जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ४०/२०१३ तक्रार दाखल दिनांक – २३/०५/२०१३
तक्रार निकाली दिनांक – १६/१०/२०१४
श्रीमती.प्रेमा भ्र.सदाशिव पाटील, उ.व.४२, धंदाः घरकाम,
द्वाराः श्रीमती.सुमनबाई भ्र कैलास पवार,
रा.मु.गांव दरवाज्याजवळ, दातर्ती रोड, शेवाळी, पो.दातर्ती,
ता.साक्री, जि.धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
(१) शाखाधिकारी, भारतीय जिवन विमा निगम
शाखा धुळे, ता.जि.धुळे.
(२) मंडळ कार्यालय, भारतीय जिवन विमा निगम, जिवन प्रकाश,
गडकरी चौक, गोल्फ ग्राऊंड, जुना आग्रा रोड,
पोस्ट बॉक्स नं.११०, नाशिक-४२२ ००२. ............. सामनेवाला
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.व्ही.पी. भामरे)
(सामनेवालातर्फे – अॅड.श्री.व्ही.एस. भट)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. सामनेवाले यांनी सेवा देण्यात त्रुटी केली आणि विमा पॉलिसीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली, या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे पती सदाशिव जंगलू पाटील यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून दि.२०/०७/२०१२ रोजी रूपये २,००,०००/- लाखाची जोखीम पॉलिसी क्र.९६४२५४६४३ घेतली होती. त्याचा हप्ता रूपये ४,८५२/- इतका होता. त्याचबरोबर दि.२५/०७/२०१२ रोजी रूपये २,००,०००/-ची जोखीम पॉलिसी क्र.९६४२५४८९३ घेतली होती. त्याचा हप्ता रूपये ५,५४९/- इतका होता. विमाधारक सदाशिव जंगलू पाटील यांचा दि.०६/०८/२०१२ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडे वरील विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी मागणी केली. मात्र सामनेवाले क्र.१ व २ यांनी दि.१२/०४/२०१३ रोजी तक्रारदार यांना नकारपत्र पाठवून विमा पॉलिसीची रक्कम देण्यास नकार दिला. सामनेवाले यांची ही कृती बेकायदेशीर असून, तक्रारदार यांना वरील दोन्हीही विमा पॉलिसींची रक्कम मिळावी, तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५०,०००/-, मानसिक त्रासापोटी रूपये १,५०,०००/- मिळावे अशी मागणी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पॉलिसी क्र.९६४२५४६४३, पॉलिसी क्र.९६४२५४८९३ च्या प्रती, विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, हप्ता भरल्याची पावती, सामनेवाले यांनी पाठविलेले नकारपत्र आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले क्र.१ व २ यांनी हजर होवून संयुक्त खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार कबूल नाही. तक्रारदार हे ग्राहक संज्ञेत मोडत नाही. या तक्रारीत योग्य पक्षकारांना सामील केलेले नाही. तक्रारदार यांच्या पतीला मे, जून आणि जुलै २०१३ या कालावधीत लिव्हर सीरॉयसीस या आजाराचा त्रास होता. त्याबाबत शिंदखेडा येथील ग्रामिण रूग्णालयात उपचार घेत होते. दि.३१/०७/२०१३ रोजी त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत सांगण्यात आले होते. विमाधारक मयत सदाशिव जंगलू पाटील यांनी सात दिवसांच्या अंतराने वेगवेगळया ठिकाणाहून तीन पॉलिसी काढल्या होत्या. त्या काढतांना अस्तित्वात असलेल्या पॉलिसींबाबत खोटी आणि असत्य विधाने केली आहे. वैयक्तिक अर्जामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही हेतूपुरस्सरपणे खोटी दिली आहेत. आजाराबाबतची माहिती लपवून ठेवली होती. या कारणामुळे त्यांची विमा पॉलिसी नाकारण्यात आली आहे. सामनेवाले यांची ही कृती कायदेशीर असून तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
५. सामनेवाले यांनी खुलाशासोबत विमाधारकाने पॉलिसी घेण्यापूर्वी भरून दिलेला अर्ज, एजंटने भरून दिेलेला गोपनीय अहवाल, वैद्यकीय चाचणीचा गोपनीय अहवाल, शिंदखेडा येथील वैद्यकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र, विमाधारकाचा वैद्यकीय अहवाल, तक्रारदार यांनी विमा कंपनीच्या तपास अधिका-यांसमोर दिलेला जबाब आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
६. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयपक्षांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
. मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
ब. तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून विमा पॉलिसींची
रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- वेचन
७.मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांच्या पतीने सामनेवाले यांच्याकडून दोन विमा पॉलिसी घेतल्या होत्या. त्याच्या छायांकीत प्रती आणि हप्ते भरल्याच्या पावत्या तक्रारदार यांनी दाखल केल्या आहेत. सामनेवाले यांच्या देशभरात विविध ठिकाणी शाखा आहेत. तक्रारदार यांच्या पतीने त्यापैकी निरनिराळया शाखांमधून विमा पॉलिसी घेतल्या होत्या. ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे पती सामनेवाले यांचे ग्राहक होते. त्यांच्या मृत्यूनंतर तक्रारदार हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. याच कारणामुळे आणि ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २ (ब) (पाच) मधील तरतुदीनुसार तक्रारदार हेसुध्दा सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. याच कारणामुळे आम्ही मुददा ‘अ’ चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
८.मुद्दा ‘ब’ – तक्रारदार यांच्या पतीने सामनेवाले यांच्याकडून दोन विमा जोखीम पॉलिसी घेतल्या होत्या. त्या पॉलिसींची छायांकीत प्रत तक्रारदार यांनी दाखल केली आहे. ही बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. विमा पॉलिसींची जोखीम रक्कम नाकारतांना सामनेवाले यांनी जे नकारपत्र पाठविलेले आहे ते बेकायदेशीर आहे आणि त्यात देण्यात आलेले कारण चुकीचे आहे असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. तर सामनेवाले यांनी पाठविलेले नकारपत्र योग्य आणि कायदेशीर असून विमाधारक सदाशिव जंगलू पाटील यांनी विमा पॉलिसी घेतांना भरावयाच्या अर्जात चुकीची, खोटी, असत्य माहिती दिली आणि त्याच कारणामुळे तक्रारदार यांना विमा पॉलिसीची रक्कम देता येणार नाही असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे.
सामनेवाले यांनी विमाधारक सदाशिव जंगलू पाटील यांनी विमा पॉलिसी घेण्यासाठी दि.२०/०७/२०१२ रोजी भरून दिलेल्या अर्जाची प्रत दाखल केली आहे. त्यात कलम २-ए मध्ये वयाच्या नोंदीत ४७ वर्षे असे नमूद करण्यात आले आहे. कलम २-बी मध्ये नियोजित व्यक्तिच्या वयाच्या नोंदीत ३५ वर्षे असे नोंद आहे. कलम १० मध्ये वडिलांच्या नावासमोर कोणाचाही उल्लेख नाही. आईच्या रकान्यात वय ६६, भावाच्या रकान्यात वय ४०, बहिणीच्या रकान्यात वय ३६ व ३८, पत्नीच्या रकान्यात वय ३५, मुलांच्या रकान्यात वय १४ व १२, कलम १२ मध्ये उंची १६८ से.मी. दाखविण्यात आली आहे. या अर्जावर विमाधारक याने पाटील एस.जे. अशी इंग्रजीत स्वाक्षरी केली आहे. या अर्जासोबत एजंटने भरावयाच्या गोपनीय अहवालात विमा धारकाचे शिक्षण दहावी दाखविण्यात आले आहे.
सामनेवाले यांनी विमाधारकाने दि.१५/०७/२०१२ रोजी आणखी एका पॉलिसीसाठी भरून दिलेल्या अर्जाची छायांकीत प्रत दाखल केली आहे. त्यात कलम २-अ मध्ये वयाच्या रकान्यात ४६ वर्षे, नियोजित व्यक्तिच्या वयाच्या रकान्यात ४० वर्षे, कलम १० मध्ये वडिलांचे वय ७० वर्षे, आईचे वय ६५ वर्षे, बहिणीचे वय ३० वर्षे, पत्नीचे वय ४० वर्षे, मुलांचे वय १५ व १० वर्षे दाखविले असून भाऊ नाही असा उल्लेख केला आहे. याच अर्जात कलम ५ मध्ये शैक्षणिक पात्रता बारावी दाखविण्यात आली आहे. या अर्जावर विमाधारकाने एस.जे पाटील अशी इंग्रजीतून स्वाक्षरी केली असल्याचे दिसते.
वरील दोन्ही कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले असता, दोन्ही प्रस्तावांमध्ये विमाधाराने दिलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याचे दिसून आले. दोन्ही अर्जांवर विमाधारकाची स्वाक्षरी भिन्न असल्याचे दिसून येते. एका अर्जावर विमाधारकाने पाटील एस.जे. अशी स्वाक्षरी केली आहे तर दुस-या अर्जावर त्याने एस.जे.पाटील अशी स्वाक्षरी केली आहे. त्याचबरोबर एका अर्जावर विमाधारकाने शैक्षणिक पात्रता दहावी, स्वतःचे वय ४७ वर्षे, पत्नीचे वय ३५ वर्षे, वडिलांचा उल्लेख नाही, भावाचे वय ४० वर्षे अशी नोंद केली आहे. तर दुस-या अर्जावर शैक्षणिक पात्रता बारावी, स्वतः चे वय ४६ वर्षे, पत्नीचे वय ४० वर्षे, वडिलांचे वय ७० वर्षे आणि भाऊ नाही असा उल्लेख केला आहे. यावरून दोन्ही अर्जातील माहितीत मोठी तफावत असल्याचे दिसून येते. विमाधारकाने पहिल्या पॉलिसीसाठी दि.१५/०७/२०१२ रोजी अर्ज केला. तर दुस-या पॉलिसीसाठी दि.२०/०७/२०१२ रोजी अर्ज केला. दोन्ही अर्जांमध्ये पाच दिवसांचे अंतर असल्याचे दिसते. असे असतांना दोन्ही अर्जातील माहितीत तफावत कशी ? असा प्रश्न सामनेवाले यांच्या वकिलांनी त्यांच्या युक्तिवादात उपस्थित केला. त्याबाबत तक्रारदार यांच्या वकिलांनी कोणताही खुलासा केला नाही. सामनेवाले यांच्या वकिलांनी विमाधारक सदाशिव जंगलू पाटील यांना लिव्हर सीरॉयसीस हा आजार होता आणि पॉलिसी घेण्यापूर्वी त्याबाबतची माहिती त्यांनी लपवून ठेवली होती याचाही उल्लेख केला, त्याबाबतही तक्रारदार यांच्या वकिलांनी कोणताही खुलासा दिला नाही.
सामनेवाले यांनी उपस्थित केलेले वरील मुद्दे खोटे आहेत किंवा असत्य आहेत याबबतचा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे वरील माहितीवरून विमाधारक सदाशिव जंगलू पाटील यांनी सामनेवाले यांच्याकडून निरनिराळया जोखमीच्या विमा पॉलिसी घेतांना सत्य माहिती लपवून ठेवली आणि पॉलिसीच्या दोन्ही अर्जांमध्ये दिशाभूल करणारी माहिती नमूद केली या मतापर्यंत आम्ही आलो आहेात.
विमा पॉलिसी म्हणजे विमाधारक आणि विमाकंपनी यातील एक करार असतो. कोणतीही पॉलिसी स्विकारतांना हा करार आणि त्याच्या नियम व अटी दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतात. विमा पॉलिसीचा करार करतांना किंवा पॉलिसी स्विकारतांना दोन्ही पक्षांनी सत्य आणि योग्य माहिती नमूद केली पाहिजे असे अपेक्षित असते. तथापि, सदर तक्रारीत विमाधारक यांनी निरनिराळया विमा पॉलिसी घेतांना जाणीवपूर्वक असत्य माहिती नमूद केली असावी असे आम्हाला वाटते. अशी परिस्थिती असतांना तक्रारदार यांना त्यांच्या मयत पतीच्या विमा पॉलिसींची रक्कम देण्यास सामनेवाले यांना भाग पाडणे योग्य होणार नाही असे आमचे मत बनले आहे. याच कारणामुळे तक्रारदार ह्या विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यास पात्र ठरू शकत नाही असे आम्हांला वाटते. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
९.मुद्दा ‘क’ – वरील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे सामनेवाले यांच्याविरूध्द कोणतेही आदेश करणे अयोग्य ठरेल. म्हणूनच आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.