निकालपत्र
तक्रार क्र.99/2015
तक्रार दाखल दिनांक - 02/09/2015. तक्रार नोंदणी दिनांक - 04/09/2015
तक्रार निकाल दिनांक - 17/05/2016
कालावधी 08 महिने 15 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
गोकर्णा भ्र.प्रल्हादराव काळे, अर्जदार
वय 31 वर्ष धंदा शेती, अॅड.अरुण खापरे.
रा.एरेडेश्वर ता.पुर्णा जि.परभणी.भ्भ्भ्
विरुध्द
1. व्यवस्थापक, गैरअर्जदार
न्यु.इडिया इन्शुरन्स कं.लि. अॅड.जी.एच.डोडीया.
महालक्ष्मी चेम्बर्स, दुसरा मजला,
प्रभात थेटर जवळ पुणे जि.पुणे.
2. व्यवस्थापक,
न्यु.इडिया इन्शुरन्स कं.लि.
यशोदिप बिल्डींग,शिवाजी रोड,
मु.पो.जि.परभणी.
कोरम – श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
निकालपत्र
(निकालपत्र पारित व्दारा. सौ.अनिता इंद्र ओस्तवाल, सदस्या. )
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी सेवा त्रुटी केल्याचा आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराचा पती नामे प्रल्हाद पंढरीनाथ काळे हा शेतकरी होता त्याचा मृत्यू दि.०४/१२/२०११ रोजी रोड अपघातात झाला याची नोंद ताडकळस पोलिस स्टेशनला झालेली आहे. अर्जदाराचा पती शेतकरी असल्यामुळे तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता. अर्जदाराने तीच्या पतीच्या मृत्यूची उपरोक्त योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह विमा दावा दि.05/07/2013 रोजी तालुका कृषी अधिका-यांकडे दाखल केला होता. परंतु उशीरा विमा दावा दाखल करण्यात आल्याच्या कारणांस्तव विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा स्वीकृत केला नाही. म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार अर्ज क्र.141/2013 दाखल केला होता त्या तक्रार अर्जात मंचाने असा निर्णय दिला होता की, अर्जदाराने तिचा विमा दावा संपुर्ण कागदपत्रासहीत पुन्हा 30 दिवसांचे आंत दाखल करावा त्यानुसार अर्जदाराने दि.30/01/2015 रोजी संपुर्ण कागदपत्रासहीत विमा दावा दाखल केला व तदनंतर विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी अर्जदाराने पाठपुरावा देखील केला. अपघातासमयी सदर वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करीत असल्याच्या कारणास्तव अर्जदाराचा विमा दावा पत्राद्वारे गैरअर्जदाराने निरस्त केला. वास्तवीक पाहता अपघातासमयी विमेदारासोबत फक्त वय वर्षे 8 वर्षाचा लहान मुलगा होता व समोरुन येणा-या जीप क्र.एम.एच.19 एई 1742 च्या चालकाने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता. त्यामुळे गैरअर्जदाराने अत्यंत चुकीचे कारण दर्शवून अर्जदाराचा विमा दावा निरस्त केला म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- अपघात तारखेपासून द.सा.द.शे.12 टक्के व्याज मंजुर करावी. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- द्दावी अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र व पुराव्यातील कागदपत्र नि.5 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.14 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुत अंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अपघातासमयी सदर वाहनावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले होते हे शाबीत झाल्यामुळे अर्जदाराचा विमादावा योग्य कारणांस्तव निरस्त करण्यात आलेला आहे. अपघातासमयी विमेदारा व्यक्तिरिक्त अन्य दोन व्यक्ती मोटर सायकलवर बसलेले होते व त्या वाहनाची क्षमता 1 + 1 अशी असल्यामुळे उपरोक्त पॉलिसीच्या अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील नाही. म्हणुन अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचा समोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपत्र नि.क्र.१५ वर व पुराव्यातील कागदपत्र मंचासमोर दाखल केली आहेत. दोन्ही पक्षांचा कैफियतीवरुन खालिल मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर.
1.
शाबीत झाले आहे काय? नाही.
2. अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 - अर्जदाराचा पती हा शेतकरी होता त्यामुळे तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजना याचा लाभार्थी होता दि.०४/१२/२०११ रोजी रस्ता अपघातात त्याचा मृत्यु झाला. उपरोक्त योजने अंतर्गत अर्जदाराच्या पतीच्या मृत्युची नुकसान भरपाइ मिळण्यासाठी विमा दावा गैरअर्जदाराकडे अर्जदाराने दाखल केला होता अपघातासमयी सदर वाहनावर तीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसलेले होते. म्हणुन अर्जदार उपरोक्त योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नसल्याने अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदाराने निरस्त केला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर मोटरसायकलवर फक्त 1 +1 प्रवासी बसू शकतात त्या वाहनाची क्षमता तेवढीच आहे. परंतु अपघाता समीयी 1 + 2 अशा व्यक्ती सदर वाहनावर बसलेल्या होत्या त्यामुळे गैरअर्जदाराने योग्य कारणांस्तव अर्जदाराचा विमा दावा निरस्त केलेला आहे. यावर मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदाराने अगदीच थातुर मातूर कारण देऊन अर्जदाराचा विमा दावा निरस्त केलेला आहे. गैरअर्जदाराने निव्वळ अर्जदाराचा न्याय हक्क डावलण्यासाठीच उपरोक्त बचाव घेतल्याचे दिसून येते. सदर वाहनावर विमेदार व त्याचा नऊ वर्षाचा मुलगा नामे रामप्रसाद व त्याचा मित्र् सचीन विश्वनाथ बोरमणे पासून जात असताना समोरील वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला यात विमेदाराची कोणती चूक नव्हती किंवा वाहनावर बसलेले व्यक्ती प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे सदर अपघात होण्यासाठी कारणीभूत नव्हते किंवा त्यांच्यामुळे सदर वाहनाला अपघात झालेला नव्हता हे स्पष्ट दिसून येत असतांना देखील गैरअर्जदाराने हस्यास्पद बचाव घेऊन त्रुटीची सेवा दिल्याचे मंचाचे ठाम मत असल्यामुळे उपरोक्त योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यास अर्जदार पात्र आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश.
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून ३० दिवसांच्या आंत शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम रु.१,००,०००/- द्यावी.
3. गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी रक्क्म रु.२,०००/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.१,५००/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावी.
4. दोन्ही पक्षांना निकालपत्राच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा