ग्राहक तक्रार क्र. 120/2013
अर्ज दाखल तारीख : 13/08/2013
अर्ज निकाल तारीख: 31/01/2015
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 19 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. विश्वनाथ गुरुपादय्या स्वामी,
वय-70 वर्षे, धंदा – निवृत्तीवेतनधारक व शेती,
रा.येणेगुर, ता. उमरगा, जि. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
इंडस इंड बँक (कंझुमर फायनान्स डिव्हीजन)
दमाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स, शॉप क्र. जी.11,
दक्षिण कसबा, लक्ष्मी मार्केट रोड, दत्त चौक, सोलापूर -413007
2. शाखा व्यवस्थापक,
इंडस इंड बँक (कंझयूमर फायनान्स डिव्हीजन)
औरंगाबाद रोड, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.डी.पी.वडगावकर.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.पी.एम.जोशी.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : एकतर्फा.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम. व्ही. कुलकर्णी यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी मधील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारकर्ता (तक) निवृत्तीवेतनधारक व शेतकरी असून विरुध्द पक्षकार (विप) हे वित्त पुरवठा करणारी संस्था आहे. तक्रारदार यांना गरज पडल्यामुळे त्यांनी इंडिका कार घेण्यासाठी विप यांना संपर्क साधला असता विप क्र.1 यांनी रु.2,55,000/- 10.75 टक्के व्याजदराने वित्त पुरवठा केला जे 35 हप्त्यामध्ये फेडायचे होते अशा प्रकारचे लोन अॅग्रीमेंट करुन घेतले व सदर रकमेमध्ये तक्रारदाराने आपली रक्कम जमा करुन दि.26/02/2010 रोजी इंडीका कार खरेदी केली. सदर करारानुसार तक्रारदाराने विप यांना वित्तपुरवठा परत केलेला आहे व तक्रारदार यांच्या कारची मुळ कागदपत्रे आर.सी. बुक व गाडीची दुसरी चावी आजून तक्रारदार यास दिलेली नाही. विप यांनी सदर कर्जाची काही बाकी असल्याचे तक्रादार यांना कळविलेले नाही. विप यांनी विम्यासाठी म्हणुन रु.24,000/- एवढी रक्कम वाहनासाठी दिलेल्या वित्त पुरवठयात समाविष्ट केलेली आहे. वास्तविक तक्रारदाराच्या वाहनाचा विमा मुळ वाहन विक्रेत्यानीच काढलेला आहे. सदर विमा मुदतीनंतर तक्रारदाराने पुढील विमा उतरविलेला आहे. विप यांनी विम्यापोटी रु.4832/- एवढी रक्कम नावे टाकली आहे व पावतीही दिलेली नाही. तक्रारदाराने स्वत: काढलेल्या विम्याची रक्कम रु.7660/- अशी होते. तेव्हा वर नमूद रक्कम कशाची आहे हे नेमके कळत नाही. म्हणून विप यांनी सेवेत त्रुटी केली असून विप कडून तक्रारदास मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, प्रस्तुत तक्रारीचा खर्च रु.10,000/- तसेच विप क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडुन विम्यापोटी स्विकारलेली रक्कम रु.24,000/- व न उतरविलेल्या विम्याची रक्कम रु.4832/- तसेच वरील सर्व रकमेवर द.सा.द.शे.18 व्याज दयावे अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत कर्जखात्याचा खातेउतारा, बाफना मोटर्स यांचे विम्याबाबतचे पत्र, आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड विमा कंपनीची विमा पॉलिसी, युनायटेड इंडियाची विमा पॉलीसी, विपकडील तक्रारदाराचा खातेउतारा, ग्राहक पंचायतीत दिलेले तक्रार अर्ज व त्यांनी तक्रारदारास दिलेले पत्र ई. कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.07/10/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे
तक्रारदार व विप क्र.1 यांच्यात झालेला करार हा मा. मंचाचे अधिकार क्षेत्रामध्ये झालेला नाही तसेच विप क्र.2 ही विप क्र.1 यांची शाखा आहे. परंतु त्यांना चारचाकी वाहनाकरीता वित्तीय पुरवठा करण्याचे प्रशासकीय अधिकार नाहीत. विप क्र.2 चा व्यवसाय हा फक्त दुचाकी पुरताच मर्यादीत असल्याने त्यांच्याकडे वाहनाकरीता वित्तीय पुरवठा करण्याचे प्रशासकिय अधिकार नाहीत. म्हणुन विप क्र.2 चा सदर व्यवहाराशी काहीही संबंध नाही. सदर प्रकरणातील क्लिष्टता पाहता सदर प्रकरण दिवाणी न्यायालयाकडे वर्ग होणे न्याय व योग्य आहे. विपकडे सदर वाहनाची दुसरी चावी व वाहनाची कागदपत्रे नव्हती व नाहीत. वास्तविक पाहता विप यांच्या वित्तीय पुरवठयाची नोंद वाहनाच्या आर.सी.बुकला झाल्यामुळे तक्रारदार यांनी वाहनाचे सर्व मुळ कागदपत्रे विप क्र.1 यांनी ठेवून घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही. विमा कंपनीच्या वाहनाच्या प्रिमीयमच्या रकमेच्या दरामध्ये वाढ झालेली असल्यामुळे तक्रारदार यांच्या वाहनाच्या विमा रकमेच्या फरकाची रक्कम रु.4,832/- विप क्र.1 यांनी कर्ज करारातील तरतुदीनुसार तक्रारदार यांचेकडून घेतलेली आहे आणि त्या बाबतची माहीती, कल्पना विप क्र.1 ने तक्रारदारास वेळोवेळी दिलेली होती. तक्रारदाराने सदर कर्जाचे सर्व हप्ते दि.05/10/2012 रोजी परत फेड केलेले असल्यामुळे तक्रारदाराची तक्रार मुदतीत नाही. म्हणून वरील सर्व कारणाने तक्रारदाराची तक्रार चुकीची व असत्य असल्याने खर्चासह नामंजूर करण्यात यावी. असे नमूद केले आहे.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांना नोटीस पाठविण्यात आली सदर नोटीस unclaimed शे-यासह परत आल्याने दि.06/09/2013 रोजी एक्सपार्टी आदेश पारीत करण्यात आला.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकारने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? अंशत: होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? अंशत: होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा:
मुद्दा क्र.1 :
5) तक ने इंडिका कार विकत घेणेसाठी विप क्र.1 वित्त संस्थेकडून कर्ज घेतले याबददल दुमत नाही. विप क्र.1 ची विप क्र.2 शाखा असून उस्मानाबाद इथे आहे. विप क.1 चे म्हणणे आहे की विप क्र.2 चा व्यवसाय टू व्हीलर पुरताच मर्यादीत असल्यामुळे विप क्र.1 चे व्यवहाराशी संबंध नाही. मात्र ग्राहक संरक्षण कायदा क 11 (2) प्रमाणे ब्रँच ऑफीस असेल तर त्या जिल्हयातील ग्राहक मंचास अधिकार येतो त्यामुळे तक विप चा ग्राहक होतो. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुददा क्र. 2 व 3 :
6) तक ची तक्रारीत मागणी अशी आहे की विप ने त्याचेमधील अॅग्रीमेंटची प्रत मंचात दाखल करावी. विप ने विम्यापोटी स्वीकारलेली रक्कम रु.24,000/- + 4,832/- व्याजसह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावी. विप ने कारच्या इन्शुरन्ससाठी म्हणून तक कडून पैसे काढले जेव्हा की प्रिमियम कार विक्रेता तसेच तक ने स्वत: भरला अशी तक ची मुख्य तक्रार आहे.
7) तक चे म्हणणे आहे की कार विक्रेता बाफना मोटर्स यांनी विमा प्रिमियम रु.9,865/- भरला होता. विप क्र.1 ने दिलेले स्टेटमेंट ऑफ अकौंटप्रमाणे इनव्हाईस अमाउंट रु.3,56,244/-, इन्शुरन्स डिपॉझीट रु.24,000/-, अॅग्रीमेंट व्हॅल्यू रु.3,30,638/-, मार्जीन मनी रु.1,01,244/-, फायनान्स रु.2,55,000/-, इंटरेस्ट चार्जेस रु.51,638/-, अदर दॅन वन इयर इन्शूरन्स रु.24,000/- दाखवले आहेत. आयसी आयसी आय लोंम्बार्डचे प्रमाणपत्र असे दाखविते की प्रिमियम रु.9,865/- भरुन दि.11/12/2009 ते 10/12/2010 कालावधी साठी इन्शुरन्स काढला होता. युनायटेड इंडीया यांच्या पावतीप्रमाणे रु.7,660/- भरुन दि.08/12/2011 रोजी इन्शुरंन्स काढला. पॉलीसी शेडयूल सुध्दा हजर करण्यात आलेले आहे. विप ला रु.4,832/- एवढी रक्कम भरावी लागली नाही असे तक चे म्हणणे आहे.
8) ICICI लोंबार्डचे पॉलीसीप्रमाणे गाडीची एक्स शोरुम किंमत रु.3,47,804/- होती ती पॉलीसी बाफना मोटर्स तर्फे काढली असे त्यांचे पत्रावरुन दिसते. पुन्हा स्टेटमेंट ऑफ अकौंटकडे वळल्यास हे दिसते की कर्ज रु.255,000/- + मार्जीन मनी रु.101,244/- रु.3,56,244/- ही इनव्हाईस रक्कम दाखवली आहे. मात्र agreement value रु.3,30,638/- दाखवली आहे. इन्हाईस किंमतीमध्ये इन्शुरन्स डिपॉझीट रु.24,000/- सामील असावे. दि.30/09/2012 रोजी येणे रु.4,32,122/- पैकी फक्त रु.3,680/- आले नव्हते. दि.21/01/2012 रोजी इन्शूरन्स प्रिमियम म्हणून रु.4,832/- नावे टाकलेले दिसते. म्हणजेच दि.30/09/2012 अखेर येणे रु.1,152/- होते. तक चे म्हणणे प्रमाणे त्याने कर्जाची फेड 35 हप्त्यात केली आहे. अकौंट स्टेटमेंटमध्ये 35 वा हप्ता भरलेची नोंद नाही. तक ने तो हप्ता भरल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही मात्र विप ने ही इन्शुरन्स डिपॉझीट कुठे नावे टाकले व कुठे जमा टाकले या बददल काहीही खूलासा केला नाही. फक्त सेवेत त्रुटी केली नाही एवढीच त्यांची तक्रार आहे त्यामुळे विप ने इन्शुरन्स डिपॉझीट नावे टाकले असल्यास व तक ने सर्व हप्ते भरले असल्यास ती रक्कम परत मिळण्याचा हक्क आहे. त्यामुळे मुददा क्र. 2 व 3 चे उत्तर आम्ही अंशत: होय असे देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: खालीलप्रमाणे मंजूर करणेत येते.
2) जर तक ने सर्व 35 हप्ते भरले असतील व विप ने इन्शुरन्स डिपॉझीट रु.24,000/- (रुपये चोवीस हजार फक्त) त्याचे खात्यात नावे टाकले असेल तर विप ने ती रक्कम तक ला परत दयावी.
3) जर दि.30/09/2012 अखेरचे देणे रु.3,680/- (रुपये तीन हजार सहाशे ऐंशी फक्त) तक ने फेडले असेल तर इन्शूरन्स प्रिमियम रु.4,832/-(रुपये चार हजार आठशे बत्तीस फक्त) विप ने तक चे खात्यात नावे टाकला तो त्याने परत दयावा.
4) खर्चाबददल कोणताही आदेश नाही.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.