(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष ) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी दिनांक 18/4/2010 रोजीच्या औरंगाबाद-नाशिक निमआराम गाडीची ई-तिकीट खरेदी केले होते. ते तिकीट त्यांनी त्यांची पत्नी, मुलगी यांच्यासाठी खरेदी केले होते. दिनांक 18/4/2010 रोजी सकाळी 7 वाजता मध्यवर्ती बसस्थानकावर ते स्वत:, त्यांची पत्नी व मुलगी आणि वर्षाचा मुलगा यांना औरंगाबाद ते नाशिक या निमआराम गाडीमध्ये बसवून देण्यासाठी गेले होते. सदरील गाडी सिडको बस स्थानकावरुन निघणार होती. सिडको बस स्थानकावरुन सदरील गाडीची निघण्याची वेळ सकाळी 7 अशी होती. सदरील गाडी सिडको बस स्थानकावरुन मध्यवर्ती बस स्थानकावर पोहचण्यास साधारणत: 10 ते 15 मिनीटे लागतील या हिशोबाने तक्रारदार, त्यांची पत्नी व मुले मध्यवर्ती बस स्थानकावर सकाळी 7 वाजता पोहंचले. मध्यवर्ती बस स्थानकावर सकाळी 7.10 वाजता नाशिकसाठी साधी बस ऊभी होती ती निघून गेली व त्यानंतर सकाळी 7.30 वाजेपर्यंत औरंगाबाद नाशिक निमआराम गाडी आली नसल्यामुळे तक्रारदार या बसची चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेले असता त्यांना व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत. उलट उध्दटपणाने उत्तरे देण्यात आले. अनेकवेळेस चौकशी करुनही त्यांना औरंगाबाद-नाशिक निमआराम गाडीची माहिती मिळू शकली नाही किंवा गाडी सुध्दा आली नाही म्हणून तक्रारदाराने पत्नीस व मुलास साध्या गाडीत बसवून दिले. तिकीट काढलेले असतानाही त्यांच्या मुलीस जागा नसल्यामुळे त्यांनी घरी घेऊन गेले. औरंगाबाद- नाशिक या गाडीची अडव्हान्स बुकींग करुनाही गाडी योग्य वेळी फ्लॅटफॉर्मवर लागली नाही त्यामुळे तक्रारदाराच्या कुटूंबीयांना साध्या गाडीने जावे लागले. तसेच अनाऊन्समेंट करण्यात आली नव्हती आणि चौकशी केल्यानंतर योग्य ते उत्तर दिले नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून अडव्हान्स बुकींगचे रु 314/- परत मिळावेत व त्रासाबद्दल रु 2,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारांनी त्यांच्या लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे सकाळी 7 वाजता त्यांच्या कुटूंबियासहीत बस स्थानकावर फ्लॅटफॉर्मवर बसले होते , त्या ठिकाणी साधी बस लागली होती व औरंगाबाद-नाशिक ही निमआराम बस लागली नव्हती, तसेच तक्रारदाराने चौकशी कार्यालयात चौकशी केली हे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदाराने स्वत:साठी तिकीट घेतलेले नसून त्यांच्या कुटूंबियासाठी त्यांनी तिकीट खरेदी केले असल्यामुळे ते ग्राहक होऊ शकत नाहीत. तक्रारदारानी चौकशी विभागात झालेल्या घटनेबद्दल लेखी तक्रार दिली हे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदाराने फक्त ई तिकीट दाखल केले आहे. यावरुन तक्रारदारानी चौकशी कार्यालयात कुठलीही चौकशी केली नव्हती व लेखी तक्रार दिली नव्हती . गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार मध्यवर्ती बस स्थानकावरुन औरंगाबाद – नाशिक निमआराम बस सकाळी 7 वाजता सुटल्याची नोंद आहे. ई तिकीटवर सदरील बस सुटण्याची वेळ सकाळी 7 वाजताची होती त्यामुळे तक्रारदारानी बस स्थानकावर 5 मिनीटे आधी येणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार स्वत:च त्यांच्या तक्रारीमध्ये असे म्हणतात की, ते सकाळी 7 वाजता बस स्थानकावर नाशिक फ्लॅटफॉर्मवर आले. सदरील तक्रारीची नोटीस मिळाल्यानंतर गैरअर्जदारानी संबंधीत आगार प्रमुखास या घटनेबाबत चौकशी करण्याची आदेश दिले. दिनांक 18/4/2010 रोजी बस स्थानकावर डयुटीवर असलेले वाहतुक नियंत्रक सरिता उत्तमराव जाधव तसेच कैलास शेषराव पुंगळे या दोघांचा जवाब नोंदवून घेतला व त्याचा अहवाल नियंत्रकाकडे पाठविला तो येथे दाखल केला आहे. त्यानंतर आगारप्रमुख यांनी संपूर्ण चौकशी केली . त्या चौकशीमध्ये तक्रारदाराचे कथन चुकीचे आहे असे नमूद केले आहे. तक्रारदाराची तक्रार ही काल्पनिक असून त्यांनी पैसे उकळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारांनी लेखी जवाबासोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराने त्यांची पत्नी , मुलगी यांच्याकरीता औरंगाबाद-नाशिक निमआराम गाडीचे दोन ई तिकीट काढले होते. गाडी सुटण्याचे ठिकाण हे सिडको बस स्थानक होते व गाडी सुटण्याची वेळ सकाळी 7 अशी होती हे तक्रारदाराच्या तिकीटावर नमूद केले आहे. तक्रारदार त्यांची पत्नी, मुलगी व दोन वर्षाचा मुलगा हे मध्यवर्ती बस स्थानकावर व तेथे 7:30 वाजेपर्यंत गाडीची वाट पाहिली व त्यानंतर कार्यालयात चौकशी केली हे तक्रारदाराचे म्हणणे स्वाभाविक आहे. गैरअर्जदार त्यांच्या लेखी जवाबात असे म्हणतात की, गाडीची वेळ सकाळी 7 वाजताची असताना तक्रारदाराने वेळे अगोदर किमान 5 मिनीटे पोहचणे आवश्यक होते. तक्रारदार हे मध्यवर्ती बस स्थानकावर सकाळी 7 वाजता पोहचले. बसची सिडको बस स्थानकावरुन निघण्याची वेळ सकाळी 7 ची आहे व सिडको बस स्थानकावरुन मध्यवर्ती बस स्थानकावर येण्याकरीता किमान 10 मिनीटे लागतात. म्हणजे तक्रारदार वेळेच्या आधी मध्यवर्ती बस स्थानकावर पोहचले होते असे दिसून येते. बस बाबत तक्रारदाराने चौकशी विभागात चौकशी केली परंतु त्यांना व्यवस्थित उत्तरे मिळाली नाही ही गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी ठरते. एसटी चे “ बहुजन हिताय बहुजन सुखाय ” हे घोषवाक्य असताना सुध्दा सौजन्य सप्ताह सोडून इतर वेळेस व्यवस्थित सेवा देत नाहीत हे या तक्रारीवरुन दिसून येते. गैरअर्जदारांचा लेखी जवाब पाहिला असता औरंगाबाद – नाशिक निमआराम बस सिडको बस स्थानकावरुन किती वाजता सुटते हे त्यांना माहित नसल्याचे दिसून येते. गैरअर्जदारांनी बस स्थानकावरील दोन विभाग नियंत्रकाचे जवाब दाखल केले आहेत. त्यामध्ये तक्रारदारानी त्यांच्याकडे औरंगाबाद नाशिक निमआराम बसची चौकशी केली नव्हती असे दोन्ही नियंत्रकांनी नमूद केले आहे. सदरील जवाबावर एसटीचा सही शिक्का नाही तसेच हा जवाब कशासाठी घेतला याचे प्रमाणपत्र नाही आणि वाहतूक नियंत्रकाचे शपथपत्रही दाखल केले नाही. असा जवाब मंच पुरावा म्हणून मानत नाही. गैरअर्जदारांनी दिनांक 18/4/2010 रोजीची नियंत्रण नोंदवहीची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये क्रमांक 9 वर औरंगाबाद नाशिक निमआराम बसची वेळ सकाळी 7 वाजता असे नमूद केले आहे. ई तिकीट वर या गाडीचे सुटण्याचे ठिकाण सिडको बस स्टॅण्ड आहे. म्हणजेच सिडको बस स्थानकावरुन गाडी मध्यवर्ती बस स्थानकावर येण्यास किमान 10 ते 15 मिनीटे लागतात व तक्रारदार मध्यवर्ती बस स्थानकावर सकाळी 7 वाजता पोहचले आहेत म्हणजेच तक्रारदार वेळेच्या आत पोहचले होते. बस फलाटावर लागली नाही व त्या बसमध्ये तक्रारदाराच्या पत्नी व मुलांना बसता आले नाही त्यामुळे तक्रारदाराच्या कुटूंबियास साध्या गाडीने प्रवास करावा लागला यास गैरअर्जदार जबाबदार ठरतात असे मंचाचे मत आहे. आगार प्रमुख (वरिष्ठ) रा.प.औरंगाबाद यांचा अहवाल गैरअर्जदारानी दाखल केला आहे. त्यामध्ये त्यानी, तक्रारदाराच्या तक्रारी संदर्भात असे नमूद केले आहे की, “वाहतुक नियंत्रक व सहाय्यक वाहतुक नियंत्रक (स्थानक प्रमुख) यांचे जबाब घेण्यात आले. त्यावरुन असे सिध्द होते की, तक्रारकर्ते हे औरंगाबाद बसस्थानकावर सकाळी 7.25 ते 7.30 वाजता आले व चौकशी कक्षात चौकशी केली असता औरंगाबाद ते नाशिक ही बस बसच्या वेळेनुसार म्हणजे 7 वाजता निघुन गेली व त्यानंतर त्यानी कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही ”. मंचानी, दोन्ही वातुक नियंत्रकाच्या जबाबाची पाहणी केली त्यामध्ये दोन्ही नियंत्रकानी, कर्तव्यावर असताना सकाळी 6.00 ते 14.00 हया पाळीत त्यांना सकाळी 7 ते8 च्या दरम्यान औरंगाबाद नाशिक हया बससंबंधी विचारण्यास कोणी आले नाही. तक्रारकर्त्यानी सदर बसबद्दल त्याना विचारले नाही असा जबाब दिलेला आहे. परंतु हयाच जबाबावरुन आगारप्रमुखानी मात्र तक्रारदार सकाळी 7.25 ते 7.30 वाजता आले, चौकशी कक्षात चौकशी केली, औरंगाबाद नाशिक बस वेळेवर 7 वाजता निघून गेली, कुणीही लेखी तक्रार केलेली नाही असे नमूद केले. दोन्ही वाहतुक नियंत्रकानी व आगार प्रमुखाच्या कथनात तफावत आहे. सरळ सरळ तफावत दिसत असतानाही गैरअर्जदारानी तो जबाब व आगार प्रमुखाचा अहवाल दाखल केला आहे. तक्रारदारानी लेखी तक्रार दिलेली असतानाही गैरअर्जदार नाही म्हणतात. परंतु माहितीच्या अधिकारानुसार विचारणा केली असता तक्रार केली होती हे सिध्द होते. या सर्वावरुन गैरअर्जदार असत्य नमुद करीत आहेत हे सिध्द होते. गैरअर्जदारांनी त्यांचे वाहतूक नियंत्रकाचे जवाब घेणे, त्यानंतर तो अहवाल मंचास देणे हे आफ्टर थॉट वाटते. तसेच दोन्हीही वाहतूक नियंत्रक व आगार प्रमुख हे सर्व जण सत्य बोलत नाहीत हे यावरुन दिसून येते. सर्वसाधारण माणूस एसटी ने प्रवास करत असतो व प्रवाशांना त्यांनी योग्य मार्गदर्शन करणे, चांगली सेवा देणे हे गरजेचे असते. या सर्वासाठी गैरअर्जदार जबाबदार ठरतात असे मंचाचे मत आहे म्हणून मंच असा आदेश देते की, गैरअर्जदारांनी तक्रारदारास ई तिकीटाचे रु 314/- दिनांक 18/4/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजसह परत द्यावेत तसेच त्रासाबद्दल रु 2,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु 1,000/- द्यावेत. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदारानी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रु 314/- दिनांक 18/4/2010 पासून द.सा.द.शे. व्याजदराने द्यावेत तसेच त्रासाबद्दल रु 2,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु 1,000/- द्यावेत. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |