निकाल
दिनांक- 19.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार क्र.1 ते 16 यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी केली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी व त्यांच्या खात्यात जमा असलेली रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, सामनेवाला क्र.1 ते 11 हे क्रांती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, माजलगाव या व्यावसायिक प्रतिष्ठानचे प्रतिनिधीत्व करतात. सामेनवाला क्र.12 हे प्रशासक आहेत. सामनेवाला क्र.4 हे प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. सामनेवाला क्र.7 हे सचिव म्हणून काम पाहतात. सामनेवाला क्र.5 हे प्रतिष्ठानचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. व सामनेवाला क्र.6 हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. सामनेवाला क्र. 8, 9 व 10 हे प्रतिष्ठानचे संचालक म्हणून काम पाहतात.
तक्रारदार क्र.1 ते 16 यांचे सामनेवाला पतसंस्थेमध्ये वैयक्तिक बचत खाते असून त्या खात्यामध्ये तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.11 यांचे मार्फत दैनंदिन ठेव योजनेअंतर्गत सामनेवाला पतसंस्थेमध्ये रक्कमा जमा केलेल्या असून त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
---------------------------------------------------------------------------------------अ.क्र. खातेदाराचे नाव खाते नं. जमा रक्कम रुपये
---------------------------------------------------------------------------------------
1) सोनाजी आश्रुबा राऊत, 25 620/-
2) शांताबाई आत्माराम दराडे 48 7,000/-
3) अशोक रामकिसन धिरडे 79 731/-
4) प्रतिभा प्रतापराव गोलेकर 85 2,950/-
5) सुनिता वचिष्ठ काळे 51 12,350/-
6) वचिष्ठ सुर्यभान काळे 07 12,100/-
7) त्र्यंबक अशोक धिरडे 72 450/-
8) अंगद हनुमानराव गोंडे 02 750/-
9) अंगद कचरु लोखंडे 84 11,450/-
10) मनोहर जनार्धन सवणे 73 2,560/-
11) अलका बबनराव धिरडे 74 6,070/-
12) बाबुराव गोविंदराव वाघमारे 16 1,660/-
13) रंगनाथ शामराव धिरडे 19 810/-
14) सुदामती राधाकिसन सुरवसे 103 1,150/-
15) त्र्यंबक किसनराव कोरडे 45 3,100/-
16) शेख मज्जीद पिता शेख अहेमद, 26 46,125/-
एकूण 1,09,876/-
---------------------------------------------------------------------------------------
तक्रारदार शेख मज्जिद शेख अहेमद यांनी गैरअर्जदार पतसंस्था यांचेकडून खाजगी कारणासाठी पैशांची आवश्यकता असल्यामुळे त्यांचे मुदतठेव खात्यावर रक्कम रु.25,000/- कर्ज सवरुपात घेतलेले आहेत. तरीही मुदतठेवीची मुदत संपल्यानंतर सदर तक्रारदार यांचे कर्जाची रक्कम व त्यावरील वयाजाची रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम मिळण्यास सदर तक्रारदार पात्र आहे.
तक्रारदार क्र.1 ते 16 यांनी सामनेवाला पतसंस्थेमध्ये तपशिलानुसार रक्कमा जमा केलेल्या आहेत. त्या रकमेची तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत रकमेची मागणी केली असता, त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली, व रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांना मानसिक व शारिरिक त्रास झाला. सामनेवाला यांनी ग्राहकास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. सामनेवाला यांची ही कृती बेकायदेशिर आहे.
तक्रारदार यांनी दि.16.06.2011 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठविली व त्यांच्या खाती जमा असलेल्या रकमेची मागणी केली. सामनेवाला यांनी नोटीसीस उत्तर देऊन तक्रारदार यांच्या खात्यात रक्कम जमा असल्याबाबत मान्य केले व ती रक्कम परत देण्यास तयार असल्याबाबत कळवले. तसेच पतसंस्थेवर सहाय्यक निबंधक माजलगाव यांनी सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रशासक नियुक्त केला असल्यामुळे व सदरील रेकॉर्ड प्रशासकाच्या ताब्यात असल्यामुळे खातेदारांच्या ठेवी परत करणे शक्य नसल्याचे कळवले. तक्रारदार यांनी सहा महिने वाट पाहून देखील सामनेवाला यांनी त्यांचे खात्यात जमा असलेली रक्कम दिली नाही. सबब तक्रारदार यांनी त्यांचे खात्यात जमा असलेली रक्कम व्याजासह देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.5,000/- देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला यांनी मंचापूढे हजर होऊन लेखी म्हणणे दिले. तसेच त्यासोबत कागदपत्र दाखल केले. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार हयांचे पतसंस्थेमध्ये खाते असून सदर खात्यावर तक्रारीत दर्शविण्यात आलेल्या रक्कमेमध्ये तफावत आढळली आहे. त्यामुळे सदर खातेदाराचे पासबूक व नित्यनिधी ठेव प्रतिनिधी मार्फत जमा केलेल्या रक्कमांची काऊंटर स्लिप मंचात मागविल्यानंतर तसेच सदरील रक्कमेची शहानिशा केल्यानंतरच उर्वरीत रक्कम खातेदारांना हप्त्याने देणे शक्य होईल. खातेदाराची रक्कमेपैकी रु.25,000/- खातेदाराचया नित्यनिधी ठेव प्रतिनिधी नामे शरद गंगाधर सरवसे यांना संस्थेने सदरील रक्कम नगरी दिलेली आहे. तसेच सामनेवाला क्र.11 यांनी त्याचे आई नामे सौ.सुरवसेबाई या संचालक असल्याने त्यांनी पतसंस्थेचे अभिलेख स्वतःच्या घरी नेले व त्यात फेरफार करुन सदरचे रेकॉर्ड पुन्हा संस्थेत आणून ठेवले. त्यामुळे सामनेवाला क्र.11 यास दि.04.08.2010 ते 22.11.2010 या काळातील त्याने नित्यठेव धारकांकडून जमा केलेल्या रकमा व त्यांना परत केलेल्या रक्कमा संस्थेत जमा केलेल्या रक्कमा बाबत त्याचे ताब्यातील संस्थेचे रेकॉर्ड मंचात हजर करणे आवश्यक होते. नित्यठेव जाम करणेची जबाबदारी, जमा रक्कम पतसंस्थेत जमा करणेची जबाबदारी, नित्यठेव धारकाच्या मागणीवरुन त्यांना परत करण्याची जबाबदारी, उचल केलेल्या रक्कमेचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी, सामनेवाला क्र.11 यांचेवर आहे. सामनेवाला क्र.11 याने जमा केलेल्या रक्कमा पतसंस्थेस भरणा केलेल्या नाहीत. तसेच तपशिलामधील नमुद केलेल्या खातेदारापैकी खाते क्र. 85, 25, 79, 48, 51, 60 84, 74, 16, 19, 45 या खात्यावरील जमा दाखविलेली एकूण रक्कम रु.11,855/- ही खोटी मागणी केली आहे. तसेच 1 ते 15 खातेदाराची उर्वरीत जमा रक्कम संस्था आर्थिक अडचणीत असल्याने व प्रशासकाचा कालावधी संपल्याने नव्याने संस्था सुरु झाल्याने खातेदाराची उर्वरीत रक्कम टप्याटप्याने देणेस तयार आहेत.
सामनेवाला यांचे कथन की, खाते क्र.26 नामे शेख मज्जीद शेख अहेमद यांनी संस्थेमध्ये रु.45,000/- ठेव ठेवली होती. सदरील खातेदाराने त्या ठेवीवर रु.25,000/- संस्थेकडून कर्ज घेतलेले आहे. तसेच दि.18.10.2010 रोजी रु.8,000/- नगदी रोख संस्थेकडून उचललेले आहे. असे एकूण सदर खातेदाराने कर्ज खात्यासह रु.33,000/- नगदी उचललेले आहेत. सदरील खातेदाराची उर्वरीत रक्कम रु.12,000/- देणे संस्थेस मंजूर आहेत. सामनेवाला यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व सोबत दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व सोबत कागदपत्राचे अवलोकन केले. तसेच तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.एन.एम.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.आर.एम.बन यांचा युक्तीवाद ऐकला.
न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी, तक्रारदार यांना सेवा देण्यास
त्रुटी केली आहे, ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केली
आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी केलेली रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय? अंशतः होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 3 ः- तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार क्र.1 ते 16 यांनी सामनेवाला पतसंस्थेमध्ये खाते उघडलेले आहे व त्या खात्यामध्ये रक्कमा जमा केलेल्या आहेत. जमा रकमेच्या पुष्टयर्थ तक्रारदारांनी पतसंस्थेचे खाते उतारे दाखल केलेले आहेत.
सदरील रक्कम व्याजासह परत देण्याची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. केवळ पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे, या कारणास्तव बचत खात्यातील रक्कम खातेदाराला न देण्याची कृती ही सेवेत त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदार यांनी वेळोवेळी त्यांच्या खात्यात असलेली रक्कम मागणी करुनही सामनेवाला यांनी देण्यास टाळाटाळ केली आहे ही बाब सेवेत त्रुटी दर्शविणारी आहे. तसेच तक्रारदार यांना सदरील रक्कम मिळण्यास विलंब झाला, मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे, त्याबददल ही तक्रारदार सामनेवाला यांच्याकडून प्रत्येकी रक्कम रु.500/- मिळण्यास पात्र आहे. व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रु.200/- मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी व मुददा क्र.2 चे उत्तर अंशतः होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) सामनेवाला यांना असे आदेश देण्यात येते की, त्यांनी तपशिलानुसार
तक्रारदार क्र.1 ते 16 यांना त्यांच्या खात्यात जमा असलेली रक्कम
व्याजासह 30 दिवसात द्यावे.
2) सदरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम वसूल
होईपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला यांनी, तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी प्रत्येकी
रक्कम रु.500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.200/- तीस दिवसाचे
आत द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड