ORDER | ( पारीत दिनांक : 12/09/2014) ( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे. - तक्रारकर्ता हा खिडकी, तह. आष्टी, जि. वर्धा येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे व आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेकरिता शेती करतो. त्याच्याकडे 1.48 हे.आर. जमीन असल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले आहे. त.क. यांनी वि.प.क्रं. 2 यांच्याकडून वि.प. क्रं. 1 द्वारा उत्पादित सोयाबीन बियाणे एम.ए.पु.एस-71, लॉट क्रं. 12-13-3201/256, दि. 19.06.2013 रोजी खरेदी केले.
त.क. नुसार सदर बियाण्याचे 4 बॅग 6,960/-रुपयात खरेदी केले व त्यावर शासनाकडून 1440/-रुपयाचे अनुदान मिळाले होते असे त.क.यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार त.क. यांनी त्यांचा मुलगा प्रविण रमेश नागपूरे यांच्या मार्फत वि.प.क्रं. 2 यांना 5520/-रुपये देऊन सदर बियाणे खरेदी केले व सदर पावतीवर त.क. च्या मुलाची स्वाक्षरी आहे असे त.क. चे म्हणणे आहे. - त.क. यांनी दि. 20.06.2013 रोजी सदर बियाण्यांची संपूर्ण काळजी घेऊन शेतामध्ये पेरणी केल्याचे तक्रारीत नमूद केले. त.क. यांनी पुढे नमूद केले की, इतर शेजारील शेतक-यांच्या शेतीमध्ये उगवण झाली असतांना त्याच्या शेतीमध्ये उगवण न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 02.07.2013 रोजी तालुका कृषी अधिकारी, आष्टी, जि. वर्धा यांच्याकडे तक्रार केली. सदर तक्रारी वरुन संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच वि.प.क्रं. 1 यांचे क्षेत्रीय अधिकारी यांनी दि. 03.07.2013 रोजी सदर शेताची पाहणी करुन अहवाल दिला . त्या अहवालानुसार बियाणे सदोष असल्याचे आढळून आले असे नमूद आहे. त.क. यांना दुबार पेरणी करावी लागेल असे सुचविले व त्यामध्ये दुबार पेरणीत उत्पन्न कमी येईल असे सुध्दा अहवालात नमूद केले. त्यानुसार त.क. यांनी पुन्हा त्याच कंपनीचे वि.प.क्रं. 2 कडून 3 बॅग बियाणे खरेदी केले. सदर बियाणे तालुका कृषी अधिकारी यांच्या सांगण्यावरुन खरेदी केले व ते बियाणे मदत निधी म्हणून मिळाले असे त.क. ने तक्रारीत नमूद केले. त.क. यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी सदर बियाणे मदत निधी म्हणून स्विकारले. परंतु त्या बियाण्यांच्या बॅगवर कोणतेही लेबल किंवा कोणताही शेरा नव्हता व त्या बियाण्यांची देखील उगवण झाली नाही. सदर बाबीची सुध्दा रितसर तक्रार दि.19.07.2013 रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली. दि.22.07.2013रोजी वि.प.क्रं. 1 चे प्रतिनिधी व कृषी अधिकारी यांनी त.क. च्या शेताची पाहणी केली व 20% सोयाबीन पिकाची उगवण झाल्याचा अहवाल दिला असे त.क.यांनी तक्रारीत नमूद केले आहे .
- त.क. नुसार त्याला दरवर्षी एकरी शेतामध्ये 10 पोते पेक्षा जास्त सोयाबीन होत होते. त्यानुसार त.क. चे 40 पोते सोयाबीनचे नुकसान झाले व सदर नुकसान हे 1,20,000/-रुपयाचे होते असे त.क.ने तक्रारीत नमूद केले. तसेच पेरणीसाठी खर्च 10,000/-रुपये व इतर खर्च 1,000/-रुपये आला असे त.क. ने तक्रारीत नमूद केले.
- त.क. नी मागणी केली की, वि.प. यांनी सदोष बियाण्यांचा पुरवठा केल्यामुळे त्याला आर्थिक नुकसान झाले. तसेच शारीरिक व मानसिकत्रास झाला.त्यामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानभरपाईकरिता रुपये 1,75,000/- व तक्रारीचा खर्च रु.20,000/-ची मागणी केली.
- सदर तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष यांना बजाविण्यात आली. विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी सदर तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले.
- विरुध्द पक्ष क्रं.1 यांच्या तर्फे वर्धा जिल्हयातील व्यवस्थापक यांनी सदर तक्रारीला लेखी उत्तर दाखल केले असून त्यांनी त्याचे परिच्छेदनिहाय उत्तरात त.क.चे सर्व म्हणणे नाकारले आहे. त्यांनी आपल्या उत्तरातील विशेष कथनामध्ये तक्रारकर्ता यांच्या तर्फे त्याच्या मुलाने बियाणे खरेदी केले असून सदर व्यवहार हा प्रत्यक्ष त.क. यांच्याशी झालेला नाही, त्यामुळे त.क. हा वि.प. यांचा ग्राहक होऊ शकत नाही व सदर तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी आपल्या उत्तरात विशेषपणे त.क. च्या जमिनीच्या योग्यतेबाबत व अनुकूलतेबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याचे नमूद केले.
- वि.प. यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, त.क. यांनी ज्यावेळी बियाणे पेरली त्यावेळी वातावरण व हवामान सोयाबीन पिकास अनुकूल व पोषक नव्हते व त.क. यांनी योग्य पध्दतीने शेतीची मशागत केली नाही. त्यामुळे या सर्वांसाठी वि.प. जबाबदार नसून त.क. यांनीच योग्य काळजी घेतली नसल्याचे आपल्या उत्तरात नमूद केले. वि.प. यांनी पुढे नमूद केले की, दुबार पेरणीकरिता वेळ निघून गेल्यामुळे पेरणी होऊ शकत नाही असा अहवाल असतांना सुध्दा त.क. नी पेरणी केली असे वि.प. यांनी आपल्या उत्तरात नमूद केले. वि.प.यांनी या प्रकरणातील पाहणी अहवालावर देखील आक्षेप घेतला असून त.क. चे सर्व म्हणणे नाकारले व सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली.
- वि.प. क्रं. 2 यांनी सुध्दा खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले असून त्यांनी तक्रारीतील परिच्छेदातील त.क. चे सर्व म्हणणे नाकारले आहे. आपल्या विशेष कथनामध्ये वि.प.क्रं. 1 यांनी घेतलेले मुद्दे तसेच प्रतिबिंबित केले आहे व सदर तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
- सदर तक्रार मंचासमक्ष युक्तिवादाकरिता दि.27.08.2014रोजी आली असता त.क. व त्यांचे वकील हजर. सदर प्रकरण दि. 12.08.2014 रोजी युक्तिवादाकरिता असतांना देखील त.क. व त्यांचे वकील हजर व दोन्ही तारखांना वि.प. व त्यांचे वकील गैरहजर होते. दि. 27.08.2014रोजी त.क. च्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
- मंचासमक्ष सदर प्रकरणामध्ये दाखल केलेले दस्ताऐवज उभय पक्षाचे कथन, शपथपत्र, त.क. यांचा युक्तिवाद इत्यादीचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या.
कारणे व निष्कर्ष - त.क. यांनी वि.प.क्रं. 2 यांच्याकडून वि.प.क्रं. 1 द्वारा निर्मित सोयाबीन बियाणे एम.ए.यु.एस.-71/लॉट नं. 12-13-3201/256, दिनांक 19.06.2013 रोजी खरेदी केले ही बाब त.क. ने दाखल केलेल्या नि.क्रं. 2, दस्ताऐवज क्रं. 1 वरुन स्पष्ट होते. त.क. ने सदर बियाण्याच्या खरेदीकरिता वि.प.क्रं. 2 यांना 5520/-रुपये नगदी दिले असे सदर दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. सदर बियाणे वि.प.क्रं. 2 यांच्याकडून खरेदी करण्याकरिता त.क. चा मुलगा प्रविण नागपूरे गेला होता ही बाब सुध्दा दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. कारण सदर पावतीवर त.क. च्या मुलाची सही आहे.
- सदर प्रकरणामध्ये वि.प. यांनी त.क. यांच्यामध्ये प्रत्यक्ष व्यवहार झाला नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त.क. त्यांचा ग्राहक ठरत नाही असे म्हटले आहे. वि.प. यांनी घेतलेला सदर आक्षेप अमान्य करण्यात येतो . कारण सदर बियाण्याची खरेदी त.क. च्या मुलाने त.क. करिताच केली होती. त.क. हा शेतकरी असून बियाणे खरेदी करण्याकरिता आपल्या मुलाला पाठविले हे संयुक्तिक वाटते. त.क. च्या मुलाने सदर बियाणे खरेदी करीत असतांना वि.प. यांच्याकडून जी पावती घेतली त्या पावतीवर त.क. चे नांव असल्याचे दिसते. वि.प. यांनी सदर पावतीवरील त.क. च्या मुलाची स्वाक्षरी नाकारलेली आहे परंतु पावती नाकारलेली नाही. सदर प्रकरणामध्ये त.क. च्या मुलाची सही जर वि.प. यांनी नाकारली आहे तर ती सिध्द करण्याची जबाबदारी सुध्दा वि.प. यांची आहे व त्याकरिता वि.प. यांनी कोणतीही तसदी घेतली नाही. सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी त्याच्या मुलाच्या मार्फत वि.प. क्रं.2 यांच्याकडून बियाण्याची खरेदी केली होती हे स्वयंस्पष्ट असून सदर बियाणे त.क. ने त्यांच्या शेतात पेरणीकरिता खरेदी केले होते व तक्रारकर्ता शेतीचा व्यवसाय उदरनिर्वाहाकरिता करतात, ही बाब सुध्दा त्यांनी तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या व्याख्येनुसार विरुध्द पक्ष यांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
- त.क.यांनी विरुध्द पक्ष क्रं.2 यांच्याकडून दिनांक 19.06.2013 रोजी बियाणे खरेदी केले व त्याची पेरणी दि. 20.06.2013 रोजी केली. सदर बियाण्याची पेरणी केल्यानंतर उगवण न झाल्यामुळे त.क. यांनी दि. 02.07.2013रोजी कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली व त्यानुसार तालुका कृषी अधिकारी यांनी दि. 03.07.2013 रोजी सदर शेतीची पाहणी करुन तपासणी अहवाल दिला. सदर तपासणी अहवाल नि.क्रं.2 दस्ताऐवज क्रं. 3 वर दाखल आहे. सदर तपासणी अहवालाचे निरीक्षण केले असता प्रामुख्याने ही बाब स्पष्ट होते की, बियाणे सदोष असल्यामुळे उगवण झालेली नाही असे नमूद आहे. तसेच तपासणी अहवालात खालील बाब सुध्दा नमूद आहे की, ‘‘ सोयाबीन बियाण्याचा सदर लॉट पेरणी करणा-या इतर शेतक-यांच्या सुध्दा पीक उगवणबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे बियाणे लॉट क्रं.ऑक्टो 12-13 ॠ3201/256 ची उगवण शक्ती अत्यंत कमी असल्यामुळे शेतात उगवण झालेली नाही.’’ या अहवालातील सदर निष्कर्षावरुन ही बाब स्पष्ट आहे की, या लॉट मधील बियाण्याच्या इतर सुध्दा तक्रारी होत्या व त्यामध्ये सुध्दा उगवण क्षमता अत्यंत कमी होती ही बाब स्पष्ट होते व सदर बाब ही अहवालात नमूद केली आहे. आजूबाजुच्या शेतामध्ये सोयाबीनच्या पिकाची चांगल्या प्रतीची उगवण झाली आहे. यावरुन वि.प. यांनी जमिनीबाबत घेतलेला आक्षेप अमान्य करण्यात येते. कारण सदर शेतीच्या आजूबाजुला इतर शेतक-यांनी पेरलेले सोयाबीनचे पीक चांगले झाले होते, याबाबतचा स्पष्ट निष्कर्ष तपासणी अहवालात आहे. त्यामुळे जमिनीबाबत वि.प. यांनी घेतलेला आक्षेप अमान्य करण्यात येतो. कारण बाजुच्या शेतक-यांच्या शेतात चांगले सोयाबीनची उगवण झाली तर त्या परिसरातील शेती सोयाबीन उगवणीकरिता पोषक होती हे स्पष्ट होते. वि.प. यांनी त.क. यांनी पेरणी योग्य केली नाही किंवा बियाणे जास्त खोलीत पेरले असेल अशी शंका व्यक्त केली. परंतु सदर बाब स्पष्ट करण्याकरिता वि.प. यांनी कोणतेही दस्ताऐवज दाखल केलेले नाही. या उलट तपासणी अहवालात असा कोणताही निष्कर्ष घेण्यात आलेला नाही की, बियाण्याची पेरणी ही योग्य पध्दतीने केल्या गेली नव्हती. त.क. हा पिढीजात शेतकरी असून त्याला बियाण्याची पेरणी कशी, कधी करावी याबाबतची पूर्ण जाणीव आहे व तपासणी अहवालात सुध्दा पेरणीबाबत कोणताही निष्कर्ष घेतलेला नाही किंवा पेरणीच्या अयोग्यतेबाबत तपासणी अहवालात काहीही नमूद नाही. यावरुन त.क. यांनी योग्य पध्दतीने सोयाबीन बियाण्याची पेरणी केली ही बाब सुध्दा स्पष्ट होते.
- दिनांक 03.07.2013 च्या तपासणी अहवालामध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे असा उल्लेख आहे व त्यामुळे शेतक-याचे नुकसान होणार आहे असे सुध्दा म्हटले आहे. परंतु शेतक-याकडे कोणताही पर्याय नसल्यामुळे त्यानी दुबार पेरणी केली, ही बाब स्पष्ट आहे.
- त.क.यांनी दुबार पेरणी करण्याकरिता वि.प. यांच्याकडून बियाणे घेतले. सदर बियाण्यांची सुध्दा उगवण योग्य न झाल्यामुळे त.क. यांनी दि. 19.07.2013 रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. सदर तक्रार ही नि.क्रं. 2 दस्ताऐवज क्रं.4 वर दाखल आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन पाहणी करण्याबाबतचे निर्देश दिले. त्यानुसार त.क. यांच्या शेतीची पाहणी करण्यात आली व त्यामध्ये सुध्दा दुबार पेरणीकरिता दिलेले बियाणे सुध्दा सदोष असल्याचे आढळून आहे. शेतात 20% पिकाची उगवण झाल्याचे तपासणी अहवालात नमूद आहे, यावरुन ही बाब स्पष्ट होते की, त.क. यांना सदोष बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला व त्यामुळे त.क.च्या सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीस वि.प. जबाबदार आहे.
- वि.प. यांनी त.क. यांना प्रकरण प्रलंबित असतांना दि. 12.12.2013 रोजीच्या पत्राद्वारे रु.1380/-चा धनोदश बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्यामुळे पाठवित असल्याचे पत्र पृष्ठ क्रं. 84 वर दाखल केले आहे. सदर पत्रातील विषयामध्ये ‘‘ खरीप 2013 हंगामात सोयाबीन बियाण्याची कमी उगवण शक्तीमुळे झालेल्या बियाणे नुकसानीचा धनादेश पाठवित असल्याबाबत.... ’’ असे संदर्भित आहे. यावरुन वि.प. यांनी स्वतःहून बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्याचे मान्य केले, ही बाब स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांना पाठविलेला धनादेश हा 1380/-रुपयाचा होता, तो 1380/-रुपयाचाच कां पाठविला याबाबत फक्त 0.30 किलो बियाण्याची भरपाई म्हणून एकूण रु.1380/- चा धनादेश पाठवित आहे असा उल्लेख असून धनादेश क्रं.17242 हा आहे, ही बाब सदर पत्रावरुन स्वयंस्पष्ट होते.
- सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी त्याला 40 पोते सोयाबीन झाले असते असे म्हटले आहे व त्यावेळच्या बाजारभावप्रमाणे रु.1,20,000/-चे नुकसान झाले आहे ही बाब सिध्द करण्याकरिता त.क. यांनी मंचासमक्ष सुरज नरेंद्र कडू, वय-38 वर्ष, रा.खिडकी, यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी 0.80 हे.आर. मध्ये 44 क्विंटल सोयाबीन झाल्याचे नमूद आहे. त्यापैकी त्यांनी 41 क्विंटल सोयाबीन अमृता एन्टर प्राइजेस, अमरावती येथील अडत दुकानातून विक्री केले त्यावेळी सोयाबीनचा बाजारभाव 3500/-रुपये होते असे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तसेच त.क. यांनी धनराज बापूरावजी निकाळे, रा. खिडकी, ता. आष्टी, जि. वर्धा यांचे प्रतिज्ञापत्र पुरावा म्हणून दाखल केला. त्यामध्ये सुध्दा धनराज निकाळे याला 0.81 हे.आर. मध्ये 17.59 क्विंटल सोयाबीन झाल्याची नोंद आहे व त्यांनी सुध्दा बाजारभाव 3450/-रुपये होता असे नमूद केले आहे. सदर प्रतिज्ञापत्राला वि.प.यांनी खोडून काढण्याकरिता कोणतीही तसदी घेतली नाही किंवा त्याची उलट तपासणी केली नाही. तक्रारकर्ता यांनी 1.48 हे.आर. सोयाबीनची पेरणी केली ही बाब तपासणी अहवालावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्ता यांना साहजिकच कमी अधिक प्रमाणात सरासरी 40 पोते सोयाबीन झाले असते. तक्रारकर्ता यांनी दोन्ही दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये सोयाबीनचा भाव रुपये 3450/- व 3500/-रुपये नमूद आहे. त्यामुळे सरासरी भाव प्रति क्विंटल रु.3,000/-गृहीत धरला असता तक्रारकर्त्याला रु.1,20,000/- चे आर्थिक नुकसान झाले ही बाब स्पष्ट होते.
- तक्रारकर्ता यांनी मशागतीची व इतर खर्चाची केलेली मागणी अमान्य करण्यात येते. कारण सदर मशागत व पेरणीचा खर्च हा तक्रारकर्ता यांना उत्पन्न झाले असता त्याला मिळाले असते. या प्रकरणात तक्रारकर्ता यांना रु.1,20,000/- उत्पन्न झाले असे ग्राहय धरण्यात येत असल्यामुळे पेरणी, मशागत करिता केलेल्या खर्चाची मागणी अमान्य करण्यात येते. विरुध्द पक्ष यांच्या अनुचित व्यापार पध्दतीमुळे तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. याकरिता शारीरिक व मानसिक त्रासाचे म्हणून तक्रारकर्ता 10,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 5000/-रुपये मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1) तक्रारकर्ता यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला. तसेच सेवेत त्रृटी दिल्याचे घोषित करण्यात येते. 3) विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्ता याला रु.1,20,000/- आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे. अन्यथा सदर रक्कमेवर 10% दराने व्याज देय राहील. 4) विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु. 5,000/- द्यावे. 5) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 6) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात. | |