अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार सतीश पि. पुंडलीकराव नुग्रवार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडून दि.08/01/2010 रोजी विमा पॉलिसी काढली जिचा पॉलिसी क्र. 272000/48/09/ 8500001312 असा आहे. गैरअर्जदार क्र. 2 ही विमा कंपनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्या अधिपत्याखाली काम करते. दिनांक 02/09/2010 रोजी अर्जदार झाडावर काम करीत असतांना अचानक हवेच्या हेलकाव्यामुळे खाली पडून त्यांचा उजवा पाय मोडला व इतर अवयवांना पण जब्बर मार लागला. अर्जदारास डॉ. कत्रुवार नांदेड यांच्याकडे उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. दिनांक 02/09/2010 ते दिनांक 10/09/2010 पर्यंत अर्जदार डॉ. कत्रुवार नांदेड यांच्या दवाखान्यात उपचार घेत होते व त्यास रु.22,690/- इतका खर्च आला. त्या व्यतिरिक्त अर्जदारास औषधोपचारासाठी रु. 25,000/- वेगळा खर्च आलेला आहे. त्या बद्दलच्या पावत्या अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदार 1 यांच्याकडे सदर मेडीकल बिल व खर्चाची मागणी केली व त्यासाठी लागणा-या सर्व कागदपत्राची पूर्तता केली. त्यानंतर दिनांक 13/12/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास पत्र पाठवून एक्सरेची मागणी केली. अर्जदाराने सदर मागणीची पूर्तता केली. तरी पण गैरअर्जदाराने अर्जदाराचा कोणताही खर्च दिलेला नाही. दिनांक 20/07/2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली. त्यानंतर दिनांक 17/08/2012 रोजी गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास पत्र पाठवून पुन्हा एक्सरे पाठविण्यासाठी सांगितले. त्यानंतर अर्जदाराने पुन्हा एक्सरे संबंधीत कार्यालयाला पाठवला तरी देखील आजपर्यंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणतीही रक्कम दिलेली नाही म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार मंचात दाखल करुन विनंती केली आहे की, गैरअर्जदार 1 यांच्याकडून अर्जदारास विमा रक्कम रु.50,000/- वैदयकीय खर्च रु.47,000/- तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.3,000/- असे एकूण रक्कम रु. 1,00,000/- गैरअर्जदार 1 व 2 यांच्याकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
गैरअर्जदार 1 यांना मंचाची नोटीस तामील होवून देखील त्यांनी मंचात हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही.
गैरअर्जदार 2 यांना यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते आपल्या वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे.
अर्जदाराची तक्रार ही खोटी व काल्पनिक असून ती खारीज करण्यास योग्य आहे. अर्जदाराचे म्हणणे की, तो झाडावर काम करीत असतांना झाडावरुन पडून त्याचा अपघात झाला हे खोटे आहे. अर्जदारास औषधोपचारासाठी रु.47,000/- खर्च आला हे म्हणणे देखील खोटे आहे. अर्जदाराला पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार सर्व कागदपत्रे गैरअर्जदार यांच्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे. गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास एक्सरेची फिल्म दाखल करण्यास सांगितले होते व त्यास स्मरणपत्र देवून देखील अर्जदाराने सदर एक्सरेची फिल्म दाखल केलेली नाही त्यामुळे गैरअर्जदार 2 यांनी अर्जदाराचा क्लेम नो-क्लेम म्हणून बंद केला. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे बहुतांश म्हणणे अमान्य केलेले आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यंच्याकडून Hospitalization Benefit Policy घेतली होती हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर पॉलिसीच्या कव्हर नोटच्या प्रतीवरुन स्पष्ट होते व ते गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदार हा दि. 2/09/2010 ते 10/09/2010 पर्यंत डॉ. कत्रुवार यांच्या अॅक्सीडेंट आणि मॅटरनिटी हॉस्पीटलमध्ये अंतररुग्ण म्हणून उपचार घेतले हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर हॉस्पीटलच्या डिस्चार्ज कार्डाच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. अर्जदारास कत्रुवार हॉस्पीटलमध्ये 22,650/- रुपये खर्च आला होता हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर हॉस्पीटलच्या बिलाच्या प्रतीवरुन सिध्द होते. अर्जदाराचा विमा दावा पूर्ततेकरीता एक्सरे फिल्मची मागणी गैरअर्जदार क्र. 1 यांनी केलेली होती व जर एक्सरे फिल्म दाखल न केल्यास सदर क्लेम हा नो क्लेम धरला जाईल असे गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास दि. 17/08/2012 रोजीच्या पत्राद्वारे कळवलेले होते. हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर पत्राच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम नो क्लेम केलेला आहे, हे मंचास योग्य वाटत नाही कारण गैरअर्जदाराने त्यासाठी दिलेले कारण हे योग्य नाही. अर्जदाराने एक्सरे फिल्म गैरअर्जदार यांच्याकडे दोन वेळा दाखल केल्याचे म्हटलेले आहे. जरी असे गृहीत धरले की अर्जदाराने एक्सरे फिल्म गैरअर्जदार यांच्याकडे दाखल केलेली नाही तरी अर्जदार हा दि. 02/09/2010 पासून ते दि. 10/02/2010 पर्यंत अॅडमीट होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या डिस्चार्ज कार्डावरुन स्पष्ट होते. तसेच त्याच डिस्चार्ज कार्डामध्ये अर्जदारावर Fracture of Shaft Femer साठी शास्त्रक्रिया व उपचार केलेले आहेत हे देखील स्पष्टपणे लिहिलेले आहे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या मेडीक्लेम पॉलिसीच्या अटी व शर्तीपैकी 1A, 1B, 1C यामध्ये जो खर्च मंजूर केलेले आहेत ते पाहता अर्जदाराने जे हॉस्पीटलचे बिल दाखल केलेले आहे त्यापैकी रजिस्ट्रेशन चार्जेस 200 रुपये वगळता पूर्णपणे देय आहेत असे मंचाचे मत आहे. सदर बिलातील रजिस्ट्रेशन चार्जेस 200 रुपये वगळता 22,450/- ही रक्कम अर्जदार मिळण्यास पात्र आहे. तसेच 1C प्रमाणे अर्जदार औषधांचा खर्च मिळण्यास पात्र आहे. अर्जदाराने जी औषधांची बिले दाखल केलेली आहेत त्यांची एकूण रक्कम पुढील प्रमाणे आहे.
बिल नंबर रक्कम
10084 294/-
10089 1805/-
10109 821/-
10093 410/-
10116 510/-
______________________
एकूण 3840/-
अर्जदार हा सदर रुपये 22,450/- व 3840/- असे एकत्रीत रु. 26,290/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. अर्जदारास सदर रक्कम देण्याचे टाळाटाळ करुन गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी दिलेली आहे व अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे.
वरील विवेचनावरुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र.2 यानी अर्जदारास रु. 26,290/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रु.3,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.