संयुक्त निकालपत्र :- (दि.27/06/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुत दोन्ही तक्रारीमधील तक्रार क्र.425/07 मध्ये नमुद तक्रारदार विरुपाक्ष रामचंद्र जुगळे हे सिध्देश्वर टेक्सटाईचे पार्टनर असून तक्रार क्र.426/07 मध्ये संगमेश्वर टेक्सटाईल चे प्रोप्रा. सौ.कमलादेवी रामचंद्र जुगळे या असून प्रस्तुत दोन्ही प्रकरणातील वादविषयात साम्य आहे. तसेच सामनेवालाही एकच असलेने प्रस्तुत दोन्ही प्रकरणात एकत्रित निकाल पारीत करणेत येत आहे. (02) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊनही सामनेवाला प्रस्तुत कामात हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. सदरच्या तक्रारी हया सामनेवाला बँकेने तक्रारदारांना लेटर ऑफ क्रेडीटची सुविधा वेळेत अदा न करुन सेवेत त्रुटी ठेवलेने दाखल केलेल्या आहेत. (03) ग्राहक तक्रार क्र.425/2007 व 426/2007 मधील तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी:-अ) ग्राहक तक्रार क्र.425/2007 मधील तक्रारदार हे सिध्देश्वर टेक्सटाईलचे पार्टनर आहेत. ग्राहक तक्रार क्र.426/2007 मधील तक्रारदार हे संगमेश्वर टेक्सटाईलचे प्रोप्रायटर आहेत. त्यांचा व्यवसाय हा पॉवर लूम्सवर कापड माल विणणेचा आहे. प्रस्तुत तक्रारदारांनी कापड माल विणणेकरिता दक्षिण कोरीया येथील डेडूक इंटरनॅशनल यांचेकडून ssangyong rapier loom, Model-JAGA II, YOM 2000यातील प्रत्येकी सहा सेट खरेदी करणेचे ठरवले व त्याप्रमाणे त्यांना सामनेवाला बॅंकेमार्फत प्रत्येकी रु.17,28,000/-इतकी रक्कम डी.डी.ने पाठवली. ती त्यांना पोहोचली आहे. उर्वरित रक्कम रु.9,,67,500/- प्रत्येकी लेटर ऑफ क्रेडीटने देणेचे ठरले. तक्रारदारांनी सदर लेटर ऑफ क्रेडीटची रक्कम रु.9,67,500/-(युएसडी रु.21,500) पाठवणेकरिता सामनेवाला बँकेत डी.डी.ने वीरशैव को-ऑप बँक लि. मुख्या शाखा कोल्हापूर यांचेमार्फत रक्कम रु.10,65,000/- इतकी भरणा केली. सदर रक्कम खातेवर जमा झालेनंतर दि.07/03/2007 रोजी सदर रक्कम लेटर ऑफ क्रेडीटसाठी सामनेवाला बॅंकेचे अनुक्रमे चेक क्र.115751 व चेक क्र.110301 ने F.D. against L.C. करिता ट्रान्सफर केले. त्याप्रमाणे सामनेवाला बँकेने डॉलरच्या प्रतिमुल्याच्या 10 टक्के प्रमाणे रु.10,65,000/- इतकी रक्कम एफ.डी. करुन घेऊन त्यापोटी रक्कम रु.9,67,500/- इतक्या रक्कमेच्या लेटर ऑफ क्रेडीट रक्कम जमा झालेपासून 3 दिवसांचे आत म्हणजेच दि.10/03/2007 रोजीअखेर देण्याचे काम सामनेवाला बँकेचे होते. सदर सेवेच्या बदल्यात कर व कमिशन म्हणून अनुक्रमे रु.8,418/- व रु.6,434/- इतकी रक्कम सामनेवाला यांनी स्विकारली. तक्रारदार हे सामनेवालांचे चालू खातेचे ग्राहक आहेत. प्रस्तुत रक्कम कुलमिन बँक,चुंग अॅन्ग टो बॅंक शाख डॉगडेगू कोरीया या बॅंकेस पाठवणेचे असताना व त्याची एक प्रत तक्रारदार यास देणेची असताना सामनेवाला यांनी सेवा देणेस कसुर केलेला आहे. सामनेवाला यांनी प्रस्तुतची रक्कम दि.22/03/2007 अखेर न दिलेने यातील वर नमुद संबंधीत विक्रेते यांनी प्रस्तुत रक्कम उशिरा पोहोचलेच्या कारणास्तव पूर्वी अदा केलेली रक्कम रु.17,28,000/- बुडीत झालेचे कळवले व पॉवर लूम देण्यास असमर्थता दर्शविली. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे रु.17,28,000/- इतकी रक्कम बुडाली तसेच पॉवर लुम्सही मिळाले नाहीत. सामनेवाला यांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे प्रस्तुत दोन्हीं तक्रारदारांना स्वतंत्ररित्या (प्रत्येकी) विनाकारण प्रवासासाठीचा झालेला खर्च रु.40,000/-मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्क्म रु.2,00,000/- व व्याज असे मिळून प्रत्येकी रु.19,68,000/- इतके नुकसान झाले. दि.31/8/2007 रोजी सामनेवालांना नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता सदर नोटीसला उत्तर दिलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करावी व नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी रक्कम रु.19,68,000/- तक्रारदारास देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (04) दोन्ही तक्रारदारांनी आपल्या तक्रारच्या पुष्टयर्थ प्रोफार्मा इन्व्हाईस, डी.डी. कर व कमिशनचे लेटर ऑफ क्रेडीट, एल.सी., एफ.डी.स्विकारलेचे पत्र, प्रवासाचे खर्चाची रिसीट, कर व कमिशन घेतलेबाबतचे बील, किमान प्रवासखर्चाचे इन्व्हाईस, क्रेडीट नोट, डिपॉझीट स्लिप, विक्रेत्यांचे पत्र, वकील नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (05) सामनेवाला यांनी प्रस्तुत दोन्ही तक्रारीमध्ये दाखल केलेल्या म्हणणेत साम्य आहे. त्यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदारांची तक्रार मान्य केली कथनाखेरीज परिच्छेदनिहाय स्पष्टपणे नाकारली आहे. तक्रारदारांचा व्यवसाय हा पॉवर लूमव्दारे कापड उत्पादनाचा असून सदर कारणासाठी बरेच कामगार आहेत. तक्रारदाराने प्रस्तुतची सेवा ही वाणिज्य हेतूने घेतलेली आहे. तक्रारदाराने मशनरी आयात करणेचा हेतू असलेने सामनेवालाने लेटर ऑफ क्रेडीट दिले. लेटर ऑफ क्रेडीटची सेवा ही पूर्णत: वाणिज्य हेतूसाठी आहे. सबब ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (1)(डी) नुसार तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेस पात्र नाही. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी. पुढे सामनेवाला असे प्रतिपादन करतात की, तक्रार अर्जातील कलम 1, 2 व 3 मधील मजकूर सर्वसाधारण खरा व बरोबर आहे. कलम 4 मधील मजकूराबाबत सामनेवाला बॅंकेने लेटर ऑफ क्रेडीट देणेपुरतीच मर्यादित आहे. तक्रारदारांनी नमुद विक्रेत्यास नमुद पॉवर लूम्स खरेदीसाठी रु.17,28,000/- सामनेवाला बँकेमार्फत दिलेची बाब सामनेवाला यांनी नाकारली आहे. तक्रारदारांनी बँकेपासून तसेच मे. मंचापासून माहिती लपवून ठेवलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीत केलेले कथन व सोबत जोडलेल्या कागदपत्रांनुसार तक्रारदारांस नमुद डेडूक इंटरनॅशनल या विक्रत्याकडून ssangyong rapier loom, Model-JAGA II, YOM 2000 यातील सहा सेट खरेदी करणेचे होते. सदर मशिनरींची किंमत 76,800 यु.एस.डॉलर्स इतकी असून सदर रक्कमेच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच 38,400 यु.एस.डॉलर्स ही टी/टी किंवा रोख देणेचे होते.उर्वरित 50 टक्के म्हणजेच 38,400 यु.एस.डॉलर्स इरिव्होकेबल एल/सी ने देणेचे होते. तक्रारदाराने रु.21,500/- यु.एस.डॉलर इतक्या रक्कमेच्या लेटर ऑफ क्रेडीटची मागणी केली. तक्रारदाराने उर्वरित रक्कमेची काय तरतुद केली हे स्पष्ट केलेले नाही. सामनेवाला बँकेने दि.10/03/2007 पर्यंत लेटर ऑफ क्रेडीट देणेची होती ही बाब नाकारली. लेटर ऑफ क्रेडीट अदा करणेसाठी किचकट प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. यामध्ये विविध कागदपत्रांची पूर्तता व तपासणी केलेनंतरच आयात-निर्यात पॉलीसी 2004-9 तसेच FEMA 1999 व RBI चे नियम. या नियमास अनुसरुन लेटर ऑफ क्रेडीट दयावे लागते. वर नमुद तरतुदी व नियमानुसार लागणा-या कागदपत्रांची पूर्तता झालेनंतरच सामनेवालांनी दि.22/03/2007 रोजी लेटर ऑफ क्रेडीट दिलेले आहे. प्रस्तुत लेटर ऑफ क्रेडीट पुणे शाखेस पाठवलेची महिती तक्रारदारास दिली होती. सदर माहिती मिळालेनंतरच तक्रारदाराने रु.10,65,000/- इतकी रक्कम दि.08/03/2007 रोजी कोल्हापूर शाखेत जमा केली आहे. दि.14/03/2007 रोजी तक्रारदाराने दि.08/03/2007 चा अर्ज व प्राथमिक कागदपत्रे दाखल केली. सदरचे सर्व कागदपत्रे पुणे शाखेला पाठवून दिली. दि.17 ते 19 मार्च-2007 रोजी सुट्टी असलेने लगेचच येणा-या दि.20/03/2007 रोजी पुणे शाखेने फाईल स्विकारुन तांत्रिक अडचणी (टेक्नीकल क्युरीज) माहिती दिली. दि.21/03/007 ला सदर बाबींचे तक्रारदाराने पुणे शाखेत जाऊन निरसन केले. तदनंतर दि.22/03/2007 रोजी लेटर ऑफ क्रेडीट तक्रारदारास दिलेले आहे. तक्रारदारने प्रस्तुत लेटर ऑफ क्रेडीट दि.10/3/2007 अथवा विशिष्ट तारखेस पोहोच करणेबाबत कधीही सुचविलेले नाही. याउलट तक्रारदाराने प्रस्तुत फॉर्म हा दि.14/03/2007 रोजी दिलेला आहे. तक्रारदाराचे रक्कम रु.17,65,000/- सामनेवाला जबाबदार नाहीत. तसेच तक्रारदाराचे अन्य मागण्यासाठीही सामनेवाला हे जबाबदार नाहीत. प्रस्तुतची तक्रार ही दिशाभूल करणारी असून खरी व बरोबर नाही. दि.31/8/2007 चे तक्रारदाराने पाठविलेल्या नोटीसमध्ये रु.20,08,000/- 18 टक्के व्याजासह नुकसानीची मागणी केलेली आहे. सदर रक्कम मे. मंचाचे आर्थिक अधिकारक्षेत्राबाहेरील असलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र नाही. कोणत्याही कायदेशीर कृतीसाठी दाद मागणेची झाल्यास मुंबई येथील कोर्ट ट्रिब्युनल व फोरममध्ये दाद मागता येईल असे तक्रारदाराने मान्य केले असलेने सबब प्रस्तुतची तक्रार ही मे. मंचात चालणेस पात्र नाही. तक्रारदार व सामनेवाला बँकेमध्ये घडलेला व्यवहार हा वाणिज्य हेतूने (Commercial Purpose) असलेने तक्रारदार हे ग्राहक नाहीत. तसेच प्रस्तुतची सेवा ही वाणिज्य हेतूने घेतली असलेने प्रस्तुत कायदयाच्या कलम 2 (ओ)प्रमाणे समाविष्ट होत नसलेने प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत यावी तसेच कॉम्पेसेंटरी कॉस्ट रु.10,000/- तक्रारदाराकडून सामनेवाला यांना देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी प्रस्तुत मंचास केली आहे. (06) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ लेटर ऑफ क्रेडीटसाठी इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. (07) तक्रारदारांच्या तक्रारी, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी महणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतच्या तक्रारी मे. मंचात चालणेस पात्र आहेत काय? --- होय. 2. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- नाही. 3. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- अ) सामनेवालांनी तक्रारदार हे ग्राहक होत नसलेचा मुद्दा उपस्थित केला आहे; सदर बाबींचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाला यांचे चालू ठेव खातेदार आहेत. तसेच तक्रारदारांनी लेटर ऑफ क्रेडीटची सुविधा घेणेसाठी रक्क्म भरणा केलेली आहे. तक्रारदारांनी सामनेवालांकडून लेटर ऑफ क्रेडीटची सुविधा घेतलेली आहे व सदर सेवेसाठी योग्य ते मुल्य अदा केलेले आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. ब) तक्रारदार हे नमुद फर्मचे पार्टनर असून तेथे अनेक कामगार आहेत. तसेच लेटर टू क्रेडीट सेवा ही पूर्णत: वाणिज्य हेतूसाठी आहे. सबब तक्रारदार यांनी कमर्शिअल पर्पजसाठी सदरची सेवा घेतलेबाबतचा मुद्दा सामनेवाला यांनी उपस्थित केला आहे. सदर बाबींचा विचार करता तक्रारदार हे नमुद फर्मचे अनुक्रमे पार्टनर व प्रोप्रायटर असून नमुद फर्ममध्ये किती कामगार होते अथवा त्यांचा मोठया प्रमाणावर नफा प्रेरित हेतूने व्यवसाय करीत होते हे सामनेवाला यांनी दाखवून दिलेले नाही. तक्रारदारास त्याचे व्यवसायासाठी परदेशातून पॉवर लुम्स खरेदी करावयाचे होते. यावरुन सामनेवालांनी व्यावसायिक (वाणिज्य) हेतूचा निष्कर्ष काढलेला आहे. मात्र त्याबाबत कायदेाशीर पुरावा अथवा प्रॉडक्शन अर्ज दिलेला नाही. सबब केवळ कथनाखेरीज सामनेवालांकडे वाणिज्य हेतूबाबतचा अन्य कोणताही पुरावा नसलेने सामनेवालांचा सदरचा आक्षेप फेटाळणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. क) सामनेवाला यांनी आर्थिक अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. प्रस्तुत बाबींचा विचार करता लेटर ऑफ क्रेडीट ही सुविधा रु.9,67,500/- इतक्यापर्यंतच मर्यादित होती. तसेच तक्रारदाराने आपल्या तक्रारीत विनंती कलमात केलेली मागणी ही रुपये वीस लाखाचे आत असलेने प्रस्तुत तक्रार चालवणेचे आर्थिक अधिकारक्षेत्र या मंचास येते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- तक्रारदारांनी डेडयॅक इंटरनॅशनल या विक्रेत्याबरोबर ssangyong rapier loom, Model-JAGA II, YOM 2000 यातील प्रत्येकी सहा सेट खरेदी करणेचे ठरवले व त्याप्रमाणे प्रत्येकी रु.17,28,000/- इतकी रक्कम तक्रारदारांनी पाठवली व ती नमुद विक्रेत्यास पोहोचली आहे. व ठरलेप्रमाणे उर्वरित रक्कम रु.9,67,500/-($ -21,500 ) प्रत्येकी लेटर ऑफ क्रेडीने देणेचे ठरले त्याप्रमाणे रु.10,65,000/- इतकी रक्कम दि.07/3/2007 रोजी चेक क्र.115751 व्दारे F.D. Against L.C. करिता ट्रान्सफर केली. त्यासाठी सामनेवाला बँकेने डॉलरच्या प्रतिमुल्याच्या 10 टक्के वाढीप्रमाणे रक्कम भरुन घेतली हे दि.07/03/2007 च्या धनादेश व बँकेचे चलनावरुन सिध्द होते. तक्रारदारांनी दाखल केलेला 11 जानेवारी-2007 च्या प्रोफॉर्मा इन्व्हाईसप्रमाणे नमुद 6 सेटची किंमत प्रति सेट 12,800/- डॉलरप्रमाणे 76,800/- डॉलर इतकी होती. सदर रक्कमेपैकी 38,400/- डॉलर टी.टी/कॅशने देणेचे होते व उर्वरित 38,400/- डॉलर लेटर ऑफ क्रेडीटने दयावयाचे होते. सदर इन्व्हाईसचा विचार करता तक्रारदाराने रु.17,28,000/- नमुद विक्रेत्यास डी.डी. ने पाठवलेबाबत नमुद केले आहे. तसेच 21,500 डॉलरसाठी लेटर ऑफ क्रेडीट सामनेवाला बँकेकडून घेतलेली आहे. वस्तुत: वर नमुद इन्व्हाईसप्रमाणे 38,400/- लेटर ऑफ क्रेडीट घेण्याऐवजी तक्रारदाराने 21,500/- इतके क्रेडीट घेतलेले आहे. उर्वरित 16,900 डॉलरच्या क्रेडीटचे काय केले याबाबत तक्रारदाराने मौन बाळगलेले आहे. सामनेवाला बॅकेने दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये दि.07/03/2007 रोजीचे तक्रारदाराने त्यांना दिलेले प्रोफॉर्मा इन्व्हाईस दाखल केलेले आहे. सदर इन्व्हाईसनुसार वर नमुद 6 सेटची किंमत प्रतिसेट 8,000/- डॉलर असून एकूण 6 सेटची किंमत 48,000/- डॉलर इतकी आहे. नमुद इन्वहाईसप्रमाणे दि.16/02/2007 रोजी डाऊन पेमेंट म्हणून 26,500/- डॉलर पी/टी ने देणेचे होते व उर्वरित 21,500/- डॉलर लेटर ऑफ क्रेडीटने देणेचे होते. प्रस्तुत दोन्ही इन्हवाईसचा विचार करता तक्रारदाराकडेच दोन्ही इन्व्हाईस होती. त्याने स्वत: दाखल केलेल्या इन्वहाईसमध्ये वेगळा व्यवहार दिसून येतो व बँकेस दिलेल्या इन्व्हाईसमध्ये वेगळा व्यवहार दिसून येतो. सबब तक्रारदार हा स्वच्छ हाताने सदर मंचासमोर आलेला नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. वादकरिता तक्रारदाराने बँकेकडे दिलेला इन्व्हाईस ग्राहय धरला तर प्रस्तुत रक्कम लेटर ऑफ क्रेडीटव्दारे नमुद विक्रेत्यास देणेबाबतचा अर्ज तक्रारदाराने दि.08/03/2007 रोजी तयार केलेला आहे. मात्र प्रस्तुतचा अर्ज सामनेवाला बँकेकडे दि.14/03/2007 रोजी मिळालेबाबतचे पत्र प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने दाखल केलेले आहे. प्रस्तुतचा व्यवहार हा आंतरराष्ट्रीय व्यवहार असलेने नमुद सेट आयात करणेसाठीचा आहे. सबब त्या संदर्भातील योग्य त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केलीखेरीज लेटर ऑफ क्रेडीट दिले जात नाही. सामनेवाला बँकेकडून प्रस्तुतचा अर्ज त्यांचे पुणे येथील कार्यालयात पाठवला गेला. तदनंतर तांत्रिक अडचणीचे तक्रारदाराने निरसन केलेनंतर तक्रारदारास दि.22/3/2007 रोजी लेटर ऑफ क्रेडीट दिलेले आहे. नमुद कालावधीचे दरम्यान दि.17 ते 19 मार्च-2007 रोजी सुट्टी असलेने सुट्टीचा कालवधी त्यामध्ये व्यतीत झालेला आहे. तक्रारदाराचे सामनेवाला यांनी रक्कम भरणा करुनही लेटर ऑफ क्रेडीट सुविधा दिली नाही अशी नसून सदर सुविधा वेळेत दिली नाही. त्यामुळे सदर व्यवहारापोटी दिलेली रक्कम बुडीत होऊन नुकसान झालेची आहे. सदर बाबींचा विचार करता प्रस्तुतचा अर्ज सामनेवालांचे पुणे येथील कार्यालयास प्राप्त झालेपासून दि.14 मार्च ते 21 मार्च-2007 अखेर होणा-या दिवसातून सुट्टीचे 3 दिवस वजा जाता पाच दिवसामध्ये व वादाकरिता 8,मार्च2007 ते 21 मार्च-2007 अखेर 11 दिवसामध्ये सामनेवालांनी तातडीने कार्यवाही करुन लेटर ऑफ क्रेडीट दिलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच तक्रारदाराने प्रस्तुतची सुविधा 3 दिवसात देणेस सामनेवाला बांधील होते असे कथन केले आहे. सदर बाबीचा विचार करता सामनेवाला बँकेकडे दाखल केलेल्या प्रोफॉर्मा इन्व्हाईसनुसार डाऊनपेमेंट दि.16/02/2007 रोजी 26,500 डॉलर टी.टी. ने देणेचे होते व उर्वरित रक्कम L/C ने देणेचे होते. सदर इन्व्हाईसमध्ये प्रसतुतची रक्कम किती कालावधीत दयावयाची होती हे स्पष्टपणे नमुद केलेले नाही. तसेच त्याबाबतची लेखी अथवा तोंडी सुचना तक्रारदाराने सामनेवालांना दिलेची दिसून येत नाही. वादाकरिता अशी सुचना जरी दिली असती तरी आर.बी.आय.चे नियम आंतरराष्ट्रीय व्यवहार कायदयासंबंधीचे नियम तसेच FEMA-1999 चे तरतुदींनुसार कायदेशीर पूर्तता झालेनंतरच लेटर ऑफ क्रेडीट दिले जाते. सामनेवाला बँकेने योग्य त्या कालावधीत (रिझनेबल टाईम) लेटर ऑफ क्रेडीट सुविधा दिलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीने त्यांचे अधिकृत वेबसाईटवर लेटर ऑफ क्रेडीटची सुविधा 3 दिवसात देणेबाबत प्रसिध्द केले आहे. त्यासंबंधातील प्रस्तुत वेबपेजच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. सदर प्रतीचे अवलोकन केले असता एल.सी.सुविधेबाबत अशाप्रकारची मुदत नमुद केलेचे दिसून येत नाही. याउलट ट्रान्सफर फंडस थ्रू यूवर एटीएम/डेबीट कार्ड या माहितीखाली कार्ड टू कार्ड व्यवहार तीन दिवसात पूर्ण करणेबाबत नमुद केले आहे. सबब प्रस्तुतची प्रसिध्दी ही एल.सी.साठी नसून ए.टी.एम/डेबीट कार्डमधून रक्कम ट्रान्सफर करणेबाबतची आहे. सबब तक्रारदाराने दि.10/03/007 अखेर प्रस्तुत एल.सी. सुविधा देण्यास सामनेवाला बँक बांधील होती हे दाखल पुराव्यावरुन दिसून येत नाही. सबब वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला बँकेने कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदारांच्या तक्रारी नामंजूर करणेत येतात. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |