जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
तक्रार क्रमांक:280/2013
दाखल दिनांक:01/01/2014
तक्रार आदेश दिनांक :19/06/2014
निकाल कालावधी:00वर्षे05महिने19दिवस
इक्बाल इमाम मुजावर
वय- 59वर्षे, धंदा- व्यापार,
रा.भंडारकवठे ता.द.सोलापूर जि.सोलापूर. ...तक्रारदार
विरुध्द
मा.मॅनेजर,
मॅगमा फायनान्स कार्पोरेशन लि,
शिवा कन्स्ट्रक्शन गंगा टॉवर,
न्यु पाच्छा पेठ, अक्कलकोट रोड,
सोलापूर. ...सामनेवाला
गणपुर्ती :- श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस.बनसोडे.
सामनेवालातर्फे विधिज्ञ:- जी.एन.राजपूत, एकतर्फा,
निकालपत्र
श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार) यांचेव्दारा :-
1. तक्रारदाराच्या तक्रारीमधील थोडक्यात कथन असे की, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवयास असून त्यावर त्यांचे कुटूंबियाचा उदर निर्वाह चालतो. त्यांनी टाटा कंपनीची ट्रक घेण्याचे ठरविले. सामनेवाला ही फायनान्स कंपनी आहे. जानेवारी 2013 मध्ये तक्रारदाराने सामनेवालाकडून ट्रक खरेदीसाठी रु.8,47,000/- कर्ज घेतले. व ट्रक नं.एम.एच.13/आर-3239 चेसीज नं.42603/सी.आर.झेड-715646 व इंजिन नं.बी-591452080 सी 62661210 खरेदी केला. कर्ज फेडीपोटी दरमहा रुपये 27,186/- हप्ता ठरला. कर्ज फेडीपोटी रुपये 81,600/- परतफेड केली. त्यानंतर ट्रक नादुरुस्त झाला. त्यामुळे कर्जाचे तीन हप्ते भरणे झाले नाही.
(2) त.क्र.280/2013
2. सामनेवाला यांनी दि.27/07/2013 रोजी कोणतीही पुर्वसूचना न देता तक्रारदाराचा ट्रक जबरदस्ती करुन ओढून नेला. त्यानंतर तक्रारदारानी ही तक्रार या मंचात दाखल केली आहे. त्यासोबत अंतरीम आदेश मिळण्यासाठी अर्ज केला, तो मंजूर झाल्यानंतर तक्रारदारास ट्रकचा ताबा मिळाला. अशा प्रकारे पाच महिने तक्रारदारास ट्रक वापरता आला नाही. दरमहा रु.15,000/- याप्रमाणे त्यांचे 75,000/- रुपये इतके नुकसान झाले आहे. सदर कालावधीतील कर्जाचे व्याज देण्यास तसेच झालेले नुकसान देण्यास सामनेवाला जबाबदार आहेत. त्यानंतर तक्रारदार हप्ते भरण्यासाठी सामनेवालाकडे गेलेअसता सामनेवाला यांनी हप्ता घेण्यास नकार दिला आहे. म्हणून झालेली नुकसान भरपाई रुपये 75,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे. मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- ची मागणी तक्रारदाराने केलेली आहे.
3. नोटीस बजावणी झाल्यानंतर सामनेवालाने हजर होऊन विधिज्ञ श्री.राजपूत यांचे वकीलपत्र दाखल केले. तक्रार दाखल करतानाच ट्रकचा ताबा मिळावा म्हणून अंतरीम आदेश मिळण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला आहे. तारीख 01/01/2014 चे आदेशाप्रमाणे तक्रारदारानी रुपये 81,558/- भरणा केल्यानंतर सामनेवाला यांनी ट्रकचा ताबा तक्रारदाराला परत करावा असा मंचाने हुकूम केला आहे.
4. त्यानंतर सामनेवाला यांनी आपले म्हणणे मंचात दाखल केलेले नाही, त्यांचे विरुध्द नो से चा आदेश झालेला आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत आपले अॅफिडेव्हीट दाखल केले आहे.
5. तक्रारदाराने ट्रकच्या रजिस्ट्रेशनचे सर्टीफिकेट, टॅक्ससह हजर केलेले आहे. तारीख 27/07/2013 ची बी.डी.पार्कींग यार्डची पावती हजर केली असून ट्रक नं.एम.एच.13/आर-3239 सामेनवाला यांचे मॅगमा फायनान्स यांनी तेथे पार्क केलेबाबतची पावती आहे. असे दिसते की, तक्रारदारातर्फे ता.25/11/2013 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठविण्यात आली, नोटीस मिळाल्याची पावती तक्रारदारतर्फे हजर करण्यात आली आहे. असे दिसते की, तक्रार दाखल झाली व अंतरीम आदेश झाल्याबरोबर तक्रारदाराला ट्रकचा ताबा मिळाला. त्यामुळे तक्रारीमध्येच ट्रकचा ताबा मिळाला, परंतू आमचे पाच महिन्याचे उत्पन्न बुडाले म्हणून नुकसानीची मागणी करण्यात आली आहे.
6. सामनेवालातर्फे तक्रारदाराचे कोणत्याही तक्रारीचा प्रतिवाद करण्यात आलेला नाही. या मंचाचे अंतरीम आदेशाप्रमाणे तक्रारदाराने रुपये 81,558/- असे दोन दिवसांत भरावयाचे होते व त्यानंतर सामेनवाला यांनी तात्काळ ट्रकचा ताबा द्यावयाचा होता. त्याप्रमाणे तक्रारदाराने ट्रकचा ताबा मिळविल्याचे दिसते.
(3) त.क्र.280/2013
7. सामनेवाला यांनी त्यांचे व तक्रारदारामधील कर्ज पुरवठा देतांना झालेल्या कराराची प्रत दाखल केलेली नाही, तक्रारदाराकडे अशी प्रत असण्याची शक्यता कमी आहे. कारण कर्ज पुरवठादार अशी प्रत सहसा कर्ज घेणा-यास देत नाहीत. तीन हप्ते थकल्यामुळे ट्रकचा ताबा मिळवणेस सामनेवालेस हक्क प्राप्त झाला हे दाखवणेची जबाबदारी सामनेवाला यांचेवर आहे. परंतू त्यांनी पार पाडलेली नाही, याचाच अर्थ असा निघतो की, सामनेवाला यांनी बिनाहक्काने तक्रारदाराकडून ट्रकचा ताबा घेतला. त्यामुळे साहजीकच होणा-या नुकसान भरपाईस सामनेवाला हे जबाबदार आहेत. त्यामुळे आम्ही पुढील आदेश करीत आहोत.
-: आदेश :-
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी दरमहा 10,000/- रुपये प्रमाणे रुपये 50,000/- द्यावेत. वरील रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज हा आदेश पारीत झाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत.
3) या तक्रारीचा खर्च म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारास रुपये 2,000/- हा आदेश पारीत झाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत.
4) उभय पक्षकारांना या निकालाची साक्षांकित प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिं01806140