ग्राहक तक्रार क्र. 03/2013
अर्ज दाखल तारीख : 05/01/2013
अर्ज निकाल तारीख: 03/10/2015
कालावधी: 02 वर्षे 09 महिने 29 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
1. प्रयागबाई श्रीराम गायकवाड,
वय - 52 वर्षे, धंदा- शेती व घरकाम,
2. कल्याण श्रीराम गायकवाड,
वय – 40, धंदा – शेती,
3. मिरा शहाजी काकडे,
वय- 38, धंदा- शेती व घरकाम,
4. संगिता जगन्नाथ मोटे,
वय – 35 वर्षे, धंदा – घरकाम,
5. महावीर श्रीराम गायकवाड,
वय – 32 वर्षे, धंदा – शेती,
सर्व रा. सरमकुंडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद. .....तक्रारदार
विरुध्द
1. मा. व्यवस्थापक तथा शाखाधिकारी,
रिलायंस जनरल इन्शरंन्स कं. लि.,
रिलायन्स सेंन्टर, वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई- 38,
2. शाखाधिकारी,
कबाल इन्शुरन्स सर्हिंसेस प्रा. लि.,
शॉप क्र. 2, दिशा- अलंकार,
कॅनाट गार्डन टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद- 431003.
3. तालूका कृषी अधिकारी,
तालूका कृषी अधिकारी कार्यालय, वाशी, विरुध्द पक्ष
कोरम : 1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र. अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री. एस.एन.माने.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री. व्ही.डी.मोरे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. प्र. अध्यक्ष सौ.विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
1) अर्जदार प्रयागबाई श्रीराम गायकवाड आणि इतर 4 अर्जदार ( मुले व मुली) यांनी विरुध्द पक्ष विमा कंपनी यांचे विरुध्द शेतकरी अपघात विमा रक्कम मिळणेसाठी तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार हे मौजे समरकुंडी ता.वाशी जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. त्यांचे मालकीचे जमीन गट नं.143/अ, 147/1/अ एकूण क्षेत्र 5 हे. 18 आर. जमीन क्षेत्र आहे. सदरहू जमीन गट नं.143, 147/1/अ एकूण क्षेत्र 05 यांचे वडील श्रीराम लक्ष्मण यांचे पती व अर्जदार क्र. 2 ते 5 यांचे वडील श्रीराम लक्ष्मण गायकवाड यांचे नावे 7/12 पत्रकामध्ये (संक्षिप्त रुपात मयत श्रीराम) यांचे नावे नोंदवलेले आहे. मयत श्रीराम हे शेतकरी असल्याने विमा योजनेस पात्र आहे.
मयत श्रीराम हे दि.17/06/2008 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास विजोरा शिवारात भाकरे यांचे शेतातील ऊस जनावरांसाठी बैलगाडीत भरत असतांना अचानकपणे त्यांचे उजवे हाताचे मनगटाजवळ सापाने चावा घेतल्याने त्यांना तात्काळ उपचाराकामी ग्रामीण रुग्णालय वाशी व त्यानंतर उस्मानाबाद येथील दवाखान्यात दाखल केले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरच्या सल्यानुसार पुढील उपचाराकामी सोलापूर येथील दवाखान्यात नेत असतांना दि.18/06/008 रोजी 6.30 वा. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला तशी अपघाती मृत्यू घटनेची नोंद पोलिस स्टेशन वाशी यांचेकडे दिल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, इन्वेस्ट पंचनामा करुन मयत श्रीराम यांचे पोष्ट मार्टेम करण्यात आले.
त्यानंतर आवश्यक क्लेमफॉर्म सोबत मुळ अर्ज, 7/12 मुळ प्रत, 8 अ ची मुळ प्रत, फेरफारची नक्कल, ( 6-ड) ची मुळ प्रत, 6-क ची मुळप्रत, तलाठयाचे प्रमाणपत्र, मुळ प्रत, अर्जदाराचे प्रमाणपत्र, मुळ प्रत, मृत्यू दाखल, शाळेचा पुरावा, मुळ प्रत, एफ.आय.आर ची मुळप्रत, घटनास्थळ पंचनामा, मुळप्रत, मराणोत्तर पंचनामा मुळ प्रत, पोष्ट मार्टेम ची मुळ प्रत, बँक पासबूक, मतदान कार्ड, सीए रिपोर्ट इ. कागदपत्राची पुर्तता करुन क्लेम फॉर्म सहीत विम्याची रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केली. वरील सर्व कागदपत्रे विप क्र.3 तालूका कृषी अधिकारी वाशी यांचेकडे दि.07/03/2009 रोजी क्लेम फॉर्म सोबत वरील सर्व कागदपत्रे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद यांचे मार्फत विप क्र.2 कबाल इन्शुरन्स सर्व्हिस प्रा.लि. औरंगाबाद यांचेकडे सादर करुन आपघात विमा रकमेचा लाभ मिळणेकामी सहकार्य करावे अशी विनंती केली. विप क्र.2 कबाल इन्शुरन्स सर्हिेसेस प्रा.लि. औरंगाबाद यांचे मार्फत विप क्र.1 विमा कंपनीकडे क्लेम फॉर्मसह संपूर्ण कागदपत्रे सादर करुन विमा रकमेची मागणी केली.
नंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उस्मानाबाद यांनी दि.25/03/2009 रोजी पुन्हा विप क्र.1 विमा कंपनीला पुर्ण कागदपत्रे पडताळून शेतक-यास विमा रकमेची मान्यता मिळावी व शेतक-यास शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा अशी पत्राव्दारे विनंती केली.
अर्जदाराने विप क्र. 1 यांचेकडे विप क्र. 2 यांचे मार्फत क्लेम फॉर्म सहीत एकूण 28 मुळ आवश्यक कागदपत्रे सादर करुन ही विप क्र. 1 विमा कंपनीने जाणूनबुजून नुकसान भरपाईची रक्कम मिळू नये म्हणून अर्जदारास आजतागायत दिली नाही त्यासंदर्भात कळवले नाही.
त्यानंतर दि.31/05/2011 रोजी विधिज्ञा मार्फत नोटीस पाठवून विमा रकमेची मागणी केली. नोटीस विमा कंपनीला प्राप्त होऊनही अद्यापर्यंत रक्कम दिलेली नाही म्हणून अर्जदारांनी प्रस्तुत तक्रारीमार्फत शेतकरी अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- 12 टक्के व्याजसह दि.25/05/2009 पासून मिळावी तसेच अर्जदाराला झालेल्या त्रासाबद्दल रक्कम रु.5,000/- तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/- मिळावे विनंती केलेली आहे.
सदर प्रकरण दि.05/08/2011 रोजी किरकोळ अर्ज क्र.16/11 म्हणून दाखल झाले. सदर प्रकरणात उशीर माफीचा अर्ज दाखल होता त्यावर युक्तिवाद होऊन सदर उशीर माफीचा अर्ज रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) खर्चासह मंजूर केला त्यावेळेस सदर उशीर माफीच्या अर्जाच्या नोटीसा विप क्र.1, 2 व 3 यांना गेलेल्या होत्या व त्यावर त्यांनी मुळ तक्रारीस म्हणणे दिलेले आहे आणि उशीर माफ खर्चावर मंजूर केल्यानंतर खर्च रक्कम रु.1,000/- भरले नंतर सदर प्रकरण ग्राहक तक्रार 3/13 म्हणून बोर्डावर घेण्यात आले.
सदर प्रकरणात विप क्र. 1 विमा कंपनीने अभिलेखावर म्हणणे दाखल केलेले आहे त्यांचे म्हणणेनुसार खोटया स्वरुपाची तक्रार दाखल केलेली आहे. मंचापुढे तक्रार चालू शकत नाही अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. तक्रार मुदतीत नाही अटी व शर्तीनुसार शेतक-याच्या पत्नीनेच विमा पॉलिसी मिळणेबाबत योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. इतर वारसांना विमा रकमेची मागणी करता येणार नाही.
मयत श्रीराम हे मृत्यू समयी शेतकरी होते व त्यांच्या मालकीची जमीन होती व ते शेती व्यवसाय करत होते हा मजकूर चुकीचा आहे. सदर मजकूर पुराव्यानीशी सिध्द करण्याची गरज आहे. विप क्र. 2 हे मध्यस्थ आहेत. हा मजकूर सिध्द करण्याची जबाबदारी विप ची आहे असे म्हंटले आहे.
मयत श्रीराम यांना उजव्या हाताला मनगटाजवळ साप चावला त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना सोलापूर येथील दवाखान्यात घेऊन जात असताना दि.18/06/2008 रोजी 6.30 वा. सुमारास वाटेत मृत्यू झाला हा मजकूर सबळ पुराव्यानिशी सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे. श्रीराम यांनी वाशी, उस्मानाबाद येथे दवाखान्यात साप चाव्याबाबत उपचार घेतल्याबाबतची कोणताही कागदोपत्री पुरावा मंचात दाखल केला नसल्याचे म्हंटले आहे.
अर्जदार यांनी पेलिस स्टेशन वाशी यांचेशी संगनमत करुन केवळ विमा रक्कम मिळावी म्हणून घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा व पी.एम. केलेले आहे जे की मान्य नाही. पुन्हा एकदा विप क्र.1 विमा कंपनीकडे रक्कम मिळणेकामी विनंती केली हा मजकूर खोटा आहे. कोणत्याही प्रकारे कर्तव्यात निष्काळजीपणा केलेला नाही अथवा रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली नाही. अर्जदाराने प्रि-मॅच्यूअर तक्रार दाखल केलेली आहे. सेवेत त्रुटी केलेली नाही. मयत शेतक-याच्या पत्नीचा प्रथम अधिकार आहे परंतू तिने विमा प्रस्ताव दाखल केलेला नाही अथवा मंजूरीसाठी विमा प्रस्ताव विप क्र. 2 कडे पाठविला नाही. मयत श्रीराम यांचा रासायनिक विश्लेषण अहवाल दाखल केल्याचे नमूद केलेले आहे. परंतू अद्यापही सदर अहवाल मंचात दाखल नाही त्यामुळे तक्रार नामंजूर करावी अर्जदार क्र.2 यांना विमा रक्कम मागणी करण्याचा अधिकार नाही. सातबारा उतारा व फेरफार दाखल केलेला नाही. त्यामुळे विप क्र. 1 यांचे विरुध्द तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.
विप क्र.2 कबाल इन्शुरन्स च्या विरुध्द योग्य ती तजवीज केली नाही म्हणून त्यांचे विरुध्द तक्रार दि.05/08/2013 रोजी खारीज करण्यात आली.
विप क्र. 3 तालूका कृषि अधिकारी यांनी त्यांचे म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे त्यांचे म्हणणे नुसारा के. श्रीराम लक्ष्मण गायकवाड रा. सरमकुंडी ता. वाशी यांचा क्लेम फॉर्म व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जदार क्र.2 कल्याण श्रीराम गायकवाड रा. सरमकुंडी ता. वाशी यांनी आमचे कार्यालयास दि.06/03/2009 रोजी सादर केले.
सदर प्रस्ताव या कार्यालयाने दि.07/03/2009 रोजी मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उस्मानाबाद यांचे मार्फत मे. कबाल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांना सादर करण्यात आला पंरतू कबाल इन्शुरंन्स ब्रोकर्स प्रा. लि. यांनी कार्यालयाशी कसलाही पत्र व्यवहार केल्याचे दिसुन येत नाही तरी या विप क्र.3 ला यांचे हद्दीत सदर अर्ज नामंजूर करण्यात यावा. अशी विनंती विप क्र.3 यांनी केलेली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत, नोटीस, क्लेम फॉर्म भाग 3, ब्रोकर यांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे प्रस्तावाचे पत्र, क्लेम फॉर्म 1 चे सहपत्र, क्लेम फॉर्म, सातबारा, फेरफार नोंदवही, वारसा प्रमाणपत्राची नोंद नक्कल, प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला, आकस्मिक मृत्यूची खबर, तहसिलदार यांना पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे उस्मानाबाद यांचे पत्र, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, समरी लेटर, शवविच्छेदन अहवाल, Medical Certificate विप ने दाखल केलेले agreement इ. कागदपत्राचे अवलोकन केले दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदाराला प्रकरण दाखल करण्यास झालेला
उशीर माफ झालेला आहे का ? होय.
2) सदर प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम करणारे
कबाल इन्शुरन्स यांना प्रकरणातून वगळण्यास प्रकरणाला
किंवा विमा रक्कम देण्यास बाधा येते काय? नाही.
3) विमा कंपनीने अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली काय ? होय
4) अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
5) काय आदेश? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
1) मुद्दा क्र.1
अर्जदाराने शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल केलेली होती. तक्रारीसोबत तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्यामुळे उशीर माफ होऊन मिळण्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आला होता सदर अर्जावर युक्तिवाद होऊन विचाराअंती अर्जदार यांना तक्रार दाखल करण्यास झालेला उशीर रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) खर्चासह होऊन अर्ज दि.12/10/2012 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे.
विमा कंपनीने त्यांचे म्हणण्याच्या परिच्छेद क्र. 3 मध्ये अशी हरकत घेतलेली आहे की, तक्रार मुदतीत दाखल केलेली नाही. परंतु अर्जदार यांना तक्रार दाखल करण्यास उशीर झाला आणि सदर झालेला उशीर माफ करुन तक्रार दाखल करावी अशा स्वच्छ हाताने मंचात आलेले आहेत त्यामुळे विमा कंपनीने घेतेलेली हरकत संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
2) मुद्दा क्र.2 : सदर प्रकरणात शेतकरी अपघात विमाही योजना शासनाने कार्यान्वित केंलेली आहे आणि सदर योजनेसाठी विमा सल्लागार म्हणून सदर प्रकरणात कबाल इन्शुरनस सर्हिेसेस प्रा. लि. औरंगाबाद यांना मध्यस्थ (ब्रोकर) म्हणून विरुध्द पक्षकार म्हणून सामील केलेले आहे. शासननिर्णय असे म्हणतो की विमा सल्लागार कंपनीने विम्याच्या दाव्यांची तपासणी, पडताळणी करावी व परिपुर्ण प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे मंजूरीसाठी सादर करावेत आणि किरकोळ अर्ज दाखल केला तेव्हा या ब्रोकरने त्यांचे म्हणणे दिलेले होते आणि त्या वेळेसच त्यांना सदर अर्जदाराचा विमा प्रस्ताव मिळालेला होता.
सदर प्रकरणात अर्जदाराने विप क्र.2 कबाल इन्शूरन्स यांना दि.04/03/2013 रोजी R.L.A.D. ने परीपुर्ण प्रस्ताव पाठवला परंतू सदर पाकिटावर ‘’सदर प्राप्तकर्ता फर्म, दिलेला पत्ता सोडून गेले करीता परत’’ दि.11/03/2013 व सही असा शेरा मारुन परत जिल्हा मंचाकडे आलेले आहे व ते पाकीट सदर फाईल ला जोडलेले आहे त्यामुळे सदर ब्रोकर नंतर कुठे गेले व त्यांचा पत्ता अर्जदाराच्या विधिज्ञांना माहित नसल्यामुळे त्यांनी त्यांचे विरुध्द काही तजविज केलेली दिसुन येत नाही आणि म्हणून दि.05/08/2013 रोजी ब्रोकर विरुध्द तक्रार रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर प्रकरणातला ब्रोकरला प्रकरणातून खारीज केल्यामुळे बाधा येत नाही.
विमा कंपनीने अशी हरकत घेतलेली आहे की, ब्रोकर असल्याशिवाय किंवा विमा प्रस्ताव विप क्र. 2 यांनी विमा कंपनीकडे मंजूरकडे पाठवलेला नाही. शासन निर्णयामध्ये अशी कुठे नोंद केलेली किंवा लिहिलेले निदर्शनास येत नाही की, अर्जदाराने ब्रोकरकडे किंवा मध्यस्थकडे विमा प्रस्ताव मंजूर करुन विमा रक्कम देऊ नये.
वास्तविक पाहता विमा रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला शासनाने दिलेले आहेत. विमा प्रस्तावात दाखल करण्यात आलेली कागदपत्राची विमा कंपनीने शहानिशा करावयाची आहे.
अर्जदाराने ज्यावेळी किरकोळ अर्ज क्र.16/11 दाखल केला होता तेंव्हा विमा सल्लागार म्हणून कबाल इन्शुरन्स यांना देखील विरुध्द पक्षकार म्हणून किरकोळ अर्जात सामील केलेले होते. त्या वेळेस त्यांना किरकोळ अर्जाची नोटीस पाठवली होती व त्यांना ती मिळाली होती व किरकोळ अर्जात त्यांनी त्यांचे म्हणणे अभिलेखवर दखल केलेले होते. त्यांचे म्हणण्यानुसार
Para 3 - We received the claim of shri shriram laxman Gaikwad voltage – saramkundi, Tq. Washi, Dist. Osmanabad. Who met an accident on 17/06/2008 and we received the claim on 15/09/2008 as the said claim was in-complete for want some document such as claim form original with bank details Tahsildar certificate with office seal originals 8 A original Inquest panchanama attested by police officer same was conveyed vide our letter dated 30/09/2008 and reminder on 13/11/2008, 21/03/2009 the insurance company has intimated the applicant vide their letter dated 23/06/2010 the applicant could not submit the required documents finally the reliance general insurance company close the claim vide their letter dated 24/11/2010 आणि से दाखल करताना हेडिंग असे लिहिलेले आहे की ‘’ The applicant cannot be our consumer on following grounds’’
वरीलप्रमाणे कबाल इन्शुरन्सला सदर प्रकरणातील प्रयागबाई यांना विमा प्रस्ताव व संबंधित कागदपत्रे मिळालेली आहेत त्यामुळे ग्राहक तक्रारीतुन जरी त्यांच्या विरुध्द तक्रार नामंजूर / रद्द केले तरी प्रकरणाला कसल्याही प्रकारची बाधा पोहचत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम देण्यास जाणून बूजून टाळाटाळ केलेली आहे कारण शासननिर्णय प्रपत्र- ड प्रमाणे प्रथम माहिती अहवाल स्थळपंचनामा, मरणोत्तर पंचनामा (इन्कवेस्ट पंचनामा), शवविच्छेदन अहवाल (पीएम रिपोर्ट), वैद्यकीय अधिका-याचे सहीशिक्याचे प्रमाणपत्र, मृत्यू दाखला इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. विमा कंपनीला ते मिळालेले आहेत तरी सुध्दा विमा कंपनीने विमा रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आणि दि.24/11/2010 रोजी विमा कंपनीने क्लेम नाकारलेला आहे असे कबाल इन्शुरन्स चे स्पष्ट म्हणणे आहे त्यामुळे सर्व कागदपत्रे प्राप्त असताना कबाल इन्शुरन्सने पाठविलेले असताना सुध्दा व प्रकरणात हजर झाले तेव्हा सुध्दा त्यांना कागदपत्रे निश्चितच मिळालेली असणार तरी सुध्दा सेटलमेंट करण्याची तयारी दर्शविलेली नाही हि सेवेतील त्रुटी आहे.
प्रपत्र 5 मध्ये नमूद केलेल्या कागदपत्राच्या आधारे नुकसान भरपाई अदा करतांना दुर्घटना सिध्द होत असेल किंवा एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत एखादया कागदपत्राची पुर्तता होऊ शकली नाही तर वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र दाखल करावे असे सुचित केलेले असतांना विमा दावा नाकारलेला आहे. त्याप्रमाणे वैदयकीय प्रमाणपत्र अभिलेखावर दाखल केलेल आहे. प्रमाणपत्र असे म्हणते की, This is to certiry that, Mr. Shriram laxman Gaikwad age 55 yrs. R/o Saramkundi tq. Washi dist. Osmanabad. Was brought at R.H.Washi on 18/06/2008 on examination his diagnosis was neuro palaytic snake bite. So he was referreded to GH Osmanabad, But on the way patient expired. So patient was brought back at R/H washi and pm was done on 18/6/08 and his cause of death is death due to cardiorespiratory arrest due to neuroparalytic snake bite. There was no doubt in the diagnosis. Hence skin was not sent to chemical analysis. Hence Certified.
वास्तविक पाहता अर्जदाराने सर्व कागदपत्रे दाखल केलेले आहेत आणि विमा कंपनीने तो जाणून बुजून नाकारलेला आहे. प्रमाणपत्रात साप चावून मृत्यू झाल्याचे सप्ष्ट म्हंटलेले आहे आणि “Skin was not sent to chemical analysis” असे स्पष्ट म्हंटलेले असल्याने रासायनिक अहवालाचा प्रश्नच येत नाही त्यामुळे विमा कंपनीने अशी हरकत घेतलेली आहे की C.A.report दाखल नाही. जर त्वचा रासायनिक अहवालासाठी पाठवलेलीच नाही तर रसायनिक अहवाल अभिलेखवर दाखल करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे विमा कंपनीने घेतलेली हरकत संयुक्तिक वाटत नाही.
विमा कंपनीने शासननिर्णय डावलून अर्जदाराचा क्लेम नाकारलेला आहे. क्लेम नाकारल्यामुळे अर्जदाराचा विमा रक्कम मिळविण्याचा हक्क संपूष्टात येत नाही विमा कंपनीने त्यांचे म्हणण्यामध्ये अशीही हरकत घेतलेली आहे की क्लेम (विमा प्रस्ताव) अर्जदाराच्या पत्नीने दाखल करावयाचा आहे. किरकोळ अर्ज 16/11 मधील कागदपत्राचे सूक्ष्म अवलोकन केले तर असे निदर्शनास येते की कबाल इंन्शुरन्सला सदर प्रकरणातील विमा प्रस्तावाची कागदपत्रे प्रयागबाई गायकवाड या नावानेच मिळालेली आहे आणि कबाल इन्शुरन्स ने सदर विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे त्याच नावाने पाठवलेला आहे हे स्पष्ट होत असताना सुध्दा विमा कंपनीने तांत्रिक कारण त्यांचे से मध्ये उपस्थित केलले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन आम्ही य निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की विमा कंपनीने अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केलेली आहे हे सिध्द होते आणि अर्जदार विमा कंपनीने क्लेम नाकारल्या पासून म्हणजेच दि.24/11/2010 पासून 9 टक्के दराने रक्कम मिळण्यास पात्र आहेत म्हणून मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक ची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) अर्जदार क्र.1 हिस विमा कंपनीने शेतकरी अपघावि विम्याची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) दि.24/11/2010 पासून 9 टक्के व्याज दराने मंचाचे आदेश पारीत दिनांका पासून 30 (तीस) दिवसात द्यावेत.
3) अर्जदार क्र.1 हिस विमा कंपनीने तक्रार खर्च रक्कम रु.2,000/-(रुपये दोन हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता
विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्र. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.