निकाल
दिनांक- 19.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार श्री.शरद गंगाधर सुरवसे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी केली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी व त्यांच्या खात्यात जमा असलेली रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, सामनेवाला क्र.1 ते 11 हे क्रांती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, माजलगाव या व्यावसायिक प्रतिष्ठानचे प्रतिनिधीत्व करतात. सामनेवाला क्र.4 हे प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. सामनेवाला क्र.7 हे सचिव म्हणून काम पाहतात. सामनेवाला क्र.5 हे प्रतिष्ठानचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात व सामनेवाला क्र.6, 8, 9 व 10 हे प्रतिष्ठानचे संचालक म्हणून काम पाहतात.
तक्रारदार यांचे सामनेवाला पतसंस्थेमध्ये वैयक्तिक बचत खाते नं.11 असून त्या खात्यामध्ये तक्रारदार यांची रक्कम रु.29,000/- जमा आहेत. तक्रारदार हे सामनेवाला पतसंस्थेचे नित्यठेव प्रतिनिधी (पिग्मी) एजन्ट म्हणून काम पाहत होते. तक्रारदार यांनी अनेक खातेदारांच्या दैनंदिन जमा रकमा सामनेवाला पतसंस्थेमध्ये जमा केलेल्या आहेत. खातेदार यांनी त्यांच्या रकमा काढून घेण्याचा प्रयत्न केला असता सामनेवाला यांनी सदरील रकमा देण्याचे टाळाटाळ केले. त्यामुळे खातेदार यांनी तक्रारदार यांच्याकडे सदरील रकमा मागण्याचा तगादा लावला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत असलेल्या खात्यातून रक्कम परत काढण्यासाठी मागणी केली, परंतू सामनेवाला यांनी ती रक्कम देण्यास टाळाटाळ केली व रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांना मानसिक व शारिरिक त्रास झाला. सामनेवाला यांनी ग्राहकास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. सामनेवाला यांची ही कृती बेकायदेशिर आहे.
तक्रारदार यांनी दि.16.06.2011 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठविली व त्यांच्या खाती जमा असलेल्या रकमेची मागणी केली. सामनेवाला यांनी नोटीसीस उत्तर देऊन तक्रारदार यांच्या खात्यात रक्कम जमा असल्याबाबत मान्य केले व ती रक्कम परत देण्यास तयार असल्याबाबत कळवले. तसेच पतसंस्थेवर सहाय्यक निबंधक माजलगाव यांनी सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रशासक नियुक्त केला असल्यामुळे व सदरील रेकॉर्ड प्रशासकाच्या ताब्यात असल्यामुळे खातेदारांच्या ठेवी परत करणे शक्य नसल्याचे कळवले. तक्रारदार यांनी सहा महिने वाट पाहून देखील सामनेवाला यांनी त्यांचे खात्यात जमा असलेली रक्कम दिली नाही. सबब तक्रारदार यांनी त्यांचे खात्यात जमा असलेली रक्कम रु.29,000/- व्याजासह देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला यांनी मंचापूढे हजर होऊन लेखी म्हणणे दिले. तसेच त्यासोबत कागदपत्र दाखल केले. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार हे पतसंस्थेमध्ये नित्यठेव प्रतिनिधी म्हणून काम करत होते. प्रतिनिधींनी संस्थेकडे त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेची मागणी केली होती, परंतू संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने रक्कम देण्यास अडचण आली. तक्रारदार यांच्या खाती रक्कम रु.29,000/- जमा असल्याबाबत मान्य केले आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार हे सुलाबाई दत्तात्रय बरगुले हीस कर्ज रकमेपोटी जामीनदार आहेत. सदरील महिलेकडून कर्ज येणे बाकी आहे. तक्रारदार यांचे नावे असलेल्या रकमेतून सदरील कर्ज रक्कम वसूल करावयाची आहे. सामनेवाला यांचे कथन की, त्यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व सोबत दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व सोबत कागदपत्राचे अवलोकन केले. तसेच तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.एन.एम.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.आर.एम.बन यांचा युक्तीवाद ऐकला.
न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी, तक्रारदार यांना सेवा देण्यास
त्रुटी केली आहे, ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केली
आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी केलेली रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय? अंशतः होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 3 ः- तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार याने सामनेवाला पतसंस्थेमध्ये खाते नं.11 उघडलेले आहे व त्या खात्यामध्ये रक्कम रु.29,000/- आज मितीस शिल्लक आहे. तक्रारदार हे सामनेवाला पतसंस्थेमध्ये पिग्मी एजन्ट म्हणून काम करत होते ही बाब दोन्ही पक्षकारांनी मान्य केलेली आहे. तसेच तक्रारदार यांच्या खाती असलेली रक्कम देण्याबाबत तयारीही सामनेवाला यांनी दाखवली आहे.
सामनेवाला यांचे कथन की, पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यामुळे रक्कम देण्यास अडचण आली. तसेच तक्रारदार हे सुलाबाई दत्तात्रय बरगुले हीस जामीन राहीले. सदरील सुलाबाई हिने सामनेवाला पतसंस्थेकडून रु.20,000/- चे कर्ज घेतले व अद्याप रु.13,500/- कर्ज वसूल येणे बाकी आहे. सदरील रक्कम तक्रारदाराच्या खात्यातून जमा करुन मिळावी अशी मागणी सामनेवाला यांनी केली आहे. सामनेवाला यांनी सदरील सुलाबाई बरगुले हिने घेतलेल्या कर्जाबाबत कागदपत्र हजर केले आहे, त्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सौ.सुलाबाई दत्तात्रय बरगुले या नावाच्या महिलेने सामनेवाला यांच्या संस्थेकडून रु.20,000/- कर्ज काढलेले आहे, त्या कर्जापोटी सौ.शारदाबाई राधाकिसन रिमन, सौ.शिला कैलास सोळंके, व तक्रारदार सुरवसे शरद गंगाधर हे जामीन राहीलेले आहेत. सदरील कर्ज दिलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता कर्जदाराचा अंगठा कर्ज प्रकरणावर घेतलेला दिसतो, परंतू तो अंगठा कोणाचा आहे याबाबत अंगठा बांधल्याची सही नाही. तसेच काही कागदपत्र हजर केलेले आहे त्यावर ही अंगठा घेतलेला दाखवला आहे परंतू तो अंगठा कर्जदाराचा आहे किंवा काय ? याबाबत अंगठयासमोर कोणाचीही साक्ष घेतलेली नाही. कर्जदार यांचे सर्व अंगठे घेतलेले दर्शविलेले आहेत, परंतू तो अंगठा कर्जदाराचाच आहे याबाबत सविस्तर लिहून कोणाचीही सही घेतलेली नाही. तसेच तीन कोरे कागद हजर केलेले आहे, त्या को-या कागदावर स्टॅम्प लावून अंगठा घेतलेला दिसतो. तसेच दुस-या को-या कागदावर सौ.शारदाबाई या महिलेल्या नावाने सही केलेली आहे व दुस-या को-या कागदावर असलेल्या स्टॅम्पवर शिक्का सोळंके यांची सही दर्शविलेली आहे. सदरील कोरे कागद कशा संदर्भात आहे याचा ही बोध होत नाही. तसेच कर्जदार सुलाबाई बरगुले यांच्या पतीच्या नावे गावी शेतजमीन आहे व त्या शेतजमीनीवर कर्जाचा बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरु करुन शेतजमीनीवर सामनेवाला पतसंस्थेचा रु.20,000/- चा बोजा चढवण्यात आलेला आहे.
वर नमुद केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले असता सदरील कर्जदार याने कर्ज थकवले आहे काय? याबाबत काही निष्पन्न होत नाही. तसेच सामनेवाला यांनी जर खातेदाराचे कर्ज थकवले असेल तर त्याच्या विरुध्द कोणती कारवाई केली, याबाबत ही या मंचापूढे कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच तक्रारदार हे जामीन आहे असे जरी गृहीत धरले तरी, कर्जदाराविरुध्द व तक्रारदाराविरुध्द कर्ज वसूलीसाठी आवश्यक ती कायदेशिर कारवाई करणे सामनेवाले यांना शक्य होते. परंतू सामनेवाला यांनी तसे काही केल्याचे आढळून येत नाही. सबब तक्रारदार यांच्या खाती असलेली रक्कम सामनेवाला यांनी ठेवून घेण्याचे कोणतेही कायदेशिर कारण व प्रयोजन नाही. सबब सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार हे सौ.सुलाबाई दत्तात्रय बरगुले हीस जामीन राहीले व कर्जाची रक्कम तक्रारदार यांच्या खात्यातून जमा करुन मिळावी ही मागणी मान्य करता येत नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांच्या खाती सामनेवाला पतसंस्थेमध्ये रक्कम रु.29,000/- जमा आहे, ही रक्कम तक्रारदार यांना मिळावी म्हणून सामनेवालाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे निदर्शनास येते. तसेच तक्रारदार यांनी, सामनेवाला यांना नोटीस देऊन सदरील रकमेची मागणी केली. सदरील नोटीस तक्रारदार यांनी दाखल केली आहे. त्या नोटीसीस सामनेवाला यांनी उत्तर पाठविले आहे, सदरील उत्तरामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या खात्यात जमा असलेली रक्कम परत करण्याचा मानस आहे असे म्हटले आहे. तसेच पतसंस्थेवर सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती सहा महिन्याच्या कालावधीसाठी केली आहे असे नमुद केले आहे व तक्रारदार यांच्या खाती जमा असलेली रक्कम परत देण्यास शक्य नसल्याबाबत कळवले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेमध्ये बचत खाते उघडलेले आहे व त्यामध्ये रक्कम रु.29,000/- शिल्लक आहे. सदरील रक्कम व्याजासह परत देण्याची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. केवळ पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे, या कारणास्तव बचत खात्यातील रक्कम खातेदाराला न देण्याची कृती ही सेवेत त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदार यांनी वेळोवेळी त्यांच्या खात्यात असलेली रक्कम मागणी करुनही सामनेवाला यांनी देण्यास टाळाटाळ केली आहे ही बाब सेवेत त्रुटी दर्शविणारी आहे. तसेच तक्रारदार यांना सदरील रक्कम मिळण्यास विलंब झाला, मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे, त्याबददल ही तक्रारदार सामनेवाला यांच्याकडून रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांच्या खाती असलेली रक्कम रु.29,000/- निकाल तारखेपासून व्याजासह मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी व मुददा क्र.2 चे उत्तर अंशतः होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) सामनेवाला यांना असे आदेश देण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना
त्यांच्या खात्यात जमा असलेली रक्कम रु.29,000/- व्याजासह 30
दिवसात द्यावे.
2) सदरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम वसूल
होईपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला यांनी, तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम
रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- तीस दिवसाचे आत
द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड