(मा.अध्यक्ष.श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालेकडून नुकसान भरपाईच्या क्लेमची रक्कम रु.6,18,384/-मिळावी, गाडी जितेंद्र ऑटोमोबाईल्स मध्ये पार्क असल्याने त्यांचे पार्किंग चार्जेस रक्कम रु.200/- प्रमाणे रु.54,000/- मिळावेत, जितेंद्र ऑटोमोबाईल्सचे कोटेशनच्या रकमेचे 3% म्हणजे रक्कम रु.18,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च व मानसिक त्रास याचे रक्कम रु.25,000/- मिळावेत, नुकसान भरपाईच्या रकमेवर द.सा.द.शे.12% प्रमाणे व्याज मिळावे, सर्वे रिपोर्ट मे.मंचात दाखल करण्याचे आदेश व्हावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी पान क्र.26 लगत इंग्रजी भाषेमध्ये व पान क्र.27 लगत मराठी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.31 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. मुद्देः 1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय 2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-होय 3. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? ---होय 4. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी व पार्किंगचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय 5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवालेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. विवेचनः याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.पी.पी.घुलेपाटील यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांचे वतीने पान क्र.41 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. अपघातग्रस्त वाहनास सामनेवाले यांनी विमा पॉलिसी दिलेली आहे ही बाब सामनेवाले यांनी त्यांचें लेखी म्हणणे कलम 4 मध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.16 लगत विमा पॉलिसी शेडयुल दाखल केलेले आहे. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व पान क्र.16 लगतचे विमा शेडयुल याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “गाडीचा ड्रायव्हर नामे किरण मधुकर सपकाळ यांचेकडे व्हॅलिड अँण्ड इफेक्टीव्ह ड्रायव्हींग लायसन्स नव्हते. त्यामुळे अटी व शर्तींचा भंग झालेला आहे. तक्रारदाराच्या क्लेमबाबत सामनेवाला यांनी सर्व अंगांचा सखोल विचार करुन कार्यवाही केलेली आहे. (Propoer Application of Mind). सेवेत कमतरता केलेली नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे. जरी सामनेवाला यांनी अर्जदार यांचे ड्रायव्हर यांना वाहन चालवण्याचा योग्य तो परवाना नव्हता या कारणावरुन क्लेम नाकारलेला असला तरी प्रत्यक्षात पान क्र.29 चे सामनेवाला यांचे सर्व्हेयर श्री. रोहीत पाटील यांचे सर्वे रिपोर्टमध्ये ड्रायव्हर यांना लाईट मोटार व्हेयीकलचे व्हॅलीड लायसन्स होते असा स्पष्ट उल्लेख दिसून येत आहे. अर्जदार यांनी पान क्र.18 लगत ड्रायव्हींग लायसन्सची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. यामध्ये नॉन ट्रान्सपोर्ट व्हेईकलसाठी अर्जदार यांचे ड्रायव्हर यांना दि.30/12/2023 पर्यंत वाहन चालविण्याचा परवाना आहे असा उल्लेख आहे. सामनेवाला यांचे सर्वे रिपोट नुसार अपघातग्रस्त वाहन हे पॅसेंजर व्हेईकल आहे. अर्जदार यांनी सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्स 1990 चे रुल 2 ची झेरॉक्स प्रत सादर केलेली आहे. या रुलनुसार नॉन ट्रान्सपोर्ट व्हेईकल यामध्ये पॅसेंजरची वाहतूक करण्यासाठी वापरलेले चार चाकी वाहन याचा ही उल्लेख आहे. या सेंट्रल मोटर व्हेईकल रुलचा विचार होता, अर्जदार यांचे ड्रायव्हर यांना अपघातग्रस्त वाहन चालवण्याचा योग्य तो वाहन चालवण्याचा परवाना होता असे दिसून येत आहे. परंतु असे असुनही सामनेवाला यांनी अयोग्य व चुकीचे कारण देवून अर्जदार यांचा विमा क्लेम नाकारलेला आहे व त्यामुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. पान क्र.29 लगत सामनेवाला यांनी जो सर्वे अहवाल दाखल केलेला आहे, त्या अहवालानुसार रु.3,50,000/- इतक्या निव्वळ रकमेचे वाहनाचे नुकसान झालेले आहे असे दिसून येत आहे. पान क्र.29 चा अहवाल अयोग्य व चुकीचा आहे हे दर्शवण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट अर्जदार यांनी पान क्र.8 लगत जितेंद्र मोटर्स प्रा.लि. यांचेकडील जे दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक दाखल केलेले आहे, त्यामधील नोंदी व पान क्र.29 च्या सर्वे अहवालामधील नोंदी या योग्य व बरोबर आहेत असे दिसून येत आहे. सामनेवाला यांचा पान क्र.29 चा अहवाल चुकीचा आहे हे दर्शवण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.3,50,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. 2011 एन.सी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 445. न्यु इंडिया इन्शुरन्स कं विरुध्द डॉ.एम.एम.कृष्णा. सामनेवाले यांचेकडून अर्जदार यांना विमा क्लेमपोटी रक्कम रु.3,50,000/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळालेली नाही. सर्वे रिपोर्टपासून दोन महिन्याचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम मंजूर करणे गरजेचे होते, याचा विचार होता पान क्र.29 चे सर्वे अहवालाची तारीख दि.13/10/2010 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.14/12/2010 पासून अर्जदार हे आर्थीक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.3,50,000/- या रकमेवर संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टांचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहेः 1) 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.186. ओरीएंन्टल इन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बंन्सल. 2) 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी. अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून रु.200/- प्रमाणे अपघातापासून पार्किंगची रक्कम रु.54,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. परंतु विमा पॉलिसीचे सर्वसाधारण अटी व शर्ती नुसार पार्किंग व टोईंग चार्जेसकरीता जास्तीतजास्त रु.2500/- मंजूर करता येतात, याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून पार्किंगच्या खर्चाची रक्कम म्हणून रक्कम रु.2500/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. या कामी सामनेवाला यांनी पान क्र.42 लगत मा.सर्वोच्च न्यायालय. नवी दिल्ली. यांचेकडील सिव्हील अपील क्र.44/2003. निकाल ता.10/07/2009. न्यु इंडिया इन्शुरन्स कं. विरुध्द सुरेशचंद्र अग्रवाल. या निकालपत्राची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. परंतु वर उल्लेख केलेल्या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये फरक आहे. प्रस्तुत तक्रार अर्जामधील अपघातग्रस्त वाहन हे पॅसेंजर व्हेईकल आहे व वर उल्लेख केल्यानुसार सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्सप्रमाणे अर्जदार यांचे ड्रायव्हर यांना पान क्र.18 नुसार दि.30/12/2023 अखेर योग्य तो वाहन चालवण्याचा परवाना आहे हे स्पष्ट झालेले आहे, यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र या कामी विचारात घेतले नाही. अर्जदार यांनी या कामी मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचे समोरील सिव्हील अपील क्र.574/2008 निकाल ता.22/01/2008 नॅशनल इन्शुरन्स कं. विरुध्द अन्नाप्पा इराप्पा नेसरीया या निकालपत्राची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामध्ये लाईट मोटर व्हेईकल यामध्ये पॅसेंजर कॅरेज व्हेईकलचा समावेश होतो असा उल्लख आहे. या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये साम्य आहे. यामुळे या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार या कामी घेतलेला आहे. सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमची रक्कम मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवालेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. सामनेवाले यांचे कृतीमुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यातः 2.अ. विमाक्लेमपोटी रक्कम रु.3,50,000/- दयावेत व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवर दि.14/12/2010 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज दयावे. 2.ब. पार्कींग चार्जेससाठी रु.2500/- द्यावेत 2.क. मानसिक त्रासापोटी रु.15,000/- दयावेत. 2.ड. अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत. |