आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी
तक्रारकर्त्यांनी मृतक रैनाबाई गजराव पंधरे हिच्या अपघाती निधनाबद्दल शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- विरूध्द पक्ष यांना विमा दाव्याद्वारे मागितले होते. परंतु त्यांनी विमा दावा अर्ज निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्त्यांनी रू. 1,00,000/- अपघाती विमा मिळण्याकरिता सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता क्र. 1 हा मृतक श्रीमती रैनाबाई पंधरे हिचा पती असून तक्रारकर्ता क्र. 2 व 3 हे मुले आहेत. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्यामार्फत विमा दावा निकाली काढल्या जातो. तसेच विरूध्द पक्ष 3 यांच्यातर्फे विमा दाव्याची शहानिशा केल्यानंतर तो विमा दावा विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे सादर केल्या जातो.
3. तक्रारकर्ता क्र. 1 ची पत्नी मृतक श्रीमती रैनाबाई पंधरे हिच्या मालकीची शेती मौजा महारीटोला, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 47, क्षेत्रफळ 0.05 हे.आर. असून तक्रारकर्त्याची पत्नी शेती व्यवसाय करीत होती.
4. तक्रारकर्ता क्र. 1 ची पत्नी दिनांक 15/09/2005 रोजी पुराच्या पाण्यात बुडून मरण पावली. त्यामुळे तक्रारकर्ता क्र. 1 याने विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे विमा दावा रक्कम रू. 1,00,000/- मिळण्यासाठी रितसर अर्ज कागदपत्रासह सादर केला.
5. रितसर अर्ज केल्यानंतर व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सुध्दा तसेच विरूध्द पक्ष 1 व 3 यांच्याकडे विमा दाव्याबद्दल विचारणा केली असता विरूध्द पक्ष यांनी विमा दावा मंजूर अथवा नामंजूर झाला किंवा नाही हे आजपर्यंत तक्रारकर्त्यांना कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी विमा दाव्याचे रू. 1,00,000/- द. सा. द. शे. 18% व्याजासह मिळण्यासाठी तसेच मानसिक त्रासापोटी रू. 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दिनांक 14/06/2011 रोजी मंचात दाखल केले.
6. तक्रारकर्त्यांचे प्रकरण दिनांक 20/06/2012 रोजी न्याय मंचाने दाखल करून घेतल्यानंतर मंचामार्फत विरूध्द पक्ष यांना दिनांक 21/06/2012 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या.
विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत. विरूध्द पक्ष 3 यांना नोटीस मिळूनही ते मंचामध्ये हजर झाले नाहीत अथवा सदर प्रकरणात आपले उत्तरही त्यांनी दाखल केले नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 26/03/2013 रोजी पारित करण्यात आला.
विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा जबाब दिनांक 17/10/2012 रोजी मंचात दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्यांची तक्रार ही तांत्रिक मुद्दयावर आधारित असून त्यामध्ये घडणा-या घटनांचे पुरावे नसल्यामुळे तक्रारकर्त्यांचा विमा दावा अर्ज पुरावे दाखल करण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे, तसेच तक्रारकर्त्यांचा तक्रार अर्ज हा मुदतीत नसल्यामुळे व विद्यमान न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्राबाहेर असल्यामुळे सदरहू प्रकरण खारीज करण्यात यावे.
7. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत कागदपत्रांची यादी पृष्ठ क्र. 11 वर दाखल केली असून विरूध्द पक्ष 3 यांनी विरूध्द पक्ष 2 यांना पाठविलेल्या तक्रारकर्त्यांच्या प्रस्तावाबाबतचे पत्र पृष्ठ क्र. 12 वर दाखल केले आहे. तसेच सरपंच, ग्राम पंचायत महारीटोला यांचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 13 वर, मृतकाचे मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 14 वर, 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 15 वर, फेरफार नोंदवही पृष्ठ क्र. 16 व 17 वर, आणि तक्रारकर्त्यांनी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पृष्ठ क्र. 19 याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
8. तक्रारकर्त्यांचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता क्र. 1 यांची पत्नी ही शेतकरी असल्याचे फेरफार व 7/12 च्या नोंदी यावरून सिध्द होते. तसेच सरपंचांच्या प्रमाणपत्रावरून तक्रारकर्ता क्र. 1 च्या पत्नीचा मृत्यु हा पाण्यात बुडून झाला ही बाब देखील सिध्द होते. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा निकाली निघावा याकरिता वारंवार विनंती करून सुध्दा त्यांचा दावा निकाली न काढणे म्हणजे Continuous Cause of action ठरते. त्यामुळे तक्रारकर्ते हे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
9. विरूध्द पक्ष 1 व 2 चे वकील ऍड. सचिन जैस्वाल यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्यांचा तक्रार अर्ज हा मुदतीत नसून तो खारीज करण्यात यावा. तसेच विरूध्द पक्ष 1 यांनी वेळोवेळी मागणी करून सुध्दा तक्रारकर्त्यांनी कागदपत्रे न दिल्यामुळे त्यांचा दावा प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात यावा.
10. तक्रारकर्त्यांचा तक्रार अर्ज, विरूध्द पक्ष यांचा जबाब तसेच तक्रारीमध्ये दाखल केलेली कागदपत्रे व दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्यांची तक्रार मुदतीत आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता क्र. 1 च्या पत्नीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे | होय |
3. | तक्रारकर्ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
4. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
11. तक्रारकर्त्यांनी श्रीमती रैनाबाई गजराव पंधरे हिचा मृत्यु दिनाक 15/09/2005 रोजी झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा मुदतीत सादर केला. विरूध्द पक्ष 3 यांचे पत्र क्रमांक 1403/2005 नुसार तक्रारकर्त्यांचा विमा दावा प्रस्ताव हा विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे पाठविण्यात आला होता. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांचा विमा दावा अजूनपर्यंत प्रलंबित ठेवल्यामुळे तक्रारकर्त्यांची Cause of action ही Continuous स्वरूपाची असल्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार ही मुदतीत आहे असे सिध्द होते.
12. तक्रारकर्त्यांनी त्यांच्या तक्रारीसोबत दाखल केलेल्या सरपंच, ग्राम पंचायत महारीटोला यांच्या दिनांक 24/04/2012 च्या प्रमाणपत्रानुसार श्रीमती रैनाबाई पंधरे हिचा मृत्यु दिनांक 15/09/2005 रोजी पुराच्या पाण्यात बुडून झाला हे दर्शविते. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या पत्नीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे ही बाब स्पष्ट होते. सरपंच हे जबाबदार व्यक्ती असून त्यांचा प्रत्यक्ष पुरावा हा त्या केसमधील प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून त्यांच्या प्रमाणपत्रावरून मृतकाचा मृत्यु पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्ते अशिक्षित असून त्यांची मानसिक अवस्था पाहता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिलेला नाही हे परिस्थितीतून स्पष्ट होते. तसेच रिपोर्ट दिल्यावर पोस्टमार्टेम व इतर कागदपत्रे तयार होतात. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला नाही म्हणून तो मृत्यु पाण्यात बुडून झाला नाही हे सिध्द होऊ शकत नाही.
13. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला 7/12 चा उतारा व फेरफाराची नोंद यावरून हे सिध्द होते की, तक्रारकर्ता क्र. 1 ची पत्नी ही शेतकरी असून तिच्या नावाने शेतजमीन होती. तक्रारकर्त्यांनी रितसर अर्ज करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांचा विमा दावा प्रलंबित ठेवला. तसेच कागदपत्र सादर करण्यासाठी त्यांनी तक्रारकर्त्यांना कुठलेही पत्र दिल्याबाबतचा पुरावा सदरहू प्रकरणात दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्यांचा दावा निकाली न काढणे ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्ते हे अपघाती विम्याचे रू. 1,00,000/- व्याजासह मिळण्यास तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- द्यावे. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 14/06/2012 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 10% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 3,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात कुठलाही आदेश नाही.