न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे
तक्रारदार हे कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. ते साई कुबेर बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे भागीदार म्हणून कामे पाहत असतात. वि.प. हे बँकींग व्यवसाय करणारी संस्था असून ग्राहक व सभासद यांचेकडून ठेवी स्वीकारणे, कर्ज पुरवठा करणे इत्यादी स्वरुपाची तदनुषंगीक कार्ये व सेवा वि.प. हे मोबदला स्विकारुन देत असतात. प्रस्तुत वि.प. नं. 2 यांचेकडून सौ. अनुश्री सचिन मुळे यांनी शेती कर्ज घेतलेले होते. सदरचे शेती कर्ज हे दि. 3-03-2010 रोजी मंजूर करणेत आले होते. त्याचा तारणगहाण दस्त दि. 15-03-2010 रोजी झालेला आहे. त्याची मुदत 48 महिन्याकरिताची होती. सौ. अनुश्री मुळे यांचे सदर कर्ज प्रकरणावेळी त्यांचे पती सचिन मुळे हे साई कुबेर बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्समध्ये भागीदार म्हणून काम पहात होते. सौ. अनुश्री सचिन मुळे यांचे कर्ज प्रकरणास स्थावर जामीनकीची आवश्यकता निर्माण झालेने त्यांचे पती श्री. सचिन मुळे हे भागीदार असलेल्या फर्मची म्हणजेच साई कुबेर बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांचे मालकीची शहर कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ए वॉर्ड सि.स. नं. 3097 ही मिळकत वि.प. यांचेकडे तारण दिली होती. तथापि दरम्यानचे काळात सदर साई कुबेर बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स या फर्ममधून श्री. सचिन मधुकरराव मुळे हे दि. 1-04-2011 रोजी निवृत्त झाले आणि सदर भागीदारी फर्म पुढे चालू ठेवणेकरिता तक्रारदार यांनी त्यांची मुले श्री. धनराज दिलीप पाटील व श्री. धैर्यशील दिलीप पाटील यांना नवीन भागीदार करुन घेतले त्यांचे भागीदारी करारपत्र दि. 22-07-2011 रोजी झाले आहे. तदनंतर म्हणजेच श्री. सचिन मधुकरराव मुळे यांचे निवृत्तीनंतर सौ. अनुश्री सचिन मुळे यांचे शेती कर्जास जामीनकी दिलेली साई-कुबेर बिल्डर्स अॅड डेव्हलपर्सची मिळकत आजतागायत वि.प. यांचेकडे तारण राहिलेली आहे. तसेच वि.प. यांचेकडून सौ. अनुश्री सचिन मुळे यांनी घेतलेले शेतीकर्ज हे दि. 14-03-2014 रोजी पूर्ण फेड केलेचे तक्रारदार यांना खात्रीलायकपणे समजून आलेले आहे. याबाबत तक्रारदाराने वि.प. यांचेकडून माहिती घेणेचा प्रयत्न केला परंतु वि.प. यांनी माहिती देणेस असमर्थता दर्शविली होती. सबब, तक्रारदाराने दि. 1-04-2014 रोजी वि. प. यांना कळविले होते सदरचे पत्र वि.प. यांना मिळूनदेखील वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर तारण मिळकतीचे तारणमुक्त दस्त करुन देणेस असमर्थता दर्शवली आहे. अशा प्रकारे तक्रारदार यांना वि.प. ने सेवा देणेत अक्षम्य कसूर केलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदार यांनी मे. मंचात दाखल केलेला आहे.
2) तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प. यांचेकडून वादातीत मिळतीचा तारण मुक्त दस्त करुन देणेचे आदेश व्हावेत, वि.प. ने प्रस्तुत कर्ज प्रकरणाचा संपूर्ण कर्ज खाते उतारा याकामी दाखल करणेचे वि.प. ला आदेश व्हावेत, वि.प. यांचे कडून तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडीव्हेट, तक्रारदाराने वि.प. ला पाठविलेली पत्रे प्रस्तुत पत्र आर.पी. ए.डी. ने पाठवलेची पोस्टाची पावती, प्रस्तुत पत्रे वि.प. यांना मिळालेची पोहोचपावती, तक्रारदाराने वि.प. ला लिहून दिलेले तारणगहाण दस्त, तक्रारदार यांचे भागीदारी पत्र, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदार यांनी या कामी दाखल केलेली आहेत.
4) वि.प. यांनी प्रस्तुत कामी म्हणणे/कैफियत, तक्रारदाराने रजिस्टर तारण गहाण खत नं. 1070/10, विकसन करारपत्र, कर्ज मंजुरी पत्रे, गँरंटी डीड, अकौंट स्टेटमेंटस, पॉवर ऑफ अॅटोर्नी, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस व लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे याकामी वि.प. ने दाखल केलेली आहेत.
प्रस्तुत कामी वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि. प. ने तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाहीत.
(ii) तक्रारदार हे वि.प. बँकेचे ग्राहक नाहीत त्यांनी ग्राहक म्हणून वि.प. बँकेत मोबदला म्हणून कोणतीही रक्कम जमा केलेली नाही. तक्रारदाराने वि.प. यांचेकडे कधीही सेवा मागणी केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार नाहीत, मुळातच तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक नसलेने तकारदाराला सदर तक्रार अर्ज दाखल करणेचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे तक्रारदाराने मागणी केलेली सेवा देणेचे बंधन वि.प. यांचेवर नाही.
(iii) या कामी तक्रारदाराने मुळ कर्जदार यांना याकामी विरुध्द पक्षकार म्हणून सामील केलेले नाही त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही.
(iv) मुळ कर्जासाठी तारण मिळकत ही श्री हरी असोसिएटस प्रा. लि, यांनी तारण दिलेली आहे. तक्रारदाराने तारण गहाणखत कधीही करुन दिलेले नव्हते व नाही त्यामुळे तारणमुक्ती लेख करुन मागणेचा अधिकार तक्रारदार यांना कायदयाने येत नाही. वादातीत तारणगहाण खतास तक्रारदाराने फक्त संमत्ती दिलेली आहे व तक्रारदार हे सदर कर्जास जामीनदार आहेत. त्यामुळे सदर मिळकती तारणमुक्त करुन मागणेचा अधिकार तक्रारदार यांना नाही. त्यामुळे तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही.
(v) तक्रारदार हे तारणगहाण मिळकतीचे मालक नसतानाही त्यांनी तारणमुक्त लेख करुन मागितला आहे व मे. कोर्टाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर होणेस पात्र आहे.
(vi) तारण मिळकत ही श्रीहरी असोसिएटस प्रा. लि, यांनी तारण दिली आहे व कर्जदार श्री. सचिन मुळे, श्री. मधुकर मुळे, व अनुश्री मुळे यांनी अन्य कर्जे या वि.प. यांचेकडून घेतलेली आहेत. व ती अद्याप परतफेड झालेली नाहीत व त्याचे हप्ते तक्रारदार भरत आहेत. त्या सर्व कर्जाना वादातीत तारण मिळकत कंटीन्यूईंग सिक्युरिटी म्हणून कर्जदार यांनी तारण दिली आहे व तशी तरतुद कर्ज करारपत्रात आहे. कर्जदाराने त्यांची वि.प. बँकेकडील सर्व कर्जे पुर्ण परतफेड केलेखेरीज तारण मिळकत तारणमुक्त करुन देणेचा प्रश्नच उदभवत नाही. तसेच तक्रारदार हे सदर मिळकतीचे मालक नसलेने तारण मुक्ती लेख करुन मागणेचा तक्रारदाराला अधिकार नाही. सदर मिळकत अन्य कर्जाची परतफेड होईपर्यंत तारणमुक्त न करणेचा अधिकार वि.प. यांना आहे व तो लिन अधिकाराने येतो. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा.
(vii) प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र नाही सदर कर्जाबाबत वाद उत्पन्न झालेस तो लवादामार्फत सोडविणेची व त्याचे अधिकारक्षेत्र मुंबई अशी तरतुद कर्जकरार व तारण गहाण खतात असलेने प्रस्तुत तक्रार या मे. मंचात चालणेस पात्र नाही.
(viii) कर्जदार यांची अन्य कर्जे अद्याप पूर्णपणे परतफेड न झालेने व त्या कर्जास सदर मिळकतीचे मालक हे जामीनदार असलेने या जाबदार यांनी सदर कर्जासाठी तारण असलेल्या मिळकती तारण मुक्त करुन देणेचा प्रश्नच येत नाही. तसेच तक्रारदाराने वाद मिळकती वि.प. बँकेस तारण दिलेल्या नव्हत्या व नाहीत. वाद मिळकत कर्जदार व जामीनदार यांची वैयक्तीक कर्जे व ते अन्य कोणाचेही कर्जास जामीन असतील अशा सर्व कर्जास सदर तारण मिळकतीवरही बोजा राहणेचा आहे अशी तरतुद सदर तारण गहाणखतात केली आहे. कर्जदार यांचे पती सहकर्जदार सचिन मुळे यांचे नावे अद्यापही कर्जे असलेने सदर मिळकत वि.प. यांना तारणमुक्त करुन देता येणार नाही. त्यामुळे वि.प. ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराला सदोष सेवा दिली असे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदाराला नुकसानभरपाई मागणेचा कोणताही हक्क नाही. तक्रारदाराने कारण नसताना वि.प. विरुध्द विनाकारण तक्रार अर्ज दाखल करुन वि.प. यांना खर्चात पाडलेने तक्रारदार यांना रक्कम रु. 50,000/- दंड करणेत यावा.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. ने तक्रारदाराचे तक्रार अर्जावर नोंदवलेले आहेत.
6) वर नमूद तकारदार व वि. प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | नाही |
2 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून तारणमुक्त लेख करुन मिळणेस पात्र आहेत काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न -
मुद्दा क्र. 1 व 2 -
7) वर नमूद मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. कारण प्रस्तुत तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक नाहीत कारण ज्या वादातीत मिळकतीचे तारण गहाणखत आहे. प्रस्तुत तारण गहाणखत हे तक्रारदार यांनी करुन दिलेले नाही. तसेच वादातीत मिळकत ही तक्रारदाराचे मालकीची नाही. तक्रारदार यांनी फक्त तारणगहाण खत करणेसाठी संमती दिलेली आहे. प्रस्तुत तारणगहाणखत हे श्री हरी असोसिएटस प्रा. लि, तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सचिन मधुकर मुळे यांनी करुन दिले आहे. तसेच वादातीत तारणगहाण दिले मिळकतीचे मालमत्ता पत्रकावर मालक सदरी श्री हरी असोसिएटस तर्फे श्री. सारंग विश्वासराव जगताप यांचे नाव आहे. म्हणजेच सदर मिळकतीशी श्री साई कुबेर डेव्हलपर्स यांचा तसेच तक्रारदाराचा कोणताही संबंध नाही असे दाखल सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. ही बाब तक्रारदाराने वि.प. यांना पाठवलेले पत्र व त्यातील मजकूरावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार यांना तारणमुक्त लेख मागणेचा कोणताही अधिकार नाही असे मे. मंचाचे स्पष्ट आहे. तसेच स्वत: तक्रारदार किंवा साई कुबेर डेव्हलपर्स व वि.प. बँक यांचे दरम्यान कोणताही व्यवहार झालेला नाही. सबब, वरील सर्व कारणास्तव तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक होत नाहीत. त्यामुळे सदर तक्रारदार यांना वि.प. यांचे कडून तारणमुक्त लेख मागणेचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे वि.प. यांनी तक्रारदाराला तारणमुक्त लेख करुन देणेचा व सदोष सेवा पुरविणेचा प्रश्नच उदभवत नाही. सबब, तक्रारदार हे तारणमुक्त लेख करुन मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
वरील सर्व कारणमिमांसा विचारात घेता तक्रारदार वि.प. चे ग्राहक नसलेने तक्रारदाराचा तक्रार अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणे न्यायोचित होणार आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.