ग्राहक तक्रार क्र. 188/2013
अर्ज दाखल तारीख : 13/12/2013
अर्ज निकाल तारीख: 22/01/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 10 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. शिल्पा भ्र. शिवाजी सुर्यवंशी,
वय-26 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. महादेव गल्ली, उमरगा,
ता.उमरगा, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
भारतीय जिवन विमा निगम लि,
उस्मानाबाद तुळजापुर रोड, उस्मानाबाद,
ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.जी.के.गायकवाड.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.ए.एस.रणदीवे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री. एम.व्ही. कुलकर्णी यांचे व्दारा :
1) विरुध्द पक्ष (विप) भारतीय जीवन बिमा निगम यांच्याकडे आपल्या पतीने आर्युवीमा काढला असतांना पतीच्या मृत्यू नंतर विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी केली अशी तक्रार करुन भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ती (तक) हिने ही तक्रार दाखल केलेली आहे.
2) तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात असे की तिचा पती शिवाजी याचे दि.28/2/2012 रोजी आजापणामुळे निधन झाले. शिवाजी हे छत्रपती शिवाजी महाविदयालय उमरगा येथे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरीला होते. त्याला दरमहा रु.16,000/- पगार मिळत होता. त्याने एकूण सात विमा पॉलिसीज विप यांच्याकडून घेतलेल्या होत्या. त्या वेगवेगळया रकमेच्या होत्या. आपल्या पगारातून शिवाजी पॉलिसीचे प्रिमीयम भरत होता. त्याने संपूर्ण माहीती विप यांना दिलेली होती. शिवाजीचे मृत्यूनंतर सहा पॉलीसीच्या रक्कमा विप यांनी तक ला दिल्या. मात्र पॉलसी क्र.984774457 या पॉलीसीची विमा रक्कम रु.3,75,000/- तक ला देण्याचे विप ने नाकारले आहे. विप चे म्हणणे आहे की शिवाजी यांनी पॉलीसी घेतांना आपण कोणत्याही स्वरुपातील तंबाखूचा उपभोग घेत नाही अशी खोटी माहीती दिली. बाकी सहा पॉलीसीची रक्कम दिल्या नंतर सातव्या पॉलीसीची रक्कम विप यांना नाकारता येणार नाही. कारण सर्व पॉलीसीसाठी मृत्यूचे कारण एकच आहे. त्यांनी पॉलीसीची रक्कम रु.3,75,000/- तसेच मानसिक त्रासासाठी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावी म्हणून ही तक्रार दाखल केली आहे.
3) तक्रारी सोबत तक्रारदाराने ज्या सहा पॉलीसीची रक्कम मंजूर केली ती विप ने दिलेली पत्रे हजर केली आहे. शिवाजी यांनी सातवी पॉलीसी घेतांना जो मजकूर लिहून दिला व त्यामुळे पॉलीसी नाकारण्यात आली ते पत्र हजर केलेले आहे. महाविद्यालयाकडून शिवाजी यांनी घेतलेल्या रजेचा तपशिल, दि.09/10/2012 रोजी विप यांनी कागदपत्राची मागणी केलेले पत्र तसेच डॉ.सतीश नरोडे यांचे विपच्या फॉर्मवरील रिपोर्ट, लातूर कॅन्सर सेंटरचा रिपोर्ट, कृष्णा सर्जीकल पॅथॅलॉजीचा रिपोर्ट, नरवडे हॉस्पिटल उमरगा यांचे दि.07/11/2011 चे डिस्चार्ज प्रमाणपत्र यांच्या पती सोबत जोडल्या आहेत.
4) विप यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दिलेले आहे. ज्या सात पॉलिसीज शिवाजी यांनी विप कडून घेतल्या त्यांच्या तारखा व रकमा तसेच पॉलीसी पोटी दिलेल्या रकमांचा तपशिल विप यांनी दिलेला आहे. त्याप्रमाणे सहा पॉलीसी पोटी रु.99,296/- , 63,040/-, 63,618/-, 1,25,112/-, 72,070/-, 1,62,820/- एवढया रकमा दिल्याचे नमूद आहे. 1999 मध्ये एक, 2004 मध्ये एक, 2005 मध्ये 2, व 2006 मध्ये दोन पॉलीसीज शिवाजी यांनी घेतल्याचे नमूद आहे. शेवटची विवादीत पॉलीसी रु.3,75,000/- ची शिवाजीने दि.14/05/2010 ला घेतल्याचे नमूद आहे. विप चे म्हणणे आहे की विमा कायदा कलम 45 नुसार विमा कंपनीला पॉलीसी घेतांना दाखल कागदपत्रांची छाननी करण्याचा अधिकार आहे. विमा पॉलीसी घेतल्या नंतर शिवाजी यांचा दोन वर्षात मृत्यू झाला त्यामुळे विपने कागदपत्रांची सखोल छाननी केली. त्यामध्ये हे उघड झाले की शिवाजी यांनी खोटी माहीती दिली होती. स्वत:ला कर्करोग झाल्याचे दडवून ठेवले होते. तंबाखूचे सेवन कधीच केले नाही असे म्हंटले होते. नेहमी प्रकृतीमान चांगले राहते असे म्हंटले होते.
5) विमेदाराच्या आयुष्याविषयी विमा कंपनीला कोणतीही माहीती नसते. त्यामुळे विमा घेतांना भरलेला फॉर्मवरच विश्वास ठेवला जातो विमेदाराने स्वत:च्या आरोग्याबददल सर्व अचूक माहीती देणे बंधनकारक आहे. तसे मा. सर्वोच्च न्यायालय व मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग यांचे न्याय निवाडे आहेत. शिवाजी यांनी दि.19/09/010 रोजी कृष्णा सर्जीकल पॅथलॉजी लॅबमध्ये वैदयकीय तपासणी केली तेव्हा कॅन्सर झाल्याचे दिसून आले. लातूर कॅन्सर अॅण्ड लॅप्रॉस्केपी सेंटर च्या अहवालाप्रमाणे शिवाज यांना कॅन्सर हा तंबाखू सेवनामुळे झाला होता. हिंदूजा हॉस्पिटल'' मुंबई यांच्या रिपोर्टप्रमाणे शिवाजी यांना आठ ते नऊ वर्षापासून तंबाखू खाण्याचे व्यसन होते. शेवटची पॉलीसी घेतली तेव्हा शिवाजी यांचे वय-34 वर्ष होते. त्यामुळे शिवाजी यांची वैदयकीय तपासणी करण्यात आली नाही. जर प्रपोजल फॉर्ममध्ये शिवाजी यांनी खरी माहिती दिली असती तर विमा संरक्षण देण्यापूर्वी विप यांनी त्यांची सखोल वैदयकीय तपासणी केली असती व विमा संरक्षण देणे नाकारले असते. मात्र शिवाजी यांनी विप यांचे जाणीवपुर्वक फसवणूक करुन विमा संरक्षण प्राप्त झाले. त्यांचा मृत्यू तंबाखू खाऊन झालेल्या कॅन्सरमुळे झाला होता. कॅन्सरसारखा रोग एकदम होत नाही. त्याची लक्षणे ब-याच आधिपासून दिसतात व ओषधोपचार सुरु होतात. शिवाजी यांना स्वत:ला कॅन्सर झाला आहे हे समजल्यामुळेच त्यांनी त्वरीत खरी माहीती दडवून ठेऊन मोठया रक्कमेचा विमा विप कडे उतरविला. विप यांनी विमा कायदा कलम 45 नुसार योग्यरित्या तक चा दावा नाकारला आहे. त्यामुळे विप यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. त्यामुळे तक यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे असे नमूद केले आहे.
6) म्हणण्यासोबत विप ने दि.09/04/2010 चा शिवाजी यांनी भरुन दिलेला प्रपोजल फॉर्म हजर केला आहे. कृष्णा सर्जीकल चा दि.19/09/2010 चा रिपोर्ट, लातूर कॅन्सर सेंटरचा दि.20/09/2010 चा रिपोर्ट, हिंदूजा हॉस्पिटलचा दि.30/09/2010 चा रिपोर्ट, शिवाजी कॉलेजचे दि.01/10/2012 चे पत्र इत्यादी कागदपत्रे हजर केली आहेत.
7) तक्रारदाराची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे व उभयतांचा युक्तिवाद यांचा विचार करता आमच्या विचारार्थ खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहलेली आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे का ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
8) मयत शिवाजी याने वय 34 वर्षे असताना दि.09/04/2010 रोजी आयुर्विमा छत्र रु.3,75,000/- चे घेतल्याचे दिसते त्यापुर्वी दि.25/10/1999 रोजी रु.100,000/- दि.15/12/2004 रोजी रु.50,000/-, दि.28/03/2005 रोजी रु.50,000/- दि.24/10/2005 रोजी रु.1,00,000/-, दि.28/12/2006 रोजी रु.75,000/- व त्याच दिवशी रु.1,50,000/- चा विमा उतरवल्याचे विप च्या म्हणण्यावरुन दिसून येते. शेवटी दि.14/05/2010 रोजी विवादीत रु.3,75,000/- ची पॉलीसी घेतली. शिवाजीचा मृत्यू दि.28/02/2012 रोजी कॅन्सर या आजारामुळे झाला. त्यामुळे एवढाच वादाचा मुददा आहे की शिवाजीने वस्तुस्थिती लपवून ठेऊन शेवटची पॉलीसी घेतली किंवा नाही.
9) दि.09/04/2010 च्या शिवाजीने इन्शूरन्ससाठी भरलेल्या फॉर्मची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये स्वत:ला कोणताही आजार नसल्याचे म्हंटले आहे. मागील 5 वर्षात एक आठवडयापेक्षा जास्त दिवस उपचारासाठी डॉक्टरकडे कधीही न गेल्याचे लिहिले आहे. आजारपणाचे कारणावरुन मागील 5 वर्षात कधीही कामावर गैरहजर न राहील्याचे म्हंटले आहे. कॅन्सरचा आजार नसल्याचे लिहिले आहे. दारु, नशाकारक पदार्थ, मादक द्रव्य अगर तंबाखू सेवन करत नसल्याचे म्हंटले आहे. प्रकृती उत्तम असल्याचे म्हंटले आहे. ढोले या एजंटामार्फत पॉलीसी घेतल्याचे दिसते. तसेच वय 34 वर्ष असल्यामुळे वैदयकीय तपासणीविना विमा प्रस्ताव विप ने स्वीकारल्याचे दिसते.
10) शिवाजी जिथे लॅब असिस्टंट म्हणून काम करत होता त्या छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा यांचे पत्राप्रमाणे दि.21/09/2010 पर्यंत शिवाजीने 1 ते 3 दिवसांच्या किरकोळ रजा उपभोगल्या. 2007 पासून दरवर्षी 6 दिवस, 7 दिवस व 13 दिवस तसेच 10 दिवस किरकोळ रजा उपभोगल्याचे दिसते जे सर्व सामान्य प्रमाण आहे. 23/09/2010 पासून 18 वैदयकीय रजा, 26 जुलै 11 पासून 116 दिवस वैदयकीय रजा व 19 नोंव्हेंबर 2011 पासून 159 दिवस अर्जीत रजा घेतल्याचे नमूद आहे.
11) रेकॉर्डवर दाखल मेडीकल पेपर्समध्ये लातूर कॅन्सर व लॅप्रोस्कोपी सेंटरचा दि.20/09/2010 चा केस पेपर हजर केला आहे. त्याप्रमाणे हिरडयाचा अल्सर 3 महीन्यापासून असल्याची तक्रार शिवाजीने केली होती म्हणजे जुन 2010 पासून शिवाजीची तक्रार होती. रिस्क फॅक्टर्स मध्ये तंबाखू खाणे, सुपारी खाणे व अल्कोहोल नमूद असून मेडीकल हिस्टरी काहीही नसल्याचे नमूद आहे. दि.19/09/2010 रोजीच कृष्णा सर्जीकल पॅथॅलॉजी लातूरचा रिपोट्र असून 2 ½ महीन्यापासून हिरडयावर अल्सटीव्ह लीजन आढळला होता well differentiated squamous cell carcinoma of hard palate. असा रिपोर्ट आहे. पी डी हिंदूजा हॉस्पिटल मुंबईचे ऑक्टोबर 2010 चे डिस्चार्ज कार्ड असे दर्शविते आजार हा चौथ्या स्टेजचा होता. 2 ते 9 वर्षापासून पेशंट तंबाखू सेवन करीत होता.
12) विप चे फॉर्मवर मेडीकल अटेडंट सर्टीफिकेट डॉ. नरवडे यांचे आहे. त्याचप्रमाणे शिवाजीला प्रथम त्रास 15 सप्टेंबर 2010 ला झाला. डॉ. नरवाडे यांनी प्रथम 25 सप्टेबर 2010 ला शिवाजीला तपासल्याचे म्हंटले आहे. त्यापूर्वी डॉ.फरीन गोळीवाले यांनी शिवाजीला
शदा हॉस्पिटल सोलापूर इथे तपासल्याचे नमूद आहे. डॉ गोळीवाले यांचा केस पेपर हजर करण्यात आलेला नाही. डॉ. नरवडे एल. आय. सी. चे मान्यता प्राप्त डॉक्टर असावेत त्यांचे म्हणणेप्रमाणे 15 सप्टेंबर 2010 पासून किरकोळ आजारासाठी त्यांनी शिवाजीला तपासले.
13) डॉ. गोळीवाले यांचेकडील पुरावा देण्याची जबाबदारी विप वर होती ती विप ने पार पाडली नाही. हिंदूजा हॉस्पिटलचे रिपोर्टप्रमाणे ऑक्टोबर 2010 मध्ये कॅन्सर चौथ्या स्टेजचा होता. तो एप्रिलमध्ये अजीबात कळाला नसेल काय हा प्रश्न आहे.
14) क्षणभर असे मानू की शिवाजीला जुन 2010 पर्यंत तोंडात अजीबातच त्रास जाणवला नाही. मात्र हिंदूजा हॉस्पीटलमध्ये त्याचे तर्फे सांगणेत आले की 8–9 वर्षापासून म्हणजे सुमारे 2001 पासून तो तंबाखूचे सेवन करत होता. मात्र पॉलीसी घेताना आपण तंबाखू सेवन करीत नाही असे शिवाजीने लिहून दिले होते तसेच विप यांचे म्हणणे की कॅन्सरसारखा आजार एकदम दृष्टीस पडणार नाही यामध्ये तथ्य आहे. एप्रिल / मे 2010 पुर्वी पासून शिवाजीला त्रास होऊन आजाराची कल्पना आली असणार पत्नीच्या आयुष्यासाठी तरतुद म्हणून घाईघाईने दि.09/04/2010 रोजी रु.3,75,000/- ची पॉलीसी शिवाजीने घेतली असणार. जर विमा करार करतांना विप ची शिवाजीने फसवणूक केली असेल व आजारपणाची, तंबाखू सेवनाची गोष्ट लपवून ठेवली असेल तर विमा दावा नाकारुन विप ने सेवेत त्रुटी केली व तक अनुतोषास पात्र आहे असे आमचे मत होऊ शकत नाही. त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रदद करण्यात येते.
2) खर्चाबददल कोणताही हुकुम नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.