नि का ल प त्र :- (दि. 31/08/2013) (द्वारा- श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतची तक्रार दि. 31-03-2012 रोजी दाखल होऊन दिनांक 02-04-2012 रोजी स्विकृत करुन वि.पक्ष यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.पक्ष यांना नोटीस लागू होऊन सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. युक्तीवादाचे वेळेस तक्रारदार व वि.पक्ष यांचेतर्फे वकील हजर. तक्रारदार व वि.पक्ष यांचे वकिलांचा तोंडी युक्तीवाद ऐकणेत आला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-
तक्रारदार यांचा ट्रक व्यवसाय भाडयाने देणेचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या व्यवसायाकरिता वि. प. यांचेशी चर्चा करुन ट्रक वाहनाचा चेसीस नं. एमबी 1 सीटीडीवायसी 1 बीपीएए 7633, इंजिन नं. एबीपी 105965 वाहनाचा रजिस्टर नं.एमएच-09-सीए 17, टस्कर सुपर 2516 हा ट्रक खरेदी करणेचे निश्चित केले. त्याप्रमाणे वि. पक्ष यांनी अर्थपुरवठा करणेचे मान्य करुन तक्रारदार व वि.पक्ष यांचेमध्ये लेखी करार होवून तक्रारदार यांना ट्रकसाठी एकूण रक्कम रु. 14,30,000/- चा अर्थपुरवठा करणेचे निश्चित केले. कर्जाची मुदत दि. 16-06-2011 ते 02-05-2015 असा होता. सदर कर्जासाठी दरमहाचा ईएमआय रक्कम रु. 42,500/- असा होता. आतापर्यंत तक्रारदारांनी एकूण रक्कम रु. 3,13,250/- हप्त्याची रक्कम फेड केलेली आहे, व अद्यापी मुदती अखेर जमा करावयाची रक्कम रु. 13,00,000/- इतकी बाकी रक्कम आहे. तक्रारदार यांना त्यांचे आर्थिक अडचणीमुळे अलिकडील 3 हप्ते वि. पक्ष कंपनीकडे जमा करुन शकलेले नाहीत. तक्रारदार यांना वि.पक्ष यांनी अचानकपणे दि. 20-03-2012 रोजी रक्कम रु. 1,70,000/- व दि. 5-06-2012 रोजी रक्कम रु. 17,36,391/- इतक्या रक्कमेची डिमांड नोटीस पाठवून तक्रारदारांचा ट्रक वाहन जप्त करणेची धमकी दिली. त्यांनतर तक्रारदारांनी रक्कम रु. 45,000/- जमा करुन भरुन घेणेबाबत विनंती केली असता वि.प. कंपनीचे अधिका-यांनी सर्व एकरक्कमी रक्कम रु. 1,70,000/- ची मागणी केली व वाहन जप्त करणार अशी भाषा केली. सबब, वि.प. कंपनीने तक्रारदाराच्या खात्यावर लावलेला दंड व्याज कमी होवून हप्त्याची रक्कम जमा करुन घेणेबाबत आदेश व्हावा व खाते उतारा अॅग्रीमेंटची प्रत मिळावी. व तक्रार अर्जाचा नुकसानभरपाई म्हणून वि.प. कडून रक्कम रु. 20,000/- वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदारांनी तक्रारीत केली आहे.
(3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ कर्जाचा खाते उतारा, डिमांड नोटीस दि. 20-03-2012, वि.पक्ष कंपनीत जमा केलेली रक्कमेची पावती दि. 22-03-2012 इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. व तक्रारीसह शपथपत्र दाखल केलेले आहे.
(4) वि.पक्ष बँक यांनी म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदार यांना वि.पक्ष बँक यांनी कर्जपुरवठा केलेला आहे. तक्रारदार हे वि.पक्ष यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत. त्यामुळे तक्रारदारांना नुकसानीची मागणी करता येणार नाही. तक्रारीस “वॉंन्ट ऑफ कॉज ऑफ अॅक्शन” या तत्वानुसार तक्रार नामंजूर करणेत यावी. वि.पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदारांचा ईएमआय हप्ता रक्कम रु. 42,800/- इतका असून सदर कर्जाचा कालावधी 48 महिन्याचा होता. तक्रारदारांकडून अद्यापी कर्ज रक्कम रु. 17,37,153/- इतकी येणे बाकी आहे व व्याज येणे आहे. तक्रारदार हे ट्रक भाडयाने देत असल्यामुळे सदर तक्रारीस व्यापारी उद्देशाचा बाध येत असल्यामुळे तक्रार या मंचात चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार हे थकबाकीदार आहेत. तक्रारदारांना वि.प. बँकेने अनेक नोटीसा पाठविल्या असून वर सिक्युरिटायझेशन अॅक्टखाली कार्यवाही चालू केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार खोटी आहे. बँकेने तक्रारदारास कधीही धमकी दिलेली नसून कायदेशीर कारवाई केलेली आहे. तक्रारदार हे रक्कम रु. 45,000/- घेऊन आलेले नाही. तक्रारदार रक्कम भरण्यास खोटे आश्वासन देतो ते त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागले नाहीत. बँकेने कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येवून तक्रारदरांवर रक्कम रु. 50,000/- दंड बसविणेत यावा अशी विनंती वि.पक्ष यांनी त्यांचे म्हणण्यात केली आहे.
(5) तक्रारदारांची तक्रार अर्ज, तक्रारदारांनी दाखल कागदपत्रे, वि. पक्ष यांनी तक्रार अर्जास दिलेले लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षकारांच्या वकिलांचा विस्तृत तोंडी व लेखी युक्तीवाद विचारात घेता सदर कामी तक्रारदार हे वि.पक्षकार यांचे ग्राहक होतात का ? हा मुद्दा प्रथम विचारात घेणे आवश्यक आहे त्यास अनुसरुन या मंचाचे विवेचन खालीलप्रमाणे :-
प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार हे त्यांचे मुळ तक्रार अर्जात तक्रारदार यांचा धंदा – ट्रक व्यवसाय तक्रारीत नमूद केले आहे. त्याचप्रमाणे तक्रार अर्ज सरनामेत तक्रारदार हे ट्रक व्यवसाय भाडयाने देणेचा व्यवसाय करतात. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांचा व्यवसाय हा ट्रक भाडयाने देणेचा व्यवसाय आहे. व तक्रारदार हे सदर ट्रक व्यवसायातून नफा कमविण्याचा उद्देश स्पष्ट होतो. तक्रारदारांनी वि.पक्ष यांचेकडून अर्थसहाय घेऊन ट्रक खरेदी करुन तो ट्रक हा व्यापारी हेतूने (Commercial Purpose ) घेतलेचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक सरंक्षण कायदा,1986 कलम 2(1)(d) (i) नुसार “ ग्राहक ” या व्याख्येत बसत नाहीत. म्हणून तक्रार अर्ज या मंचात चालणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारांनी त्यांचे इच्छेनुसार योग्य त्या न्यायालयात आपली दाद मागावी. तसेच हे मंच पुढे असे विदीत करीत आहे की, सदर प्रकरणासाठी व्यतीत झालेला कालावधी मुदत माफीसाठी ग्राहय धरण्यात यावा.
(6) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराच्या व्यापारी उद्देशामुळे ते वि.पक्षकारांचे ग्राहक ठरत नसल्याचे सिध्द झाल्याने प्रस्तुत प्रकरणी उपस्थित करण्यात आलेल्या अन्य मुद्दयाबाबत विचार या निकालपत्रात करणेत आलेला नाही. सबब आदेश खालीलप्रमाणे.
- आ दे श -
1. तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. उभय पक्षकारांना निकालपत्राच्या प्रमाणित प्रती विनामुल्य पाठविण्यात याव्यात.