(पारीत दिनांक : 30 ऑक्टोंबर 2019)
आदेश पारीत व्दारा – मा.श्री जे.ए. सावळेश्वरकर, सदस्य
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत प्रकरण ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम – 12 अन्वये ही तक्रार विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन असे की, तक्रारकर्ता याचे विरुध्दपक्ष बँकेमध्ये वेगवेगळे बचत/चालु खाते असुन त्यामध्ये खाते क्रमांक 3070634658 हे बचत खाते आहे. तक्रारकर्त्याचे पुढे कथन असे की, त्यांनी त्याच्या व्यवसायासाठी विशाल इंटरप्राईजेस या मेडिकल एजंसीमधून माल खरेदी करण्यासाठी त्यांनी दिनांक 26.12.2018 रोजीचा धनादेश क्रमांक 059512 रक्कम रुपये 27,330/- चा दिला होता व विशाल इंटरप्राईजेसच्या मालकाने सदरचा धनादेश त्याचे खाते असलेल्या सुंदरलाल साहुजी अर्बन को-ऑप. बँक लि., परभणी येथे वटविण्यासाठी टाकला होता. तक्रारकर्ता पुढे असे कथन करतो की, सुंदलाल साहुजी को-ऑप.बँकेने दिनांक 26.12.2018 रोजी Fund insufficient असा शेरा देवून सदरचा धनादेश विरुध्दपक्षाच्या बँकेत पाठविला (जेथे तक्रारकर्ताचे खाते आहे). तक्रारकर्ता पुढे असे कथन करतो की, खात्यामध्ये दिनांक 26.12.2018 रोजी रुपये 76,411/- इतकी रक्कम होती, तरी सुध्दा विरुध्दपक्षाने दिनांक 26.12.2018 रोजी Drawers Signature i and Cheque Dishonor अशा शे-यासह रुपये 118/- GST कर कपात केला. त्यासाठी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दिनांक 31.12.2018 रोजी रितसर तक्रार दाखल केली आहे. शेवटी तक्रारकर्ताचे कथन असे की, विरुध्दपक्षाचा ग्राहक असुनही विरुध्दपक्षाने सेवेमध्ये त्रुटी ठेवल्यामुळे शारिरिक व मानसिक त्रास झाला त्यापोटी नुकसान भरपाई मिळावी व तक्रारकर्त्याची तक्रार प्रार्थने प्रमाणे मंजुर करावी अशी विनंती केली.
3. तक्रारकर्ताचे तक्रारीची नोंदणी करुन विद्यमान मंचा मार्फत विरुध्दपक्षास नोटीस पाठविण्यात आली. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर विरुध्दपक्ष यांनी मंचासमोर हजर होऊन त्याचे लेखी जबाब नि.क्र.11 खाली दाखल केला आहे.
4. विरुध्दपक्षाने आपल्या लेखी जबाबात कथन केले की, दिनांक 26.12.2018 रोजीचा धनादेश क्रमांक 059512 विरुध्दपक्षास दिला होता याबाबत माहिती नाही. तक्रारकर्त्याने तो धनादेश दिल्याची तारीख तक्रारीत दर्शविली नाही, तसेच सदर धनादेश सुंदरलाल साहुजी बँकेत कधी टाकला याची तारीख नमुद केली नाही. तक्रारकर्ता स्वच्छ हाताने आला नाही हे स्पष्ट होते. विरुध्दपक्ष पुढे असे कथन करतो की, सुंदरलाल साहुजी बँकेने दिनांक 26.12.2018 रोजी धनादेश कधी पाठविला आणि दिनांक 26.12.2018 रोजीच धनादेश कधी प्राप्त केला याबाबत तक्रारकर्त्याने काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. विरुध्दपक्षाचे पुढे कथन असे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून स्टेटमेंट कधी प्राप्त केले हे नमुद नाही आणि ‘ड्रावर सिग्निचर इलेजिबल’ असा मजकुर असल्यास खात्यात पुरशी रक्कम नाही असा त्याचा अर्थ होत नाही, त्यामुळे विरुध्दपक्षाने सदर तथ्याचे खंडन केले आहे. विरुध्दपक्षाचे पुढे कथन असे की, विरुध्दपक्षाने कोणताही रिटर्न मेमो दिलेला तक्रारकर्त्याने दाखल केला नाही आणि दाखल केलेला रिटर्न मेमो हा सुंदरलाल साहुजी बँकेचा आहे व त्या बँकेस प्रस्तुत तक्रारीत पक्षकार म्हणुन सामील केलेले नाही त्यामुळे विरुध्दपक्षाविरुध्द सदर तक्रार चालु शकत नाही. विरुध्दपक्षाचे पुढे कथन असे की, सुंदरलाल साहुजी को-ऑप.बँक लि.,जिंतुर, शाखा परभणी यांनी दिलेला रिटर्न मेमो मध्ये धनादेश सादर केल्याची तारीख 24.12.2018 अशी दर्शविली आहे. त्यामुळे दिनांक 26.12.2018 चा धनादेश दिनांक 24.12.2018 रोजी बँकेत सादर करणे व बँकेने स्विकारणे हे गैरकायदेशिर आहे, शिवाय क्लिरींगसाठी पाठविणे देखील गैरकायदेशिर कृत्य आहे. शिवाय तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाने सदरील धनादेशाचा अनादर केल्याचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. विरुध्दपक्षाचे कथन असे की, विरुध्दपक्षाचे कर्जदार श्री पंडितराव इंगोले जे तक्रारकर्ताचे वडील आहे त्यांनी कर्ज मर्यादा रुपये 10 लाखावरुन रुपये 50 लाखांवर करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु ती विरुध्दपक्षाने नाकारली त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या विरोधात खोटी कार्यवाही दाखल केली आहे. शेवटी विरुध्दपक्षाने कोणत्याही प्रकारच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही असे त्यांचे कथन आहे. सबब विरुध्दपक्ष यांचे विरुध्द प्रस्तुत ग्राहक तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
5. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब, अभिलेखावरील दाखल दस्तऐवज, पुरावा तसेच दोन्ही पक्षाच्या वकीलांनी केलेला युक्तिवाद यावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात व त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
- तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक ठरतो काय ? : होय
- विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? : नाही
- तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? : नाही
- या तक्रारीचा अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
- निष्कर्ष व कारणमिमांसा -
6. मुद्दा क्रमांक 1 - मुद्दा क्रं.1 सिध्द करण्यासाठी तक्रारकर्त्याने नि.क्र.12 वर स्वतःचे पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. नि.क्र.5 प्रमाणे छायांकित दस्तऐवज दाखल केले आहेत. जसे आधारकार्ड, विरुध्दपक्षास दिलेला तक्रार अर्ज दिनांक 31.12.2018, सुंदरलाल साहुजी अर्बन को-ऑप. बँक लि.परभणी यांचा रिटर्न मेमो दिनांक 26.12.2018, तक्रारकर्ताचा विरुध्दपक्ष बँकेतील धनादेश दिनांक 26.12.2018, विरुध्दपक्ष बँकेचा खातेउतारा दिनांक 31.12.2018 दाखल केला आहे. नि.क्र.13 वर पुरावा बंद पुरसिस दिली आहे. यावरुन असे दिेसते की, तक्रारकर्ता यांचे विरुध्दपक्ष बँकेमध्ये 3070634658 या क्रमांकाचे बचत खाते आहे व त्यासाठी विरुध्दपक्ष बँकेने तक्रारकर्त्याला बँकेचे धनादेश बुक देखील दिलेले आहे. अशारितीने तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. सबब, मुद्दा क्रमांक 1 चा निष्कर्ष होकारार्थी ठरविण्यात येतो.
7. मुद्दा क्रमांक 2 व 3 - विरोधीपक्षाने त्यांचे कथन सिध्द करण्यासाठी त्यांनी नि.क्र.14 वर बँक अधिका-याचे पुरावा शपथपत्र दिले व नि.क्र.15 वर पुरावा बंद पुरसिस दिली. दाखल दस्तऐवजावरुन असे दिसुन येते की, तक्रारकर्त्याचे राजमुद्रा मेडिकल आणि जनरल स्टोअर्स हिंगोली येथे आहे. सदर दुकानातील मालाच्या खरेदीसाठी विशाल इंटरप्राईजसेच्या नावाने दिनांक 26.12.2018 रोजी रुपये 27,330/- चा धनादेश दिलेला दिसुन येतो. तथापि, तो धनादेश विशाल इंटरप्राईजेसच्या मालकाने तो सुंदरलाल साहुजी बँकेमध्ये दिनांक 24.12.2018 रोजी सादर केलेला दिसुन येतो व सदर धनादेश दिनांक 26.12.2018 रोजी Fund insufficient या कारणास्तव सुंदरलाल साहुजी बँकेकडून परत आलेला दिसुन येतो. याठिकाणी धनादेश दिनांक 26.12.2018 रोजीचा धनादेश दिनांक 24.12.2018 रोजी सादर का करण्यात आला याचे स्पष्टीकरण अथवा पुरावा तक्रारकर्त्याकडून दाखल करण्यात आलेला नाही. तसेच सदर धनादेश सुंदरलाल साहुजी बँकेकडून विरुध्दपक्षाच्या बँकेमध्ये कधी परत आला याबद्दलचाही कागदोपत्री पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. विरुध्दपक्षाच्या वकीलांनी युक्तिवादात असे सांगितले की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दिलेला रिटर्न मेमो तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच विरुध्दपक्षाचे वकीलांनी पुढे आपल्या युक्तिवादात असे सांगितले की, तक्रारकर्त्याने दिनांक 31.12.2018 रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये Fund insufficient असा शेरा मारुन धनादेश परत केल्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले असे सांगितले आहे. तथापि, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सदर बचत खात्याच्या खातेउतारा प्रमाणे सदर धनादेश हा ‘ड्रावर सिग्निचर इलेजिबल’ व Cheque Dishonor अशा कारणांमुळे झाला आहे असे प्रतिपादीत केले. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा धनादेश अनादरीत केला असे म्हणता येणार नाही व तसा ठोस पुरावा तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेला नाही. पुढे विरुध्दपक्षाचे वकीलाचे कथन असे की, पुरेशी रक्कम जमा नाही असा शेरा विरुध्दपक्ष बँकेने कधीच दिला नाही. तक्रारकर्त्याची सही मध्ये फरक आहे अशा पध्दतीचा आहे, तथापि तक्रारकर्त्याला स्वतःच्या सहीबाबत बँकेकडे तपासणी करुन घेता आली असती, धनादेश रक्कम प्राप्त करता आली असती. परंतु तक्रारकर्त्याने ही संधी गमाविलेली दिसुन येते.
तक्रारकर्त्याच्या वकीलांनी येथे युक्तिवाद केला की, विशाल इंटरप्राइजेस मालकानी धनादेशाचा अनादर झाल्यामुळे फोनवरुन ऑर्डर कॅन्सल केल्याची माहिती दिली असे उत्तर सुनावले. त्यामुळे व्यावहारीक संबंध खराब झाले. अशापरिस्थितीत, तक्रारकर्त्याने आपली तक्रार सिध्द करण्यासाठी सुंदरलाल साहुजी अर्बन को-ऑप. बँक व विशाल इंटरप्राईजेसच्या मालकांना सदर अर्जामध्ये विरुध्दपक्ष म्हणुन सामील करता आले आले असते किंवा सुंदरलाल साहुजी अर्बन को-ऑप. बँकेच्या अधिका-यांना व विशाल इंटरप्राईजेसच्या मालकांना साक्षिदार म्हणुन तपासता आले असते व पुरावा दाखल करता आला असता. तथापि, ही संधी सुध्दा तक्रारकर्त्याने गमाविलेली दिसुन येते. तसेच तक्रारकर्त्याने सदरचा धनादेश हा वैयक्तिक बचत खात्याचा व्यवहाराचा वापरलेला दिसुन येतो, तो राजमुद्रा मेडिकल आणि जनरल स्टोअर्स या खात्याचा वापरलेला नाही. तक्रारकर्त्याने वैयक्तिक खात्यात दिनांक 24.12.2018 रोजी रुपये 80,000/- जमा केल्याचे दिसत आहे आणि तक्रारीतील धनादेश हा दिनांक 24.12.2018 रोजीच प्रेझेंट केल्याचे दिसते आणि धनादेशाचे क्लिरिंग सामान्यतः सकाळी 10-00 वाजता होत असते, त्यामुळे सकाळी ठिक 10-00 वाजता सदरील रक्कम रुपये 80,000/- नसल्यामुळे तो धनादेश अनादरीत होऊ शकतो. तसेच धनादेश दिनांक 26.12.2018 हा दिनांक 24.12.2018 रोजी दोन दिवस आधीच (Prematurely) सुंदरलाल साहुजी अर्बन को-ऑप.बँकेत सादर केल्याचे दिसुन येतो. परंतु, या सर्व बाबी तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमुद केलेल्या नाही अथवा योग्य निसंदीग्ध पुराव्याचे आधारे सिध्द केलेल्या नाही आणि स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच सुंदरलाल साहुजी अर्बन को-ऑप. बँक, परभणी येथे सदरील धनादेश कोणत्या तारखेस दाखल केला त्यांनी विरुध्दपक्ष बँक हिंगोली येथे केंव्हा रवाना केला, विरुध्दपक्ष बँकेस तो कधी मिळाला आणि विरुध्दपक्ष बँकेनी कधी परत केला या संबंधीचा कोणताही योग्य पुरावा तक्रारकर्त्याने मंचासमोर आणलेला नाही. विरुध्दपक्षाने पुढे युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याचे वडिलाचे कर्ज खात्याची कर्ज मर्यादा मागणी विरुध्दपक्षाने नाकारली त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाविरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. परंतु, विरुध्दपक्षाने तो सिध्द करण्या इतपत कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. वरील कारणास्तव व सिध्दते अभावी सदर तक्रार खारीज होण्या लायक आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 व 3 चा निष्कर्ष नकारार्थी ठरविण्यात येते.
8. मुद्दा क्रमांक 3 - वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
- अंतिम आदेश –
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.