Exh.No.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.32/2011
तक्रार दाखल झाल्याचा दि. 29/08/2011
तक्रार निकाल झाल्याचा दि. 20/06/2012
श्री प्रमोद लक्ष्मण पेडणेकर
वय 45 वर्षे, धंदा – व्यवसाय,
रा. उभादांडा, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) मॅनेजर,
न्यु इंडिया इंश्युरंस कंपनी कुडाळ शाखा,
कार्यालय 1806, आशीर्वाद भवन,
पोस्ट ऑफिस जवळ, कुडाळ,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
2) मॅनेजर,
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा,
शाखा – वेंगुर्ले, मु.पो. वेंगुर्ले,
ता.वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या.
तक्रारदारातर्फे - विधिज्ञ श्री एस. व्ही. खानोलकर.
विरुद्धपक्षातर्फे - विधिज्ञ श्री एस.के. तायशेटे
(मंचाच्या निर्णयाद्वारे मा.श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.20/06/2012)
1) प्रस्तुतची तक्रार स्वीकृत करुन सामनेवाला यांना नोटीसचा आदेश झालेला आहे. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. सुनावणीच्या वेळेस तक्रारदार व सामनेवाला क्र.1 विमा कंपनीच्या वकीलांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, तक्रारदारांची टाटा सुमो गाडी तक्रारदारांचे मालकीची आहे तक्रारदारांनी सदरची गाडी क्र. MH04-Q-2647 ही सामनेवाला क्र.2 संस्थेकडून कर्जावू रक्कम घेऊन खरेदी केलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तक्रारदार आणि श्री दिलिप वामन कुलकर्णी यांच्यामध्ये एक करार झालेला आहे. सदर करारानुसार सदरची गाडी दिलिप वामन कुलकर्णी यांनी घेतलेली आहे व रक्कम रु.1,20,000/- ही रक्कम फेडण्याची जबाबदारी घेतलेली आहे, परंतू परिवहन खात्याकडे असलेल्या रेकॉर्डप्रमाणे गाडी तक्रारदारांचे नावे नमूद आहे.
3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात दि.22/2/2005 रोजी श्री दिलिप वामन कुलकर्णी व त्यांचे मित्र आंगणेवाडी येथे जत्रेकरीता गेलेले होते. त्यावेळेस तेथील कणकवली एस.टी. स्टँडनजिक सदर गाडी पार्कींग केलेली होती. त्यानंतर रात्रीचे 1.00 वाजता ते गाडीजवळ आले असता गाडी जाग्यावर नव्हती व कोणीतरी अज्ञात इसमाने डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडून गाडी चोरुन नेली. याबाबतची चोरीची फिर्याद मालवण पोलीस स्टेशनला दिली. सदर पोलीस स्टेशनला आरोपी न मिळाल्याने तो गुन्हा ‘अ फायनल’ केला. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्लेम मंजूर करणे बंधनकारक होते, परंतू दि.30/3/2010 रोजी सामनेवाला क्र.2 यांना पत्र पाठवून क्लेम नामंजूर झाल्याचे कळवले आहे. त्यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी दि.19/4/2010 रोजी तक्रारदारांना क्लेम नामंजूर झाल्याचे कळविले आहे.
4) दरम्यानच्या कालावधीमध्ये तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत दुरुस्ती करुन घेतलेली आहे. त्यामध्ये तक्रारदार पुढे सांगतात की, सामनेवाला क्र.2 यांनी 101 चे प्रोसिंडिंग करुन जप्ती दाखला मिळवलेला आहे व सदरचा जप्ती दाखला बेकायदेशीर आहे. सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदारांच्या विरुध्द जप्ती मागता येणार नाही. तक्रारदाराने त्यांच्या तक्रारीमध्ये क्लेम रक्कम रु.1,50,000/- व्याजासह मंजूर करावेत तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्च रु.2,000/- मंजूर करावेत, अशी विनंती केलेली आहे.
5) तक्रारदाराने नि.4 च्या यादीने 8 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने म्हणण्यामध्ये तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्यांच्या मालकीची गाडी दि.11/4/2004 रोजीच्या करारपत्राने श्री दिलिप वामन कुलकर्णी यांना विक्रीत दिली असल्यामुळे ते सदर गाडीचे मालक राहिलेले नाहीत, त्यामुळे सदरची तक्रार कायदयाने चालणार नाही. सुमो गाडी नोंदणी क्र. MH04-Q-2647 या गाडीचे मालक तक्रारदार होते हे खरे आहे. सदर गाडीचा विमा उतरविलेला होता व त्याचा कालावधी 17/12/2004 ते 16/12/2005 असा होता ही गोष्ट खरी आहे; परंतु तक्रारदारांनी सामनेलवाला क्र.2 यांचेकडून घेतलेल्या कर्जास सदर सामनेवाला जबाबदार नाहीत.
7) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात दि.11/5/2004 रोजीच्या करारामध्ये ते गाडी खरेदी देत आहेत असा उल्लेख केलेला आहे] तसेच आर.टी.ओ. कार्यालयात जरुर लागल्यास तक्रारदाराने सहया दयायच्या आहेत असे नमूद आहे. तक्रारदार हे वादग्रस्त सुमोचे मालक राहिलेले नाहीत. वाहन कायदा 1988 मधील कलम 50 प्रमाणे वाहनाची विक्री केल्यानंतर 15 दिवसांत परिवहन अधिका-याकडे जाणीव करुन देणे आवश्यक आहे तसेच विमा पॉलिसी तबदिल करणे बंधनकारक आहे. सदरचा क्लेम हा दि.30/3/2010 च्या पत्रान्वये कळविलेला आहे. तसेच सदरची गाडी ही 1995 सालात बनलेली आहे. तक्रारदाराने मागीतलेली रक्कम ही भरमसाट आहे. सबब तक्रारदाराची तक्रार ही रद्द करण्यात यावी व सामनेवाला यांना रु.10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत, अशी विनंती केलेली आहे.
8) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात सांगतात, महाराष्ट्र सहकार कायदा 1960 कलम 101 अन्वये केलेल्या कारवाईच्या विरुध्द सहकार न्यायालयात तक्रारदाराने दाद मागणे आवश्यक होते. कलम 101 प्रमाणे दिलेल्या दाखल्याविरुध्द तक्रारदारांना दाद मागता येणार नाही. सबब तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
9) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवालांचे म्हणणे, दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद, दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारदार म्हणतात त्यापमाणे त्यांचे वाहन क्र. MH04-Q-2647 हे वाहन तक्रारदारांचे मालकीचे होते व सदर वाहनांवर सामनेवाला यांनी विमा उतरविला होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सदरचे वाहन दि.22/2/2005 रोजी चोरीला गेलेले होते व त्याबाबतची फिर्याद मालवण पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे व आरोपी न मिळाल्याने सदर गुन्हा ‘अ फायनल’ केलेला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
10) सामनेवाला विमा कंपनीने दि.30/3/2010 च्या पत्रान्वये तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन केले असता सामनेवाला विमा कंपनीने, तक्रारदार हे सदर वाहनाचे मालक नाहीत असे कारण देऊन क्लेम नामंजूर केलेला आहे. तक्रारदार व श्री दिलिप वामन कुलकर्णी यांचेमध्ये करार झालेला आहे. सदर कराराचे मंचाने अवलोकन केलेले आहे. सदर करारामध्ये सदरचे वाहन दिलिप कुलकर्णी यांना विक्री केल्याचे नमूद केलेले आहे. तसेच सदर वाहनावर असलेला सामनेवाला क्र.2 पतसंस्थेचा रक्कम रु.1,05,000/- चा बोजा आहे. त्यापैकी रु.85,000/- चे कर्ज आहे व कर्जासह सदरचे वाहन ताब्यात देत आहे. असे करारात नमूद केलेले आहे. युक्तीवादाचे वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी दिलिप वामन कुलकर्णी यांनी सदर कराराचा भंग केलेला आहे व कराराप्रमाणे कुलकर्णी यांनी कर्ज परतफेड न केल्याने सामनेवाला क्र.2 संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, 1960 कलम 101 अन्व्ाये बेकायदेशीर वसुलीचा दाखला घेतलेला आहे असे प्रतिपादन केलेले आहे. त्यामुळे परिवहन खात्याकडे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट व ट्रान्सफर सर्टीफिकेट करुन दिलेले नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधलेले आहे. सदरचा करार हा दोन्ही बाजूंना बंधनकारक आहे. सदर वाहन खरेदी घेणा-याने कराराचा भंग केलेला आहे. त्यामुळे परिवहन खात्याकडे वाहनाची रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट व ट्रान्सफर सर्टीफिकेट सदर दिलिप वामन कुलकर्णी यांचे नावे करुन दिलेली नाहीत ही बाब या मंचाच्या निदर्शनास तक्रारदारांचे वकीलांनी आणून दिलेली आहे. जोपर्यंत वाहनाचे रजिस्ट्रेशन व ट्रान्सफर सर्टीफीकेटवर सहया होऊन वाहन हस्तांतरण होत नाही तोपर्यंत सदरचे वाहन कायदेशीररित्या हस्तांतरण झाले आहे असे म्हणता येणार नाही. प्रस्तुत प्रकरणाचा विचार करता सदरचे वाहन परिवहन खात्याकडे तक्रारदारांचे नावे आहे याचा विचार करता, वाहनाचा मालकी हक्क हा तक्रारदार यांचा आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. याचा विचार करता प्रस्तुतची तक्रार दाखल करण्याचा वैध स्थिती (locus stand) येत आहे असे निष्कर्ष हे मंच काढत आहे. वास्तविक पाहता तक्रारदारांचे वाहनाची चोरी 22/5/2005 रोजी झालेली आहे व विमा कंपनीने दि.30/3/2010 रोजीचे पत्र सामनेवाला क्र.2 यांना पाठवून क्लेम नामंजूर झाल्याचे कळवले आहे याचा विचार करता क्लेमबाबत निर्णय घेण्यासाठी सुमारे 5 वर्षे कालावधी सामनेवाला विमा कंपनीने घालवलेला आहे सदरची बाब ही गंभार सेवा त्रुटीमध्ये येते. उपरोक्त विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे सामनेवाला विमा कंपनीकडून क्लेम रक्कम मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. त्यामुळे सदर वाहनाची I.D.V. रु.1,50,000/-(रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) ही रक्कम व्याजासह मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
11) सामनेवाला क्र.2 यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 101 अन्वये घेतलेला वसुलीचा दाखला बेकायदेशीर आहे व याबाबत तक्रारदाराने दाद मागीतलेली आहे, परंतू सदर कलमान्वये चालणारे प्रोसिडिंग हे अर्धन्यायीक स्वरुपाचे आहे. त्यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी हे मंच विचारात घेत नाही.
12) उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेऊन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास क्लेम विमा रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) दयावेत व सदर रक्कमेवर दि.22/2/2005 पासून द.सा.द.शे 9 टक्के प्रमाणे संपूर्ण रक्कम मिळेपर्यंतचे व्याज दयावे तसेच मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) व तक्रार खर्च रु.2,000/-(रुपये दोन हजार मात्र) दयावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 20/06/2012
sd/- sd/- sd/-
(वफा खान) (एम.डी. देशमुख) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग