ग्राहक तक्रार क्र. 186/2013
अर्ज दाखल तारीख : 07/01/2014
अर्ज निकाल तारीख : 01/04/2015
कालावधी: 01 वर्षे 02 महिने24 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती शिवकन्या ज्ञानेश्वर कचरे,
वय - 28 वर्षे, धंदा – शेती,
रा.मेडसिंगा, ता. जि.उस्मानाबाद.
2. महादेव ज्ञानेश्वर कचरे,
वय – 10 , धंदा – शिक्षण, रा. सदर
3. साक्षी ज्ञानेश्वर कचरे,
वय – 08 वर्षे, धंदा शिक्षण,
अर्जदार क्र. 2 व 3 अज्ञान असून अ.पा.क. म्हणून
अर्जदार क्र. 1 आई, रा. सदर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. दि. न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. पुणे,
व्दारा – विभागीय कार्यालय,
श्री. इकबाल अलम पठाण,
मा. व्यवस्थापक तथा शाखाधिकारी,
दि. न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
शिवाजी चौक, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.
2. श्री. नंदकुमार प्रभाकर देशपांडे,
शाखाधिकारी,
डेक्कन इन्शुरन्स अॅड रि-इन्शूरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
फरकाडे बिल्डींग, भानुदास नगर,
बिग बझारच्या मागे, जालना रोड,
औरंगाबाद – 431001.
3. जाधव डी.एन.
तालूका कृषी अधिकारी,
तालूका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री. बी. ए. बेलूरे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) 1. तक्रारकर्ती (तक) क्र.1 चे पती जे तक क्र.2 व 3 चे वडील होते व शेतकरी होते ते अपघातात मयत झाल्यानंतर शेतकरी अपघात विम्याची रक्कम विरुध्द पक्षकार (विप) यांच्याकडे मागीतली असता नाकारल्यामुळे तक यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात असे की मयत ज्ञानेश्वर कचरे यांना मेडसींगा ता.जि.उस्मानाबाद येथे गट क्र.54 मध्ये 60 आर. जमीन होती त्यामुळे शासनातर्फे विप क्र. 1 कडे शेतकरी अपघात विमा काढलेला होता. दि.14/11/2011 रोजी रात्री दहाच्या सुमारास ज्ञानेश्वर उस्मानाबाद बायपास ने मेडसींगा गावाकडे स्वत:ची मोटरसायकल क्र.एम.एच.25 इ. 5712 ने येत होते. शेरकर वस्तीजवळ इंडीका कार एम.एच. 02 जे. ए. 5016 पाठीमागून आली, तिचे चालकाने कार घाई घाईने व निष्काळजीपणाने चालवून ज्ञानेश्वरच्या मोटर सायकलाला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळ ज्ञानेश्वर गंभीररीत्या जखमी झाला. उस्मानाबाद येथील शासकीय दवाखान्यात त्यास नेले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले. मृत्यू घटनेची नोंद उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन मध्ये झाली. ज्ञानेश्वरचे पोष्टमार्टम करण्यात आले घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.
3. तक यांनी विप क्र.3 ता. कृषी अधिकारी यांचेकडे शेतकरी जनता अपघात विमा क्लेम फॉर्म भरुन दिला सोबत जरुर ती कागदपत्रे दिली. विमा रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केली. विप क्र.3 मार्फत विप क्र.2 डेक्कन इन्शूरन्स ब्रोकर्स यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. विप क्र.2 ने विप क्र. 1 इन्शूरंन्स कंपनीकडे प्रस्ताव पाठवला. मात्र विप क्र.1 यांनी अदयापही तक यांना विम्याची रक्कम दिलेली नाही हा निष्काळजीपणा केलेला आहे. त्यामुळे विप कडून विम्याची रक्कम मिळावी व त्यावर व्याज मिळावे तसेच तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती करण्यात आलेली आहे.
4. तक्रारी सोबत तक यांनी प्रस्तावाची प्रत, वारसा प्रमाणपत्र, सातबारा उतारा, फेरफार उतारा, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, दोषारोप पत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) 1. विप क्र.1 यांनी हजर होऊन लेखी म्हणणे दि.30/01/2014 रोजी दिलेले आहे. विप क्र.1 चे म्हणणे आहे की त्यांचेकडील योजना दि.15/08/2011 ते 14/08/2012 या कालावधीसाठी होती. या मुदतीमध्ये तक यांनी विमा दावा दाखल केला नाही. दि.15/02/2013 रोजी दाखल केलेला दावा योजनेशी विसंगत आहे. विप क्र.1 कडे आवश्यक त्या कागदपत्रासह दावा दाखल झालेला नाही. झालेला विलंब माफ झालेला नाही. त्याबाबतचा निर्णय या मंचामध्ये होऊ शकत नाही. या विप ने सेवा देण्यात कोणतीही त्रुटी केलेली नाही त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) विप क्र.2 यांनी हजर होऊन दि.30/01/2014 रोजी लेखी म्हणणे दिलेले आहे. विप क्र.2 चे म्हणणे आहे की सल्लागार म्हणून शासनाने त्यांना कोणतेही फी दिलेली नाही. विप क्र.2 चे काम मर्यादित स्वरुपाचे होते. विमा कंपनीस आवश्यक ती कागदपत्रे गोळा करणे व त्यांची छाननी करुन विमा कंपनीस पाठविणे, कागदपत्रे अपूर्ण असल्यास संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय यांना कळविणे. तक यांच्याकडून कोणतीही माहिती जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयामार्फत विप क्र.2 ला मिळालेली नाही त्यामुळे तक यांची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे असे नमूद केले आहे.
ड) विप क्र.3 यांनी हजर होऊन ता.07/01/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक यांची प्रस्ताव दाखल करण्याची मुदत नोव्हेंबर 2012 मध्ये संपलेली होती. तक यांनी प्रस्तावास बरीच कागदपत्रे जोडली नव्हती. उशीराबाबतचे शपथपत्र व इतर कागदपत्रे जोडली नव्हती. तक यांना भेटून फेर प्रस्ताव दाखल करा म्हणून दि.01/01/2013 रोजी पत्र क्र.08/13 देण्यात आले होते व प्रस्ताव परत पाठविण्यात आला होता. तक यांनी आर.पी.डी. ने बँक पासबूक मृत्यू प्रमाणपत्र इत्यांदीच्या छायांकीत प्रती पाठविल्या परंतू परीपूर्ण प्रस्ताव दाखल केला नाही. पुन्हा दि.13/05/2013 चे पत्र देऊन दि.14/05/2013 पर्यंत परीपूर्ण प्रस्ताव देण्याबाबत कृषी पर्यवेक्षामार्फत कळविले होते मात्र तक यांनी त्याप्रमाणे पुर्तता केली नाही.
इ) तक यांची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे विचारात घेता आमचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात आम्ही त्यांची उत्तरे त्याचे समोर खालील कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनूतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता. शेवटी दिल्याप्रमाणे.
ई) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2:
1. तक नी एफ.आय. आर. हजर केला त्यावर तारीख दि.22/11/2011 ची आहे मात्र घटनास्थळ पंचनाम्यात तारीख 15/11/2011 आहे. अपघाती मृत्यू नोंद झाल्यानंतर तो पंचनामा करण्यात आला. मरणोत्तर पंचनामा सुध्दा दि.15/11/11 रोजी करण्यात आला. शवचिकित्सा दि.15/11/2011 रोजी करण्यात आली. मृत्यूचे कारण ह्रदयात झालेला रक्तस्त्राव व डोक्याला झालेली जखम असे होते. दोषारोपपत्र कार ड्रायव्हर कोंडजी शेख विरुध्द दाखल झाल्याचे दिसून येते.
2. विप क्र.3 ता. कृषी अधिकारी यांचे कृषीपर्यवेक्षक यांना दिलेल्या दि.01/01/2013 चे पत्राप्रमाणे तक चा प्रस्ताव त्याच दिवशी रजिष्टर पोष्टाने मिळाला होता. प्रस्तावातील त्रुटी पुर्ण करण्यासाठी तसेच उशीराचे कारण प्राप्त करण्यासाठी सूचना दिली होती. विप क्र.3 चे कैफियतीप्रमाणे कृषी पर्यवेक्षक यांनी दि.04/02/2013 रोजी प्रस्ताव परीपुर्ण करुन दाखल करण्यासाठी तक यांना दिला. तक यांनी नंतर बँक पासबूक व मृत्यूप्रमाणपत्र इत्यादींची झेरॉक्स प्रत पाठवल्या पण परीपूर्ण प्रस्ताव दाखल केला नाही. त्यामुळे दि.13/05/13 चे पत्र पाठवून दि.14/05/2013 पर्यंत परीपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याबद्दल तक यांना कळवण्यात आले होते. हे उघड आहे की विप क्र.3 यांनी केवळ कागदी घोडे नाचविले. सरकारी कार्यालयातील अनुभव लक्षात घेता नागरीकांनी प्रत्यक्ष भेट न घेता रजिष्टर पोष्टाने पत्र व्यवहार केला तर त्यात काहीही चूक म्हणता येणार नाही. सरकारी कर्मचारी नाकरीकांना सौजन्य व सहकार्य देत नाहीत उलट त्यातून काही स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तक ने प्रस्ताव रजिष्टर पोष्टाने पाठविला यात चूक केली असे म्हणता येणार नाही.
3. ज्या प्रस्तावाची प्रत तक ने तक्रारीसोबत हजर केली आहे त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र बँक पासबूक यांची नोंद आहे. 15 नंबरचा कागद वारस प्रमाणपत्र ही नोंद हस्ताक्षरात आहे, तक चे नाव हस्ताक्षरात लिहलेल्या खाली मंडळ कृषी अधिकारी हे पण हस्ताक्षरात लिहलेले आहे. ते पत्र ता. कृषी अधिकारी यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना पाठवल्याचे दिसते. जरी त्यावर तारीख नसली व सही नसली तरी हस्ताक्षरातील नोंदी कोणी केल्या याबद्दल विप क्र.3 याने मौन बाळगले आहे. सोबत क्लेम फॉर्म भाग क्र.3 भाग क्र.1 वारसा प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र दि.02/07/2012 चे, सातबारा उतारा, एफ.आय. आर. मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा शवचिकित्सा अहवाल, दोषारोप पत्र, मृत्यू प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे जोडल्याचे दिसून येते, दि.18/04/2013 रोजी पोष्टाने कागदपत्रे पाठवल्याची पावती हजर करण्यात आलेली आहे.
4. ता.15/02/2013 चा उशीर माफीचा अर्ज तारीख दि.14/02/2013 चे प्रतिज्ञापत्र वगैरे च्या प्रति तक ने हजर केल्या आहेत. बँक पासबूकाची प्रत हजर केलेली आहे. विप क्र.3 याने म्हंटले आहे की दि.04/02/2013 रोजी मूळ प्रस्ताव तक ला परत देण्यात आला त्याबद्दल कोणतीही पोहोच हजर करण्यात आलेली नाही. प्रस्ताव परत का देण्यात आला याचे कारण समजत नाही. जर प्रस्तावात काही त्रुटी होत्या तर त्यांची पूर्तता करुन घेणे हे विप क्र.3 चे कर्तव्य होते. मात्र प्रस्ताव परत दिला असे विप चे म्हणणे आहे त्याच सोबत तक ने रजिष्टर पोष्टाने बँक पासबूक व मृत्यू प्रमाणेपत्र पाठवल्याचे म्हंटले आहे. तक अशी अर्धवट कागदपत्रे का पाठवेल याचे कारण स्पष्ट केले नाही. याउलट दि.13/05/2013 रोजी पत्र देऊन दि.14/05/2013 पर्यत प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले असे विप क्र. 3 ने म्हंटले आहे. परंतू त्याबद्दल कोणताही पुरावा दिलेला नाही. वर म्हंटल्या प्रमाणे विप क्र.3 यांनी कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
5. तक क्र.1 ही 28 वर्षाची विधवा आहे व मेडसींगा या खेडयामध्ये राहते तक क्र.2 व 3 ही अज्ञान मुले आहेत. त्यांना प्रामाणिकपणे मदत करण्याऐवजी तांत्रिक काणांवरून विमा रकमेपासून वंचित करण्याचा विप चा प्रयत्न दिसून येतो. विप क्र.1 ने आता म्हंटले आहे की उशीर माफीचा निर्णय या मंचात होऊ शकणार नाही. अर्जासाठीचा कालावधी हा अपरीहार्य नसल्याचे तत्व मान्य झालेले आहे. केवळ तांत्रिक कारणांवरुन तक ची मागणी फेटाळण्याचा विप चा प्रयत्न आहे. विप यांची त्यामुळे सेवेत त्रुटी दिसून येते. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते
1) विप क्र.3 ने दोन महिन्यात तक कडून जरुर ती कागदपत्र जमा करुन प्रस्ताव विप क्र.2 मार्फत विप क्र.1 कडे पाठवावा.
2) विप क्र.3 व 2 ने असे न केल्यास विमा रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 व्याजाने तक यांना समान हिश्याने मिळण्यासाठी दयावी.
3) विप क्र.1 ने विमा प्रस्ताव मिळाल्यास ऊशीराचे व तांत्रिक मुद्यावर न फेटाळता त्वरीत कारवाई करावी.
4) विप क्र.3 यांनी तक यांना तक्रारीचा खर्च रु.3,000/-(रुपये तीन हजार फक्त) दयावा.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.