(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या पतीच्या मृत्यु नंतर त्याच्या जिवन विम्याबद्दल मिळणारी विमा रक्कम देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार ही मयत मधुकर शेषेराव हरबडे यांची पत्नी असून अर्जदार हीस 3 अपत्ये आहेत. अर्जदाराचे पती हे कृषी उत्पन्न बाजार समिती,मानवत,तालुका मानवत,जिल्हा परभणी येथे नोकरीस होते. अर्जदाराचे पतीचे मृत्यु नंतर अर्जदार ही तीच्या माहेरी म्हणजे आंबेडकर नगर,नांदेड येथे राहात आहे. दिनांक 21.06.2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचे विमा प्रतिनिधी श्री पावन सारडा यांनी अर्जदाराचे पतीची भेट घेऊन त्यांना विमा योजनाक्रमांक 133/16 बद्यल माहिती देऊन विमा योजना विकत घेण्याची विनंती केली. अर्जदाराचे पतीस विमा प्रतिनिधीने सदर विमा योजना तिप्पट लाभाची असून फायद्याची असल्याचे सांगितल्यावरुन अर्जदाराचे पतीने विमा प्रतिनिधी यांनी सांगितल्याप्रमाणे प्रस्ताव पत्रावर सही केली व विमा हप्ता रक्कम रु.555/- दिला. अर्जदाराचे पतीने गैरअर्जदार क्र. 1 कडून आलेल्या प्रतिनिधीमार्फत स्वतःचे जिविताचा विमा दिनांक 22.06.2010 रोजी उतरविला होता. विमा हप्ता भरावयाचा कालावधी 16 वर्षाचा असून विमा करार रक्कम रु.2,00,000/- इतक्या रक्कमेचा आहे. पुढील मासिक हप्ता अर्जदाराचे पती यांचे वेतनातून कपात करण्याची उभयतांमध्ये ठरले होते. त्यानुसार अर्जदाराचे पती हयात असेपर्यंत विमा हप्ते त्यांचे मासिक वेतनातून नियमाप्रमाणे वसूल केलेले आहेत. अर्जदाराचे पती यांचा मृत्यु अचानक झालेल्या काविळीमुळे झालेला आहे. पतीच्या मृत्यु पश्चात अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्कम मिळणेसाठी प्रस्ताव सादर केला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव दिनांक 10.02.2012 रोजी “Suppression of material facts” या कारणामुळे नामंजूर केलेला आहे. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांचे मुंबई येथील क्षेत्रीय कार्यालयात पत्रव्यवहार करुन नुकसान भरपाई मिळणेसाठी विनंती केली. मुंबई येथील क्षेत्रीय कार्यालयाने दिनांक 21.10.2012 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांचे मुंबई येथील मुख्य कार्यालय(सचिवालय) यांचेकडे दाद मागीतली, तेथेही अर्जदाराचा प्रस्ताव नाकारण्यात आला. शेवटी पर्याय न राहिल्याने अर्जदारास विमा लोकपाल,मुंबई येथे जावे लागले. विमा लोकपाल,मुंबई यांनी देखील दिनांक 29.11.2013 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव नाकारण्यात आलेल्याचे जाहिर केले. अर्जदाराचे पतीने त्यांना असलेल्या आजाराची माहिती विमा प्रस्ताव पत्रात नमुद केलेली नाही, सदर माहिती जाणूनबुजून लपवली असे गैरअर्जदार यांनी विमा प्रस्ताव नाकारण्याचे कारण दिलेले आहे. वास्तविक पाहता टेबल क्रमांक 133/16 प्रमाणे गैरअर्जदार यांनी या प्रकारचा विमा घेण्याचा जो प्रस्ताव अर्जदाराचे पती यांना दिलेला होता त्यातील नियमानुसार विमाधारकाचे वैद्यकीय तपासणी करुन वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे अपरिहार्य होते. त्यानुसारच गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे पतीचा विमा प्रस्ताव पत्रासोबत वैद्यकीय व्यावसायीकाचे प्रमाणपत्र जोडलेले होते. वैद्यकीय व्यावसायीकाने दिलेल्या प्रमाणपत्राच्या प्राप्तीनंतरच गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे पतीचा विमा प्रस्ताव स्विकारलेला आहे. असे असतांनाही गैरअर्जदार यांनी सदरील प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केलेले आहे. कराराप्रमाणे अर्जदारास नुकसान भरपाई देणे अनिवार्य आहे. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा प्रस्ताव नामंजूर करुन सेवेत त्रुटी दिलेली आहे. यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागलेला आहे व आज रोजी अर्जदारावर तीच्या 3 अज्ञान मुलांची जबाबदारी आहे. हे सर्व लक्षात घेतल्यास अर्जदाराला किमान रक्कम रु.50,000/- एवढी नुकसान भरपाई व प्रकरण दाखल करण्यासाठी रक्कम रु.5,000/- मिळणेस देखील अर्जदार पाात्र आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचा प्रस्ताव नाकारलेला असल्यामुळे सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने अर्जदाराने पतीचा नैसर्गीक मृत्यु बाबत विमा करार पत्र क्र. 983666918 च्या अटी व शर्तीपमाणे मुळ विमा रक्कमेच्या तीप्पट नुकसान भरपाई म्हणजेच रक्कम रु.6,00,000/- गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 16.01.2011 पासून द.सा.द.शे. 18 व्याजदरासह देण्याचा आदेश करावा. तसेच झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- व दावा खर्च म्हणुन रक्कम रु. 2,000/- गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. मयत विमाधारक मधुकर शेषेराव हे आपल्या हयातीत कृषी उत्पन्न बाजार समिती,मानवत येथे नोकरीस होता व दिनांक 16.01.2011 रोजी आजारामुळे त्याचा मृत्यु झाला याबद्दल वाद नाही. परंतु त्याचा मृत्यु अचानक आलेल्या आजारामुळे झालेला आहे हे खोटे आहे. गैरअर्जदार यांचे असेही म्हणणे आहे की, विमाधारक हा विमा पॉलिसी घेण्यापासून यकृताच्या आजारापासून पिडीत होता. दिनांक 04.05.2009 ते दिनांक 18.05.2009 व दिनांक 15.03.2010 ते दिनांक 20.03.2010 पर्यंत आंतररुग्ण म्हणून उपचार घेतला होता. वरील कालावधीत सेवेत असलेल्या कार्यालयात अर्ज करुन सुध्दा रजा उपभोगली आहे व याचा आजारामुळे विमाधारकाचा मृत्यु झालेला आहे. विमाधारकाने आपल्या हयातीत अर्जदारास नियुक्त व्यक्ती दाखवून दिनांक 22.06.2010 रोजी विमा कोष्टक क्रमांक 133/16 प्रमाणे पॉलिसी क्र. 983666918 घेतली याबद्दल वाद नाही. अर्जदाराचा विमा दावा “Suppression of material facts” या कारणावरुन दिनांक 10.01.2012 च्या पत्रान्वये फेटाळण्यात आला होता,त्याविरुध्द अर्जदाराने क्रमवार 3 अपील केलेले असून दिनांक 21.10.2012, दिनांक 24.04.2013 व दिनांक 27.11.2013 रोजी अर्जदाराचे अपील सकारण फेटाळण्यात आले आहे. विमाधारक हा पॉलिसी घेण्या आधीपासून यकृताच्या आजाराने पीडीत होता व त्यासाठी त्यांनी सेवेत असलेल्या कार्यालयात अर्ज करुन रजा उपभोगलेली आहे ही बाब विमा प्रस्ताव फॉर्म भरुन देतेवेळी कलम 11 मध्ये सदरील माहिती लपविली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी व त्यानंतर अपीलीय अधिकरी यांनी साक्षी पुरावा आधारे अर्जदाराचा प्रस्ताव योग्यरीत्या फेटाळलेला आहे. त्यामुळे सदरील मंचास प्रकरण चालविणेचा अधिकार नाही. विमा लोकपाल,मुंबई हा उच्च न्यायालयाचे समकक्ष असल्याने सदरील तक्रार अर्जावर मंचाला आदेश पारीत करता येणार नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणणेच्या पृष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदाराचे पतीने त्यांचे हयातीमध्ये दिनांक 21.06.2010 रोजी विमा योजना क्र. 133/16 नुसार पॉलिसी क्र. 983666918 घेतली असल्याचे दोन्ही बाजूस मान्य आहे. तसेच अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा दिनांक 16.01.2011 रोजी झालेला असल्याची बाबही दोन्ही बाजूस मान्य आहे. अर्जदाराचे पतीचे मृत्यु पश्चात अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे सदरील पॉलिसी आधारे विमा रक्कम मिळणेसाठी प्रस्ताव सादर केला व गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा प्रस्ताव ‘’ गैरअर्जदार यांचेपासून सत्य माहिती लपवून ठेवली ‘’ या कारणावरुन फेटाळलेला आहे. सदर निर्णया विरुध्द अर्जदार यांनी विमा लोकपाल,मुंबई यांचेकडे अपील केलेले होते त्यांनीही अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार यांनी योग्यरीत्या नाकारलेला असल्याचे सांगितले आहे. परंतु दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव हा चुकीच्या कारणावर नाकारलेला आहे कारण अर्जदाराचे पतीने पॉलिसी घेत असतांना गैरअर्जदार यांनी नेमणुक केलेले वैद्यकीय व्यावसायीकाकडून अर्जदाराचे पतीची वैद्यकीय चाचणी केलेली होती व वैद्यकीय व्यावसायीकाकडून दिलेले प्रमाणपत्रानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे पतीस विमा पॉलिसी दिलेली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांानी पॉलिसीचा प्रोपोजल फॉर्म तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. सदरील प्रोपोजल फॉर्मचे अवलोकन केले असता अर्जदार यांचे मयत पती सन 1993 पासून गैरअर्जदार यांचेकडून विमा पॉलिसी घेत असल्याचे कॉलम क्र. 9 वरुन दिसून येते. तसेच कॉलम क्र. 12 चे अवलोकन केले असता त्यामध्ये प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे सादर करीत असतांना गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे मयत पतीची वैद्यकीय चाचणी केलेली असल्याचे स्पष्ट होते. कारण त्यामध्ये मेडीकल असे लिहिलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमाप्रस्ताव नाकारतांना प्रस्तावासोबत सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्राचा उल्लेख कुठेही केलेला नाही. ही बाब चुकीची आहे. यावरुन वैद्यकीय व्यावसायीकाकडून विमाधारकाची प्रकृती संदर्भात दिलेले प्रमाणपत्र योग्य असल्यानेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे पतीस सदरील पॉलिसी दिलेली असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारतांना अर्जदाराचे मयत पतीने गैरअर्जदाराचे प्रस्तावामध्ये सत्य माहिती लपवून ठेवली असे नमूद केलेले आहे. परंतु त्या संदर्भात गैरअर्जदार यांनी आश्विनी क्रिटीकल आरोग्य सेंटर,नांदेड यांचे डॉक्टरांनी गैरअर्जदार यांना दिलेले मेडीकल अटेंडंट सर्टीफीकेट तसेच अर्जदार यांचे पतीने त्यांचे कार्यालयात उपभोगलेल्या रजेचा दाखला व रजेसोबत दिलेले मेडीकल सर्टीफीकेटच्या आधार घेतलेला आहे. सदरील मेडीकल अटेंडंट सर्टीफीकेटमध्ये अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा “due to cardiac arrest, due to multi system organ failure” मुळे झालेला असल्याचे नमुद केलेले आहे. त्याच प्रमाणपत्रामध्ये 5 No. परिच्छेदमधील E & F या प्रश्नांचे उत्तर म्हणजेच सदरील डॉक्टरांनी अर्जदाराचे पतीस तपासले ती तारीख 07.01.2011 अशी दिलेली आहे. तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराचे पती हे दिनांक 15.03.2010 ते दिनांक 20.03.2010 या कालावधीमध्ये आजाराच्या कारणामुळे सेवेमध्ये रजेवर होता त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यालयात नोकरीच्या ठिकाणी दिलेल्या रजेच्या संदर्भातील वैद्यकीय प्रमाणपत्राचे आधारे रजा घेतलेली आहे व सदरील प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता अर्जदाराचे पती हा दिनांक 15.03.2010 ते दिनांक 20.03.2010 या कालावधीमध्ये Viral(metabolic encophotopathy with hepatitis ) यामुळे आजारी होता असे नमुद केलेले आहे. तसेच प्रमाणपत्रामधील शेवटच्या वाक्याचे अवलोकन केले असता अर्जदाराचा पती हा दिनांक 01.04.2010 पासून नोकरीवर जाण्यास तंदुरुस्त असल्याचेही नमुद केलेले आहे. यावरुन विमाधारक हा दिनांक 01.04.2010 रोजी विमाधारकाची प्रकृती तंदुरुस्त असून तो कामावर जाण्यास योग्य असल्याचे दिसून येते. अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा दि16.01.2011 रोजी झालेला आहे. अर्जदार यांचे पतीचा मृत्यु हा यकृताच्या आजारामुळेच झालेला आहे व अर्जदाराचा पती हा पॉलिसी घेण्यापुर्वीपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होता या संदर्भातील कोणताही पुरावा गैरअर्जदार यांनी दिलेला नाही. अर्जदार यांचे पतीस दिनांक 15.03.2010 ते दिनांक 20.03.2010 या कालावधीमध्ये hepatitis म्हणजेच कावीळ झालेली होती व कावीळ हा आजार दुषीत पाण्यामधील जंतूमुळे कोणालाही व किती वेळाही होऊ शकतो. त्यामुळे विमाधारक पॉलिसी घेण्यापुर्वीपासूनच आजारी होता हे गैरअर्जदार यांचे म्हणणे योग्य नाही. विमाधारकाने गैरअर्जदार यांचेकडे सन 1993 पासून विविध पॉलिसी घेतलेल्या असून गैरअर्जदार यांनी सदरील पॉलिसींच्या रक्कमा अर्जदार यांना दिलेल्या आहेत. परंतु याच पालिसीची रक्कम देतांना गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे पती- विमाधारक यांनी गैरअर्जदारापासून सत्य माहिती लपवून ठेवली या कारणामुळे अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारलेला आहे. गैरअर्जदाराने विमा प्रस्ताव नाकारतांना प्रस्तावासोबत असलेल्या विमाधारकाची प्रकृती संदर्भातील गैरअर्जदार यांचे अधिकृत वैद्यकीय व्यावसायीकाकडून दिलेल्या प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केलेले असल्याचे दिसून येते. विमाधारकाची वैद्यकीय चाचणी केलेली असल्याचे प्रमाणपत्रही गैरअर्जदार यांनी मंचापुढे दाखल केलेले नाही. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव अयोग्य कारणामुळे नाकारलेला असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणणेच्या पृष्टयर्थ वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखल केलेले आहेत. परंतु सदरील निवाडयांचे अवलोकन केले असता सदरील निवाडयातील वस्तुस्थिती व उपस्थित प्रकरणातील वस्तुतस्थिती भिन्न असल्यामुळे या प्रकरणात लागू होत नाही असे मंचाचे मत आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी वादग्रस्त पॉलिसी तक्रारीमध्ये दाखल केलेली नाही परंतु अर्जदाराने सदरील पॉलिसीचा करार हा रक्कम रु.2,00,000/- साठी झालेला असल्याचे तक्रारीमध्ये नमुद केलेले आहे व ही बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी जबाबामध्ये मान्य केलेली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीतील मागणीमध्ये सदरील पॉलिसीच्या तीप्पट लाभाची रक्कम रु.6,00,000/- मागणी केलेली आहे. परंतु त्या संदर्भातील पुरावा मंचासमोर दिलेला नाही. त्यामुळे अर्जदाराची रक्कम रु.6,00,000/- ची मागणी मान्य करता येत नाही. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास पॉलिसी क्र. 983666918 ची रक्कम रु.2,00,000/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार यास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2500/- आदेश तारखेपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेच्या अहवालासाठी ठेवण्यात यावे.