आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, ती मृतक श्री. रामदास उर्फ रामु खेमराज मोहतुरे यांची विधवा पत्नी आहे. मृतक श्री. रामदास हे शेतकरी होते व त्यांच्या सामुहिक मालकीची शेती मौजा धोप, ता. मोहाडी, जिल्हा भंडारा येथे प.ह. नंबर 7, भुमापन क्रमांक 216, आराजी 2.22 हे. आर होती. दिनांक 01/02/2007 ला अंदाजे 4.30 वाजता श्री. रामदास मोहतुरे हे आपल्या हिरोहोंडा मोटारसायकल क्रमांकः एमएच-36/बी-3846 ने खापा कडून धोप कडे जात असतांना प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीपगाडी क्रमांकः एमएच-36/8184 ने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने श्री. रामदास मोहतुरे यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. पोलीस स्टेशनमध्ये घटनेचा रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस स्टेशन, आंधळगाव यांनी आरोपीविरूध्द अपराध क्रमांक 8/07 भा. दं. वि. चे कलम 279, 337, 304 (अ) व मोटार वाहन कायद्याचे कलम 184 अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली. मृतकाच्या मृत्युपश्चात त्यास पत्नी व 2 मुले वारस आहेत.
3. पतीच्या अपघाती मृत्युनंतर तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा मिळण्यासाठी विमा दावा प्रपत्र आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 28/03/2007 ला विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर केले. विरूध्द पक्ष 3 यांनी विरूध्द पक्ष 1 यांना दिनांक 11/04/2007 ला विमा दाव्याची रक्कम मंजूर करण्याकरिता पत्र पाठविले. त्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांनी विरूध्द पक्ष्ा 3 यांना पत्र पाठवून वयाचा दाखला, मृत्यु प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, वाहन चालविण्याचा परवाना व आर. सी. बुकची मागणी केली. तक्रारकर्तीने संपूर्ण दस्त विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे जमा केले व विरूध्द पक्ष 3 यांनी दिनांक 07/04/2008 च्या पत्रान्वये संपूर्ण कागदपत्रे विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे सादर केली. विरूध्द पक्ष 1 यांना परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होऊन देखील त्यांनी तक्रारकर्तीच्या विमा दाव्याबाबत एक महिन्याच्या कालावधीत निर्णय घेतला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केलेली आहे.
4. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये विमा रक्कम रू. 1,00,000/- व्याजासह मिळावे तसेच शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केलेली आहे. आपल्या कथनाच्या पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने दस्तऐवजांच्या यादीप्रमाणे अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 8 ते 40 अन्वये दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
5. मंचाची नोटीस विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल केलेले आहे. विरूध्द पक्ष 1 चे म्हणणे आहे की, मयत रामदास/रामु मोहतुरे, गाव धोप, जिल्हा भंडारा यांचा अपघात दिनांक 01/02/2007 रोजी झाला व सदरील प्रस्ताव हा त्यांच्या कार्यालयास दिनांक 24/04/2007 रोजी प्राप्त झाला. सदरील दावा हा विमा कंपनीकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आला. विमा कंपनीने सदरील प्रस्ताव नामंजूर केला व त्याबाबत अर्जदारास दिनांक 31/12/2010 च्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी उत्तरासोबत पृष्ठ क्रमांक 53 ते 59 प्रमाणे दस्तऐवज दाखल केले आहेत.
6. विरूध्द पक्ष क्र. 2 चे म्हणणे आहे की, मृतकाचा अपघात हा त्याच्याच चुकीमुळे झालेला आहे. तक्रारकर्तीची तक्रार मुदतीमध्ये नाही त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी. तक्रारकर्तीने विमा प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे पाठविली नाहीत, त्यामुळे दाव्याबाबत निर्णय घेता आला नाही. यामागे विमा कंपनीचा कोणताही निष्काळजीपणा नाही तसेच तक्रारकर्तीस त्रास द्यावा हा उद्देश देखील नाही.
7. विरूध्द पक्ष क्र. 3 यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कार्यालयाने तक्रारकर्तीला योजनेनुसार लाभ मिळण्याबाबत आवश्यक कार्यवाही केलेली आहे. त्यांच्या स्तरावरून कोणताही विलंब तथा दुर्लक्ष झालेले नाही. त्यामुळे त्यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे. विरूध्द पक्ष 3 यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, विमा कंपनीच्या दिनांक 24/04/2007 चे पत्रानुसार सदर प्रस्ताव, वयाचा दाखला, मृत्युचे प्रमाणपत्र, ड्रायव्हींग लायसेन्स व आर.सी. बुक सादर करण्यास्तव प्रकरण या कार्यालयास परत करण्यात आले. सदर त्रुटींची पूर्तता करून ते या कार्यालयाचे पत्र क्रमांकः कलि/संकीर्ण/3/कावि/370/दिनांक 07/04/2008 अन्वये मंजुरीकरिता पुन्हा सादर करण्यात आले व यासंदर्भात अर्जदारास सुध्दा या कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे पृष्ठ क्रमांक 65 ते 103 प्रमाणे दस्त दाखल केलेले आहेत.
8. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, तक्रारकर्तीच्या वकिलांचा युक्तिवाद, विरूध्द पक्ष 2 यांचा लेखी युक्तिवाद यावरून मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय?
-ः कारणमिमांसा ः-
9. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार दाखल करते वेळेस विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला होता व तो अर्ज मंचाने दिनांक 14/03/2011 रोजी मंजूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे.
10. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु झाला तसेच तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत ते लाभार्थी होते याबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा फक्त काही आवश्यक कागदपत्रे विरूध्द पक्ष 2 यांना प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्ताव नामंजूर केला एवढाच आहे.
11. विरूध्द पक्ष 2 चे म्हणणे आहे की, विमा प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केला व तसे अर्जदारास दिनांक 31/12/2010 च्या पत्रानुसार कळविले आहे. परंतु दिनांक 31/12/2010 चे पत्र तक्रारकर्तीने अथवा विरूध्द पक्ष 2 यांनी दाखल केलेले नाही. विरूध्द पक्ष 2 यांनी पृष्ठ क्रमांक 59 वर दिनांक 16 जून 2008 चे पत्र दाखल केलेले आहे, ज्यामध्ये ड्रायव्हींग लायसन्स नसल्यामुळे दावा, “No Claim” म्हणून treat करण्यात येतो असे नमूद केले आहे. सदर पत्रामध्ये “cc to Bhandara Consumer Forum along with proof of Tahsil letter (Xerox copy) for information” असे नमूद केलेले आहे. परंतु विरूध्द पक्ष 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांनी त्यांच्या लेखी उत्तरामध्ये अशाप्रकारचे कोणतेही पत्र पाठविले याबाबत कुठेही नमूद केलेले नाही.
12. विरूध्द पक्ष 2 चे म्हणणे आहे की, त्यांना आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाली नाहीत. परंतु आवश्यक कागदपत्रांमध्ये नक्की कोणती कागदपत्रे त्यांना विमा दावा प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यास्तव आवश्यक होती याबाबत काहीही उल्लेख केलेला नाही. तर विरूध्द पक्ष 3 च्या मते त्यांनी विरूध्द पक्ष 2 च्या त्रुटींची पूर्तता करून विरूध्द पक्ष 2 कडे दिनांक 07/04/2008 रोजीच पाठविलेली आहेत. विरूध्द पक्ष 3 यांनी दावा अर्ज चेकलिस्ट दाखल केलेली आहे, ज्यावर दिनांक 24/04/2007 ही तारीख नमूद आहे व कॉलम 15 मध्ये ड्रायव्हींग लायसेन्स व आर. सी. बुक कॉपी अटॅस्टेड असे नमूद केलेले आहे. तक्रारकर्तीच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेची सुधारित प्रत दाखल केलेली आहे, ज्यामध्ये अनुक्रमांक 23 (इ) (8) - "जर शेतक-याचा मृत्यु वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वाहन चालविण्याचा परवाना (Valid Driving License) सादर करणे आवश्यक राहील. वरील सुधारणा सदर योजना राज्यात सन 2008-09 करिता कार्यान्वित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहतील" असे नमूद करण्यात आले आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा वाहन अपघातामध्ये दिनांक 01/02/2007 रोजी झालेला असल्यामुळे वरील सुधारणा सदर प्रकरणामध्ये लागू पडणार नाही असे मंचाचे मत आहे.
13. तक्रारकर्तीच्या वकिलांनी माननीय राज्य आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांच्या 2008 (2) ALL MR (JOURNAL) 13 – ICICI Lombard General Insurance Co. Ltd. Vs. Smt. Sindhubhai Khanderao Khairnar या निकालाचा आधार घेतलेला आहे. विरूध्द पक्ष 2 यांना विरूध्द पक्ष 1 व 3 यांच्यामार्फत तक्रारकर्तीचा परिपूर्ण विमा प्रस्ताव प्राप्त होऊन देखील काही कागदपत्रे दाखल केली नाही या कारणास्तव विमा दावा प्रस्तावाबाबत काहीही निर्णय न घेणे ही विरूध्द पक्ष 2 यांची कृती ही निश्चितच त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. करिता त्यांच्याविरूध्द तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र असून विरूध्द पक्ष 1 व 3 यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता आदेश.
आदेश
तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेची रक्कम रू. 1,00,000/- ही द.सा.द.शे. 9% व्याजासह अदा करावी. व्याजाची आकारणी दिनांक 01/02/2007 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत करण्यात यावी.
2. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी प्रस्तुत तक्रारीच्या खर्चाबद्दल तक्रारकर्तीला रू. 2,000/- द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 3 यांची सेवेतील कोणतीही त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द तक्रारकर्तीची प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात येते.
4. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.