निकाल
(घोषित दि. 25.07.2016 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने त्याच्या रुग्णालयाच्या अंतर्गत सजावटीसाठी गैरअर्जदार यांच्याकडून वाळवी प्रतिबंधक प्लायवूड खरेदी केले. प्लायवूड लावण्यापूर्वी त्यांनी किड प्रतिबंधक उपाय योजना करुन सुध्दा काही वर्षातच गैरअर्जदार यांच्याकडून खरेदी केलेल्या प्लायवूडला वाळवी लागली याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली परंतू गैरअर्जदार यांनी तक्रारीचे निरसन न केल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे आहे.
अर्जदार हे जालना येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. सन 2008 मध्ये त्यांनी रुग्णालयाच्या व घराच्या अंतर्गत सजावटीसाठी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे प्लायवूड घेण्यासाठी चर्चा केली असता त्यांनी गैरअर्जदार क्र.1 उत्पादीत प्लायवूड हे वाळवी न लागणारे असून किमान 50 वर्ष टिकेल असे सांगितले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार या आश्वासनामुळे त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून प्लायवूड खरेदी केले. सदरील प्लायवूड लावण्यापूर्वी वाळवी प्रतिबंधक उपाय योजना म्हणून पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण झाल्यानंतर देखील नियमितपणे पेस्ट कंट्रोल व औषध फवारणी करण्यात येत होती. ऑगस्ट 2015 मध्ये गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून घेतलेल्या प्लायवूडला ठिकठिकाणी वाळवी लागून प्लायवूड व सजावटीचा भाग खराब होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले. अर्जदाराने इंजिनिअर श्री.किरण कोळेश्वर यांच्याकडून पाहणी केल्यानंतर प्लायवूड दोषयुक्त असल्यामुळे वाळवी लागल्याचे सांगण्यात आले. अर्जदाराने दि.18.11.2015 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून गैरअर्जदार यांनी 16 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत प्लायवूड खरेदी केल्याची पावती,पेस्ट कंट्रोलचे देयक, गैरअर्जदार यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, वाळवी लागल्याचे फोटो इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल केला असून त्यांच्या जबाबानुसार त्यांची कंपनी ही भारतातील प्लायवूडचे उत्पादन करणारी एक नामवंत कंपनी आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही कालबाहय असून त्यांनी उत्पादन केलेले प्लायवूड 50 वर्षे टिकेल अशी गॅरंटी किंवा वॉरंटी कधीच दिलेली नव्हती. अर्जदाराने दाखल केलेल्या प्लायवूड व सजावटीच्या फोटोमध्ये अर्जदाराने त्याच्या प्लायवूड सोबत इतर प्लायवूडचा देखील वापर केलेला आहे. यावरुन त्यांनी उत्पादीत केलेल्या प्लायवूडमध्ये दोष होता हे म्हणणे त्यांना मान्य नाही. अर्जदाराने दि.18.11.2015 रोजी पाठविलेली नोटीस ही मराठी भाषेत होती परंतू त्यांचे कार्यालय कलकत्ता येथे असल्यामुळे व मराठी भाषा तिथे प्रचलित नसल्यामुळे त्यांनी अर्जदारास इंग्रजीमधून संभाषण करण्यास कळविले. अर्जदारास विक्री करण्यात आलेल्या प्लायवूडमध्ये कोणताही उत्पादकीय दोष नसल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार कालबाहय असून ती खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखी जबाब दाखल केला असून त्यांच्या जबाबानुसार त्यांचा जालना येथे स्वस्तिक ग्लास हाऊस या नावाने व्यवसाय असून ते गैरअर्जदार क्र.1 उत्पादीत करीत असलेल्या प्लायवूडचे स्थानिक विक्रेते आहेत. दि.09.07.2008 रोजी अर्जदाराने त्यांच्याकडून गैरअर्जदार क्र.1 उत्पादीत वाळवी प्रतिबंधक प्लायवूडची खरेदी केल्याचे त्यांना मान्य आहे. परंतू या प्लायवूडची 50 वर्षे गॅरंटी दिली असल्याचे अर्जदाराचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी वरीलप्रमाणे कोणत्याही प्रकारची लिखीत किंवा तोंडी गॅरंटी अर्जदारास दिलेली नाही. गैरअर्जदार क्र.2 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही उत्पादकीय दोषाबाबत आहे. ते स्वतः या प्लायवूडचे उत्पादक नसल्यामुळे त्यांचा उत्पादनाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. त्यांचा फक्त विक्री व्यवहाराशी संबंध येतो. अर्जदाराने विनाकारण त्यांना प्रतिवादी केले असून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती त्यांनी मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की,
1) अर्जदार हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी त्यांच्या घराच्या व रुग्णालयाच्या अंतर्गत सजावटीसाठी गैरअर्जदार क्र.1 उत्पादीत ‘मयूर प्लायवूड’ या प्लायवूडची दि.09.07.2008 रोजी क्र.2 यांच्याकडून खरेदी केली. अर्जदाराने मागणी केल्याप्रमाणे वाळवी प्रतिबंधक प्लायवूडची विक्री गैरअर्जदार क्र.2 यांनी केली. अर्जदाराने तक्रारीसोबत प्लायवूड खरेदी केल्याचे बिल जोडले आहे. (बिल क्र.83 ता.09.07.2008) याबाबत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा सुध्दा आक्षेप नाही. अर्जदाराने त्यांच्या तक्रारीसोबत प्लायवूड खरेदी सोबत गॅरंटी किंवा वॉरंटी कार्ड जोडलेले नाही व तक्रारीमध्ये त्याबददल उल्लेखही केलेला नाही.
2) अर्जदाराने घरामध्ये तसेच रुग्णालयात पूणे येथील रिलायबल पेस्ट कंट्रोल कंपनीकडून अंतर्गत सजावटीपूर्वी वाळवी प्रतिबंधक उपाय योजना करुन घेतल्याचा पुरावा मंचात दाखल केला आहे.परंतू ही उपाय योजना प्लायवूड खरेदीच्या एका वर्षापूर्वी केल्याचे पेस्ट कंट्रोल कंपनीच्या बिलावरुन दिसून येते. रिलायबल पेस्ट कंट्रोल कंपनीचे बिल हे दि.30.07.2007 रोजीचे आहे.
3) अर्जदाराने दि.18.11.2015 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना कायदेशीर नोटीसद्वारे प्लायवूडला लागलेल्या वाळवी बाबत तक्रार केली आहे ही तक्रार 7 वर्षाच्या कालावधीनंतर करण्यात आली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सदरील तक्रार विहीत मुदतीत करणे आवश्यक होते. प्लायवूडची वॉरंटी 7 वर्षाची असल्याचे गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या वॉरंटी कार्ड वरुन दिसून येते. अर्जदार यांनी मुदत संपल्यानंतर दि.18.11.2015 रोजी ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी त्यासोबत विलंब अर्ज देखील दाखल केलेला नाही.
4) अर्जदार यांनी दि.01.09.2015, 07.09.2015 व 18.11.2015 रोजी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, गांधी चौक, जालना यांना नोटीस पाठविली असून रुग्णालयासाठी स्टॅन्डर्ड फायर अॅंड स्पेशल पेरिल्स पॉलीसी घेतली आहे. (पॉलीसी क्र.23/202/11/14/11/00000642) अर्जदाराने दिलेल्या नोटीस मध्ये वाळवीमुळे रुग्णालयाच्या अंतर्गत सजावटीचे 8,64,000/- रुपयाचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे व ते देण्याची मागणी केलेली दिसून येते. अर्जदाराने याबाबत झालेल्या कारवाईची माहिती मंचासमोर किंवा तक्रारीमध्ये दिलेली नाही. यावरुन अर्जदार यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी व मंचामध्ये एकाच कारणासाठी नुकसान भरपाईची मागणी केल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच सदरील तक्रार खारीज करीत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना