न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. ही सोने तारण घेवून कर्ज देणेचा व्यवसाय करीत असून वि.प.क्र.2 ही त्यांची मुख्य शाखा असून वि.प.क्र.1 ही त्यांची शाखा आहे. तक्रारदार व त्यांचे वडीलांनी वि.प. कंपनीतून सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. तक्रारदार क्र.1 यांचे वडील व तक्रारदार क्र.2 यांचे पती श्री विश्वास बाबूराव लायकर यांनी ता. 13/4/2017 रोजी तक्रारदार यांचे दागिने ठेवून कर्ज घेतले होते. सदर दागिन्यांचे वजन 15.80 ग्रॅम व 8.70 ग्रॅम इतके भरले. त्यानुसार त्यांचे किंमतीप्रमाणे वि.प. कंपनीने विश्वास लायकर यांना ता. 13/4/17 रोजी रक्कम रु.21,250/- व रु. 15,000/- इतके कर्ज मंजूर करुन तशी रक्कम अदा केली. सदर कर्जाची मुदत ता.12/10/2017 रोजीपर्यंत होती. दरम्यानचे काळात सन 2017 मध्ये वि.प. बँकेमध्ये घोटाळा झालेबाबत तक्रारदार यांना समजलेनंतर त्यांनी घेतलेली कर्ज रक्कम भरुन सोने परत घेणेकरिता ते बँकेत गेले. तथापि वि.प. यांनी कर्ज रक्कम स्वीकारली नाही व त्यांना परत पाठविले. त्यानंतर विश्वास लायकर हे आजारी पडले व ते दि. 26/11/17 रोजी मयत झाले. त्यापूर्वी तक्रारदार यांची बहिण व आई यांनी बँकेत मागणीप्रमाणे ता. 15/7/2017 व ता. 11/11/17 रोजी पैसे भरले होते. त्यावेळी पैसे भरुनही वि.प. यांनी सोने परत देणेस नकार दिला. त्यानंतर पुन्हा तक्रारदार क्र.2 यांनी वि.प. बँकेत येवून ता. 15/1/18 व 29/1/18 रोजी सोने तारण कर्ज घेतले. त्यावेळी वि.प. यांनी वडिलांचे ता. 13/4/17 रोजीचे कर्ज खात्याकरिता दिलेले सोने लिलाव करणार असलेबाबत काहीही सांगितले नाही व अचानक तक्रारदार यांना सदर कर्जातील तारण सोन्याचा लिलाव झाल्याचे तोंडी सांगितले. वास्तविक, सदर लिलावापूर्वी वि.प. यांनी तक्रारदारास नोटीस पाठविणे बंधनकारक होते. त्याबाबत तक्रारदार यांनी चौकशी केली असता वि.प. यांनी पोस्ट खात्याचा कन्साईनमेंट ट्रॅकींग रिपोर्ट दिला असता सदर नोटीस कर्जदार मयत झालेने लागू न होता परत गेली असलेचे त्यावर नमूद आहे. अशा परिस्थितीत मयताचे वारसांना नोटीस न काढताच बेकायदेशीरपणे वि.प यांनी सोन्याचा लिलाव करुन तक्रारदारांची फसवणूक केली आहे. तक्रारदारांचे पूर्वहक्कदार विश्वास लायकर हे वि.प. यांचे ग्राहक होते. त्यांचे पश्चात त्यांचे वारस तक्रारदार असलेने ते वि.प. यांचे ग्राहक होतात. अशा प्रकारे वि.प. यांनी अप्रामाणिक व्यापार पध्दती अवलंबल्याने तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून नुकसान
भरपाईदाखल रक्कम रु.2,20,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 5 कडे अनुक्रमे तक्रारदार यांचे पूर्वहक्कदार यांनी घेतलेल्या कर्जाबाबतचे पत्राची प्रत, तारण ठेवलेल्या सोन्याची वजन पावती, कर्जाची प्रत, पोस्ट खात्याचा कन्साईनमेंट रिपोर्ट वगैरे कागदपत्रे दाखल केली आहे. तसेच पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांना प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू झालेनंतर वि.प.क्र.1 व 2 हे याकामी वकीलामार्फत हजर झाले. परंतु त्यांनी विहीत मुदतीत आपले लेखी म्हणणे दाखल न केलेने त्यांचेविरुध्द नि.1 वर नो से आदेश पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदार यांचे वडील श्री विश्वास लायकर यांनी वि.प. यांचेकडे अनुक्रमे 15.80 ग्रॅम व 8.70 ग्रॅम इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने तारण ठेवून ता. 13/4/17 रोजी रक्कम रु.21,250/- व रु. 15,000/- इतके कर्ज घेतले होते. तक्रारदारांनी याकामी सदर दोन्ही सोने तारण कर्जांच्या पावत्या याकामी हजर केल्या आहेत. वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी म्हणणे दाखल करुन सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, विश्वास लायकर हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सदरचे विश्वास लायकर हे मयत झाले असून तक्रारदार हे त्यांचे सरळ कायदेशीर वारस आहेत. सबब, वारस या नात्याने तक्रारदार व वि.प. हे ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदार क्र.1 यांचे वडील व तक्रारदार क्र.2 यांचे पती श्री विश्वास बाबूराव लायकर यांनी ता. 13/4/2017 रोजी अनुक्रमे 15.80 ग्रॅम व 8.70 ग्रॅम इतके सोन्याचे दागिने तारण ठेवून बव.प. यांचेकडून रक्कम रु.21,250/- व रु. 15,000/- इतके कर्ज घेतले. त्यानंतर विश्वास लायकर हे आजारी पडले व ते दि. 26/11/17 रोजी मयत झाले. त्यापूर्वी तक्रारदार यांची बहिण व आई यांनी बँकेत मागणीप्रमाणे ता. 15/7/2017 व ता. 11/11/17 रोजी पैसे भरले होते. त्यावेळी पैसे भरुनही वि.प. यांनी सोने परत देणेस नकार दिला. तदनंतर वि.प. यांनी वडिलांचे ता. 13/4/17 रोजीचे कर्ज खात्याकरिता दिलेले सोने लिलाव करणार असलेबाबत तक्रारदारांना काहीही न सांगता सदर तारण सोन्याचा लिलाव केला. वास्तविक, सदर लिलावापूर्वी वि.प. यांनी तक्रारदारास नोटीस पाठविणे बंधनकारक होते. वि.प. यांनी मयताचे नावे नोटीस पाठविली होती परंतु सदरची नोटीस कर्जदार मयत झालेने लागू न होता परत गेली असलेचे पोस्टाचे कन्साईनमेंट रिपोर्टवरुन दिसून आले. अशा प्रकारे मयताचे वारसांना नोटीस न काढताच बेकायदेशीरपणे वि.प यांनी सोन्याचा लिलाव करुन तक्रारदारांची फसवणूक केली आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने सोनेतारण कर्जाच्या पावत्या व पोस्टाचा ट्रॅकींग रिपोर्ट दाखल केला आहे. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात, तक्रारदार यांची बहिण व आई यांनी बँकेत मागणीप्रमाणे ता. 15/7/2017 व ता. 11/11/17 रोजी पैसे भरले होते. त्यावेळी पैसे भरुनही वि.प. यांनी सोने परत देणेस नकार दिला असे कथन केले आहे. परंतु सदर कर्जापोटी रकमा भरल्याबाबत तक्रारदारांची कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदारांचे सदरचे कथन कोणत्याही ठोस पुराव्याअभावी ग्राहय मानता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस लागू झालेनंतर ते याकामी हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द नो से आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथन वि.प. क्र.1 व 2 यांनी लेखी कैफियत दाखल करुन नाकारलेले नाही. त्यामुळे वि.प. क्र.1 व 2 यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, त्याने तक्रारअर्जात केलेल्या कथनांवर विश्वासार्हता दाखवणे न्यायोचित होत आहे. वि.प. यांनी मयत विश्वास लायकर हे मयत झालेबाबत पोस्टाचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांचे वारसांना लिलावपूर्व नोटीस पाठविणे बंधनकारक होते. परंतु मयताचे वारसांना कोणतीही संधी न देता वि.प. यांनी मयताचे सोन्याचा लिलाव केल्याचे दिसून येते. वि.प. यांची सदरची कृती ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, तक्रारदारांनी आपली तक्रार पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
8. तक्रारदार यांनी याकामी रक्कम रु.2,20,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. परंतु तक्रारदाराचे वडीलांनी किंवा तक्रारदारांनी सोने तारण कर्जाची परतफेड केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदारांनी गहाण ठेवलेल्या सोन्याचे वजन व त्याची होणारी किंमत व कर्जापोटी घेतलेली रक्कम यांचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 20,000/- इतकी रक्कम मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.20,000/- अदा करावेत.
4) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अदा करावेत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.