निकाल
(घोषित दि. 01.09.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार यांचे मयत वडीलांनी दि.22.10.2014 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्या जालना शाखेमार्फत शेती कामाकरीता ट्रॅक्टर घेण्याकरता वाहन कर्ज रु.5,77,843/- घेतले. त्यानंतर तक्रारदार यांच्या वडीलांचा मृत्यू दि.23.03.2015 रोजी झाला. तक्रारदार यांच्या वडीलांनी गैरअर्जदार यांच्याकडून वाहनकर्ज घेतल्यानंतर ट्रॅक्टरचा विमा गैरअर्जदार क्र.2 यांच्या मार्फत काढला. गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार यांच्या वडीलांकडून विमा हप्त्यापोटी रक्कम रु.11,686/- दि.07.10.2014 रोजी वसूल केले सदर विमा दि.07.10.2014 ते 06.10.2014 या कालावधीसाठी उतरविला होता. तक्रारदार यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याने गैरअर्जदार यांच्याकडे ट्रॅक्टरच्या विमा पॉलीसीचा मूळ कागद, विमा रकमेच्या मागणी करण्याकरता मागितला, परंतू गैरअर्जदार क्र.1 यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदार याने त्यांचे वकीलामार्फत दि.03.12.2015 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना कायदेशीर नोटीस पाठविली, परंतू गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर नोटीस स्विकारलेली नाही. तक्रारदार याने आर.टी.ओ. कार्यालय जालना यांचेकडून काही माहिती मिळवली, त्याआधारे असे समजले की, गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार याच्या वडीलांच्या मृत्यूनंतर संबंधित वाहनाची पासींग केलेली आहे व विमा पॉलीसी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून काढलेली आहे.सदर विम्याचा कालावधी दि.07.04.2015 ते 06.04.2016 असा आहे. तक्रारदाराने वाहन कर्जाचा हप्ता रु.64,000/- दि.22 जुलै 2015 व 08 जुलै 2015 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे जमा केला आहे. तक्रारदार याच्या वडीलांचा मृत्यू दि.23.03.2015 रोजी झाला त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांनी वाहन कर्जाची शिल्लक राहीलेली रक्कम गैरअर्जदार क्र.1 यांना द्यावी. व गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून तक्रारदार यास बेबाक प्रमाणपत्र देण्यात यावे याकरता ही तक्रार केलेली आहे. तक्रारदाराची अशी विनंती आहे की, त्याचा तक्रार अर्ज खर्चासह मंजूर करावा.
गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस मिळूनही गैरहजर राहीले त्यामुळे त्यांच्या विरुध्दचे प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश झाला.
गैरअर्जदार क्र.2 वकीलामार्फत हजर झाले. त्यांनी लेखी जबाब दाखल केला. त्यांनी तक्रारदार यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तक्रारदाराचा तक्रार अर्ज सूडबुध्दीने केलेला आहे त्यामुळे तो गैरअर्जदार यांना मान्य नाही. तक्रारदार याने प्रत्यक्ष वस्तुस्थिती व घडलेल्या घटना योग्य रितीने ग्राहक मंचासमोर मांडलेल्या नाहीत. त्याने महत्वाच्या गोष्टी ग्राहक मंचापासून लपविलेल्या आहेत. तक्रारदार यांच्या वडीलानी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून ट्रॅक्टर करता कर्ज घेतले त्याची किंमत रु.5,77,843/- होती. तक्रारदार याचे मयत वडीलांनी सदर ट्रॅक्टरचा विमा गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून काढला. तक्रारदार याचा विमा उतरविण्याचा फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरलेला आहे. त्या फॉर्मनुसार त्याल कव्हर नोट देण्यात आलेली आहे. सदर विम्याचा कालावधी 13 ऑक्टोबर 2014 ते 12 ऑक्टोबर 2015 आहे. विमा पॉलीसीच्या भाग 3 मध्ये विमा पॉलीसीच्या अटी, शर्ती व अपवाद यांचा उल्लेख केलेला आहे. सदर अटी व शर्ती वाचल्यानंतर असे निष्पन्न होते की, सकृतदर्शनी विमा धारकाचा मृत्यू जर सदर ट्रॅक्टर ड्रायव्हिंग करताना किंवा ट्रॅक्टरवरुन प्रवास करताना झालेला नसेल तर पॉलीसीच्यामुळे तक्रारदार यास फायदा मिळू शकत नाही. तक्रारदाराचे कोणतेही नुकसान झालेले नाही, त्याला मानसिक त्रास झालेला नाही किंवा दुःख ही झालेले नाही. गैरअर्जदार क्र.2 यांचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार क्र.2 यांनी केलेली आहे.
तक्रारदारयांनी तक्रार अर्जासोबत जोडलेल्या यादीप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांच्या नक्कला मंचाच्या अवलोकनार्थ जोडलेल्या आहेत. गैरअर्जदार क्र.2 यांनी मंचाच्या अवलोकनार्थ त्यांच्या यादीत दिल्याप्रमाणे कागदपत्रांच्या नक्कला सादर केल्या आहेत.
आम्ही तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार यांचा लेखी जबाब काळजीपूर्वक वाचला. तक्रारदार व गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक वाचन केले, त्याचप्रमाणे दोन्ही बाजुंच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार यांचे मयत वडीलांनी त्यांच्या हयातीत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून कर्ज प्रकरणावर एक ट्रॅक्टर शेतीच्या कामाकरता विकत घेतला. त्याचवेळी सदर ट्रॅक्टर करीता गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून विमा घेतला. ट्रॅक्टरकरता घेतलेल्या कर्जाची तारीख 22.10.2014 आहे. वाहन कर्जाची रक्कम रु.5,77,843/- आहे. तक्रारदार यांच्या वडीलांनी विमा हप्त्यापोटी दि.07.10.2014 रोजी रु.11,686/- विमा हप्ता भरलेला आहे, सदर विम्याचा कालावधी एक वर्षा करता होता. दरम्यान दि.23.03.2015 रोजी तक्रारदार यांच्या वडीलाचा मृत्यू झाला त्यामुळे तक्रारदार याने ट्रॅक्टरच्या विम्याची रक्कम कंपनीस देण्यात यावी व त्याला बेबाकी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या विरुध्द केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे विरुध्दचे प्रकरण एकतर्फा झालेले आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांनी वकीलामार्फत हजर होऊन त्यांचे म्हणणे सादर केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यांचे मयत वडीलांनी कर्जावर विकत घेतलेल्या ट्रॅक्टरचा विमा गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून घेतला होता परंतू सदर विमा पॉलीसीच्या काही अटी व शर्तीच्या अधीन राहून जर तक्रारदार यांचा विमा दावा योग्य असेल तरच त्याला सदर विम्याचा लाभ मिळू शकतो. गैरअर्जदार यांनी ग्राहक मंचाच्या अवलोकनार्थ विमा पॉलीसीच्या अटी व शर्ती काय आहेत? हे दाखविण्याकरता अटी व शर्तीच्या कागदाची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. सदर अटी व शर्तीची नक्कल EXHIBIT-C च्या पान क्रमांक 11 वर सेक्शन III मध्ये आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघाताकरता वाहनाच्या मालकाकरता विम्याच्या लाभाबाबत अट दिलेली आहे, त्याचे सविस्तर वाचन केल्यानंतर असे दिसून येते की, ज्या व्यक्तीच्या नावे सदर ट्रॅक्टरचा विमा आहे, तो सदर ट्रॅक्टर चालवित असताना जर अपघात झाला व त्या अपघातात जिवीत हानी अथवा वित्तहानी झाली तरच त्याचे भरपाई संबंधात हे नियम लागू आहेत. आमच्या पुढे चर्चेत असलेल्या प्रकरणात तक्रारदार यांचे वडील हेडगेवार हॉस्पीटल औरंगाबाद येथे मरण पावलेले आहे, परंतू कोणत्या विकारामुळे त्यांना दवाखान्यात उपचाराकरता दाखल व्हावे लागले व त्यांच्या मृत्यू करीता कोणते कारण उदभवले, याचा तक्रार अर्जात अथवा सादर केलेल्या कागदपत्रात कोठेही उल्लेख नाही. जर तक्रारदार याच्या वडीलाचा मृत्यू नैसर्गिक किंवा वृध्दापकाळाने झाला असेल, किंवा ट्रॅक्टरच्या अपघाताने झालेला नसेल तर, तक्रारदार यांच्या वडीलाच्या मृत्यूनंतर विम्याची नुकसान भरपाई मागता येणार नाही.
तक्रारदार याने त्याचे तक्रार अर्जात असाही आरोप केला आहे की, ट्रॅक्टरच्या विमा छत्राच्या तारखा कव्हर नोटमध्ये व इतर संबंधित कागदामध्ये वेगवेगळया आहेत. आमच्या मताने जरी विमा छत्राच्या उपलब्धतेबाबत तारखेचा घोटाळा असेल तरीही, ज्या कारणावरुन तक्रारदार यांचा विमा दावा फेटाळला ते कारण बदलत नाही. जर कर्जावर विकत घेतलेल्या ट्रॅक्टरच्याद्वारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरितीने तक्रारदार यांच्या वडीलाचा मृत्यू झाला असता तरच तक्रारदार हा विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनंतर अधीन राहून विमा नुकसान भरपाईचा लाभ
मिळण्यास पात्र ठरला असता. अशा परिस्थितीत विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा दावा फेटाळला यामध्ये सेवेत कोणतीही त्रुटी नाही त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना