(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक – 21 डिसेंबर, 2018)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमूद पत्त्यावर राहतो. विरुध्दपक्ष क्रं. 1 ही इलेक्ट्रानिक वस्तुचे उत्पादन करणरी कंपनी असून विरुध्द पक्ष क्रं. 2 हे तुमसर येथील सदर कंपनीचे प्राधिकृत विक्रेता आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 कंपनी उत्पादीत फ्रिज( LG,(M,405DMG) (S705LP001860) विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचेकडून दिनांक 05/03/2008 रोजी रुपये 25,450/- एवढया किंमतीत खरेदी केला. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी त्याबाबतचा कॅश मेमो आणि 1+4 वर्षाची वॉरन्टी असेलेले वॉरन्टी कार्ड तक्रारकर्त्याच्या नावाने दिले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, फ्रिज खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यांचा माहिती तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 यांना दिली, परंतु विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी त्याकडे पुर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचे कडे तक्रार क्रमांक 30982619606 नोंदविली असता विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी त्यांचे अभियंत्यास पाठवून तक्रारकर्त्याच्या फ्रिजमध्ये तात्पुरती सुधारणा करुन त्याचा फ्रिज पुन्हा सुरु करुन दिला. परंतु काही दिवस व्यवस्थित चालल्यानंतर फ्रिज पुन्हा बंद पडला. सदर फ्रिजमध्ये पुन्हा बिघाड उदभवल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना याबाबत कळविले असता विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी सदर फ्रिज आशित इंटरप्राईजेस यांचेकडे सुधारणा करण्यासाठी पाठविला, ज्याची पुर्ण रक्कम तक्रारकर्त्याला देणे भाग पडले. आशित इंटरप्राईजेसने सात महिने दुरुस्तीकरीता आपल्याकडे ठेवून सदर फ्रिज कोणतीही सुधारणा न करता जश्याच्या तश्या असस्थेत विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचेकडे परत पाठविला त्यानंतर विरुध्द पक्ष क्रं. 2 ने फ्रिज तक्रारकर्त्यास परत दिला. त्या दिवसापासून फ्रिज बंद अवस्थेत आहे. तक्रारकर्त्याला सदर फ्रिज पासून कोणताही उपभोग घेता आला नाही व त्याला दैनंदिन कामासाठी उपयोगात येणा-या सोईपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे तक्रारकर्त्याने आपले वकीलामार्फत विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना कायदेशीर नोटीस पाठविला. सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी त्याचे उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याच्या फ्रिजमध्ये वारंवार बिघाड उदभवला परंतु विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी हेतुपुरस्पररित्या हयगय व दुर्लक्ष केले. त्याकरीता विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 हे जबाबदार आहे. तक्रारकर्त्याला झालेल्या त्रासाचे निराकरण करण्याकरीता तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केली असून-
विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला कंपनीच्या वतीने दिनांक 05/03/2008 रोजी दिलेल्या वॉरन्टीचा भंग केल्यामुळे तक्रारकर्त्याला नविन फ्रिज बदलवून (replacement) किंवा त्याची रक्कम दिनांक 05/03/2008 पासून 18 टक्के द.सा.द.शे. प्रमाणे परत करण्याचा आदेश विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना देण्यात यावा. तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचेकडून मिळावा अशी विनंती केली आहे. .
03. विरुध्दपक्ष क्रं-1 ने दिनांक 15/10/2015 रोजी झालेल्या आदेशाची पुर्तता न केल्यामुळे दिनांक 05/10/2015 रोजी मंचाने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पुर्ववत असल्याने प्रकरण विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचेविरुध्द एकतर्फा चालविण्यात आले.
विरुध्द पक्ष क्रं. 2 हे सदर प्रकरणांत मंचासमक्ष हजर झाले, परंतु त्यांनी आपले लेखी उत्तर मंचासमक्ष दाखल न केल्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण विना लेखी जबाब चालविण्याचा आदेश पारीत करण्यांत आला.
04. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-12 नुसार एकूण-10 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून त्यामध्ये फ्रिजच्या बीलाची पावती, वॉरन्टी कार्डची प्रत, विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी विरुध्द पक्ष क्रं. 1 कडे फ्रिज पाठविल्याची भाडेपावती, विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी फ्रिज परत केल्याची पावती, तक्रारकर्त्याने वकीलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोष्टाच्या पावत्या व पोचपावती तसेच विरुध्द पक्ष क्रं. 1 कडून परत आलेला बंद लिफाफा इत्यादी दस्तऐवजाच्या छायाकिंत प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्त्याला शपथपत्र दाखल करावयाचे नाही अशी पुरसिस दिली. व लेखी युक्तिवाद दाखल केला नाही.
05. तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथन, दाखल दस्ताऐवज आणि युक्तिवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी मंचासमक्ष हजर होऊन तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढले नाही तसेच विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथन अबाधीत राहते. तक्रारकर्त्याने पृष्ठ क्रमांक 13 नुसार दाखल केलल्या फ्रिजच्या बीलावरुन तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद एल. जी. कंपनीचा फ्रिज रुपये 25,450/- एवढया किंमतीत खरेदी केल्याचे दिसून येते. सदर फ्रिजवर विरुध्द पक्ष क्रं. 1 कंपनीने 1+4 वर्षाची वॉरन्टी फ्रिज खरेदी तारखेपासून दिलेली होती. सदर वॉरन्टी ही फ्रिजकरीता 1 वर्षाची होती व फ्रिजच्या काम्प्रेसरवर अतिरिक्त 4 वर्षाची वॉरन्टी देण्यात आल्याचे वॉरन्टी कार्डवरुन स्पष्ट होते.
07. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने दिलेल्या तक्रारी वरुन विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्या अभियंत्याने फ्रिजमधील बिघाड दुरुस्त करुन फ्रिज पुर्ववत सुरु करुन दिला होता. परंतु त्यानंतर पुन्हा तक्रारकर्त्याचे फ्रिजमध्ये बिघाड निर्माण झाला त्याबाबत तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना कळविले असता विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी आशित इंटरप्राईजेस यांचेकडे दुरुस्ती करीता पाठविला. सदर फ्रिज विरुध्द पक्ष क्रं. 2 मार्फत आशित इंटरप्राईजेस कडे दिनांक 11/08/2011 रोजी पाठविल्याचे अभिलेखावरील दाखल पृष्ठ क्रमांक 15 वरील पावतीवरुन दिसून येते. त्याचप्रमाणे सदर फ्रिज विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी विरुध्द पक्ष क्रं. 2 कडे दिनांक 29/03/2012 रोजी आहे त्याच परिस्थितीत वापस पाठविल्याचे पृष्ठ क्रमांक 16 वरील विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी दिलेल्या पावतीवरुन दिसून येते. सदर पावतीचे अवलोकन केले असता त्यावर set return as same condition असा शेरा लिहीला असून only for replacement purpose असा शिक्का असल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने सदर फ्रिज दिनांक 05/03/2008 रोजी खरेदी केला त्यामुळे त्याची वॉरन्टी दिनांक 05/03/2009 पर्यंत होती. तक्रारकर्त्याने सदर फ्रिज दुरुस्तीकरीता आशित इंटरप्राईजेस, वाडी नागपूर येथे दिनांक 11/08/2011 रोजी पाठविल्याचे अभिलेखावरील दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. याचा अर्थ तक्रारकर्त्याच्या फ्रिजमध्ये बिघाड वॉरन्टी कालावधीनंतर आलेला आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी दुरुस्ती शुल्क घेवून फ्रिजची दुरुस्तीकरुन देणे आवश्यक होते. तसेच काम्प्रेसरमध्ये बिघाड असेल तर काम्प्रेसरची वॉरन्टी 5 वर्षाची असल्यामुळे तो विना शुल्क बदलवून देणे आवश्यक होते, परंतु विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी फ्रिज दुरुस्त न करता तब्बल सात महिन्यांनी विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्याकडे परत पाठविला. सदर फ्रिज तक्रारकर्त्याकडे सन 2011 पासून नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. सदर फ्रिजमध्ये बिघाड होण्यापूर्वी तक्रारकर्त्याने त्याचा वापर 3 वर्ष केल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याच्या फ्रिजमध्ये वॉरन्टी कालावधीनंतर बिघाड झाल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष क्रं. 1 ने आशित इंटरप्राईजेसकडे सात महिने फ्रिज दुरुस्तीकरीता ठेवला. परंतु तक्रारकर्त्याशी दुरुस्ती करण्याबाबत किंवा दुरुस्तीला लागणा-या खर्चाबाबत कुठलाही पत्र व्यवहार केल्याचा पुरावा मंचासमक्ष आलेला नाही. तक्रारकर्त्याचा फ्रिज दुरुस्त करण्याची जबाबदारी उत्पादीत कंपनी म्हणून विरुध्द पक्ष क्रं. 1 यांची असतांना त्यांनी तो करुन दिलेला नाही ही विरुध्द पक्ष क्रं. 1 च्या सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी सदर फ्रिज तक्रारकर्त्याकडून कोणतेही शुल्क न आकारता दुरुस्त करुन द्यावा अथवा सदर फ्रिज दुरुस्त होणे शक्य नसल्यास विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी फ्रिजच्या मुळ किंमतीच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच रुपये 12,725/- तक्रारकर्त्याला तक्रार दाखल दिनांक 01/04/2013 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने द्यावे, या निष्कर्षाप्रत मंच येते.
08. विरुध्द पक्ष क्रं. 2 हे फ्रिज विक्रेता असुन ते फ्रिज विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 यांचेकडून जरी सदर फ्रिज विकत घेतला असला तरी फ्रिज दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्रं. 1 उत्पादन कंपनीची आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी सेवेत त्रुटी केली असे म्हणता येणार नाही त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यांत येते.
विरुध्द पक्ष क्रं. 1 ने दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला निश्चितच शारीरीक, मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 1 कडून नुकसान भरपाई रुपये 3,000/- मिळण्यास पात्र आहे तसेच तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- विरुध्द पक्ष क्रं. 1 कडून मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येते.
09. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
::आदेश::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून कोणतेही शुल्क न आकारता त्याचा फ्रिज दुरुस्त करुन द्यावा. सदर फ्रिज दुरुस्त होणे शक्य नसल्यास विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी फ्रिजच्या मुळ किंमतीच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच रुपये 12,725/- तक्रारकर्त्याला तक्रार दाखल दिनांक 01/04/2013 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने द्यावे.
- विरुध्दपक्ष क्रं-(1) ने तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
- विरुध्दपक्ष क्रं- 1 ने सदर आदेशाचे अनुपालन आदेशाची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावी.
- विरुध्दपक्ष क्रं-(2) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.