आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेची रक्कम मिळण्याबद्दल दाखल केली आहे. तक्रारकर्तीचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्तीचे पती नारायण भुसारी हे शेतकरी असून त्यांची मौजा आथली, ता. लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे गट नंबर 112, 106, 220 एकूण आराजी 1.90 हे.आर. एवढी शेती होती. ते शेती व्यवसाय करीत होते व घरातील कुटुंबप्रमुख होते. दिनांक 24/10/2006 ला मृतक श्री. नारायण भुसारी हे शेतातील धानाचा कडपा बांधण्याकरिता गेले असता त्यांना विषारी सापाने दंश केल्यामुळे औषधोपचाराकरिता परसोडी (नाग) येथे नेण्यात आले. दिनांक 26/10/2006 ला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. मृतकाचे भाऊ श्री. श्रावण नानाजी भुसारी यांनी घटनेबद्दल पोलीस स्टेशन, लाखांदूर येथे फिर्याद नोंदविली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन, लाखांदूर यांनी अकस्मात मृत्यु क्र. 39/06 अंतर्गत फिर्याद नोंद करून इतर कार्यवाही पूर्ण केली. 3. पतीच्या अपघाती मृत्युनंतर शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम प्राप्त करण्यासाठी तक्रारकर्तीने संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून रितसर अर्ज तलाठ्यामार्फत विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे सादर केला. विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी दिनांक 15/11/2006 ला सदर अर्ज विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. तक्रारकर्तीचा अर्ज विरूध्द पक्ष यांना प्राप्त होऊन देखील त्यांनी तक्रारकर्तीच्या विमा दाव्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे तक्रारकर्तीने वेळोवेळी विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्या भेटी घेतल्या तसेच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता देखील केली. दिनांक 20/01/2009 ला विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीला पत्र पाठवून मृतकाचे नाव फेरफारामध्ये दिसत नसल्याचे कारण सांगून विमा दावा नामंजूर करीत असल्याचे कळविले. तक्रारकर्तीच्या मते तिने संपूर्ण कागदपत्रे विरूध्द पक्ष यांच्याकडे मुदतीच्या आंत पाठवून देखील तिच्या विमा दावा प्रस्तावाबाबत विरूध्द पक्ष यांनी मुदतीमध्ये कार्यवाही न करता तिचा विमा दावा तकलादू कारणास्तव नामंजूर केला ही विरूध्द पक्ष यांची कृती त्यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचामध्ये दाखल केली. 4. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीमध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम व तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. आपल्या तक्रारीसोबत तक्रारकर्तीने तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 8 ते 38 तसेच 68 ते 80 पर्यंतचे दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 5. मंचाचा नोटीस विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल केलेले आहे. 6. विरूध्द पक्ष क्र. 1 चे म्हणणे आहे की, मृतक नारायण भुसारी हे कुटुंबप्रमुख नाहीत, त्यांचा शेती व्यवसाय नाही तसेच त्यांचा मृत्यु विषारी साप चावल्यामुळे झालेला नाही. पोलीस स्टेशन, लाखांदूर येथे श्रावण भुसारी यांनी खोटी तक्रार दाखल केलेली आहे. विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, तक्रारकर्तीने वारसांनाबद्दलचा दाखला अर्जासोबत जोडलेला नाही. त्यामुळे वारस म्हणून दिलेले तिचे नावही अमान्य केलेले आहे. विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, तक्रारकर्तीने सर्व पत्रव्यवहार हा तलाठ्यामार्फत विरूध्द पक्ष क्र. 3 तहसीलदार, भंडारा यांचेशी केलेला असल्यामुळे विरूध्द पक्ष क्र. 3 च्या सेवेतच त्रुटी दिसते. विरूध्द पक्ष क्र. 1 कडे जे शेतीचे कागदपत्र सादर करण्यात आले त्यामध्ये मृतक नारायणचे नाव नसल्यामुळे अर्जदाराचा दावा नामंजूर केला. तक्रारकर्तीने मुदतबाह्य खोटा दावा दाखल केलेला आहे. तक्रारकर्तीच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे मृतकाचा मृत्यु झालेला असल्यामुळे ती दावा रक्कम मिळण्यास पात्र नाही. विरूध्द पक्ष क्र. 1 च्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी केलेली आहे. 7. विरूध्द पक्ष क्र. 2 यांचे उत्तर कुरिअरने प्राप्त झालेले आहे. विरूध्द पक्ष क्र. 2 चे म्हणणे आहे की, विरूध्द पक्ष क्र. 3 मार्फत प्रापत झालेला प्रस्ताव हा पुढील कार्यवाहीसाठी विरूध्द पक्ष क्र. 1 यांना पाठविण्यात आला. विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला असून त्याप्रमाणे तक्रारकर्तीला दिनांक 20/01/2009 च्या पत्राद्वारे कळविलेले आहे. विरूध्द पक्ष क्र. 2 ची सदर प्रकरणात कोणतीही चूक नसल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी विनंती केली आहे. 8. विरूध्द पक्ष क्र. 3 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी त्यांचे लेखी उत्तर पुरेशी संधी मिळूनही दाखल केलेले नाही. 9. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज व त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावरून मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? -ः कारणमिमांसा ः- 10. तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 26/10/2006 ला विषारी सर्पदंशाने मृत्यु झाला ही बाब शवविच्छेदन अहवाल, रासायनिक परीक्षण अहवाल तसेच मरणान्वेषण प्रतिवृत्त यावरून स्पष्ट होते. तक्रारकर्तीने शेत सर्व्हे नंबर 112, 106 व 220 चा सात/बाराचा उतारा दाखल केलेला आहे. सदरचा सात/बाराचा उतारा हा सन 2005-06 या वर्षाचा असून त्या तीनही उता-यांमध्ये नारायण नानाजी भुसारी यांचे नाव दर्ज केलेले आहे. तसेच तक्रारकर्तीने वारसा प्रकरणाची नोंदवही गाव नमुना ‘6-क’ ची प्रत दाखल केलेली आहे. त्यावरून सुध्दा ही बाब स्पष्ट होते की, मृतक नारायण नानाजी भुसारी यांच्या नांवे गट नंबर 106, 112, 220 ही शेत जमीन होती व त्यांच्या मृत्युनंतर तक्रारकर्ती व तिच्या मुलांच्या नावे सदर शेत जमीन दर्ज झाली आहे. यावरून ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ती हीच मृतक नारायण भुसारी यांची विधवा पत्नी आहे. तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची प्रत दाखल केली आहे ज्यामध्ये संबंधित शेतक-याचे अपघाती निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियास दाव्याची रक्कम प्राधान्यानुसार अदा करावी असे नमूद केले आहे. यामध्ये मृत शेतक-याची पत्नी ही प्राधान्य क्रमांक 1 वर आहे. याच योजनेमध्ये, प्रपत्र ‘ई’ मध्ये महसुली यंत्रणेने करावयाची कार्यपध्दती नमूद आहे. ज्यामध्ये शेतक-याने अथवा वारसदाराने दुर्घटना घडल्यानंतर तातडीने संबंधित तलाठी यांच्याकडे विहित कागदपत्रासह विमा प्रस्ताव सादर करावयाचा आहे. योजनेनुसारच तक्रारकर्तीने तलाठ्यांच्याच मार्फत विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र सादर केली. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होऊन देखील विमा कंपनीने तक्रारकर्तीस दिनांक 20/01/2009 ला म्हणजेच मुदतीनंतर तिचा विमा प्रस्ताव नामंजूर केला असे कळविले आहे. वास्तविकतः सदर योजनेअंतर्गत संपूर्ण कागदपत्रासह विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे कालावधीत रक्कम अदा करणे विमा कंपनीला बंधनकारक आहे. तक्रारकर्तीने तिच्या नावाचे तसेच तिच्या मृतक पतीच्या नावाचे संपूर्ण दस्तऐवज विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे पाठवून देखील फक्त फेरफार नोंदवहीमध्ये तक्रारकर्तीच्या पतीचे नाव आढळून येत नाही या तकलादू कारणास्तव तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केलेला आहे. वास्तविकतः तक्रारकर्तीने दाखल केलेल्या फेरफार नोंदवहीमध्ये तिच्या पतीचे नाव नमूद असून, पतीच्या मृत्युनंतर वारसानांची नावे नमूद आहे. 9. विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्तीने मुदतबाह्य दाखल केली आहे. वास्तविकतः तक्रारकर्तीने दिनांक 15/11/2006 ला संपूर्ण कागदपत्रासह विमा प्रपत्र मुदतीच्या आंत विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे सादर केला. विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी तो विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्यामार्फत विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे दाखल केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने मुदतीमध्येच विरूध्द पक्ष यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केलेला आहे. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 20/01/2009 ला तक्रारकर्तीस विमा दावा नामंजूर झाल्याचे कळविले आणि तक्रारकर्तीने सदर तक्रार दिनांक 19/01/2011 ला मंचामध्ये दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मुदतीमध्येच दाखल केली आहे असे मंचाचे मत आहे. विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी त्यांच्या जबाबदा-या योग्यप्रकारे पार पाडल्यामुळे त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही असे मंचाचे मत आहे तर विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला ही त्यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करिता आदेश. आदेश तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरूध्द पक्ष क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. व्याजाची आकारणी दिनांक 26/10/2006 पासून तर संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या हाती पडेपर्यंत करण्यात यावी. 2. विरूध्द पक्ष क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी प्रस्तुत तक्रारीच्या खर्चापोटी तक्रारकर्तीला रू. 1,000/- द्यावे. 3. विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 यांची सेवेतील कोणतीही त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 4. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आंत करावे.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |