आदेश (पारीत दिनांक : 29 फेब्रुवारी, 2012 ) श्री मिलींद रामराव केदार, मा.सदस्य यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा,1986 चे कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. त.क. यांची प्रतिज्ञालेखावरील मुख्य तक्रार अशी आहे की, ते व्यवसायाने वैद्यकीय अधिकारी, असून सेवाग्राम, तालुका जिल्हा वर्धा येथील कायम रहिवासी आहेत. त.क.यांनी मारोती कंपनीची मारोती झेन एस्टीलो हे वाहन, वि.प.क्रं 5 चे मार्फतीने, वि.प.क्रं 4 यांचे कडून माहे एप्रिल, 2009 मध्ये खरेदी केले. सदर वाहनाचा नोंदणी क्रमांक MH-32/C-3012 असा आहे. वाहन विकत घेते वेळी सदर वाहनाचा विमा वि.प.क्रं 2 विमा कंपनीकडे पॉलिसी क्रमांक 70022472 अन्वये दिनांक 08.04.2009 ते 07.04.2010 कालावधी करीता काढण्यात आल्याचे सांगितले. वि.प.क्रं 1 हे, वि.प.क्रं 2 कंपनीचे अभिकर्ता म्हणून कार्य पाहतात. वि.प.क्रं 3 हे मारोती कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सदर वाहन विकत घेते वेळी त्याचा विमा वि.प.क्रं 1 कडून काढताना नुकसान भरपाई बाबत आश्वस्त करण्यात आले व त्यासाठी रुपये-500/- आगाऊ घेण्यात आले. CC-57/2011 2. त.क.यांनी पुढे असे नमुद केले की, त्यांचे विमाकृत वाहनास दिनांक 26.11.2009 रोजी पहाटे 05.00 वाजता अपघात झाला.अपघाता नंतर, वि.प.क्रं 5 यांना माहिती देताच, त्यांनी दुरध्वनी वरुन क्षतीग्रस्त वाहन, जवळचे अधिकृत मारोती डिलरकडे घेऊन जाण्यास सांगितले. त्यावरुन सदर वाहन दिनांक 28.11.2009 रोजी वि.प.क्रं 3 यांचेकडे नेण्यात आले व त्यांचे सुचने वरुन त.क.चे मित्र निखील यांनी सदर वाहन दिनांक 10.01.2010 रोजी त्यांचे कार्यशाळेत दुरुस्तीसाठी नेले व नुकसान भरपाईचा अर्ज केला. परंतु पंधरा दिवसा नंतरही तेथील अधिकारी श्री राकेश यांनी कारवाई होत आहे, वेळ लागेल असे सांगितले व श्री थंपी सर्व्हेअर यांची नेमणूक झाल्याचे सांगितले. परंतु त्यानंतरही वि.प.यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही.
4. त.क.यांनी प्रयत्न करुन सुध्दा वि.प.ने आवश्यक ती कारवाई केली नाही. त.क.ला चर्चे करीता बोलाविले व त्यानंतर इन्व्हेस्टीगेटर श्री अयर व सर्व्हेअर श्री महेंद्र ध्रुव यांची नेमणूक केली व दावा निकाली काढण्याचे आश्वासन दिले. तसेच वि.प.क्रं 2 चे मार्फतीने दिनांक 28.09.2010 व 03.10.2010 ला त.क.यांना कळविले की, ते सदर वाहनाचा विमा दावा हा निव्वळ तोटा या तत्वावर काढून, वाहनाचे भग्न अवशेष विक्री करुन, त्याची किंमत त.क.यांना देतील. सदर वाहनाची आय.डी.व्ही. किंमत ही रुपयेः3,13,702/- अशी असल्यामुळे, त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी असे त.क.यांनी सुचित केले.
5. त.क.यांनी असेही नमुद केले की, त.क.चे वाहन वि.प.क्रं 3 यांचेकडे असताना त्यांनी पार्कींग चॉर्जेस लावले तसे पार्कींग चॉर्जेस लावणे चुकीचे आहे. या बाबत त्यांनी वि.प.क्रं 1 ते 3 यांना कळविल्याचे नमुद केले. 6. त.क.यांनी विमा दाव्या संबधाने रजिस्टर नोटीस दिनांक 22.02.2011 रोजी वि.प.यांना पाठविली परंतु वि.प.यांनी नोटीसला उत्तर दिले नाही व विमा दावा रक्कम देण्यास वि.प.टाळाटाळ करीत आहेत. अशाप्रकारे वि.प.यांनी, त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे त.क.चे म्हणणे आहे. 7. म्हणून त.क.यांनी, शेवटी प्रस्तुत तक्रार वि. जिल्हा न्यायमंचात दाखल केली असल्याचे त.क.नमुद करतात. त.क.यांनी तक्रारीचे विनंती कलमात प्रार्थना केली की, त.क.यांना सदर वाहनाचे विमा दाव्या संबधाने रक्कम रुपये-3,13,200/-
CC-57/2011 व्याजासह देण्याचे वि.प.यांना आदेशित व्हावे तसेच त.क.यांना झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्यल रुपये-2.00 लक्ष व प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-15,000/- वि.प.कडून देण्याचे आदेशित व्हावे. 8. वि.प.क्रं 4 व 5 यांनी प्रतिज्ञालेखावर आपला लेखी जबाब पान क्रमांक 46 ते 49 वर न्यायमंचा समक्ष दाखल केला. त्यांनी नमुद केले की, वि.प.क्रं 4 हे मारोती कंपनीद्वारे निर्मित वाहन तसेच वाहनाचे सुटे भाग विक्री व सेवा करीता नागपूर येथील नियुक्त वितरक असून, वि.प.क्रं 5 ही त्यांची शाखा आहे. त.क.यांनी वि.प.क्रं 5 कडून तक्रारीतील नमुद वाहन विकत घेतले असले तरी, सदर वाहनाचे विम्या बाबत कोणताही करार, त.क. किंवा वि.प.क्रं 4 व 5 मध्ये नव्हता वा त्या संबधाने कोणतीही रक्कम त्यांनी त.क.यांचे कडून घेतलेली नाही. सदर व्यवहाराशी वि.प.क्रं 4 व 5 यांचा कोणताही संबध नाही व त्यामुळे त.क.यांनी तक्रारअर्जात कुठलेही आरोप वि.प.क्रं 4 व 5 विरोधात केलेले नाहीत परंतु असे असताना त्यांना विनाकारण प्रस्तुत प्रकरणात प्रतिपक्ष करण्यात आलेले आहे. सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज व्हावी. 9. वि.प.क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी जबाब पान क्रं 53 ते 62 वर प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष दाखल करण्यात आला. त्यांनी त.क.यांचे मालकीची मारोती झोन इस्टीलो कार क्रमांक-32-सी-3012 वाहनाचा विमा, त.क.यांचे कडून प्रिमियम स्विकारुन दिनांक 08.04.2009 ते दिनांक 07.04.2010 कालावधी करीता काढून पॉलिसी दिल्याची बाब मान्य केली. त.क.यांनी रुपये-500/- वि.प.क्रं 1 यांना कश्यासाठी दिले या बद्यलची त्यांना माहिती नाही. 10. विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे , पॉलिसीचे वैध कालावधीत वाहनास अपघात झाल्यास त्याची वाहनमालकाने त्वरीत सुचना विमा पॉलिसीमध्ये नमुद पत्त्यावर लिखित रुपाने देणे गरजचे आहे व त्यानंतर आवश्यक पुर्तता करणे आवश्यक आहे. त.क.यांचे प्रकरणामध्ये विमाकृत वाहनास दिनांक 26.11.2009 रोजी अपघात झाल्या नंतर, त.क.यांनी क्षतीग्रस्त वाहन वि.प.क्रं 5 चे सहमतीने दिनांक 10.12.2009 रोजी वि.प.क्रं 3 यांचे गॅरेज मध्ये पाठविले होते परंतु त.क.यांनी विमा कंपनीचे नजीकचे कार्यालयात अपघाताची सुचना त्वरीत दिली नाही. त्यामुळे वि.प.विमा कंपनीस अधिकृत सर्व्हेअरची त्वरीत नियुक्ती करता आली नाही. त.क.हे उच्चशिक्षीत असताना त्यांनी जाणूनबुजून विमा पॉलिसीतील अटी व नियमाचा भंग केला आहे. त.क.यांनी वाहन वि.प.क्रं 3 चे गॅरेज मध्ये दुरुस्ती करीता टाकले परंतु त्याची सुचना वि.प.क्रं 2 विमा कंपनीस दिली नाही. CC-57/2011 वि.प.क्रं 2 विमा कंपनीस प्रथमच वि.प.क्रं 3 कडून वाहनास अपघात झाल्या बद्यलची सुचना मिळाली त्यावरुन अधिकृत सर्व्हेअर यांची नियुक्ती केली असता त्यांनी वाहनाचे निरिक्षण केले व चौकशी केली. मारोती इन्शुरन्सचे अधिकारी व वि.प.क्रं 2 विमा कंपनीचे अधिकारी व त.क.यांचेमध्ये बैठक झाल्या नंतर अपघातग्रस्त वाहनाचा दावा हा निव्वळ तोटा (टोटल लॉस बेसिस) तत्वावर ठरविण्यात आला. अपघातग्रस्त वाहनाची आय.डी.व्ही.किंमत रुपये-3,13,702/- ठरविण्यात आली. आपसात ठरल्या प्रमाणे वि.प.विमा कंपनीने अपघातग्रस्त वाहन मे.खन्ना अटो या कंपनीस त.क.यांची सहमती घेऊन रुपये-1,15,000/- मध्ये विकले व वि.प.क्रं 2 विमा कंपनीला वाहनाचे विक्रीतून मिळालेली रक्कम, आय.डी.व्ही.प्रमाणे मंजूर रक्कम रुपये-3,13,702/- मधून वजा करुन व रुपये-500/- कम्पलसरी डिडक्शनची रक्कम वजा करुन, उर्वरीत रक्कम रुपये-1,98,200/- एवढी रक्कम धनादेशाद्वारे त.क. यांना दिनांक 14.10.2010 रोजी देण्यास तयार होती. 11. परंतु त.क.वरील दोन्ही रक्कमा उचलण्या करीता वि.प.क्रं 2 चे कार्यालयात आले नाही. तसेच वि.प.क्रं 3 चे कार्यालयाचा पार्कींगचा खर्च सुध्दा त.क.यांनी दिलेला नाही. अपघातग्रस्त कार वि.प.क्रं 3 हे मे.खन्ना अटो यांना देण्यास तयार नव्हते कारण त्यांचे पार्कींगचे चॉर्जेस त.क.यांनी दिले नव्हते. पार्कींगचा खर्च देण्याची जबाबदारी त.क.यांची आहे कारण त्यांनी वाहन वि.प.क्रं 3 कडे दिनांक 10.12.2009 रोजी दुरुस्तीसाठी टाकताना, वि.प.क्रं 2 विमा कंपनीची परवानगी घेतली नव्हती. 12. त.क.यांना व्याज व अन्य नुकसान भरपाई मागण्याचा कोणताही अधिकार नाही कारण ते नेट लॉस बेसीस या आधारावर रुपये-3,13,200/- नुकसान भरपाई देण्यास तयार होते व आहेत परंतु त.क.यांनी मारोती डिलर, सेप्टा मोटर्स, मलाड यांना पार्कींगचे भाडे त.क.यांनी न दिल्यामुळे सदर विमाकृत वाहन विक्री नंतर मे. खन्ना अटो यांना दिली नाही व त्या कारणास्तव खन्ना अटो यांनी विमाकृत वाहना संबधाने डी.डी. दिलेला नाही व रुपये-1,98,200/- चा धनादेश वि.प.क्रं 2 विमा कंपनीकडून त.क.यांनी स्वतः उचललला नाही म्हणून या संबधात नुकसान भरपाई व व्याज मागण्याचा त.क.यांना कोणताही अधिकार नाही. 13. वि.प.क्रं 2 यांनी पुढे असेही नमुद केले की, विमा पॉलिसी ही ठाणे कार्यालयातून काढली होती तसेच अपघात हा मुंबईचे विर्लेपार्ले येथे घडलेला आहे व
CC-57/2011 अपघातग्रस्त कार मालाड येथे ठेवण्यात आली होती त्यामुळे अधिकारक्षेत्र हे मुंबई येथेच आहे व वाहन नागपूर येथे खरेदी करण्यात आलेले आहे, त्यामुळे वर्धा जिल्हा न्यायमंचास प्रस्तुत प्रकरणी अधिकार क्षेत्र येत नाही.
14. वि.प.क्रं 3 यांनी, त.क.यांना दिनांक 02.11.2010 रोजीचे पत्र पाठवून क्षतीग्रस्त वाहनाचे पार्कींचे प्रतीदिवस रुपये-250/- प्रमाणे एकूण रुपये-81,000/- ची मागणी केलेली आहे. वि.प.क्रं 2 यांनी दिनांक 24.02.2011 रोजीचे पत्र पाठवून त.क.यांना त्यांचे नावाचे रुपये-1,98,200/- नुकसान भरपाईचा धनादेश घेऊन जावा असे सुचित केले होते परंतु या सर्व बाबींचा उल्लेख त.क.यांनी दाव्यात केला नाही. सबब त.क.यांची तक्रार खर्चासह खारीज व्हावी, असा उजर वि.प.क्रं 2 विमा कंपनी तर्फे घेण्यात आला. 15. वि.प.क्रं 3 स्पेक्ट्रा मोटर्स लिमिटेड तर्फे प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब पान क्रमांक 86 ते 89 वर न्यायमंचा समक्ष दाखल करण्यात आला. त्यांनी लेखी जबाबामध्ये आक्षेप घेतला की, सदर प्रकरण चालविण्याचे अधिकारक्षेत्र वि.जिल्हा न्यायमंचास नाहीत कारण तक्रारीचे कुठलेही कारण हे वि.जिल्हा वर्धा ग्राहक न्यायमंचाचे अधिकारक्षेत्रात घडलेले नाही आणि या एकाच कारणास्तव प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. वि.प.क्रं 3 विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही तसेच तक्रारीवरुन वि.प.क्रं 3 विरुध्द कोणतीही मागणी नाही. तसेच त्यांनी त.क.यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
16. वि.प.क्रं 3 ची त.क.यांचे कडून पार्कींग चॉर्जेस बद्यलची मागणी आहे व त्या संबधीचे अधिकारक्षेत्र हे मुंबई न्यायमंचास येते. विमा दाव्या संबधाने वि.प.क्रं 3 यांचा कोणताही संबध येत नसल्याने त्यांना जबाबदार धरता येऊ शकत नाही. त.क.यांनी वि.प.क्रं 3 यांचे पार्कींग चॉर्जेस दिलेले नाहीत. सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज व्हावी, अशी विनंती वि.प.क्रं 3 यांनी केली. 17. वि.प.क्रं 1 मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आणि ठळकपणे नमुद केले की, सदर तक्रारीत नमुद केलेले वि.प.क्रं 1 म्हणजे मारोती इन्शुरन्स, मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड सर्वथा चुकीचे असून, मारोती इन्शुरन्स, मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही. मारुती इन्शुरन्स ही नॅशनल इन्शुरन्स कंपनीशी निगडीत असून
CC-57/2011 ती त्यांचे करीता अभिकर्ते म्हणून कार्य करते. यालट, मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड ही एक स्वतंत्र वेगळी संस्था आहे व वाहन निर्मितीचा व्यवसाय आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 म्हणजे मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड यांचा सदर इन्शुरन्स कंपनीशी काहीही संबध नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 म्हणून दिलेले टायटल मारोती इन्शुरन्स-मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड हे सर्वथा चुकीचे आहे. त्यामुळे त.क.ची तक्रार बनावट व खोटी असून ती कुठल्याही पुराव्याचे आधारीत नाही. वि.प.क्रं 1 मारुती सुझूकी इंडीया लिमिटेडचा या तक्रारीशी दुरान्वये संबध नाही. तसेच वि.प.क्रं 1 मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड यांचा वि.प.क्रं 2 व विरुध्दपक्ष क्रमांक मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड यांचा आपसात काहीही संबध नाही. वि.प.क्रं 1 मारुती सुझूकी इंडीया लिमिटेड हा वाहन निर्माण करण्याचा उद्योग असून, वि.प.क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी ही एक विमा कंपनी आहे. सबब वि.प.क्रं 1 विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, असा उजर त्यांनी घेतला. 18. त.क.यांनी पान क्रमांक 10 वरील यादी नुसार एकूण 16 दस्तऐवज दाखल केले असून, त्यामध्ये वाहन खरेदी बिल, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, विमा पॉलिसी, विमा कंपनीकडे अपघाता संबधी माहिती दिल्या बाबतचा फॉर्म, अपघातग्रस्त वाहनाचा जॉबकॉर्ड, त.क.यांनी वि.प.यांचेशी वेळोवेळी केलेला पत्र, रजिस्टर नोटीस, पोस्ट पावती, पोच पावती , कोटेशन इत्यादीचा समावेश आहे. त.क.यांनी पान क्रं 122 ते 133 वर शपथपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
19. वि.प.क्रं 2 यांनी पान क्रं 64 वरील यादी नुसार एकूण 03 दस्तऐवच दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी त.क.यांचेशी केलेला पत्रव्यवहार व त.क.चे नोटीसला दिलेले उत्तर इत्यादीचा समावेश आहे. 20. त.क.यांची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार, वि.प. यांचा प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज याचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर मंचा समक्ष निर्णयान्वित होण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) प्रस्तुत तक्रार चालविण्याचे वि.न्यायमंचास अधिकार क्षेत्र येते काय ? नाही. (2) काय आदेश? अंतीम आदेशा नुसार CC-57/2011 :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 21. तक्रारकर्ते यांनी केलेले कथन व तक्रारीतील मुद्ये यांचे अवलोकन केले असता व तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या पान क्रं 13 वरील दस्तऐवज क्रमांक 3 विमा प्रपत्राचे अवलोकन केले असता, तक्रारकर्ते यांनी त्यांचे वाहन क्रमांक- MH-32/C-3012, ज्याचा Engine Chassis No.-3350803-216975 आहे. सदर वाहन मारोती झेन एस्टीलो असून ते मारोती कंपनीचे आहे. या वाहनाचा विमा दिनांक 08.04.2009 ते 07.04.2010 या कालावधी करीता वि.प.क्रं 2 यांचेकडे उतरविला होता. सदर वाहनाचे विम्याची रक्कम, वि.प.क्रं 4 द्वारे दिल्याचे दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते. यावरुन वाहनाचे विम्याची रक्कम ही वि.प.क्रं 5 यांना नागपूर येथे देण्यात आली, ही बाब स्पष्ट होते. 22. तक्रारकर्त्याचे वाहनास झालेला अपघात हा दिनांक 26.11.2009 रोजी झाला ही बाब सुध्दा दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते आणि सदर वाहन दुरुस्ती करीता जवळचे मारोती डिलर वि.प.क्रं 5 स्पेक्ट्रा मोटर्स लिमिटेड, मालाड, पश्चीम, मुंबई येथे नेले, ही बाब सुध्दा दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते. 23. सदर विमाकृत वाहनाचा अपघात हा विलेपार्ले, मुंबई येथे झाला होता व वाहन दुरुस्ती करीता वि.प.क्रं 5 स्पेक्ट्रा मोटर्स लिमिटेड, मालाड, पश्चीम मुंबई येथे नेले होते या वरुन वाहनाचा अपघात झालेले क्षेत्र सुध्दा, वि.जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही व ज्या कार्यशाळेमध्ये सदर विमाकृत वाहन दुरुस्ती करीता नेले होते ते वि.प.क्रं 3 हे सुध्दा वि.मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. 24. तक्रारकर्त्याचे तक्रारीतील मुख्य मुद्या वि.प.क्रं 3 यांनी लावलेल्या पार्कींग चॉर्जेस संबधिचा आहे. त्यामुळे वि.प.क्रं 3 विषयी असलेल्या आक्षेपाचे न्यायोचितदृष्टया ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-11 अंतर्गत, ज्या वि.प.शी वाद असेल, तो वि.प.ज्या मंचाचे कार्यक्षेत्रात येतो त्या ठिकाणी तक्रार दाखल करावी लागते. तक्रारकर्त्याचा वाद हा वि.प.क्रं 3 व वि.प.क्रं 1 व 2 यांचेशी आहे. सदर तीनही वि.प.या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही, त्यामुळे सदर तक्रारीचे निवारण करण्याचे अधिकारक्षेत्र वि.जिल्हा ग्राहक न्यायमंचास येत नाही, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. CC-57/2011 25. न्यायोचितदृष्टया तक्रारकर्त्यास मुभा देण्यात येते की, त्याने आपली तक्रार योग्य त्या सक्षम न्यायमंचा समोर किंवा योग्य न्यायप्राधिकरणापुढे दाखल करावी, या बाबतचे त्यांचे सर्व हक्क अबाधित ठेवण्यात येत आहेत. 26. वरील सर्व विवेचना वरुन, वि.जिल्हा न्यायमंच, प्रस्तुत प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) त.क.ची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्यल कोणतेही आदेश नाहीत. 3) त.क.ला योग्य वाटल्यास ते सक्षम न्यायालयात जाऊन तेथे आपली दाद मागू शकतील. या संबधीचे त्यांचे सर्व अधिकार अबाधित ठेवण्यात येत आहेत. 4) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी. 5) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |