ग्राहक तक्रार क्र. 109/2014
दाखल तारीख : 16/05/2014
निकाल तारीख : 17/10/2015
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 02 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री. बाजीराव बब्रुवान मुंढे,
वय - सज्ञान, धंदा. शेती,
रा.पवारवाडी, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मा. जिल्हा व्यवस्थापक,प ससयससव्यवस्थापक
महाबीज कार्यालय, समता नगर,
उस्मानाबाद.
2. हिंदूस्थान कृषि सेवा केंद्र,
बी.एस.एन.एल. ऑफिसच्या समोर,
सांजा रोडा, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री. एम बी. शेरकर.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधिज्ञ : श्री. ए.एन. देशमुख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) क्र.2 बिज पुरवठादार यांचे मार्फत बीज उत्पादक संस्था विप क्र.1 यांनी उत्पादन केलेले परभणी मोती रब्बी ज्वारीचे बी घेऊन पेरले असता उत्पादन आले नाही व विप यांनी दोषयुक्त बीज पुरविल्यामुळे भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. तक हा मौजे पवारवाडी ता.जि. उस्मानाबादचा रहिवासी असून त्याला बागायत जमिन गट क्र.18/14 व 18/15 अशी आहे. तक हे प्रगतशील शेतकरी असून जमीन बागायती आहे. साल 2013-14 च्या रब्बी हंगामासाठी तक ने विप क्र.2 कडून विप क्र.1 ने उत्पादीत परभणी मोती ज्वारी लॉट क्र.SPV-1411 बॅच क्र.1052 प्रती बँग 4 किलो प्रमाणे एक बॅग रु.200/- ने खरेदी केली. नियमाप्रमाणे शेताची मशागत करुन शेत पेरणीसाठी तयार केले. एकरी 40 बैलगाडया शेणखत, दोन पोते डीएपी रासायनीक खत, तसेच तीन वेळा पाणी दिले व दोन वेळा पाणी देतांना युरीया टाकला आहे. मात्र उगवण होत नसल्याचे लक्षात आल्यावर विप यांना त्याची कल्पना दिली तसेच पंचायत समिती उस्मानाबाद येथे दि.01/02/2014 रोजी तक्रार दिली असता दि.18/02/2014 रोजी तक्रार निवारण समिती व विप क्र. 1 व 2 चे प्रतिनिधी यांनी पाहणी करुन पंचनामा केला. त्यावर विप क्र. 1 व 2 च्या व तक्रार निवारण समीतीच्या सहया आहेत.
2. विप यांना सदर नुकसान भरपाईबाबत दि.15/03/2014 रोजी नोटीस पाठवली असता विप नी त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून सदरची तक्रार दाखल केली असून तक याचे झालेले संपूर्ण नुकसानीची भरपाई देण्याची विनंती केली. तक यांना रु.1,800/- दराने ज्वारीचे प्रती क्विंटल प्रमाणे 14 ते 15 क्विंटलचे रु.27,000/- व कडबा प्रति शेकडा रु.1,500/- प्रमाणे रु.1,000/- ते 1,200 कडब्याचे कमीत कमी रु.18,000/- प्रमाणे डी.ए.पी. रासायनिक खताचे दोन पोत्याचे रु.2,300/- व युरियाचे दोन पोत्याचे रु.600/- असे एकूण रु.46,900/- व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व दाव्याचा खर्च रु.10,000/- असे एकूण रु.67,900/- मिळण्याचे आदेश व्हावे अशी विनंती केली आहे.
3. तक ने तक्रारीसोबत टॅग क्र.108, नोव्हेंबर 2013 ची बियाणे खरेदीची पावती, तपासणी अहवाल, पंचायत समीतीचे भेसळीबाबतचे पत्र, इत्यादी कागदपत्राच्या प्रती हजर केल्या आहे.
4. विप क्र. 1 व 2 यांनी दि.04/02/2015 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक ची तक्रार अमान्य असून खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हंटले आहे. तक ग्राहक या संज्ञेत येत नाही. अर्जदाराने पिकास शेती तज्ञ व शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या प्रमाणपेक्षा अतिशय जास्त खताचा मारा केल्यामुळे पिकाची वाढ खुंटून नष्ट झाले आहे व समितीस खताचे मात्रेबाबत चुकीची माहिती दिल्याने बियाणे भेसळ 100% दिसून आले असल्याचा अहवाल दिलेला दिसतो. तक ने मागीतलेली नुकसानी भरपाई अवास्तव आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या विक्री परवान्यानुसारच विक्री करण्यात येते. तक यांनी बीज प्रमाणीकरण यंत्रणासुध्दा जबाबदार असतांना व या तक्रारीमध्ये तिचा समावेश न केल्याने सदची तक्रार खारीज करण्यात यावी असे नमूद केले आहे.
5. तक ची तक्रार त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
विप ने दोषयूक्त बियाण्याचा तक ला पुरवठा केला काय ? होय
तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय
आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र 1 व 2 ः-
6. विप क्र.2 कडून तक ने दि.16.1.2013 रोजी मोती ज्वारीची 4 किलो बियाणे खरेदी केल्याची पावती दाखल केली आहे. तक ने बि पेरले याबददल फारसा वाद नाही. तक ने संपूर्ण काळजी घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. 50 ते 60 दिवसांनी म्हणजे जानेवारी 2014 मध्ये पिकाची वाढ खुटलेली व कणसे अत्यल्प प्रमाणात आलेली दिसून आले असे त्यांचे म्हणणे आहे. दि.1.2.2014 रोजी पंचायत समिती उस्मानाबाद येथे तक्रार दाखल केली होती. तक्रार निवारण समितीने दि.18.2.2014 रोजी पाहणी केली. अहवालाप्रमाणे 25 आर क्षेत्रावर 4 किलो बि पेरले होते. मात्र कणसे बिसावली नाहीत. 100 टक्के संकरीत ज्वारी उगवून आल्याचे संमितीला आढळून आले. अहवालावर कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विद्यापीठ प्रतिनिधी, जिल्हा व्यवस्थापक महाबीज, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या सहया दिसून येतात.
7. विप चे म्हणणे आहे की, जास्त खताची मात्रा
दिल्यामुळे प्रचंड धगाटयाने बि नष्ट पावते. बि नष्ट झालेले नसून उगवण झालेली होती व वाढ खुंटली होती व कणसे अल्पप्रमाणात निसवली होती. खरीप ज्वारीची उंची रब्बी ज्वारी पेक्षा कमी असते. संकरीत ज्वारीचे कणीस रब्बी ज्वारीच्या कणसा इतके फुगीर नसते. समितीने स्पष्टपणे हे संकरीत ज्वारीचे पिक असल्याचे म्हटले आहे. तक चे म्हणणे आहे की, त्यांने पिकाला 3 वेळा पाणी दिले.
8. हे खरे आहे की, 40 बैलगाडया शेणखत ही मात्रा जास्त वाटते.
मात्र ते रासायनिक खत नाही. तसेच पुरेसे पाणी मिळाल्यास अशा खताचा पिकावर चांगलाच परिणाम होतो. तसेच तक ने 4 किलो बियाणे 25 आर क्षेत्रात पेरले म्हणजेच घनदाट पेरणी केली असणार. जास्त खताच्या मात्रेला ही पेरणी योग्यच म्हणावी लागेल. येथे बियाणे उगवून आले होते, जास्त खताच्या मात्रामुळे जळून गेले नाही. पिकाची वाढ ही झाली होती मात्र वाढ खुंटले व कणसे अल्प प्रमाणात लागली. जास्त खताच्या मात्रेने पिक जळून गेले असते अशी गोष्ट घडलेली नाही. त्यामुळे विप ने दोषयूक्त बियाणे पुरवले हे सिध्द होत आहे.
9. तक च्या महणण्याप्रमाणे 14 ते 15 क्विंटल ज्वारीचे उत्पन्न
झाले असते. मात्र हा आकडा अवास्तव वाटतो. जास्तीत जास्त 8 क्विंटल उत्पन्न निघाले असते. ज्वारीचा दर रु.1800/- होता असे तक ने म्हटले आहे. त्यामुळे ज्वारीचे नुकसान रु.14400/- येते. तक चे म्हणणे आहे की, 1000 ते 1200 पेंडी कडबा मिळाला असता. मात्र 8 क्विंटलचे ज्वारीसाठी 800 पेंडया कडबा योग्य ठरतो. एका पेंडीस रु.5/- प्रमाणे कडब्याचे नुकसान रु.4000/- होते. एकूण नुकसान भरपाई रु.18,400/- होते. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे नुकसान भरपाई रु.18,400/- (रुपये अठरा हजार चारशे फक्त) तक ला 30 दिवसाचे आंत द्यावी, न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 दराने रक्कम फिटेपर्यत व्याज दयावे.
3. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.5000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
4. विप क्र.1 व 2 व शासनामार्फत तक ला पुर्वी भरपाई मिळाली असल्यास ती रक्कम वरील रक्कमेतून वजा करण्यात यावी.
5. वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.