श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्यक्ष यांचे कथनान्वये.
- आ दे श -
(पारित दिनांकः 02/07/2014)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्त्याची संक्षिप्त तक्रार अशी आहे की,
वि.प. पंजाब नॅशनल बँकेच्या हनुमान नगर, मेडिकल चौक, नागपूर शाखेत तक्रारकर्त्याचे दि.23.02.2007 पासून खाते क्र. 2723000102026869 आहे.. या खात्यासोबतच तक्रारकर्त्याने वि.प.कडून एटीएम शॉपींग कार्डची सुविधा कार्ड क्र. 5126 5201 4788 0863 अन्वये घेतली होती व त्याबाबतचा गुप्त पीन क्रमांक त्यास देण्यात आला होता. दि.03.01.2012 रोजी तक्रारकर्त्याने सदर खात्यात रु.12,500/- भरणा करुन तशी नोंद पासबुकमध्ये करुन घेतली. परंतू त्याच दिवशी अचानकपणे तक्रारकर्त्याच्या दूरध्वनीवर रु.1,238/-, रु.5,976/-, रु,600/-, रु.550/- व रु.550/- खात्यातून वजा करण्यात आल्याचे एस एम एस येऊ लागले व चौकशी दरम्यान पासबुकवरील नोंदवरुन ते To Posp असे दर्शविले आहे. तक्रारकर्त्याने त्याबाबत डेबील अहवाल मागितला असता त्यात अज्ञात इसमाने मुंबई येथून सदर रकमा खर्च केल्याचे दिसून आले. तक्रारकर्त्याचे कार्ड त्याचेजवळ असतांना सदर बाब निदर्शनास आली, म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना दुरभाघ्वनी करुन वरील बाब त्यांचेही निदर्शनास आणून दिली. पुढे वि.प.क्र. 1 ते 3 काहीही करीत नाही असे पाहून पोलिस स्टेशन इमामवाडा, पोलिस आयुक्त, नागपूर येथे तक्रारी नोंदविल्या. तसेच मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन रु.8,914/- ही रक्कम द.सा.द.शे. 20 टक्केप्रमाणे परत द्यावी, शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा व एटीएम कार्ड नविन, निःशुल्क सक्रीय करुन द्यावे अशा मागण्या केल्या. आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने एकूण 8 दस्तऐवज दाखल केले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 ते 3 यांचेवर बजावली असता त्यांनी संयुक्तपणे तक्रारीस लेखी उत्तर प्राथमिक आक्षेपासह दाखल केले.
3. वि.प.क्र. 1 ते 3 ने लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेप घेतले की, तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत येत नाही, वि.प.ने कुठलीही त्रुटीपूर्ण सेवा दिली नसल्याने तक्रार मंचासमोर चालू शकत नाही, तक्रार कालमर्यादेत नाही, ती दंडासह खारीज करावी, मंचाचे संक्षिप्त कार्यप्रणालीमध्ये तक्रार निकाली निघू शकत नाही कारण सदर प्रकरणात साक्ष पुराव्याची गरज आहे व तक्रारकर्ता आणि वि.प. मा. मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही, म्हणून सदर तक्रार खारीज करावी अशी मागणी केलेली आहे.
4. आपल्या लेखी उत्तरात वि.प.क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याचे खाते त्यांचे बँकेत असल्याची बाब मान्य करुन, एटीएम कार्डचा पिन कोड हा गुप्त होता व तो फक्त तक्रारकर्त्याला माहित होता. वि.प.ने तक्रारकर्त्याला काढलेल्या रकमेबाबत त्वरित माहिती दिली, तसेच त्याने पुढे तक्रारकर्त्याने दि.05.01.2012 च्या पत्रावर त्वरित कारवाई करुन तक्रारकर्त्याला अपेक्षित असलेली सर्व माहिती पुरविली. त्यामुळे वि.प.ने सेवेत त्रुटी केलेली नाही. तक्रारकर्त्याने स्वतः मुंबईतील अज्ञात इसमाने सदर रक्कम काढली आहे असे नमूद केल्याने वि.प.चा यासोबत कुठलाही संबंध नाही.
तक्रारकर्त्याने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे व त्यांचा तपास सुरु आहे, त्यामुळे सदर प्रकरण हे अपरिपक्व स्वरुपाचे आहे. तक्रारकर्त्याने पोलिसांच्या तपासाची अंतिम अहवालाची प्रत सादर केलेली नाही आणि सदर अहवालाशिवाय सदर तक्रारीवर विचार करता येणार नाही. तक्रारकर्त्याने त्याचे अपरीमीत नुकसान झालेले आहे व त्याची किंमत पैशात मोजता येत नाही, असे नमूद केले आहे. मंचाला रु.20,00,000/- इतक्या रकमेपर्यंतच्या प्रकरणांचा विचार करता येतो, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही संदिग्ध स्वरुपाची असून मंचाच्या अधिकार क्षेत्राबाहेरची आहे. म्हणून सदर तक्रार योग्य कोर्ट फी अभावी व अधिकार मर्यादेअभावी खारीज करावी अशी मागणी वि.प.क्र. 1 ते 3 यांनी केलेली आहे.
5. सदर प्रकरणाच्या निर्णयासाठी खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ आले, त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.क्र. 1 ते 3 ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार
केला आहे काय ? नाही.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3) अंतिम आदेश काय ? तक्रार खारीज.
-कारणमिमांसा-
5. मुद्दा क्र. 1 बाबत – सदर प्रकरणात वि.प. पंजाब नॅशनल बँकेच्या हनुमान नगर, नागपूर शाखेत तक्रारकर्त्याचे खाते क्र. 2723000102026869 असून या खात्यासोबतच तक्रारकर्त्यास एटीएम शॉपींग कार्डची सुविधा कार्ड क्र. 5126 5201 4788 0863 अन्वये दिली असल्याचे वि.प.ने कबूल केले आहे. तक्रारकर्त्यास गोपनिय पिन क्रमांक देण्यांत आला होता. तसेच तक्रारकर्त्याने सदर खात्यात दि.03.01.2012 रोजी रु.12,500/- भरले आणि त्याच्या खात्यातून त्याचदिवशी रु.1,238/-, रु.5,976/-, रु,600/-, रु.550/- व रु.550/- वजा करण्यात आल्याचे एसएमएस वि.प.कडून पाठविण्यांत आल्याची बाब देखिल वि.प.नी नाकारलेली नाही.
6. तक्रारकर्त्याचे अधिवक्ता श्री वर्मा यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले कि, तक्रारकर्ता दि.व3.11.2012 रोजी नागपूर येथे हजर होता व त्याचे एटीएम कार्ड त्याचेसोबत नागपूर येथे होते. त्याच्या खात्यातून खरेदी केल्याबाबत पैसे कपात केल्याचे मेसेज येवू लागल्याचे समजताच त्याने वि.प.बॅकेच्या शाखेत जावून व्यवस्थापकांस आपले जवळील एटीएम कार्ड दाखविले व तो नागपूर येथे हजर असतांना कपात झालेल्या रकमेची मुंबईत खरेदी करणे अशक्य असल्याचे सांगितले. बॅकेकडे गोपनिय स्वरुपात असलेल्या माहितीचा वापर करुन अन्य इसमाने डुप्लिकेट एटीएम कार्ड बनवून तक्रारकर्त्याच्या खात्यावर खरेदी केली. यावरुन वि.प.बॅकेने तक्रारकर्त्याच्या एटीएम कार्डच्या गोपनिय माहितीसंबंधाने सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली नाही व त्यामुळे अन्य इसमास तक्रारकर्त्याच्या एटीएम पिन नंबरची माहिती चोरणे व खात्यावर खरेदी करणे शक्य झाले. बॅकेने ग्राहकाच्या गोपनिय माहितीबाबत योग्य काळजी न घेणे ही सेवेतील न्यूनता आहे व म्हणून वि.प.बॅक तक्रारकर्त्याची झालेली नुकसान भरुन देण्यास पात्र आहे.
तक्रारकर्त्यातर्फे युक्तिवादाचे पुष्टयर्थ खालील दस्तऐवज दाखल केले आहेत.
1. पासबुकची झेरॉक्स प्रत.
2. एटीएम कार्डची झेरॉक्स प्रत
3. तक्रारकर्त्याने त्याच्या खात्यातील व्यवहारांची नोंदी मागण्यासाठी दि.05.01.2012 रोजी वि.प.बॅकेला दिलेले पत्र
4. वि.प.बॅकेने दि.03.01.2012 रोजीच्या व्यवहारांच्या नोंदीबाबत दिलेली माहिती.
5. तक्रारकर्त्याने दि.09.03.2012 रोजी इमामवाडा पो.स्टे.नागपूरला दिलेली तक्रार.
7. यावर प्रतिवाद करतांना वि.प.चे अधिवक्ता श्री पुरोहित यांनी सांगितले कि, एटीएम कार्ड सोबत तक्रारकर्त्यास दिलेला पिन नंबर हा गोपनिय असून तो फक्त तक्रारकर्त्यासच माहिती होता. तक्रारकर्त्याने एटीएम कार्डचा वापर जर सुरक्षितपणे केला नाही तर, त्याचा पिनकोड इतरास माहित होवू शकतो व यांत वि.प.बॅकेचा कोणताही निष्काळजपणा नाही. तक्रारकर्त्याच्या निष्काळजीपणामुळे त्याचा पिन कोड इतराने माहित करुन घेतला किंवा चोरला व त्याचा दुरुपयोग करुन एटीएम कार्डवर खरेदी केली असेल तर त्यास तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा कारणीभूत असून त्यासाठी वि.प.ला जबाबदार धरता येत नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या एटीएम कार्डवर मुंबईत खरेदी केल्यामुळे त्याला त्याबाबतचे एसएमएस अलर्ट मेसेज वि.प.बॅकेकडून त्वरीत पाठविण्यांत आले. तसेच सदर व्यवहाराची माहिती तक्रारदाराने दि.05.01.2012 रोजी वि.प.कडे मागितली व व ती अविलंब तक्रारकर्त्यास पुरविण्यांत आली. तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन इमामवाडा येथे दि.09.03.2012 रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये अज्ञात इसमाने मास्टरकार्ड डुप्लिकेट तयार करुन मुंबई येथे खरेदी केल्याचे नमुद केले आहे. तसेच मंचासमोर दाखल तक्रारीमध्ये देखिल मुंबई येथे अज्ञात इसमाने तक्रारकर्त्याच्या एटीएम नंबरचा वापर करुन रकमा खर्च केल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याच्या पिन नंबरची चोरी करुन अन्य इसमाने तक्रारकर्त्याच्या खात्यातील रकमांवर खरेदी केली असेल तर तक्रारकर्त्याच्या निष्काळजीपणे एटीएमकार्ड हाताळण्याच्या कृतीस वि.प. किंवा तिचे अधिकारी जबाबदार नाही. तक्रारकर्त्यानी पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुध्द दिलेल्या तक्रारीचा अंतीम अहवाल अजून प्राप्त झालेला नाही म्हणून सदर प्रकरणांत कोणाची चुक आहे हे सिध्द झालेले नसल्याने तक्रार अपरिपक्व आहे.
8. सदर प्रकरणांत तक्रारकर्त्याच्या बॅक खात्याचे जे पासबुक दाखल केले आहे त्यावरुन त्याने दि.03.01.2012 रोजी आपल्या खात्यात रु.12,500 जमा केल्यानंतर खात्यातील एकुण शिल्लक रु.15,600 झाली होती. त्याच दिवशी तक्रारकर्त्याच्या खात्यातून अनुक्रमे रु.1,238/-, 5976/-, 600/-, 550/-, आणि 550/- अशी एकुण रक्कम रु.8,914/- सदर खात्याच्या एटीएम चा मुंबई येथे वापर करुन खरेदीसाठी खर्च करण्यात आल्याचे बॅकेने तक्रारकर्त्यास दि.05.01.2012 रोजी पुरविलेल्या सदर खात्यावरील दि.03.01.2012 च्या व्यवहारांच्या डिटेल्सवरुन स्पष्ट होते. परंतु सदर व्यवहारात बॅकेच्या कर्मचा-यांनी एटीएमबाबत गोपनिय माहिती अन्य व्यक्तिस उपलब्ध करुन दिली व त्यामुळे बॅकेच्या निष्काळजीपणामुळे अन्य व्यक्सिस एटीएम कार्डचा गैरवापर करणे शक्य झाल्याचे तक्रारकर्त्याने तक्रारीत म्हटलेले नाही व तसा कोणताही पुरावाही मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याच्या चुकीच्या पध्दतीने एटीएम कार्ड हाताळण्यामुळे जर इतर व्यक्तिने तक्रारकर्त्याचा पिन कोड हॅक करुन त्याचा दुरुपयोग केला असेल तर त्यासाठी वि.प. बॅकेला जबाबदार धरता येणार नाही व तक्रारकर्त्याच्या झालेल्या नुकसानीस वि.प.बॅकेची सेवेतील त्रुटी कारणीभूत आहे असे अनुमान काढता येणार नाही. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
9. मुद्दा क्र. 2 बाबतः- मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.क.कडून सेवेत कोणताही त्रुटीपूर्ण व्यवहार झाला नसल्याने, तक्रारकर्ता वि.प.विरुध्द मागणी केलेली दाद मिळण्यास पात्र नाही.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-आदेश-
1. तक्रारकर्त्याचा ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार अर्ज खारीज करण्यांत येत आहे.
2. उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
3. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यांत यावी.
4. प्रकरणाची ब व क फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.