निकाल
दिनांक- 05.12.2013
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार जगदीश दत्तात्रय शिंदे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांनी स्वतःचे वापरासाठी हिरो होंडा पॅशन मोटार सायकल एम.एच.-23-जे-2881 घेतली होती.सदरील मोटार सायकल सांगली को-ऑप बँक शाखा बीड यांचेकडून कर्ज घेऊन खरेदी केली होती.त्रकारदार हे सदरील मोटार सायकलचा वापर स्वतःसाठी करीत होते. तक्रारदार हे वकिली व्यवसाय करतात. दि.30.08.2007 रोजी संध्याकाळी 6 वाजता तक्रारदार यांनी सदरील मोटार सायकल त्यांचे निवासस्थान निवारा बिल्डींग न्र.2 सहयोग नगर बीड येथे हॅण्डल लॉक करुन लावली होते. दि.31.08.2007 रोजी सकाळी तक्रारदार यांचे लक्षात आले की त्यांची मोटार सायकल चोरी गेलेली आहे. तक्रारदार यांनी लगेचच बिड शहर पोलिस स्टेशन येथे जाऊन मोटार सायकल चोरी झाल्या बाबत तक्रार दिली. तसेच तक्रारदार यांनी सांगली को-ऑप बॅक यांनाही कळविले. सामनेवाले यांना सदरील मोटार सायकल चोरी झाल्या बाबत कळविले. तक्रारदार यांनी सदरील मोटार सायकलचा विमा सामनेवाले यांचेकडे उतरविलेला होता. विम्याचा कालावधी दि.30.07.2007 ते 29.07.2008 पर्यत होता. तक्रारदार यांचे मोटार सायकलची चोरी पॉलिसी कालावधीत झाली. तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रासह दि.08.10.2007 रोजी सामनेवाले यांचे कडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून क्लेम दाखल केला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे क्लेम मंजूर न करता दि.10.06.2010 रोजी तक्रारदार यांना कागदपत्राची पुर्तता केली नाही म्हणून क्लेम नाकारला आहे असे कळविले. तक्रारदार यांनी क्लेम मिळणेकामी आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पुर्तता केली होती असे असतानाही सामनेवाले यांनी कोणतेही संयूक्तीक कारणाशिवाय तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे.सबब, तक्रारदार यांनी विनंती केली आहे की, सामनेवाले यांनी क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांना नुकसान भरपाई रु.90,000/- मिळावी व त्यावर व्याज मिळावे तसेच तक्रारीचा खर्च मिळावा ही मागणी केली आहे.
सामनेवाले विमा कंपनी मंचासमोर हजर झाली व त्यांनी नि.9 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी आवश्यक ते कागदपत्राची पुर्तता मागणी करुनही केली नाही. त्यामुळे विमा क्लेम नाकारण्यात आला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम रास्त व योग्य कारणासाठी नाकारला आहे. तक्रारदार यांनी दि.4.9.2007 रोजी सामनेवाले यांचेकडे अर्ज देऊन सदरील मोटार सायकल चोरी झाल्या बाबत कळविले. तदनंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कागदपत्राची पुर्तता करण्यास सांगितले, त्यासाठी वेळोवेळी पत्रही पाठविले. शेवटी दि.01.07.2008 रोजी तक्रारदार यांना कागदपत्राची पुर्तता करावी असे कळविले परतु तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता केली नाही म्हणून तक्रारदार यांचा क्लेम नाकारण्यात आला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारी सोबत नि.3 अन्वये कागदपत्र हजर केले आहेत. सामनेवाले यांनी नि.12 सोबत कागदपत्र दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.13 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी नि.11 अन्वये शपथपत्र हजर केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुरावा यांचे अवलोकन केले, सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व पुरावा यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री. काकडे यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन
सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी
शाबीत केली आहे काय ? होय.
2. तक्रारदास हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत
काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.काकडे यांनी यूक्तीवादात सांगितले की, सामनेवाले यांचेकडे सर्व कागदपत्राची पुर्तता करुनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे. तक्रारदार यांची मोटार सायकल चोरीला गेलेली होती. त्या बाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांना मुदतीत कळविले आहे. तक्रारदार यांनी कागदपत्र हजर करुनही सामनेवाले हयांनी संयूक्तीक कारणाशिवाय तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे.
सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांना वेळोवेळी कळवूनही त्यांनी आवश्यक ते कागदपत्र हजर केले नाही म्हणून सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे.
वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा व कागदपत्र यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेला पुरावा व कागदपत्र यांचे अवलोकन केले. या मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांची मोटार सायकल दि.30.08.2007 ते 31.08.2007 रात्रीचे वेळात चोरी झाली. सदरील मोटार सायकल चोरी झाल्याबाबत तक्रारदार यांनी बीड शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद नोंदवलेली आहे. तसेच ज्या बँकेकडून कर्ज काढले आहे त्या बँकेला कळविले आहे. सामनेवाले यांना त्या बाबत कळविण्यात आले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सर्व कागदपत्राची पुर्तता करुन क्लेम दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्रावरुन तक्रारदार यांना क्लेम मिळण्यासाठी आवश्यक त्या बाबीची पुर्तता केल्याचे निदर्शनास येते. सदरील मोटार सायकलचा विमा हा सामनेवाले यांचेकडे उतरविलेला होता व पॉलिसी वैध होती. सामनेवाले यांना क्लेम नाकारण्यास कोणतेही संयूक्तीक कारण नव्हते. सदरील वाहन तक्रारदार यांनी बँकेकडून कर्ज घेऊन घेतले होते. सामनेवाले हयांनी त्या बाबत कागदपत्राची मागणी केली असता तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता केल्याचे निदर्शनास येते. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीत सदरील मोटार सायकलचे नुकसानीपोटी रु.90,000/- मिळणेची मागणी केली आहे. सदरील मोटार सायकल तक्रारदार यांनी वर्ष 2001 मध्ये घेतल्याचे निदर्शनास येते. सदरील मोटार सायकलची चोरी दि.30.08.2007 रोजी रात्रीचे वेळी झालेली आहे. सदरील मोटार सायकलचे उत्पादन वर्ष लक्षात घेता व मोटार सायकल चोरीस गेल्याचे वर्ष लक्षात घेता, सदरील मोटार सायकल तक्रारदार यांनी सात वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता वापरल्याचे दिसते. तक्रारदार यांनी तक्रारी सोबत सामनेवाले यांचे कडे जी विम्याची रक्कम भरली आहे व त्या वाहनाची व्हॅल्यू आहे या बाबत दस्ताऐवज दाखल केलेले नाहीत. सदरील वाहनाचे क्लेम मध्ये नमूद केलेली रक्कम पाहता तक्रारदार यांना रु.30,000/- ची मागणी केलेली आहे, सदरील बाबत सामनेवाले यांनी वाद उपस्थित केलेला नाही. मंचाचे मते तक्रारदार हे नुकसान भरपाईपोटी रु.30,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.1500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना मोटार सायकल चोरी बाबत विमा पॉलिसीचे अंतर्गत रक्कम
रु.30,000/-(अक्षरी रुपये तिस हजार फक्त) निकाल कळाल्यापासून 30
दिवसांचे आंत दयावेत. सदरील रक्कम 30 दिवसांचे आंत न दिल्यास
त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज तक्रार दाखल दि.20.07.2011 पासून
संपुर्ण रक्कम वसुल होईपर्यत दयावे.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.1500/- व दाव्याच्या
खर्चापोटी रक्कम रु.1000/- दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.