--- आदेश ---
(पारित दि. 19-01-2007 )
द्वारा श्रीमती प्रतिभा बा.पोटदुखे, अध्यक्षा –
अर्जदार श्री. राधेश्याम जगतराम टेंभरे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1 अर्जदार यांच्या पत्नी सौ. हंसाबाई राधेश्याम टेंभरे यांनी गैरअर्जदार यांच्याकडून
क्रं. 972855442 या नंबरची जीवन बीमा विषयक पॉलिसी काढली होती.
2 अर्जदार यांच्या पत्नीचा दि. 23.03.2004 रोजी हृदय विकाराने मृत्यु झाला. जेव्हा अर्जदार यांच्या पत्नीचा मृत्यु झाला तेव्हा पॉलिसी ही अस्तित्वात होती व त्याचा हप्ता नियमित भरला जात होता.
3 अर्जदार यांनी त्यांच्या पत्नीच्या विमा पॉलिसीचे पैसे मिळण्याकरिता विमा कायदा 1938 च्या कलम-39 प्रमाणे गैरअर्जदार यांच्याकडे अर्ज केला. दि. 10.12.2004 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पत्र पाठवून कळविले की, त्यांचा विमा दावा हा नाकारण्यात येत आहे. तसेच दि. 22.05.2005 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पत्राद्वारे कळविले की, पुनर्वलोकन समिती, मुंबई यांनी सुध्दा गैरअर्जदार यांनी विमा दावा नाकारल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
4 अर्जदार यांनी मागणी केली आहे की, त्यांना विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 18% व्याजासह मिळावी, शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 50,000/- मिळावे व ग्राहक तक्रारीचा खर्च हा गैरअर्जदार यांच्यावर लादण्यात यावा.
5 गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी बयान निशाणी क्रं. 11 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार म्हणतात की, अर्जदार यांच्या पत्नी श्रीमती हंसाबाई टेंभरे यांचा मृत्यु पॉलिसी काढल्यानंतर 2 वर्षे 9 महिने व 2 दिवसाच्या आत झाला. अर्जदार यांच्या पत्नीला क्षय रोग होता व त्यांनी ही बाब पॉलिसी काढतांना गैरअर्जदार यांच्याकडून लपवून ठेवली. अर्जदार यांच्या पत्नी हया शिक्षिका होत्या व त्या दि. 12.06.2000 ते 23.03.2003 या कालावधीत त्या शाळेत गैरहजर होत्या. अर्जदार यांची ग्राहक तक्रार ही कालबाहय आहे. पुनर्वलोकन समितीने सुध्दा अर्जदार यांच्या विरोधात निर्णय दिला आहे. अर्जदार यांच्या पत्नी यांनी महत्वाची माहिती लपवून ठेवून गैरअर्जदार यांच्याकडून जीवन बीमा पॉलिसी काढली होती, त्यामुळे गैरअर्जदार यांनी विमा दावा नाकारणे हे योग्य आहे व अर्जदार यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार ही खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
कारणे व निष्कर्ष
6 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपत्र, पुरावा व गैरअर्जदार यांनी केलेला युक्तिवाद यावरुन असे दिसून येते की, अर्जदार यांच्या पत्नी श्रीमती हंसाबाई राधेश्याम टेंभरे यांना क्षय रोग होता. तशा आशयाचे कागदपत्र रेकॉर्डवर दाखल आहेत. मृतक सौ. हंसाबाई टेंभरे यांनी गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, आमगांव यांना दिलेल्या पत्रात त्यांना क्षय रोग आहे असे कबूल केले आहे. तसेच दि. 12.06.2000 पासून क्षय रुग्णालय नागपूर येथे भरती असल्याचे सौ. टेंभरे यांनी या पत्रात लिहिलेले आहे. प्रमुख वैद्यकीय अधिकारी राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर यांचे दि. 22.06.2000 चे प्रमाणपत्र रेकॉर्डवर दाखल आहे. त्यामध्ये श्रीमती हंसाबाई राधेश्याम टेंभरे या क्षय आजार या कारणास्तव भरती आहेत असे नमूद केले आहे. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आमगांव यांनी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांना दि. 28.06.04 रोजी लिहिलेल्या पत्रात श्रीमती हंसाबाई टेंभरे हया दि. 12.06.2000 पासून दुस-या वेळी क्षयरोग बाधा झाल्याने दिर्घकालीन रजेवर होत्या व दि. 23.03.2003 रोजी मृत पावल्या असे नमूद केले आहे. या पत्रामध्ये श्रीमती हंसाबाई टेंभरे यांनी घेतलेली क्षयरोग रजा सुध्दा दर्शविण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे
1 दि. 12.06.2000 ते 29.07.2000 48 दिवस अर्जित रजा
2 दि.30.07.2000 ते 29.07.2001 365 दिवस विशेष क्षयरोग रजा
3 दि. 30.07.2001 ते 23.03.2003 605 दिवस असाधारण रजा
---------------------------
एकूण 1015 दिवस
-----------------------------
7 श्रीमती हंसाबाई राधेश्याम टेंभरे यांनी विमा प्रस्ताव हा दि. 29.03.2001 रोजी दिला. त्यात त्यांनी कलम-11 मध्ये व्यक्तीगत इतिवृत्त यामध्ये प्रश्नांची उत्तरे देतांना त्यांच्या क्षयरोग या आजाराची माहिती लपविलेली दिसून येते. मागील 5 वर्षा पासून कोणत्या चिकित्सकाकडून एक सप्ताह पेक्षा अधिक कालावधीसाठी उपचार घेण्याची गरज तुम्हाला पडली होती काय ? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी नाही असे दिले आहे. तसेच तुम्ही कोणत्या दवाखान्यात भरती होत्या काय ? याचे उत्तर सुध्दा त्यांनी नाही असे दिले आहे. मागील 5 वर्षापासून तुम्ही कधी आरोग्याच्या कारणावरुन कार्यालयातून अनुपस्थित होत्या काय या प्रश्नाचे उत्तर सुध्दा त्यांनी नाही असे दिले आहे. तसेच क्षय किंवा इतर आजाराने तुम्ही ग्रस्त आहात काय ? या प्रश्नाचे उत्तर देखील त्यांनी नाही असे दिले आहे. विमा प्रस्तावात श्रीमती हंसाबाई टेंभरे यांनी त्यांची स्वास्थ स्थिती चांगली आहे असे सांगितले आहे. हे सरासर खोटे असल्याचे दिसून येते. श्रीमती हंसाबाई टेंभरे यांनी गैरअर्जदार यांना खोटी माहिती देऊन व आरोग्याबद्दलची महत्वाची माहिती लपवून विमा पॉलिसी काढल्याचे दिसून येते.
8 अर्जदार यांनी ग्राहक तक्रारीत त्यांच्या पत्नीचा मृत्यु हा हृदयविकाराने झाला असे नमूद केले आहे. परंतु रेकॉर्डवर हे दाखविणारा असा कोणताही दस्ताऐवज नाही. अर्जदार यांनी भारतीय जीवन बीमा निगमचे वैद्यकीय आजार संबंधिचे प्रमाणपत्र भरुन दिले आहे. त्यात त्यांनी मृत्युचे कारण हे हृदय विकार असे टाकलेले आहे. परंतु हे प्रमाणपत्र अर्जदार यांच्या पत्नीचा मृत्यु हा हृदय विकाराने झाला हे दाखविण्यास पुरेसे नाही.
9 भारतीय जीवन बीमा निगम विरुध्द श्रीमती सुभद्रा डोमाजी भेले या 2 (1999) सी.पी.जे.175 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय महाराष्ट्र राज्य आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, क्षय रोग असल्याबद्दलची माहिती लपवून ठेवून जर पॉलिसी घेतल्या गेली असेल तर त्या कारणावरुन विमा महामंडळला विमा दावा नाकारण्याचा अधिकार आहे.
10 श्रीमती हंसाबाई राधेश्याम टेंभरे यांनी त्यांना क्षय रोग झाल्याची महत्वाची बाब लपवून ठेवून गैरअर्जदार यांच्याकडून पॉलिसी घेतली याबद्दल कोणतीही शंका घेण्यास जागा नाही.
अशा स्थितीत सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
अर्जदार यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.