जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
ग्राहक तक्रार क्रमांक – ११७/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २५/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २२/०५/२०१४
जितेंद्र रामचंद्र शिंदे - तक्रारदार
उ.व.४२ वर्षे, धंदा – नोकरी
राहणार- कुसुंबा,ता.जि.धुळे.
विरुध्द
मा.मॅनेजरओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि. सामनेवाले
के.एम.भावसार कॉम्प्लेक्स,
गल्ली नं.५, धुळे. ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.बी.पी.पवार)
(सामनेवाले तर्फे – वकिल श्री.सी.के.मुगुल)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्यामुळे, सामनेवाले यांच्याकडून वाहनाच्या विमा क्लेमची रक्कम मिळावी या मागणीसाठी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सन २००९ साली इंडिका कार विकत घेतली. तिचा विमा सामनेवाले यांच्याकडे रक्कम रु.२,७९,५००/- हा फुल कॉम्प्रेहेन्सीव्ह काढला आहे. दि.१२-०६-२०११ रोजी सदर वाहन तक्रारदाराचे मित्र शिरपूर येथे घेवून जात असतांना, वाहन पलटी होऊन खड्यात पडल्याने अपघात झाला आहे. त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे. त्याकामी संबंधीत पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. सदर वाहनाची दुरुस्ती करण्याकामी तक्रारदार यांनी रक्कम रु.२,७८,७४४/- इतका खर्च केला. त्याचप्रमाणे सामनेवाले यांच्याकडे क्लेम दाखल केला. त्यानंतर सामनेवाले यांनी सदर वाहनाचा टोटल लॉस या कामी क्लेम मंजूर करुन तक्रारदारांना कळविले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी, गाडीचे ओरीजीनल आर.सी.बुक व इतर सर्व कागदपत्र व गाडीची चावी सामनेवाले यांच्याकडे दिली. त्यानंतर सामनेवाले यांनी विमा क्लेमचा चेक पाठवित असल्याचे सांगितले. परंतु सामनेवाले यांनी नुकसान भरपाई दिली नाही किंवा क्लेम नामंजूर केल्याबद्दलचे काही एक पत्र दिले नाही. यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाल्याने नाईलाजाने सदरची तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे. तक्रारदार हे सदर वाहनाचे नुकसान भरपाईकामी टोटल लॉसची किंमत, पार्कीगचे भाडे, त्यावरील व्याज, मानसिक त्रास व अर्जाचा खर्च अशी एकूण रक्कम रु.३,४९,४५०/- एवढया रकमेची मागणी करीत आहेत.
(३) तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.नं.५ वर शपथपत्र तसेच नि.नं.६ वरील दस्त ऐवज यादी सोबत नि.नं.१ ते ९ कागदपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये खबर, पंचनामा, आरसी बुक, विमा पॉलिसीची प्रत, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
(४) सामनेवाले यांनी नि.नं.१३ वर त्यांचा लेखी खुलासा दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांनी सदरचा अर्ज नाकारला असून असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मागणी प्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यात कसूर केला होता. त्यामुळे क्लेम त्वरीत मंजूर अथवा नामंजूर करणे ही बाब घडलेली नाही. तसेच तक्रारदारांचा क्लेम मंजूर झालेबाबत लेखी कळविले होते. सामनेवाले यांनी दि.१९-११-२०१२ रोजी डिसचार्ज व्हाऊचर व लेखी पत्र तक्रारदार यांना पाठविले आहे. अशी वस्तुस्थिती असतांना सामनेवालेंनी योग्य सेवा दिली नाही हे तक्रारदाराचे कथन चुकीचे आहे. सामनेवाले यांनी सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे रु.२,६२,०००/- मंजूर केलेले असल्यामुळे आणि क्लेम नाकारला नसल्यामुळे, सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. त्यामुळे सामनेवाले हे तक्रारदाराच्या मागणी प्रमाणे देणे लागत नाही. सबब सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्याची मागणी केली आहे.
सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशाचे पुष्टयर्थ नि.नं.१७ वर शपथपत्र, तसेच नि.नं.१५ वरील दस्तऐवज यादी प्रमाणे नि.नं.१ ते ३ कागदत्र छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यामध्ये तक्रारदाराचा क्लेम मंजूर केल्याचे व्हाऊचर, क्लेमची चेक नोट व कार्यालयीन पत्रव्यवहार, सर्व्हे रिपोर्ट यांचा समावेश आहे.
(५) तक्रारदार यांचा अर्ज, शपथपत्र, छायांकीत कागदपत्र, सामनेवालेंचा जबाब व शपथपत्र पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)तक्रारदार हे विमा क्लेमची रक्कम व्याजासह मिळण्यास मानसिक, शारीरिक त्रासाची रक्कम व अर्जाच्या खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय. |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी इंडिका वाहन क्रमांक एम.ए.३९- डी-२१४३ याचा दि.०२-१२-२०१० ते दि.०१-१२-२०११ या कालावधी करिता रक्कम रु.२,७९,५००/- करीता फुल कॉम्प्रेहेन्सीव्ह विमा काढलेला आहे. या बाबतचे पॉलिसीची प्रत नि.नं.६/६ वर दाखल आहे. या बाबत उभयपक्षात कोणताही वाद नाही. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांचे सदर वाहन हे दि.१२-०६-२०११ रोजी स्लीप होऊन अपघात झालेला आहे. त्याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्याबाबतची खबर नि.नं.६/१ वर आणि घटनास्थळाचा पंचनामा नि.नं.६/२ वर दाखल केलेला आहे. या कागदपत्रांचा विचार होता सदरचे वाहनाचा रस्त्याने जात असतांना स्लीप होऊन अपघात झाला हे स्पष्ट होत आहे.
त्यानंतर तक्रारदार यांनी सदर वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवालेंकडे विमा प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्या बाबत सामनेवालेंनी असा बचाव घेतला आहे की, तक्रारदारांचा सदरचा क्लेम नाकारलेला नसुन क्लेम मंजुर झालेबाबत अर्जदारांना कळविलेले आहे. त्या बाबतचे संबंधीत कागदपत्र सामनेवाले यांनी दाखल केलेले आहेत. क्लेम मंजूर केलेले दि.३१-०८-२०१२ चे पत्र नि.नं.१५/१ वर, तसेच क्लेम मंजूर केल्याची चेक नोट नि.नं.१५/२ वर, सामनेवालेंनी दि.१९-१२-२०११ चे दिलेले पत्र नि.नं.१५/३ वर, तसेच सर्व्हे रिपोर्ट नि.नं.२३/१ वर दाखल केला आहे. या कागदपत्रांवरुन असे दिसते की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम हा टोटल लॉस या कारणाने फुल सेटलमेंट म्हणून रक्कम रु.२,६२,०००/- दि.१९-११-२०१२ रोजी मंजूर केलेला आहे व तसे दि.१९-११-२०१२ च्या पत्राने तक्रारदारांना कळविले आहे.
सदर कागदपत्रांचा विचार होता सामनेवाले यांनी केवळ क्लेम मंजूर केलेला आहे. परंतु त्या बाबतच्या रकमेचा चेक नंबर हा कुठेही कागदपत्रांमध्ये नमूद केलेला नाही. तसेच सदर चेक तक्रारदार यांना दिलेला आहे असे म्हणणे नाही. सामनेवाले यांनी केवळ क्लेम मंजूर केला परंतु सदरची रक्कम तक्रारदार यांना अद्यापपावेतो दिलेली नाही. सदर क्लेमची रक्कम का दिलेली नाही किंवा ती रक्कम तक्रारदार यांनी आजपावेतो का स्वीकारलेली नाही या बाबतचा कोणताही खुलासा सामनेवाले यांनी केलेला नाही. सदर क्लेम हा दि.१९-११-२०१२ रोजी मंजूर केलेला असतांना ती रक्कम तक्रारदारांना त्वरीत मिळणे आवश्यक होते परंतु ती रक्कम आजपावेतो तक्रारदारांना मिळालेली नाही. तसेच सदर रक्कम घेण्यास तक्रारदार यांनी नकार दिलेला आहे असे दोन्ही पक्षकारांचे म्हणणे नाही. त्यामुळे सदरचा क्लेम तक्रारदार यांना वेळेत का मिळाला नाही याबाबतचा खुलासा दोन्ही पक्षांनी सदर तक्रार अर्जात केलेला नाही. यावरुन तक्रारदार यांना मंजूर क्लेमची रक्कम ही वेळेत मिळालेली नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांना सदरची क्लेम रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. परंतु क्लेम मंजूर करुनही तक्रारदारांना वेळेत रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व सदरचा अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे. त्यामुळे सदर क्लेमची रक्कम मंजूर केलेल्या तारखेपासून, मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चाची रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत असे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, तक्रारदारांची मागणी रास्त असल्याने, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारास त्यांच्या तक्रारीत नमुद केलेल्या वाहनाच्या विमा क्लेमची रक्कम २,६२,०००/- (अक्षरी रुपये दोन लाख बासष्ठ हजार मात्र) दि.१९-११-२०१२ पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ % प्रमाणे व्याजासह द्यावेत.
(२) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांक : २२-०५-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.