तक्रार दाखल ता.22/04/2015
तक्रार निकाल ता.17/11/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे.
1. प्रस्तुतची तक्रार वि.प.कंपनी यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मे.मंचात दाखल केली आहे.
2. प्रस्तुत कामी वि.प.यांना नोटीस बजावून देखील मा.मंचात हजर नाहीत. सबब, दि.20.01.2016 रोजी वि.प.यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आलेला आहे. तक्रारदार तर्फे युक्तीवाद ऐकला. वि.प.गैरहजर. सदरचा तक्रार अर्ज गुणदोषावर निकाली करणेत आला.
3. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे इचलकरंजी येथील रहिवाशी आहेत. वि.प.ही कंपनी त्यांचे ग्राहकाकडून ठेवीची रक्कम स्विकारुन ती परतफेड करते. या कंपनीचे त्यांचे ग्राहकाकडून ठेवीची रक्कम स्विकारुन ती परतफेड करते. तक्रारदारांनी वि.प.यांचेकडून खालीलप्रमाणे ठेव रक्क्मा सात वर्षाचे मुदतीने कोल्हापूर येथील ऑफीसमध्ये घेतलेल्या आहेत.
क्र. | ठेव घेतलेली तारीख | ठेव रक्कम रुपये | ठेव पावतीचा एस नंबर | ठेव पावतीची तारीख | मुदतीअंती परतफेडीची रक्कम रु. | रजिस्टर नंबर |
1 | 30.03.2007 | 20,000/- | SQDZ-1694736 | 30.03.2014 | 45,614/- | UO-71143883 |
2 | 30.03.2007 | 20,000/- | SQDZ-1694737 | 30.03.2014 | 45,614/- | UO-71143884 |
एकूण रक्कम | 91,228/- | |
वर नमुद केलेप्रमाणे तक्रारदारांचेकडून वि.प.यांनी दि.30.03.2007 रोजी एकूण रक्कम रु.40,000/- दोन ठेव पावत्यांनी घेतलेल्या आहेत. सदर ठेवीची परतफेडीची मुदत दि.30.03.2014 रोजी होती व मुदतीअंती वि.प.यांनी एकूण रक्कम रु.91,228/- तक्रारदारांना देणेची जबाबदारी स्विकारलेली आहे व तशी हमी व खात्री व भरवसा तक्रारदारांना देणेची जबाबदारी यातील वि.प.यांनी दिलेली आहे. दि.30.03.2014 रोजी मुदत संपलेनंतर तक्रारदारांनी त्यांचे सदर ठेवीची रक्कम परत मिळणेची मागणी वि.प.यांचकडे केली असता, वि.प.यांनी तक्रारदारांचेकडील अस्सल ठेव पावत्या त्यांचे कोल्हापूर येथील ऑफीसमध्ये जमा करणेस सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने त्यांच्या ठेवीच्या अस्सल पावत्या वि.प.यांचे कोल्हापूर येथील ऑफीसमध्ये दि.29.04.2014 जमा केल्या. याबद्दल कोल्हापूर येथील ऑफीसमधून वि.प.यांना दि.29.04.2014 रोजी टोकण क्र.45234 व 45235 ची पावती दिली व त्यावेळी वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारांचे ठेवीची रक्कम रु.91,228/- व त्यावर 15 टक्के दि.30.03.2014 पासूनचे व्याज अशी रक्कम माहे जून-2014 मध्ये देणेत येईल असे सांगितले. माहे जून-2014 मध्ये तक्रारदारांनी सदरची व्याजासह रक्कम वि.प. यांचेकडे मागितली असता व तगादा लावला असता त्यांनी तक्रारदारांची ठेव रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदारांनी दि.28.02.2015 रोजी त्यांचे वकील-श्री.पी.यु.समडोळे, यांचेमार्फत वि.प.यांना नोटीस पाठवून त्यांचे ठेवीच्या रकमेची मागणी केली. सदरची नोटीस वि.प.यांना मिळूनही त्यांनी तक्रारदाराचे ठेवीची रक्कम तक्रारदारांना दिली नाही. तथापि तक्रारदार हे वयोवृध्द गृहस्थ असून त्यांना त्यांचे पत्नीचे उपजिवीकेसाठी, जेवणखाण, औषधोपचारासाठी सदर ठेवींची नितांत गरज असताना तसेच सदरहू रक्कमेची मुदत संपूनही वि.प.यांनी तक्रारदारांना रक्कम दिली नाही. त्यामुळे वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्याने तक्रारदारांनी सदरहू तक्रार मंचात दाखल करुन पुढीलप्रमाणे विनंत्या केलेल्या आहेत. पावती नं.एक्सडीझेड 1694736 व युओ नं.71143883 दि.30.03.2007 प्रमाणे दि.30.03.2014 रोजी मुदत संपलेने तक्रारदार यांना वि.प.यांचेकडून मिळणेची रक्कम रु.45,615/- व पावती नं.1694737 व युओ नं.71143884 दि.30.03.2007 प्रमाणे दि.30.03.2014 रोजी मुदत संपलेने तक्रारदारांना वि.प.यांचेकडून मिळणेची रक्कम रु.45,614/- तसेच तक्रारदारांना झाले मानसिक त्रासापोटी होणारी रक्कम रु.1,000/- व वि.प.यांचेकडून ठेवीची रक्कम परत मिळणेसाठी झालेला खर्च व या अर्जाचा खर्च रक्कम रु.1,000/- अशी एकूण रक्कम रु.93,228 ची मागणी तक्रारदारांनी केलेली आहे. तसेच सदरहू रक्कमेवर दि.31.03.2014 पासून सदरची ठेव रक्कम रु.91,228/- तक्रारदारांना मिळेपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे.15टक्के प्रमाणे व्याज देणेचा आदेश वि.प.यांना हुकूम व्हावा अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
4. तक्रारीसोबतचे कागदपत्रे एकूण आठ दाखल केलेली असून ती पुढीलप्रमाणे आहेत. वि.प.यांचेकडे तक्रारदारांनी रक्कम रु.20,000/- ठेवलेची पावतीची झेरॉक्स प्रत, वरील प्रमाणे पावतीची झेरॉक्स प्रत, तक्रारदारांनी वि.प.यांचेकडे एकूण रक्कम रु.20,000/- गुंतविलेची पावतीची प्रत व या रक्कमेचा विनीयोग केलेची पावती, वरीलप्रमाणे पावती, वि.प.यांनी अस्सल ठेव पावत्या घेऊन रक्कमा देतो असे सांगून टोकण नंबरची पावती, तक्रारदारांना दिलेल्या पावतीची झेरॉक्स प्रत, वि.प.यांना तक्रारदारांनी वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसची प्रत, सदरची नोटीस वि.प.यांना मिळालेची पोस्टाची आरपीडीची पावती, सदरची नोटीस वि.प.क्र.2 यांना मिळालेची पोस्टाची पावती आणि दि.08.11.2016 रोजीचे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र तसेच दि.08.11.2016 रोजी वि.प.कंपनी तर्फे त्यांचे वकील अॅड.मनिषकुमार यांनी तक्रारदारांचे नोटीसीस दिलेले उत्तर, सदर नोटीस पाठविलेला लखोटा, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रांचा विचार करता खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | वि.प.कंपनी यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून ठेव रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशत: मंजूर |
कारणमिमांसा:-
6. मुद्दा क्र.1 :- प्रस्तुत कामी तक्रारदारांनी वि.प.कंपनीने न्यायनिर्णयातील कलम-3 मध्ये नमुद केलेप्रमाणे ठेव रक्कमा गुंतविलेल्या होत्या. सदरचे ठेवपावत्या तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेला असून त्याचा S.No.YCA 1694736, S.No.YCA 1694737 असा आहे. सदरच्या पावत्याची छायांकीत प्रत तक्रारदारांनी प्रस्तुत कामी दाखल केल्या आहेत. सदरच्या पावत्यांवर वि.प. PACL INDIA LIMITED यांचे नाव नमुद आहे. तसेच Authorized Signatory यांची सही व शिक्का आहे. सदरच्या ठेव पावत्या वि.प.कंपनी यांनी मा.मंचात हजर होऊन नाकारलेल्या नाहीत. सबब, सदरच्या ठेव पावत्यावरील ठेव स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमांचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. कंपनीचे ग्राहक आहेत हे स्पष्टपणे सिध्द होते.
7. तक्रारदारांनी दाखल केलेल्या ठेवपावत्यांचे या मंचाने अवलोकन केले असता, सदरच्या ठेव पावत्या वि.प.कंपनी दि.30.03.2007 रोजी ठेवलेल्या होत्या. Consideration Rs.20,000/- 400.11 sq.yd. नमुद असून Mode of payment-single नमुद आहे. Estimated Realizable-45,014.00 नमुद आहे. Expiry Date of Agreement-30.03.2014 नमुद आहे. वरील ठेव पावत्यांवरुन तक्रारदारांना सदरच्या ठेवपावत्याची एकूण रक्कम दि.30.03.2014 रोजी अखेर अनुक्रमे रक्कम रु.45,614/- अशी मिळणार होती हे दिसून येते. सदरचे एकूण रक्कमेची मागणी तक्रारदारांनी दि.30.03.2014 रोजी मुदत संपलेनंतर वि.प.कंपनी यांचेकडे केली असता, वि.प.कंपनी यांनी सदरचे अस्सल ठेवपावत्या कोल्हापूर ऑफीसमध्ये जमा करणेस सांगितले. तक्रारदारांनी त्यांचे ठेवीच्या अस्सल पावत्या वि.प.यांचे कोल्हापूर ऑफीसमध्ये दि.29.04.2014 रोजी जमा केल्या व वि.प.कंपनी यांनी दि.29.04.2014 रोजी टोकन क्र.45234 व 45235 ची पावती दिली. सदरचे पावत्यांची झेरॉक्स प्रतीं तक्रारदारांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या आहेत. वि.प.कंपनी यांनी सदरचे ठेवपावतीवरील एकूण रक्कम रु.91,228/- व त्यावरील दि.30.03.2014 रोजीपासूनचे व्याज अशी रक्कम माहे जून-2014 पर्यंत तक्रारदारांना देणेत येईल असे सांगितले असे तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये कथन केले आहे. त्यानुसार तक्रारदारांनी सदरचे व्याजासह रक्कमेची मागणी वि.प.यांचेकडे केली असता, वि.प.यांनी सदरची ठेव रक्कम दिली नाही. दि.28.02.2015 रोजी तक्रारदारांचे त्यांचे वकीलामार्फत वि.प.कंपनी यांना नोटीस पाठविली. सदरचे नोटीसीस दि.06.04.2015 रोजी वि.प.कंपनीने उत्तर दिलेले आहे. तक्रारदारांनी सदरची वि.प.यांनी दिलेल्या उत्तराची प्रत मंचात दाखल केलेली आहे. सदरचे नोटीसीचे या मंचाने अवलोकन केले असता, As the bank accounts of the company are lying frozen, PACL has been rendered unable to fulfill its obligation towards customers असे नमुद आहे. म्हणजेच वि.प.कंपनी यांनी तक्रारदारांची रक्कम देणेस असमर्थता दाखविलेली आहे हे दिसून येते.
8. सबब, वरिल सर्व कागदपत्रांचा विचार करता, प्रस्तुत कामी वि.प.हे मा.मंचात हजर नाहीत. वि.प.यांना संधी देऊन देखील म्हणणे दाखल नाही. सबब, वि.प.कंपनी यांनी तक्रारदारांची ठेव रक्कम व्याजासह आजअखेर परत न देऊन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
9. मुद्दा क्र.2 व 3:- उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार वि.प.यांचेकडून न्यायनिर्णय कलम-3 मधील एकूण रक्कम रु.91,228/- व सदर रक्कमेवर दि.31.03.2014 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द. शे.9टक्के व्याज दराप्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदारांना सदरचे रक्कमेची तातडीने गरज असताना सदरची रक्कम तक्रारदारांना दिलेली नाही. त्याकारणाने झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- तक्रारदार हे वि.प.यांचेकडून मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
10. मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच प्रस्तुत कामी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.यांनी तक्रारदारांना न्यायनिर्णयातील कलम-3 एकूण रक्कम रु.91,228/- (अक्षरी रक्कम एक्यानऊ हजार दोनशे अठ्ठावीस फक्त) अदा करावी. तसेच सदर रक्कमेवर दि.31.03.2014 रोजी पासून सदर संपुर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे.9टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारांना अदा करावे.
3 वि.प.यांनी तक्रारदारांना झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार फक्त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार फक्त) अदा करावेत.
4 वर नमुद आदेशामधील रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज अदा केले असल्यास अगर त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
5 वरील सर्व आदेशांची पुर्तता वि.प.कंपनीने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
7 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.