जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 280/2016.
तक्रार दाखल दिनांक : 21/09/2016.
तक्रार आदेश दिनांक : 04/05/2017. निकाल कालावधी: 00 वर्षे 06 महिने 13 दिवस
कांताबाई अच्युत भालेराव, वय 55 वर्षे,
व्यवसाय : मजुरी, रा. कसबे तडवळे, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) व्यवस्थापक, मकरंद भारत गॅस, ग्रामीण वितरक,
इंदिरा निवास, बार्शी-लातूर रोड, येडशी, ता.जि. उस्मानाबाद.
(2) व्यवस्थापक, न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी लि.,
बिल्डींग 87, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई तर्फे :-
शाखा व्यवस्थापक, न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी लि.,
शिवाजी चौक, उस्मानाबाद.
(3) शाखा व्यवस्थापक, न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी लि.,
शाखा : सर्व्हे नं.4414, घर नं.1178, पतंगे कॉम्प्लेक्स,
कावेरी प्लाझा, आर.डी., स्वाती नगर, परळी (वै.), जि. बीड. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञ : बी.आर. पवार
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. पवार
विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.पी. दानवे
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ती यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्या विरुध्द पक्ष क्र.1 गॅस विक्रेत्याच्या ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्रमांक 72306974 व एस.व्ही. क्रमांक 4070572274 असा आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांचेमार्फत तक्रारकर्ती यांची विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे विमा पॉलिसी काढलेली आहे. दि.15/2/2016 रोजी सायंकाळी 7.00 वाजता तक्रारकर्ती यांच्या गॅस जोडणी करीत असताना गॅसची गळती होऊन स्फोट झाला आणि त्यामध्ये तक्रारकर्ती यांचे संसोरोपयोगी साहित्य व घराचे रु.3,74,700/- रकमेचे नुकसान झाले. घटनेबाबत तलाठी, कसबे तडवळा व पोलीस स्टेशन, ढोकी यांनी पाहणी करुन पंचनामा केलेला आहे. तक्रारकर्ती यांनी दि.10/3/2016 रोजी नुकसानीच्या यादीसह विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावेळी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी प्रत्येक ग्राहकाचा विमा काढल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.3 यांना नुकसान भरपाई मागणी केल्याचे व न्यायालयातून नुकसान भरपाई मागणी करण्याचे सूचित केले. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.3,74,000/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 हे जिल्हा मंचापुढे उपस्थित राहिले. परंतु उचित संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द विनाउत्तर आदेश पारीत करुन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
3. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील मजकूर व विधाने अमान्य केली आहेत. त्यांचा असा प्रतिवाद आहे की, तक्रारकर्ती ह्या त्यांच्या ग्राहक नसून विरुध्द पक्ष क्र.1 हे त्यांचे ग्राहक आहेत. तक्रारकर्ती यांना विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून दि.8/2/2016 रोजी गॅस जोडणी देण्यात आलेली असून तक्रारकर्ती ह्या गॅस जोडणीचा वापर करीत होत्या. दि.15/2/2016 रोजी झालेल्या कथित गॅस सिलेंडर स्फोटाची माहिती तक्रारकर्ती किंवा विरुध्द पक्ष क्र.1 यांनी देणे आवश्यक होते. परंतु त्याची पूर्तता न केल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. दि.16/2/2016 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ती यांच्या घरामध्ये स्फोट होऊन रु.35,000/- ते रु.40,000/- नुकसान झाल्याचे कळवले. त्यांनी नोंदणीकृत सर्व्हेअर व लॉस असेसर मे. अभिजीत नलावडे यांना अहवाल देण्याकरिता नियुक्त केले आणि त्यांनी दिलेल्या अहवालानुसार गॅसची जोडणी करताना स्फोट झाल्याचे सिध्द होत नाही. तसेच त्यांच्या अहवालानुसार रु.1,22,000/- नुकसान नमूद केले आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला ते घर तक्रारकर्ती यांचे नसून काशिनाथ धोंडी भालेराव यांचे आहे. विमा पॉलिसीच्या अटी सुस्पष्ट असून अटी व शर्तीनुसार विरुध्द पक्ष क्र.1 यांचे व्यवसायाचे ठिकाणी आग लागल्यास, चोरी झाल्यास, गॅस सिलेंडर वाहतूक, रोख रक्कम व ग्राहकांचा वैयक्तिक अपघात विमा याकरिता प्रत्येकी रु.1,00,000/- चे विमा संरक्षण आहे. तक्रारकर्ती किंवा घरातील अन्य व्यक्ती गॅसचा वापर करताना त्यांचे निष्काळजीपणामुळे गॅस गळती होऊन स्फोट झाल्यास त्याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार असू शकत नाहीत. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
4. तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- सदरकामी विरुध्द पक्ष क्र.1 मकरंद भारत गॅस, येडशी यांनी आपले म्हणणे दिलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 च्या बचावाप्रमाणे तक्रारकर्तीने किंवा विरुध्द पक्ष क्र.1 ने विरुध्द पक्ष क्र.2 व 3 ला गॅस सिलेंडरच्या स्फोटाबद्दल कळवणे जरुर होते; पण तसे कळवले नाही. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 तर्फे लॉस असेसर अभिजीत नलावडे यांनी रिपोर्ट दाखल केला. त्याप्रमाणे गॅस जोडणी करताना स्फोट झाला, असे सिध्द होत नाही. मात्र नुकसान रु.1,22,000/- झालेले आहे. ग्राहकाच्या वैयक्तिक अपघातासाठी अगर आग लागणे, चोरी होणे यासाठी रु.1,00,000/- ची विमा पॉलिसी देण्यात आलेली आहे. घडलेली घटना तक्रारकर्ती हिच्या निष्काळजीपणामुळेच गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने घडलेली आहे. असे दिसते की, तक्रारकर्तीने दि.15/2/2016 रोजी तहसील कार्यालय, उस्मानाबाद यांना माहिती दिल्यानंतर तलाठ्याच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. दि.16/2/2016 रोजी तलाठी यांनी तहसीलदार यांना रिपोर्ट पाठवलेला आहे. मात्र त्यामध्ये नुकसान किती रुपयाचे झाले, याचा स्पष्ट उल्लेख नाही.
6. पोलिसांनी दि.15/2/2016 रोजी संध्याकाळी 8 ते 9 च्या दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा केल्याचे दिसते. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे घटना त्यादिवशी संध्याकाळी 7 वाजता घडली होती. गॅस जोडणी करताना गॅसची गळती होऊन स्फोट झाला. गॅस कनेक्शन हे दि.8/2/2016 रोजी दिल्याचे कंपनीच्या कागदपत्रांवरुन दिसते. जर गॅस जोडणी करीत असताना स्फोट झाला असता तर गॅस कंपनीच्या कर्मचा-यांनी त्याबद्दल अहवाल दिला असता. सदरहु अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, हे उघड आहे. त्यामुळे गॅस जोडणी करताना स्फोट झाला, हे तक्रारकर्तीचे म्हणणे अवाजवी वाटते.
7. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 च्या बचावाप्रमाणे विचार केला तर ग्राहकाने शेगडीचे बटन चालू ठेवले व गॅस न पेटवता खोलीत गॅस पसरू दिला तर नंतर ज्वालेमुळे किंवा विजेच्या ठिणगीमुळे स्फोट होण्याची शक्यता असते. मात्र असे बटन उघडे ठेवून घरभर गॅस कोणताही ग्राहक पसरु देणार नाही. शिवाय गॅसला वास येत असल्यामुळे घरातील कोणत्याही व्यक्तीस त्याचे ज्ञान होऊ शकते. त्यामुळे तक्रारकर्ती अगर तिच्या कुटुंबियाने निष्काळजीपणा केला, हे स्फोटाचे कारण मान्य करता येणार नाही. गॅसच्या सिलेंडरमध्ये अगर रेग्युलेटरमधून अगर शेगडीमध्ये गॅस लिक होऊन अचानक स्फोट होणे शक्य आहे व असे प्रकार दिसून आले आहेत. तेव्हा विरुध्द पक्ष यांना त्याबाबतची जबाबदारी झटकता येणार नाही.
8. वर म्हटल्याप्रमाणे तलाठी पंचनाम्यामध्ये नमूद आहे की, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संसारोपयोगी साहित्य, ज्वारीचे 2 पोते, गहू 1 पोते, हरभरा 1 पोते, दूरदर्शन संच, टेप रेकॉर्डर असे साहित्य जळून खाक झाले. सदर व्यक्ती तात्पुरती बेघर झाली आहे. पोलीस पंचनाम्यात म्हटले आहे की, घर 5 पत्र्याचे होते. स्टील भांडी, रोख रक्कम, प्रापंचिक साहित्य, अन्न-धान्य अंदाजे रु.1,00,000/- चे जळून नुकसान झालेले आहे. विरुध्द पक्ष क्र.1 गॅस एजंट यांनी विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांना दि.16/2/2016 चे पत्र देऊन कळवले आहे की, अंदाजे रु.35,000/- ते रु.40,000/- चे नुकसान झालेले आहे. तक्रारकर्तीने आता नुकसान झालेल्या वस्तुची यादी दिली असून एकूण नुकसान रु.3,74,700/- दाखवले आहे. मात्र हा आकड फुगवून दिला आहे, हे उघड आहे.
9. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी आपल्या ‘से’ मध्ये कबूल केले आहे की, त्यांच्यातर्फे लॉस असेसर यांनी नुकसानीचा आकडा रु.1,22,000/- काढला आहे. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 चे पुढे म्हणणे आहे की, वैयक्तिक अपघात विमा ग्राहकांचा प्रत्येकी रु.1,00,000/- चा काढलेला आहे. विमा पॉलिसीप्रमाणे आगीमुळे नुकसानीची सिमा रु.11,00,000/- आहे. त्यामध्ये विरुध्द पक्ष क्र.1 च्या सर्व ग्राहकांचा समावेश आहे. तसेच पोलीस पंचनाम्यात सुध्दा नुकसानीचा आकडा रु.1,00,000/- दाखवलेला आहे. तक्रारकर्तीच्या घराचे, भांडयाचे, धान्याचे व फर्निचरचे नुकसान लक्षात घेता तक्रारकर्ती रु.1,00,000/- भरपाई मिळण्यास पात्र आहे व ती नाकारुन विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी सेवेत त्रुटी केली आहे, असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा नं.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी तक्रारकर्ती यांना रु.1,00,000/- नुकसान भरपाई द्यावी.
ग्राहक तक्रार क्र.280/2016.
(2) विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी तक्रारकर्ता यांना प्रस्तुत तक्रारीच्या खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/3517)