द्वारा- श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा -
तक्रारकर्ता श्री. दुर्वास हिवकराज रंगारी यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........
1. मृतक श्रीमती मध्यमा दुर्वास रंगारी यांचा दि. 15.10.2006 रोजी बुडून मृत्यु झाला. त्यांनी दि. 11.11.2003 रोजी इंनडोमेन्ट इन्श्युरन्स पॉलिसी लाभासह घेतली होती व त्या त्रैमासिक विमा हप्ता म्हणून रुपये 389/- भरीत होत्या पॉलिसीचा नं. हा 974499553 असा होता. तर पॉलिसीची रक्कम रुपये 30,000/- अशी होती. पॉलिसीचा विमा हप्ता हा श्रीमती मध्यमा रंगारी हया नियमितपणे भरीत होत्या.
2. श्रीमती मध्यमा रंगारी यांनी ऑगस्ट -06 पर्यंतची प्रिमियमची रक्कम ही वि.प. 1 यांचे एजंट वि.प.2 श्री. अजय जांभुळकर यांना दिली होती. परंतु त्यांनी ते पैसे वि.प.1 यांच्याकडे भरले नाही व त्या पैशाची अफरातफर केली.
3. दि. 15-10-06 रोजी श्रीमती मध्यमा रंगारी यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांचे पती तक्रारकर्ता यांनी पॉलिसीची रक्कम लाभासह मिळण्यासाठी वि.प.क्रं. 1 यांच्याकडे संबंधित दस्ताएवजासह अर्ज केला. परंतु वि.प.क्रं. 1यांनी पॉलिसीची रक्कम ही दिली नाही.
4. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना पॉलिसीची लाभासह रक्कम रुपये 60,000/- ही व्याजासह देण्याचे निर्देश देण्यात यावे, शारीरिक , मानसिक व आर्थिक नुकसानीसाठी रुपये 10000/- व प्रकरणाचा खर्च हा वि.प.यांच्याकडून मिळावा.
5. वि.प.क्रं. 1 यांनी त्याचे लेखी बयाण निशाणी क्रं. 12 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, वि.प.2 यांनी केलेल्या अफरातफरीशी वि.प.क्रं. 1 याचा काहीही संबंध नाही. विमा हप्ता हा मुदतीत न भरण्यात आल्यामुळे पॉलिसी ही रद्द झाली. वि.प.यांच्या सेवेत कोणतीही न्यूनता नाही. तक्रारकर्ता याची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी, कारण वि.प.यांनी रु.15000/- तक्रारकर्ता यांना “Ex-Gratia” तत्वावर देण्याची तयारी दाखविली होती.
6. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी त्याचे लेखी बयाण निशाणी क्रं. 11 वर दाखल केले आहे. ते म्हणतात की, मृतक श्रीमती मध्यमा रंगारी या विमा हप्त्याची रक्कम नियमितपणे त्यांच्याकडे देत नव्हत्या त्यांनी ऑगस्ट -2006 पर्यंतची रक्कम दिली होती हे म्हणणे खोटे आहे. तक्रारकर्ता यानी दाखल केलेली तक्रार ही मुदतबाहय आहे. विद्यमान न्यायमंचास ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता यांनी ओमबुडसमन (Ombudsman) एल.आय.सी.मुंबई यांच्याकडे ही तक्रार दाखल करायला पाहिजे होती. तक्रारकर्त्यानी दाखल केलेली तक्रार ही खोटी व दिशाभूल करणारी आहे. मृतक श्रीमती मध्यमा रंगारी यांनी जी सुध्दा रक्कम विमा हप्ता म्हणून दिली आहे ती वि.प.क्रं. 1 यांच्याकडे जमा करण्यात आली आहे. तक्रारकर्ता यांनी खोटी तक्रार दाखल केलेली असल्यामुळे ती रुपये 5,000/- च्या नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावी.
7. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले कागदपत्रे, शपथपत्र , इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, सदर विमा दाव्यात खालील तक्त्याप्रमाणे रक्कम भरण्यात आलेली होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------
अ.क्र. पैसे भरल्याची ज्या त्रैमासिक हप्त्याचे क्रमांक विमा हप्ता
पैसे भरले तो महिना
--------------------------------------------------------------------------------------------------------
01 11.11.03 नोव्हेबंर - 03 134145 389.00
02 21.04.04 फेब्रुवारी – 04 0555756 394.00
03 09.07.04 मे – 2004 0225266 394.80
04 22.11.04 ऑगस्ट – 04 1071099 397.00
05 04.02.05 नोव्हेबंर – 04 1195854 400.00
06 02.06.05 फेब्रुवारी – 05 2630687 394.00
07 22.07.05 मे – 2005 1851294 394.00
08 23.09.05 ऑगस्ट – 05 2685753 394.00
09 09.03.06 नोव्हेबंर – 05 882311 399.00
10 30.06.06 फेब्रुवारी -06 2000157 402.00
------------------------------------------------------------------------------------------------------
8. वि.प.क्रं. 1 यांनी दिलेल्या दि. 11.11.2003 च्या रसीदवर “FIRST PREMIUM RECEIPT” असा उल्लेख आहे. तर दि. 20.12.03 च्या रसीदवर PROPOSAL DEPOSIT RECEIPT असा उल्लेख आहे. तक्रारकर्ता म्हणतात की, वि.प.क्रं. 2 यांच्याकडे प्रिमियमचे पैसे देण्यात आले होते. परंतु ते त्यांनी भरले नाही. मात्र वि.प.क्रं. 2 यांनी दि. 09.11.2006 रोजी म्हणजेच श्रीमती मध्यमा रंगारी यांचा मृत्यु झाल्यानंतर ते पैसे भरल्याचे दिसून येते. वि.प.क्रं.1 यांनी PREMIUM INTIMATION LETTER AND LOAN INTEREST INTIMATION या क्रं. 6220 च्या पत्रात शेवटचा भरलेला हप्ता हा दि. 11.05.06 चा आहे असे नमूद केले आहे.
9. श्रीमती मध्यमा रंगारी यांचा मृत्यु दि. 15.10.06 रोजी झाला तर शेवटचा हप्ता हा दि. 11.05.2006 च्या त्रैमासिक हप्त्यासाठी भरण्यात आला होता ही वादातीत बाब आहे. म्हणजेच ऑगस्ट-2006 चा त्रैमासिक हप्ता हा भरला गेला नव्हता.
10. वि.प.क्रं. 1 यांनी पॉलिसी सर्व्हिस मॅन्युअल नं. 11 च्या संबंधित कलमाची प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे. त्यातील ‘‘ 4 (ब) यामध्ये असे नमूद केले आहे की, जर विमा धारकाचा मृत्यु हा जेव्हा पासून शेवटचा विमा हप्ता भरला आहे त्यापासून 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत झाला असेल तर एकूण विमा रक्कमेच्या अर्धी रक्कम ही विमा दाव्यासाठी देता येऊ शकते ’’.
10.
11. मृतक मध्यमा रंगारी यांचा मृत्यु हा दि. 15.10.06 रोजी झाला तर शेवटचा त्रैमासिक हप्ता हा मे-06 चा भरण्यात आला होता. फक्त ऑगस्ट -06 चा हप्ता भरण्यात आला नव्हता. दि. 11 ऑगस्ट 06 चा हप्ता हा पहिला न भरल्या गेलेला हप्ता होता असे निदर्शनास येते. तेव्हा पासून 3 महिन्याच्या आत विमा धारकाचा मृत्यु झाला आहे त्यामुळे वि.प.क्रं. 1 यांनी विमा दाव्याची अर्धी रक्कम म्हणजेच रुपये 15000/- हे तक्रारकर्ता यांना द्यावयास पाहिजे.
12. त.क. यांनी III (2004) एसीस 206 (डीबी) हा केस लॉ रेकॉर्डवर दाखल केला आहे. तर वि.प.क्रं. 1 यांनी खालील केस लॉ रेकॉर्डवर दाखल केले आहे.
1) I (1994) CPR 106 (N.C.)
2) I (1994) CPJ 95 (N.C)
3) I (2000) CPJ 28 (Punjab)
4) I (2000) CPJ 252 ( Assam)
5) III (2002) CPJ 92 (U.P.)
वि.प.यांनी दाखल केलेले केस लॉ यातील तथ्य व परिस्थिती भिन्न असल्यामुळे सदर प्रकरणास लागू होत नाही.
अशी स्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारकर्ता यांची तक्रार ही अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. विरुध्द पक्ष क्रं. यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 15000/- द्यावे.
3. शारीरिक व मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीसाठी कोणताही आदेश नाही. तसेच ग्राहक तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.