जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 46/2011 तक्रार दाखल तारीख- 09/03/2011
निकाल तारीख - 14/07/2011
------------------------------------------------------------------------------------
1. श्री. रामचंद्र पि. श्रीरंगराव लंबाटे,
वय – 59 वर्षे, धंदा – नौकरी,
रा.चांदणी ता.जि.बीड ह.मु.नेकनूर ता.जि.बीड
2. सौ. चंद्रकला भ्र. रामचंद्र लंबाटे,
वय -50 वर्षे, व्यवसाय – घरकाम,
रा.चांदणी ता.जि.बीड, ह.मु.नेकनुर, ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजर, भिमराव बाजीराव सानप,
महात्मा फुले अर्बन को.ऑप.बॅंक लि.पाटोदा
ता.पाटोदा, जि.बीड
2. अध्यक्ष, रामकृष्ण बांगर,
महात्मा फुले अर्बन को.ऑप.बँक लि, पाटोदा,
ता.पाटोदा, जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – एस.एस.लंबाटे ,
सामनेवाले 1 तर्फे – एकतर्फा आदेश,
सामनेवाले 2 तर्फे - एकतर्फा आदेश,
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे चांदणी ता.जि.बीड ह.मु.नेकनूर ता.जि.बीड येथील रहिवाशी आहेत. त्यांचे सामनेवाले बँकेत संयुक्त बचत खाते काढले असुन त्यांचे खाते क्रं. 4001/51 आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 बँकेकडे खालील प्रमाणे मुदत ठेव ठरावीक कालावधीसाठी ठेवलेली होती. त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
1. दि.3/3/08 रोजी रक्कम रु.1,00,000/- पा.नं.11651, एल.एफ.नं.31/69
2. दि.5/3/08 रोजी रक्कम रु.50,000/- पा.नं.11663, एल.एफ.नं.31/82
3. दि.6/1/05 रोजी रक्कम रु.25,000/- पा.नं.000321, एल.एफ.नं.3/145
4. दि.5/3/08 रोजी रक्कम रु.50,000/- पा.नं.11662, एल.एफ.नं.31/81
यामध्ये नं.000321, 11651, 11663 यापावत्या तक्रारदार नं.1 यांचे नावे होत्या. उर्वरीत पावती नं. 11662 तक्रारदार नं.2 यांचे नावे आहे.
वरील उलेख केलेल्या रक्कमा तक्रारदारांनी पुढील आयुष्यात व सुरक्षीततेच्या दृष्टीने बँकेत ठेवल्या होत्या. परंतु तक्रारदारांना यातील कांही रक्कमा पासबुकावर जमा करुन दिल्या असुन सामनेवाले बँकेकडे रक्कम रु.2,09,099/- खात्यावर जमा आहेत.
सदरील रक्कम तक्रारदारांचे मुला मुलींचे शिक्षण चालू असुन तसेच शैक्षणीक खर्च तसेच नेकनुर येथे राहण्याकरीता घराचे बांधकाम सामनेवाला यांना नोटीस पाठविलेचे अगोदर कांही महिन्यापासून काढले असून बांधकामा करीता सदर रक्कमेची अत्यंत आवश्यकता आहे. बँकेत वारंवार जावून पासबुकातील पैसे काढण्यासाठी पूर्तता केली असता रक्म मिळाली नाही. सामनेवाले रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत. म्हणुन तक्रारदारानी सामनेवाले नं.2 यांचेकडे ता.23.9.2010 रोजी बँकेतील पैसे मिळण्या करीता अर्ज दिला होता. नोटीस पाठविण्या अगोदर 30 ते 35 वेहा पैसे मिळवे म्हणुन सामनेवाले नं. 1 व 2 यांची भेट घेतली, परंतु सामनेवाले यांचेकडून पैसे मिळाले नाहीत. जाणे-येण्याचा खर्च व होणारा त्रास, बांधकामाचे नुकसान करावा लागला.
ता.29.9.2009 रोजी दुययम निबंधक अधिकारी, जिल्हा कार्यालय, बीड यांचे कार्यालयात सदर बँके विरुध्द तक्रार अर्ज दिला होता, परंतु तरी देखील बँकेने तक्रारदारा यांचे पासबुकावरील रक्कम तक्रारदारांना दिली नाही.
ता. 22.12.2010 रोजी सामनेवालेंना कायदेशीर नोटीस दिली. सामनेवालेंना नोटीस मिळून देखील तक्रारदाराना पैसे मिळाले नाहीत. अशा प्रकारे सामनेवालेंनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूरी केली आहे.
तरी तक्रारदारांची विनंती की,
अ. बचत पासबुक खाते क्र.4001/51 मधील जमा रक्कम रु. 2,09,099/-
ब. सामनेवाले यांचे कृत्यामुळे झालेले नुकसान व सेवेत
कसूर केलेमुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक आर्थीक
त्रासापोटी एकुन रक्कम रु. 1,00,000/-
क. नोटीस व तक्रारीचा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/-
एकुण रक्कम रु. 3,14,099/-
वरील प्रमाणे एकुन रक्कम रु.3,14,099/- सामनेवाले यांचेकडून तक्रारदारास देण्याचा आदेश व्हावा. सदर रक्कमेवर द.सा.द.शे 18 टक्के व्याजासह तक्रार दाखल तारखेपासुन देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले नं.1 न्यायमंचाचे नोटीस प्रमाणे ता.15.1.2011 रोजी हजर झाले व त्यांनी खुलासा दाखल करणे करीता मुदतीचा अर्ज केला. सामनेवाले नं.2 यांनी सदर न्यायमंचाची नोटीस स्विकारली नाही. नॉट क्लेमचे पोस्टाचे शे-यासह सदरची नोटीस परत आली.
सामनेवाले नं.1 यांनी मुदतीत खुलासा दाखल केला नाही, म्हणुन त्यांचे खुलाशा शिवाय प्रकरण चालविण्याचा निर्णय ता. 31.5.2011 रोजी न्यायमंचाने घेतला. तसेच सामनेवाले नं.2 यांनी नोटीस घेतली नाही म्हणुन त्यांचे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा निर्णय ता.1.5.2011 रोजी न्यायमंचाने घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदारांचे शपथपत्र, याचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल एस.एस.लंबाटे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदार नं.1 व2 यांचे संयुक्त बचत खाते क्रं. 4001/51 सामनेवाले बँकेत आहे. सदर बचत खात्याचे पासबुकावर ता.19.7.2010 रोजी रक्कम रु.2,09,099/- शिल्लक आहे. सदरची मुदत ठेवीची रक्कम ही बचत खात्यात जमा केली आहे. त्यानुसार शिल्लक आहे. सदरची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे बरेच पर्यत्न केले होते. सदरची रक्कम तक्रारदारांना अद्यापपर्यन्त मिळाली नाही.
सामनेवाले यांनी तक्रारदारांचे तक्रारीस आव्हान दिले नसल्याने तक्रारदारांचे तक्रारीतील विधाने ग्राहय धरण्या पलिकडे न्यायमंचा समोर दुसरा पर्याय नाही.
सदरची रक्कम सामनेवालेंनी तक्रारदारांना का दिली नाही 1 या बाबतचा कोणताही समावेशक खुलासा सामनेवाले यांचेकडून नाही. तक्रारीतील कागदपत्रा प्रमाणे तक्रारदाराचे संयुक्त बचत खात्यावर ता.19.7.2010 रोजी रक्कम रु.2,09,099/- शिल्लक आहे. सदरची रक्कम तक्रारदारांना देणे हे सामनेवालेंवर बंधनकारक असताना सामनेवाले यांनी सदरची रक्कम तक्रारदारांनी मागणी करुनही दिली नाही. त्यामुळे सामनेवाले यांची सदरची कृती निश्िचतच सेवेत कसूर करणारी आहे, असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवालेंनी तक्रारदारांना त्यांचे संयुक्त बचत खात्यातील रक्कम रक्कम रु.2,09,099/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
संयुक्त बचत खात्यावरील रक्कम न मिळाल्याने निश्िचतच तक्रारदाराचा मुदत ठेव पावतीत रक्कम ठेवण्याचा व बचत खाते काढण्याचा उद्देश सफल झाला नाही. त्यामुळे त्यांना निश्िचतच मानसिक त्रास झाला आहे व होत आहे. तसेच स्वत:ची रक्कम जमा असताना सदरच्या रक्कमेचा उपयोग घेता आला नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास तक्रारीतील संयुक्त बचत खाते क्र.4001/51 मध्ये जमा असलेली शिल्लक रक्कम रु.2,09,099/- ( अक्षरी रुपये दोन लाख नऊ हजार नव्याण्व फक्त ) आदेश मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त ) आदेश मिळाल्या पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ( अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत अदा करावी.
5. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 ते 4 मधील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्या ता.19.07.2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे होणा-या व्याजासह रक्कम तक्रारदाराचे पदरीपडे पर्यन्त व्याज देण्यास जबाबदार राहतील.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड