जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 101/2011 तक्रार दाखल तारीख –13/07/2011
कैलाश पि. गणपत कुटे
धंदा शेती रा.कुटेवाडी ता.जि.बीड .तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी,
भारतीय जीवन बिमा निगम
शाखा बीड, दिप एजंसीच्या बाजुस, .सामनेवाला
नगर रोड, बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.सी.एन.वीर.
सामनेवाला तर्फे :- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे वडील गणपत बळीराम कूटे मौजे कुटेवाडी ता.जि.बीड येथील रहिवासी असून त्यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे रु.1,00,000/- ची जीवन आंनद योजनेनुसार दि.28.1.2008 रोजी विमा पत्र घेतली. त्यांचा नंबर 985010823 आहे. सदर विमा पत्राची मूदत दि.28.1.2023 होती. सदर विमा पत्राचा वार्षिक हप्ता रु.8476/- होता. विमेदाराने तिन हप्ते एकूण रु.25,428/- सामनेवालाकडे भरलेले आहेत. सदर पॉलिसीसाठी वयोमर्यादा 18 ते 65 वर्ष आहे. या वयोमर्यादे मधील इसमाना सदरची पॉलिसी घेता येते. ज्या इसमाकडे वयाचे प्रमाणपत्र नाही त्यासाठी हप्ता अधिक रु.150/- जादा रक्कम सामनेवाला कडे भरावे लागतात. त्यामुळे त्यांचे जवळ वयाच्या पुरावा नसल्याने सदरची ज्यादा रक्कम घेतली जाते. म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशनचा ज्यादा रु.150/- भरले की तो विमा पत्राचे अटीत बसतो.
त्यानुसार विमेदार गणपत कूटे यांनी सामनेवालाकडून सेल्फ डिक्लेरेशनची रक्कम रु.150/- भरुन विमा पत्र घेतले. दि.21.4.2010 रोजी त्यांचा सकाळी 8.30 च्या दरम्यान हदय विकाराने मृत्यू झाला आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर दि.1.1.5.2010 रोजी तक्रारदाराने नूकसान भरपाई रु.1,00,000/-ची मागणी केली असता दि.29.8.2010 रोजी सामनेवाला यांचे वरिष्ठ कार्यालय औरंगाबाद यांनी मागणी फेटाळून लावली. विमा घेताना विमेदाराकडे मतदान कार्ड नव्हते.
विमेदारांनी प्रस्तूत अर्ज पाठवते वेळी त्यांचे वय 45 सांगितले. मतदान कार्डवर त्यांचे वय 53 दिसून आल्याने सदरचा दावा सामनेवाला यांनी नाकारला.
सेल्फ डिक्लेरेशन व रु.150/- ज्यादा का घेतल्या जाते यांचे कोणतेही उत्तर सामनेवाला यांनी दिलेले नाही.
विनंती की, तक्रारदारास नूकसान भरपाईपोटी रु.1,00,000/- 12 टक्के व्याजासह सामनेवाला यांनी देण्या बाबत आदेश व्हावेत, तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व खर्चापोटी रु.10,000/- मंजूर करण्यात यावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.7.10.2011 रोजी दाखल केलरा. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. जीवन आंनद योजनेचा लाभ कमीत कमी 58 वर्ष, किमान 65 वर्ष व्यक्तीना सदरचे विमापत्र घेता येते.ज्याचे जवळ प्रमाणीत केलेले वयाचा पुरावा नसतो अशा प्रकरणात किमान त्यांचे वय 50 वर्ष धरुन सदर विमा पत्राची रक्कम रु.50,000/- पर्यत सिमीत केली जाते.प्रस्तूत तक्रारीत विमेदाराचे वय 50 वर्ष व विम्याची जोखीम रक्कम रु.1,00,000/- अवैद्यकीय सर्वसाधारण योजना अतर्गत आहे. परंतु मयत विमेदार प्रस्ताव दाखल करते वेळी 62-63 वर्षाचा होता. म्हणून त्यांचा दावा नाकारलेला आहे.त्याबाबतचे पत्र तक्रारदारांना देण्यात आलेले आहे. प्रस्ताव अर्जाचे वेळी विमेदाराने महत्वाची बाब वयाचे संदर्भात उघड केली नाही. त्यामुळे खोटया घोषणा देऊन प्रस्ताव अर्ज दाखल केला. त्यामुळे मयत विमेदाराने स्वतःहून विमा पत्रातील अटीचा भंग केलेला आहे. म्हणून सामनेवाला यांनी योग्य रितीने तक्रारदाराचा दावा नाकारला आहे. या संदर्भात विमेदाराचे वय प्रस्ताव वेळी 62-63 असे होते. या बाबत डॉ.हर्षल बडजाते यांचे प्रमणपत्र दि.26.6.2010 रोजीचे व तसेच तहसीलदार बीड यांचे प्रमाणपत्र सोबत दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी तक्रार दाखल करण्यास कोणतेही अधिकार नाही, तक्रारदारास कोणतेही कारण नाही, सेवेत कसूर नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, दाखल केले, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र, सामनेवाला यांचे साक्षीदार डॉ.एम.एस. बडजाते यांचे शपथपत्र दाखल केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.सी.एन. वीर व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता मयत विमेदार गणपत बळीराम कूटे यांनी हयातीत जीवन आनंद योजने अंतर्गत रु.1,00,000/- चा विमा त्यांचे वय 45 असल्या बददलचे स्वः घोषणा (सेल्फ डिक्लेरेशन) देऊन रु.150/- जास्तीचे भाग भरुन प्रस्ताव दाखल केला व सामनेवाला यांनी सदरचा प्रस्ताव योजना ग्राहय धरुन विमेदाराला विमापत्र दिलेले आहे. सदर विमा पत्राचे वार्षिक हप्ता रु.8476/- प्रमाणे तिन वर्षाचे हप्ते एकूण रु.25,428/- विमेदाराने त्यांचे हयातीत भरलेले आहेत.
दि.21.4.2010 रोजी विमेदाराचा हदय विकाराने मृत्यू झाला आहे. त्याचे मृत्यूनंतर विम्याचे पत्रात नॉमिनी म्हणून तक्रारदाराची नोंद असल्याकारणाने तक्रारदाराने सामनेवालाकडे सदर विमा पत्राची रक्कम मिळण्यासाठी दावा अर्ज दाखल केला. सदरचा अर्ज सामनेवाला यांनी दि.29.8.2010 रोजीच्या पत्रान्वये नाकारला आहे.या बाबत तक्रारदारानी दि.22.9.2010 रोजी झोनल कार्यालयास पत्र देऊन सामनेवाला यांनी काढलेल्या त्रूटीचे उत्तर सादर केले परंतु त्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद तक्रारदारांना मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदरची तक्रार आहे.
सामनेवाला यांनी सदर योजने अंतर्गत वैयक्तीक योजनेचे संदर्भात वयाचा पुरावा नसल्यास सदर विमेदाराचे वय जास्तीत जास्त 50 धरुन त्यांस रु.50,000/- जोखमीचे विमापत्र त्यांचे स्वतःचे घोषणा (सेल्फ डिक्लेरेशन) व रु.150/- ज्यादा घेऊन दिले जाते. परंतु प्रस्तूत तक्रारीत डॉ.एम.एस.बडजाते यांनी दिलेल्या दि.27.6.2010 रोजीच्या प्रमाणपत्रावर विमेदार गणपत बळीराम कूटे यांचे वय दि.26.7.2010 रोजी 64 वर्षाचे नमूद केले आहे. या संदर्भात त्यांनी त्यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच तहसीलदार बीड यांनी गणपत कूटे यांनी ओळखपत्र नि.11-35 चे दिलेले आहे. त्यात त्यांचे वय 66 वर्ष दाखवले आहे. या संदर्भात तक्रारदाराने त्यांचे वडिलांचे मतदानाचे ओळखपत्र नसल्याचे म्हटले आहे व सदरचे ओळखपत्र नाकारले आहे. सदर ओळखपत्राची बारकाईने पाहणी करता ते झेरॉक्स आहे. त्यावरील दिनाक व इतर माहीती तक्रारदाराच्या नांवा व्यतिरिक्त सर्व अस्पष्ट आहे. सदर ओळखपत्र संदर्भात संबंधीत तहसीलदाराचा पुरावा नाही.
तसेच दि.26.7.2010 रोजीचे डॉ.एम.एस.बडजाते यांचे प्रमाणपत्र पाहता त्यात त्यांनी किरकोळ आजारासाठी बाहयरुग्ण म्हणून विमेदार गणपत कूटे यांचेवर उपचार केल्याचे म्हटले आहे.परंतु त्या संदर्भात कागदपत्र नाहीत असे प्रमाणपत्रात नमूद आहे. त्यांचे शपथपत्रात वरील प्रमाणपत्रात त्यांनी श्री.गणपत कूटे यांना बाहयरुग्ण म्हणून कधी कोणत्या तारखेला तपासले या बाबतचा कूठलाही तपशील नाही. बाहयरुग्ण म्हणून सदर डॉक्टरचे शपथपत्र, प्रमाणपत्रास पुरक पुरावा म्हणून दाखल केलेले आहे. तरी सदरचे प्रमाणपत्र हे निर्णयासाठी ग्राहय धरणे उचित होणार नाही. तसेच महत्वाची बाब सदर प्रमाणपत्रात पेंशटची नांवाचे समोर वय नमुद नसून ते दोन ओळीमधील जागेत वय नमूद आहे. त्या दोन्ही अक्षरात फरक दिसतो म्हणून सामनेवाला यांचा पूरावा वयाचे संदर्भात विमेदार गणपत कूटेचे प्रस्तूतचे वयाचे बाबतीत ग्राहय धरणे उचित होत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी विमेदारास खोटे घोषणापत्र देऊन विमापत्रातील अटीचा भंग केल्याची बाब स्पष्ट होत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. तसेच सामनेवाला यांनी सदर योजने अंतर्गत अवैद्यकीय (नॉन मेडीकल) योजने अंतर्गत विमेदाराचे वय 50 वर्ष त्यांचेकडून घोषणापत्र व ज्यादा फि घेऊन रक्कम रु.50,000/- पर्यत जोखमेचे विमापत्र दिले जाते या बाबत विमा कंपनीचे कोणतीही नियमावली दाखल केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला यांचे सदरचे विधान ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीचा बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना हमीची रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसांचे आंत दयावेत.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र.2 चे पालन मुदतीत न केल्यास तक्रार दाखल दि.13.07.2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज देण्यास सामनेवाला जबाबदार राहतील.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड