जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 159/2008. प्रकरण दाखल तारीख - 02/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 14/08/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. जयश्री भ्र. अशोक कुंटूरकर अर्जदार वय, 44 वर्षे धंदा घरकाम व शेती रा. विजयनगर हाऊसिंग सोसायटी, हनूमान मंदीर मंगल कार्यालयाजवळ, नांदेड. विरुध्द. मॅनेजर आय.सी.आय.सी. आय. लोंबार्ड जनरल इन्शूरन्स कंपनी मर्यादित कलामंदिर, नांदेड गैरअर्जदार अर्जदारा तर्फे वकील - अड.विनायक बी. भोसले. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.अजय व्यास. निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स यांच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार यांनी त्यांच्या खाजगी कामासाठी दि.08.11.2007 रोजी टाटा इंडिका कार विकत घेतली. ज्यांचा रजीस्ट्रर नंबर एम. एच.-26-एस-982 असा आहे. कारच्या सूरक्षेतेसाठी त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून पॉलिसी कव्हर नोट नंबर पीएफ/5607980 ही विमा पॉलिसी दि.09.11.2007 ते 08.11.2008 या कालावधीसाठी घेतली होती. दि.24.01.2008 रोजी अर्जदार ही आपल्या पती सोबत देवीच्या दर्शनासाठी माहूर येथे जात असताना कार चालक आनंद गायकवाड यांचे समोर एक ट्रक रॉंग साईडने येऊन कारला जोराची धडक दिली. त्यामुळे कारचे शो, रेडियेटर, ए.सी., बॉनेट, हेड लाईट व इतर बरेच पार्टचे मिळून रु.1,00,000/- चे नूकसान झाले. सदरील अपघाताची सूचना पोलिस स्टेशन उमरखेड येथे दिली. त्यांचा गून्हा रजिस्ट्रर नंबर 3013/2008 नोंदवून दि.24.01.2008 रोजी पहिली खबर देण्यात आली. अपघाग्रस्त कारला घटनास्थळापासून नांदेड येथे आणण्यासाठी रु.2500/- खर्च झाला व बाफना मोटार्स यांच्याकडे कारच्या दूरुस्तीसाठी अर्जदारास रु.1,00,000/- खर्च लागला. कारच्या दूरुस्तीसाठी लागलेला खर्चाचा कागदोपञी पूरावा बिल गैरअर्जदाराकडे दाखल करुन नूकसान भरपाईची मागणी केली परंतु दि.12.03.2008 रोजी कोणतेही सबळ कारण नसताना व अर्जदाराने व्यापारी उददेशासाठी कारचा उपयोग केला त्यामुळे गैरअर्जदारांनी क्लेम नामंजूर केला. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदार यांनी रु.2,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने अर्जदार यांना देण्याचे आदेश करावेत. गैरअर्जदार हे वकिला मार्फत हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार संपूर्णतः गैरअर्जदारांनी अमान्य केली आहे. पॉलिसी व पॉलिसीचे कार्ड हे त्यांनी मान्य केले आहे. दि.24.01.2008 रोजी अपघातग्रस्त कार ही आनंद कीशन गायकवाड चालवत होते व त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता असे म्हटले आहे. अपघात झालेल्या कारचे रु.1,00,000/- नूकसान झाले हे त्यांनी अमान्य केले आहे.अर्जदारानी सदरील विमा प्रायव्हेट कार पॉलिसी म्हणून घेतली होती. अर्जदाराने सदर गाडीचा व्यवहारीक कारणासाठी उपयोग केला आहे व पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे म्हणून गैरअर्जदारांनी रक्कमची मागणी फेटाळली आहे. गैरअर्जदार यांनी संतोष रेणके या सर्व्हेअरला अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले असताना त्यांनी दि.06.03.2008 रोजी सर्व्हे केला व सव्हेप्रमाणे रु.72,350/- चे वाहनाचे नूकसान झाले असा अहवाल दिला, त्यामुळे अर्जदार रु.2,00,000/- मागणी करण्यास पाञ नाही म्हणून अर्जदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच घटनास्थळ पंचनामा, ड्रायव्हींग लायसन्स, इन्शूरन्स कव्हर नोट, टॅक्स इन्हॉईस, बाफना मोटार्स यांनी दिलेल्या पावत्या व गैरअर्जदार यांचे रेप्यूडेशन लेटर, व सर्व्हे रिपोर्ट इत्यादी कागदपञ दाखल केलेली आहेत. दोन्ही पक्षकारांनी वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून व दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी पॉलिसी कव्हर नोट नंबर 3001/52954546/00/000 दाखल केलेली आहे. पॉलिसी बददल वाद नाही. अर्जदाराच्या नांवे वाहन असल्याबददल एम.एच.26-एस-982 हे इंडिका कारचे आर.सी. बूकही प्रकरणात दाखल आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.24.01.2008 रोजी वाहनाचा अपघात झाला, त्याबददल दि.24.01.2008 चे एफ.आय. आर.दाखल केलेले आहे. सोबत घटनास्थळ पंचनामा देखील दाखल केलेला आहे. समोरुन येणा-या ट्रकने कारला रॉंग साईडने येऊन धडक दिली त्यामूळे कारचे नूकसान झाले असे दिसून येते. गैरअर्जदाराने आपले म्हणण्यात वाहन चालक आनंद कीशन गायकवाड यांच्याकडे वैध परवाना नव्हता असा आक्षेप घेतला आहे. अर्जदाराने आनंद गायकवाड यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केलेला आहे यावर दि.20.12.2007 ते 19.12.2010 पर्यत हा परवाना वैध आहे व अपघात हा दि.24.01.2008 रोजी झालेला आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचा हा आक्षेप मान्य करता येणार नाही. शेवटी गैरअर्जदाराने जो वाहनाचा वापर व्यावसायीक कारणासाठी झालेला आहे असा आक्षेप घेतलेला आहे त्याबददल गैरअर्जदार हे कोणताही पूरावा मंचासमोर आणू शकले नाही. अर्जदार यांचा तक्रार अर्जातील सूरुवातीचा परिच्छेद क्र.1 मध्ये त्यांनी स्पष्टपणे असे म्हटले आहे की, अर्जदार व तिचे पती हे माहूरला दर्शनासाठी जात होते. अर्जदार स्वतःच कारचा उपयोग देवदर्शन अशा वैयक्तीक कामासाठी करतात तेव्हा त्यांला व्यावसायीक वापर असा कसा काय अर्थ लावला हे न समजण्यासारखे आहे. अर्जदाराने त्यांचे वाहन टोचन करुन बाफना मोटार्स यांच्याकडे आणले त्या बाबत पूरावा म्हणून दि.25.01.2008 रोजीची पावती रु.2500/- या प्रकरणात दाखल केलेली आहे. गैरअर्जदारांनी अर्जदाराचा क्लेम दि.12.03.2008 रोजी नाकारल्या बददलचे पञ दाखल केलेले आहे. या पञातही वाहनाचा व्यावसायीक कामासाठी वापर असल्या कारणाने पॉलिसीच्या नियमाप्रमाणे क्लेम देता येत नाही असे म्हटल्याचे पञ दाखल केलेले आहे. सर्व्हेअर श्री. संतोष रेणके यांनी सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे.याप्रमाणे प्लास्टीक रबर पार्टवर 50 टक्के डिप्रीसिऐशन धरलेले आहे, ग्लास व मेटलला पार्टवर डिप्रीसिऐशन 0 टक्के धरलेले आहे. लेबर चार्ज रु.14,900/- व त्यावर लांस गृहीत धरुन रु.16,441/- मंजूर केलेले आहेत. यामूळे इन्व्हाईस रक्कम रु.96,900/- असली तरी सर्व्हेअरनी डिप्रीसिऐशन वजा जाता नेट रक्कम हे रु.72,349,63 झाले आहे असे असेंसमेंट केलेले आहे. अर्जदारानी बाफना मोटार्स यांच्याकडे वाहनाचे काम केल्या बददल टॅक्स इनव्हाईस दाखल करुन याबददल रु.96,990/- चे अगेन्स्ट रु.94,500/- दिल्या बददल दि.03.03.2008 रोजीची पावती दाखल केलेली आहे. एवढे रक्कम देऊन अर्जदाराने वाहनाचे पूर्ण काम करुन घेतलेले आहे परंतु पॉलिसीच्या नियमाप्रमाणे प्लास्टीक, रबर या पार्टवर 50 टक्के डिप्रीसिऐशन अर्जदाराने गृहीत धरलेले नसावे. परंतु पॉलिसीच्या नियमाप्रमाणे व सर्वप्रथम सर्व्हेअर यांना अपघातग्रस्त वाहनाचे सर्व्हे केला व त्यांनाच वाहनाची नेमकी स्थिती काय आहे हे माहीत असते. व कूठले पार्ट बदलणे आवश्यक आहे त्यासाठी मंजूरीही त्यांनी दिलेली आहे. म्हणून सर्व्हे रिपोर्टप्रमाणे अर्जदाराची नूकसान भरपाई देणे योग्य राहील. म्हणून नूकसानी बददल रु.72,350/- व वाहन टो करुन आणले त्याबददल रु.1500/- जे की सर्व्हेअरनी त्यांचे सर्व्हे रिपोर्टमध्ये धरलेले नाही. असे एकूण रु.74,850/- इतकी रक्कम देणे बंधनकारक आहे व कूठलेही ठोस कारण नसताना व गैरअर्जदार यांच्याकडे पूरावा नसताना तोंडीच अर्जदाराने वाहनाचा उपयोग व्यावसायीक कारणासाठी केला आहे असे कारण देऊन अर्जदाराचा क्लेम नाकारला व सेवेत ञूटी केली व हे अर्जदाराने देखील सिध्द केलेले आहे. म्हणून मानसिक ञासाबददल रु.20,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- देणे बंधनकारक आहे. Driver holding valid licence repudiation illegal, amounts assessed by surveyor awarded, ही मा. राष्ट्रीय आयोगाचे सायटेशन NCDRC 195 Harish Chadda Vs. New India Insurance Company Ltd. C.P.J. VOL.2 page no. 708, दिलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 1. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत रु.73,850/- व त्यावर दि.12.03.2008 पासून 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत दयावेत, असे न केल्यास 12 टक्के दंडणीय व्याजासह पूर्ण रक्कम अर्जदारास दयावी. 2. मानसिक ञासाबददल रु.20,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |