निकालपत्र
(पारित दिनांक31-01-2009)
द्वारा. श्रीमती पोटदुखे, अध्यक्षा ः
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, ..........
1. तक्रारकर्ता या मृ. संतोष भैयालाल येळे यांच्या पत्नी आहेत. मृ. संतोष येळे हे पंचायत समिती, गोरेगाव येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत होते. वि.प. क्र. 2 यांनी समूह विमा योजने अंतर्गत श्री. संतोष येळे यांचा वि.प.क्र. 1 यांचेकडे विमा काढला होता व त्या प्रित्यर्थ प्रत्येकी रु. 147/- ची कपात फरवरी 2006 मध्ये पगारामधून करण्यात आली होती. वि.प.क्र 1 यांच्या विमा पॉलीसी क्रमांक 281303/47/07/96 या पॉलीसी अंतर्गत दि.08/05/07 ते 07/05/2010 या कालावधीकरिता सदर विमा काढण्यात आला होता.
2. दि. 01/05/07 रोजी श्री. संतोष येळे यांचा मुत्यू अपघातामुळे झाला. परंतू वि.प.क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना विम्याची रक्कम रु. 1,00,000/- देण्याचे नाकारले.
3. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, वि.प.क्र. 1 व 2 यांना निर्देश देण्यात यावे की, त्यांना विम्याची रक्कम रु. 1,00,000/- देण्यात यावी. तसेच तक्रारकर्ता यांना आर्थिक, मानसीक व शारिरिक नुकसान भरपाई म्हणून रु. 20,000/- वि.प.क्र. 1 व 2 यांच्याकडून मिळावेत.
4. वि.प.क्र. 1 यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्र. 08 वर दाखल केला आहे. ते म्हणतात की, पॉलीसी ही दि. 08/05/07 रोजी जारी करण्यात आली व श्री. संतोष येळे यांचा मुत्यू हा दिनांक 01/05/07 रोजी झाला त्यामुळे तक्रारकर्ता यांना विम्याची रक्कम ही योग्य कारणासाठी नाकारण्यात आली आहे. तक्रारकर्ता हे ग्राहक हया व्याख्येत बसत नाहीत त्यामुळे तक्रारकर्ता यांची तक्रार ही नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
5. वि.प.क्र. 2 यांनी त्ंयाचा लेखी जबाब नि.क्र. 06 वर दाखल केला आहे. ते म्हणतात की, गट विम्याकरिता एकूण 16 ग्रामसेवकांकडून प्रत्येकी रु. 147/- याप्रमाणे पगारातून कपात करुन रु. 2499/- चा डी.डी. हा आवक जावक कारकून श्री. सयाम यांच्याकडे दि.28/03/06 रोजी दिला होता. परंतू तो त्यांनी दि. 08/05/07 रोजी वि.प.क्र. 1 यांच्याकडे पाठविला. वि.प.क्र. 1 यांनी तो स्विकारलेला असल्यामुळे वि.प. हे मृतक श्री. संतोष येळे यांच्याशी संबंधीत विमा दावा देण्यास जबाबदार आहेत.
कारणे व निष्कर्ष
6. तक्रारकर्ता व वि.प. यांनी दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताएवज, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प.क्र. 2 यांनी मृ. श्री. संतोष येळे यांच्यासह 16 कर्मचा-यांकरिता गट विमा पॉलीसी ही काढण्यासाठी प्रत्येक कर्मचा-याच्या पगारातून रु. 147/- कपात करुन एकूण रु. 2499/- चा डि.डि.क्र. 05716 हा दि. 28/03/06 रोजी श्री. सयाम या कारकूनाकडे दिला होता. त्यांनी तो दि. 08/05/07 रोजी वि.प.क्र. 1 यांच्याकडे पाठविला व वि.प.क्र. 1 यांनी तो स्विकारला व त्यानंतर वि.प.क्र. 1 यांनी दि.08/05/07 ते 07/05/2010 या कालावधीकरिता पॉलीसी ही जारी केली.
7. श्री. संतोष येळे यांचा मुत्यू हा दिनांक 01/05/07 म्हणजे पॉलीसी कालावधीच्या पुर्वी झालेला आहे.
8. सेंट्रल बँक ऑफ इंडिया व इतर वि. हिरा सोनी व इतर या III (2005) सीपीजे 27 (एनसी) मध्ये प्रकाशित झालेल्या न्यायनिवाडयात आदरणिय राष्ट्रीय आयोगाने असे प्रतीपादन केले आहे की, ''गट विमा योजनेकरिता बँक ही एजंट म्हणून काम करित असताना व विमा हप्त्याचे पैसे गोळा करण्याचे अधिकार त्यांचेकडे एजंट म्हणून असताना त्यांनी कर्मचा-यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम ही विमा कंपनीला मिळालेली आहे असे समजले जायला पाहिजे. एजंट यांनी कपात केलेली रक्कम ही विमा कंपनीला पोहचविली नाही तर पॉलीसी ही रद्द झाली असे म्हणता येत नाही. कंपनी ही पॉलीसीची रक्कम लाभार्थांना देण्यास जबाबदार असते''.
9. सदर प्रकरणात सुध्दा वि.प.क्र. 2 हे वि.प.क्र. 1 यांचे एजंट म्हणून काम करत होते व त्यांच्याकडून कर्मचा-यांच्या पगारातून कपात झालेली रक्कम वि.प.क्र. 1 यांच्याकडे पाठविण्यास उशीर झाला आहे. सदर रक्कम ही मार्च 06 मध्ये कपात होऊन सुध्दा ती वि.प.क्र. 1 यांना मे 07 मध्ये पाठविण्यात आली व त्यामुळे पॉलीसी जारी होण्यास उशीर झाला आहे. वि.प.क्र. 2 हे वि.प.क्र. 1 यांचे एजंट असून त्यांच्या चूकीचा फायदा हा वि.प.क्र. 1 यांना घेता येणार नाही.
असे तथ्य व परिस्थिती असताना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारकर्ता यांना वि.प.क्र. 1 यांनी विम्याची रक्कम रु. 1,00,000/- ही दि. 01/12/08 पासून म्हणजेच ग्राहक तक्रार दाखल झाल्याचा तारखेपासून ती रक्कम प्राप्त होई पर्यंत 9 टक्के व्याजासह दयावी.
2. वि.प.क्र. 2 यांनी तक्रारकर्ता यांना शारिरिक व मानसीक त्रासासाठी रु. 3000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु. 1000/- दयावेत.
3. आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 यांनी आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचा आत करावे.