आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेची रक्कम मिळण्याबद्दल दाखल केली आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्त्याची आई मुक्ता वासुदेव घोडीचोर ही शेती व्यवसाय करीत होती व ती कुटुंबप्रमुख होती. दिनांक 07/07/2008 रोजी ती आपल्या शेतातील निंदण काढण्याकरिता गेली असता तिला विजेचा धक्का लागून ती शेतातील विहीरीत उंचावरून पडल्यामुळे तिचा अपघाती मृत्यु झाला. घटनेबाबत तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन, लाखांदूर येथे माहिती दिली. त्यानुसार पोलीस स्टेशन, लाखांदूर यांनी अकस्मात मृत्यु क्र. 26/2008 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून संपूर्ण कागदपत्रे तयार केली. 3. तक्रारकर्त्याच्या आईच्या नावाने मौजा चिचोली येथे भूमापन क्रमांक 66, आराजी .50 हे. आर. ही शेत जमीन होती. आईच्या अपघाती मृत्युनंतर तक्रारकर्ता व त्याच्या दोन बहिणी हे त्यांचे वारस आहेत. आईच्या अपघाती मृत्युनंतर तक्रारकर्त्याने तलाठ्यामार्फत शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मिळण्याकरिता रितसर अर्ज केला व आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे पाठविला. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 07/01/2009 रोजी पाठविलेल्या पत्रानुसार तक्रारकर्त्याने आवश्यक त्या कागदपत्रांची पुन्हा दिनांक 16/01/2009 रोजी पूर्तता केली. सदर दस्तऐवज विरूध्द पक्ष क्र. 1 यांना प्राप्त झाले. तरी सुध्दा विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 11/05/2009 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून कागदपत्राची पूर्तता वेळेत न केल्यामुळे दावा अस्विकृत करून फाईल बंद करण्यात येते असे कळविले. त्यामुळे तक्रारकर्त्याने आपल्या वकिलामार्फत दिनांक 23/12/2010 ला विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठविली. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी नोटीसची पूर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारा मोबदला रू. 1,00,000/- व्याजासह मिळण्याची तसेच तक्रारीचा खर्च मिळण्याची विनंती केली आहे. 4. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे अनुक्रमे 18 दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 5. मंचाचा नोटीस विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी त्यांचे उत्तर कुरिअरद्वारे पाठविले तर विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी त्यांचे उत्तर दस्तऐवजासह दाखल केले. विरूध्द पक्ष क्र. 1 यांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल केले नाही, परंतु युक्तिवादाच्या वेळी त्यांनी युक्तिवाद केला. 6. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज व त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावरून मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? -ः कारणमिमांसा ः- 7. तक्रारकर्त्याच्या आईचा मृत्यु अपघाती झाला याबाबत दोन्ही पक्षांना वाद नाही. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 यांचे लेखी उत्तर व दाखल केलेले दस्तऐवज यावरून ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्त्याने आवश्यक ते संपूर्ण कागदपत्र विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे मुदतीमध्ये सादर केलेले आहेत. विरूध्द पक्ष क्र. 1 यांना ते कागदपत्र प्राप्त झाले याबाबतची पोचपावती सुध्दा तक्रारकर्त्याने दाखल केलेली आहे. वास्तविक पाहता शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभग्रस्त शेतक-याकडून एखादे कागदपत्र विमा मंजूर करण्यासाठी कमी पडत असेल तर अशा परिस्थितीत विमा कंपनीने स्वतः महसूल यंत्रणा तसेच कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचेद्वारा ते दस्तऐवज प्राप्त करून तक्रारीचा निपटारा शक्यतोवर लवकर केला पाहिजे अशी योजना असतांना देखील विरूध्द पक्ष क्र. 1 तक्रारकर्त्यास त्या कागदपत्राची मागणी करतात आणि त्याने ते कागदपत्र दिल्यावर सुध्दा कागदपत्र प्राप्त झाले नाही या कारणास्तव तक्रारकर्त्याची फाईल बंद करतात ही विरूध्द पक्ष क्र. 1 यांची कृती निश्चितच त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता विमा रक्कम रू. 1,00,000/- व्याजासह मिळण्यास तसेच तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार विरूध्द पक्ष क्र. 1 विरूध्द मान्य होण्यास पात्र आहे. विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 च्या सेवेत त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द तक्रार खारीज करण्यात येते. करिता आदेश. आदेश तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरूध्द पक्ष क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या मृतक आईच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. व्याजाची आकारणी दिनांक 07/07/2008 पासून तर संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्याच्या हाती पडेपर्यंत करण्यात यावी. 2. विरूध्द पक्ष क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी प्रस्तुत तक्रारीच्या खर्चापोटी तक्रारकर्त्याला रू. 1,000/- द्यावे. 3. विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारे त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 4. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आंत करावे.
| HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | , | |