तक्रारदार : गैरहजर.
सामनेवाले : प्रतिनिधी वकील श्रीमती नानावटी मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे आय.सी.आय.सी.आय. बँकेचे अधिकारी आहेत व न्याय निर्णयामध्ये यापुढे त्यांना केवळ सा.वाली बँक असे संबेाधिले जाईल. तक्रारदारांचे सामनेवाले बँकेकडे बचत खाते आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना सुरवातीचे चार अंक 5177 असलेले क्रेडीट कार्ड पुरविले होते.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदारांच्या मागणी शिवाय हे क्रेडीट कार्ड सा.वाले यांनी तक्रारदारांना पुरविले होते. त्यातही तक्रारदारांनी आपल्या क्रेडीट कार्डमधील व्यवहाराबद्दल सा.वाले यांच्या रक्कमा जमा केलेल्या आहेत व कुठलीही रक्कम त्यांच्या क्रेडीट खात्यामध्ये देय नाही. या विपरीत अशी परिस्थिती असतांना देखील सा.यांनी तक्रारदारांच्या खात्यातील रक्कमेपैकी रु.17,500/- क्रेडीट कार्ड बाकी बद्दल अडकवून ठेवले. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे सा.वाले यांचे हे वर्तन म्हणजे तक्रारदारांचा अडवणूक करण्याचा प्रकार असून सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला. तक्रारदारांनी तसे जाहीर होऊन मिळावे व नुकसान भरपाई रु.15,000/- सा.वाले यांचेकडून वसुल होऊन मिळावेत तसेच रु.17,500/- खुले व्हावेत अशी ही दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केलें की, तक्रारदारांच्या मागणीवरुन व त्यांच्या अर्जाप्रमाणे तक्रारदारांना क्रेडीट कार्ड वर्षे 2006 मध्ये देण्यात आले होते. तेव्हा पासून तक्रारदार क्रेडीट कार्डचा वापर सतत करीत आहेत. तथापी तक्रारदारांनी एप्रिल, 2007 पासून क्रेडीट कार्डच्या खात्यामध्ये सतत बाकी ठेवली व तक्रारदारांचे धनादेश वटले नाहीत. अंतीमतः सा.वाले यांनी आपल्या बँकर्स लिन या अधिकाराचा करारनाम्याप्रमाणे वापर करुन तक्रारदारांच्या बचत खात्यातून रु.17,500/- अडकून ठेवले आहेत. या प्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कार्यवाहीचे समर्थन केले.
4. तक्रारदार व सा.वाले यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. सा.वाले यांनी दिनांक 8.6.2011 चे यादीसोबत तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड उता-याची प्रत दाखल केली आहे. सा.वाले यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यातील रु.17,500/-अडकवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार प्रस्तुत तक्रारीमध्ये नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदार हे आपल्या क्रेडीट कार्डचा वापर 2006 पासून करीत आहेत. तक्रारदारांना जर त्यांचे ईच्छेविरुध्द किंवा मागणी नसतांना सा.वाले यांनी क्रेडीट कार्ड दिले असते तर निच्छितच तक्रारदारांनी ते परत केलें असते अथवा वापरले नसते. तक्रारदार 2006 पासून क्रेडीट कार्डचा वापर करतात, त्या खात्यामध्ये काही वेळेस रक्कमा जमा करतात ही बाब असे दर्शविते की, तक्रारदारांच्या मागणीवरुन सा.वाले यांनी क्रेडीट कार्ड पुरविले.
7. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेत क्र.5 मध्ये तक्रारदारांच्या क्रेडीट खात्यामध्ये एप्रिल, 2007 ते जानेवारी, 2009 या कालावधीमध्ये जे वेगवेगळे व्यवहार झाले त्याचा तपशिल दिला आहे. त्यातील नोंदी वरुन असे दिसते की, तक्रारदारांनी कित्येक वेळेस देय रक्कम सा.वाले यांचेकडे जमा केलेली नाही. व कित्येक वेळेस देय रक्कमे पैकी कमी रक्कम जमा केली. उदा. जुलै,2007 मध्ये देय रक्कम 13,337/- असतांना तक्रारदारांनी रु.2520/- जमा केले. तर ऑगस्ट,2007 मध्ये कुठलीही रक्कम जमा केलेली नाही. सप्टेंबर,2007 मध्ये देय रु.15,852/- असतांना असतांना तक्रारदारांनी फक्त रु.3,951/- जमा केले. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेबर,2007 मध्ये कुठलेली रक्कम जमा केलेली नाही. या स्वरुपाच्या नोंदी मे, 2008 पर्यत आहेत. त्यानंतर जुन 2008 पासून जाने,2009 पर्यत कुठल्याही रक्कमा जमा केलेल्या नाहीत व जानेवारी, 2009 एकूण देय रक्कम रु.28,238.53 ही क्रेडीट कार्ड खात्यामध्ये देय होती.
8. सा.वाले यांनी दिनांक 8.6.2011 चे यादीसोबत तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्याचे विवरणपत्र हजर केलेले आहे. त्यातील नोंदी हया कैफीयतीमधील पच्छिेद क्र.5 मधील जी तालीका आहे त्यातील नोंदीशी मिळत्या जुळत्या आहेत. या वरुन तक्रारदार हे आपल्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचे बाबतीत अतिशय निष्काळजी होते असा निष्कर्ष काढवा लागतो.
9. अंतीमतः सा.वाले बँकेने कराराचे कायद्याच्या कलम 171 प्रमाणे आपल्या अधिकाराचा वापर करुन तक्रारदारांच्या खात्यामधील रु.17,500/- येवढी रक्कम गोठविली. सा.वाले यांची ही कार्यवाही बेकायदेशीर आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. या संदर्भात सा.वाले यांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या पुढील न्याय निर्णयाचा आधार घेतला. ब्रान्च मॅनेजर, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इतर विरुध्द टेले सुर्या राव II (1997) CPJ 67 (NC)त्यामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने बँकेच्या वरील अधिकाराचे समर्थन केले. वरील तरतुदीवरुन असा निष्कर्ष नोंदवावा लागतो की, तक्रारदारांनी सा.वाले यांना आपल्या बचत खात्याचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हे सिध्द करण्यास यशस्वी झाले नाहीत. सबब त्या नुकसान भरपाई अथवा अन्य दाद मिळण्यास पात्र नाहीत असा निष्कर्ष नोंदवावा लागतो.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 715/2008 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.