जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.148, 149/2008, 158/2008. प्रकरण दाखल दिनांक – 26/03/2008. प्रकरण निकाल दिनांक – 11/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते अध्यक्ष (प्र). मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. 1. श्री.दत्ता पि.माणिका ढगे, अर्जदार. वय वर्षे सज्ञान, व्यवसाय शेती, तक्रार क्र.148/08 रा.महाटा ता.मुदखेड जि.नांदेड. 2. श्री.पुरभाजी पि.नागोबा ढगे, तक्रार क्र.158/08 वय वर्षे सज्ञान, व्यवसाय शेती, रा.महाटा ता.मुदखेड जि.नांदेड. 3. श्री.आनंदा पि.गुणाजी ढगे, वय वर्षे सज्ञान, व्यवसाय शेती, तक्रार क्र.149/08 रा.महाटा ता.मुदखेड जि.नांदेड. विरुध्द. 1. मॅनेजर, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या(महाबिज), नवा मोंढा, नांदेड. 2. साई कृषी सेवा केंद्र, सुभाष गंज मोंढा,मुदखेड, ता.मुदखेड जि.नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.जी.ए.भानेगांवकर. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - अड.पी.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते,अध्यक्ष प्र.) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल वरील तिन्ही अर्जदारांची एकच तक्रार आहे व मागणीही जवळपास सारखीच आहे म्हणुन या तिन्ही प्रकरणांत एकत्रित निर्णय देत आहोत. तिन्ही अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे. सर्व अर्जदार हे महाटा ता.मुदखेड येथील रहिवाशी असुन त्यांनी आपापल्या गटातील शेतात गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन उत्पादीत केलेले गव्हाचे बियाणे दि.27/10/2007 रोजी पेरले. सदरील बियाणांची पेरणी कंपनीचे नियम व शर्तीप्रमाणे व सांगण्यावरुन केले. परंतु गैरअर्जदारांच्या सांगण्यानुसार झाडे व्यवस्थीत वाढले परंतु त्यास ओंबी भरली नाही त्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना विनंती केली व शेतात येऊन पाहणी करुन झालेले नुकसान भरुन द्यावी म्हणुन सांगितले असता गैरअर्जदारांनी या सर्व बाबी धुडकावून लावल्या. यानंतर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परीषद यांच्याकडे दि.18/10/2008 रोजी तक्रार केली त्याची दखल घेऊन दि.25/01/2008 ला अर्जदाराच्या शेताचा स्थळ पाहणी केली व पंचनामा केला. निकृष्ठ दर्जाचे बियाणे दिल्यामुळे शेतक-यांचे 50 ते 60 टक्के नुकसान झाले. गैरअर्जदाराने दिलेल्या चुकीच्या सेवेमुळे झालेले शारीरिक व मानसिक त्रास व आर्थीक त्रासापोटी गैरअर्जदाराकडुन रक्कम मिळावी तसेच दावा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे त्यांचे म्हणणेप्रमाणे सर्व अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन उत्पादीत केलेले गव्हाचे बियाणे कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यांच्या शेतात पेरले आहे काय? आधी ही बाब भक्कम पुराव्यानीशी सिध्द करावयास पाहीजे. अर्जदारांनी गैरअर्जदाराकडुन कोणतेही मागदर्शन घेतले नाही त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार लागवड हे म्हणणे खोटे आहे. अर्जदारांनी शेताची निगा व मशागत करुनही नुकसान झाल्या बाबत सुत्रताबध्द पुरावे दिले नाहीत.अर्जदारांनी कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद नांदेड यांना दि.18/10/2008 रोजी तक्रार देण्यापुर्वी गैरअर्जदार क्र. 1 यांच्या पुढे पाहणी करावयास सांगितले हे खोटे आहे. प्रत्येक अर्जदारांने बियांचे दोन पीशव्या म्हणजे 80 किलो ग्राम बियाणे असे किती क्षेत्रात पेरले ही बाब तक्रारी नमुद केलेले नाही, तेंव्हा अर्जदारांनी महाबिज बियाणे कंपनीचे बियाणे शेतात पेरले की, इतर कंपनीचे बियाणे पेरले हे स्पष्ट होत नाही. तसेच कंपनीच्या बियाणांत भेसळ असल्याची नोंद केले आहे. त्यामुळे अर्जदारांना प्रत्यक्षात कोणत्या कंपनीचे किती बियाणे किती क्षेत्रात पेरले हे समजण्या पलीकडे आहे असे म्हटले आहे. शासनाने बियाणांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तक्रार निवारण समीती स्थापन केली असुन सदर समीतीमध्ये कृषी विकास अधिकारी अध्यक्ष, तसेच मोहीम अधिकारी, बिज प्रमाणीकरण अधिकारी,गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, बियाणे महामंडळाचे अधिकारी हे सर्व सदस्य असुन त्यांच्याकडुनच तक्रारकर्त्याचे शेताची पाहणी केली पाहीजे व त्यांनी दिलेले अहवालच ग्राहय धरण्यात येते. अर्जदारांनी जो पंचनामा सादर केलेला आहे तो पंचनामा तक्रार निवारण समीतीचा असुन त्या समीतीचा कोणताही सदस्य प्रत्यक्ष मोक्यावर तपासणीच्या वेळी हजर नव्हते म्हणुन तो पंचनामा ग्राहय धरता येणार नाही असे म्हटले आहे. सदर पंचनामा सुध्दा तज्ञांनी करण्याबाबत नोंद केले आहे.महाबिज उत्पादक गहु लोकोन लॉट क्र.एप्रिल 07-13-2201-443 एकुण बियाणे 107.60 क्विंटल 269 बॅग उत्पादीत झाले असुन सदर बियाणे प्रमाणीत केलेले असुन त्यांचे बिज प्रमाणीकरण यंत्रणेकडुन प्रमाणीत करण्यात आले हे सदर बियाणे विक्री करीता मुख्य केल्यानंतर ते गैरअर्जदार यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. अर्जदार यांनी जी नुकसान भरपाई मागीतली आहे याचा हिशोब कुठल्या पध्दतीने केले आहे हे सांगितले नाही. सदर बियाणे जे की, तक्रारीमध्ये नमुद केले आहे त्याची नोंद 7/12 चा उता-यामध्ये नोंद केली नाही. त्यामुळे अर्जदारांनी बियाणे पेरले होते हे सिध्द होत नाही. अर्जदारांच्या तक्रारीत दोष नसल्याने ती खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की, गव्हाच्या पिकाला ओंब्या लागल्या नाही ही बाब अमान्य केली आहे. अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे केंव्हाही कुठलीही तक्रार केली नाही. तसेच कृषी विकास अधिकारी यांनी तक्रारीचे अवलोकन करतांना गैरअर्जदारांना सुचना दिली नाही व शासनाने ठरवून दिलेल नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे असे पुरावे म्हणुन वाचता येणार नही. अर्जदारांचे 50 ते 60 टक्के नुकसान झाले हे म्हणणे गैरअर्जदारास अमान्य आहे. वादग्रस्त बियाणांचे उत्पादक गैरअर्जदार क्र. 1 आहेत व त्यांनी उत्पादीत केलेले बियाणे गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपल्या दुकानात सदरची बियाणे विक्रीसाठी ठेवले होते म्हणुन त्यावर त्यांची कुठलीही दोष नाही. कृषी विकास अधिका-यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे बियाणांची शास्त्रीय पध्दतीने तपास करुन घेऊन विक्रीसाठी दिले पाहीजे होते त्यामुळे सत्यस्थिती समोर आली असती. गैरअर्जदारांकडुन अर्जदाराचे कुठल्याही प्रकारची फसवणुक झाली नाही म्हणुन अर्जदारांचा तक्रारअर्ज फेटाळण्यात यावे असे म्हटले आहे. अर्जदारांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच दोन्ही गैरअर्जदारांनी पुरावा म्हणुन आपापले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - सर्व अर्जदारांनी साई कृषी सेवा केंद्र यांच्याकडुन गैरअर्जदार क्र. 1 यांचे बियाणे खरेदी केल्याबद्यलची पावती दाखल केली आहे. याप्रमाणे लोकोन या जातीचे गव्हाचे बियाणे अर्जदारांनी विकत घेतले आणि सर्व अर्जदारांनी दाखल केलेल्या 7/12 यावरुन प्रत्येक अर्जदाराने आपापल्या शेतामध्ये हे बियाणे पेरले म्हणुन 7/12 दाखल केलेले आहे. या 7/12 प्रमाणे 2006-07 या हंगामात गव्हाचे बियाणे पेरल्याबद्यल कुठेही उल्लेख केलेला नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात आक्षेप घेतला आहे की, 7/12 वर गहु पेरल्याची नोंद नसल्या कारणाने अर्जदाराने त्यांच्या शेतामध्ये बियाणे पेरलेच नाही. यावर अर्जदाराने असा युक्तीवाद केला की, मध्यंतरी केलेल्या पिकाची नोंद 7/12 वर येत नाही व त्यांनी नंतर तलाठी कार्यालयाचे प्रमाणपत्र दाखल केले यात तिन्ही अर्जदार हे खातेदार असुन उन्हाळी बागायती गहु पेरले आहे असे प्रमाणपत्र दिले आहे हे प्रमाणपत्र ग्राहय धरुन आम्ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदारांनी त्यांच्या शेतात गहु पेरले आहे गव्हाचे बियाणे भेसळयुक्त आहेत अशी अर्जदारांची तक्रार आहे यावर त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे तक्रार केली असे म्हटले आहे. परंतु याबाबतचा कुठलाही पुरावा मंचा समोर आणलेले नाही. अर्जदारांनी कृषी विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी दि.25/01/2008 रोजी शेताची पाहणी करुन पंचनामा केला हा पंचनामा अर्जदारांनी या मंचात दाखल केला आहे. यात अर्जदारांचे शेतामध्ये गव्हाचे पिक होते व बिज मंडळा समोर पंचनामा केला असे म्हटले अहे या पंचनामाचा अहवाल सादर करतांना त्यांनी शेतक-यांच्या सांगण्यावरुन किती बियाणे पेरले, खताचा किती मात्रा दिली हे सांगितले. पंचनाम्यात हे प्रत्यक्षात नसुन नक्की परिस्थिती काय आहे एवढेच सांगणे आवश्यक होते. शेतामध्ये पिक वाढलेले नाही व 50 ते 60 टक्के वेगळया प्रकारची व उंचीची झाडे आहेत व त्यात दाने भरलेले नाहीत असे म्हटलेले आहे. यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात 50 ते 60 टक्के घट झाली याचा अर्थ 50 टक्के पिक आला असा होईल परंतु या पंचनाम्यास गैरअर्जदार आक्षेप घेऊन हा पंचनामा ग्राहय धरता येणार नाही असे म्हटले आहे. नियमाप्रमाणे शासनाने शेतक-याचे तक्रारीचे अवलोकन करण्यासाठी जिल्हा स्तरीय कृषी समीती नेमली आहे व या समीतीचा अध्यक्ष व सदस्य म्हणुन समीतीने प्रत्यक्ष जाऊन मोक्यावर पंचनामा करणे आवश्यक आहे. पंचनामा पाहीले असता असे दिसते की, जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समीतीने व त्याचे अध्यक्ष जिल्हा कृषी अधिकारी यांनी हा पंचनामा केलेला नाही. पंचनामा कोणी केला याचा पंचनामात उल्लेख नाही. फक्त कृषी अधिकारी मुदखेड असे लिहीलेले आहे त्यांना पंचनामा करण्याचा अधिकार आहे का ? प्रश्न निर्माण होतो. शिवाय पंचनामा करण्याच्या आधी गैरअर्जदारांना कृषी अधिका-यांना नोटीस देणे आवश्यक आहे अशा प्रकारची नोटीस कृषी अधिका-यांनी दिली नाही व पंचनामा हा गैरअर्जदाराच्या समोर झाला नाही. म्हणुन अशा प्रकारचा पंचनामा योग्य आहे असे ग्रहीत धरता येणार नाही. शिवाय बियाणांमध्ये भेसळ आहे अशी अर्जदाराची तक्रार असे तर त्या लॉट मधील बियाणांचा शँपल घेऊन ते प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवीणे आवश्यक आहे. म्हणुन पिकामध्ये भेसळ होती अशा प्रकारचे निष्कर्ष काढण्यासाठी तज्ञ आवश्यक असते म्हणुन जिल्हा कृषी तक्रार निवारण समीतीने पंचनामा करावयास हवे होते. यात जिल्हा कृषी अधिकारी यांचा निष्काळजीपणा आम्हास दिसुन येतो. शेतक-यांनी बियाणा विषयी तक्रार केल्यानंतर जिल्हा कृषी अधिका-यांनी जिल्हा कृषी तक्रार निवारण समीतीस त्यांचा हा अर्ज पाठवून त्या समीतीनेच पाहणी करुन पंचनामा करावा व अहवालामध्ये फक्त काय परिस्थिती आहे याचाच उल्लेख करावा परंतु जिल्हा कृषी अधिकारी असे करीत नाही व पंचनामा एकटया अधिका-याला पाठवुन देतात ते जाऊन शेतक-याचा जबाब घेतल्या सारखा पंचनामा करतात असा पंचनामास काहीही अर्थ उरत नाही या सर्व प्रकरणांस जिल्हा कृषी अधिकारी जबाबदार आहेत असे आमचे मत आहे.यामुळै अर्जदारांनी योग्य त्या न्यायालयात जाऊन जिल्हा कृषी अधिकारी यानी केलेल्या चुकीमुळे जे शेतक-यांचे नुकसान झाले आहे या बाबत दाद मागावी. आमच्या पुढे दाखल केलेल्या प्रस्तुत प्रकरणांत अर्जदारांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या अर्ज केलेला आहे तो अर्ज या प्रकरणांत दाखल केलेला आहे तोच याबाबत पुरावा आहे. मंचामध्ये आमच्या समोर प्रत्यक्ष प्रकरणांत अर्जदाराने जे पुरावे दाखल केले आहे ते अर्जदाराचे नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य पुरावे नाहीत. म्हणुन शेतक-यांचा अर्ज मंजुर करता येणार नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांना आपापला सोसावा. 3. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीशसामते) सदस्या अध्यक्ष (प्र) गो.प.निलमवार. लघुलेखक. |