श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 24/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी गैरअर्जदार बँकेकडून गृहकर्ज घेतले होते. त्यामुळे तो त्यांचा ग्राहक आहे. त्यांनी या गृहकर्जापोटी दुसरीकडे मोठा फ्लॅट घ्यावयाचा असल्याचे कर्ज खाते बंद करण्याच्या दृष्टीने गैरअर्जदाराकडे जाऊन चौकशी केली, तेव्हा गैरअर्जदाराचे कर्मचारी श्री. अनूप यांनी फोरक्लोजर चार्जेससह रु.1,03,895/- एवढी रक्कम जमा करण्यास सांगितले व तशी पावती देण्यात आली. त्यापूर्वी तक्रारकर्त्याने वेळोवेळी गैरअर्जदाराच्या कर्जाचे हफ्ते इ.सी.एस.द्वारे आपले खात्यातून भरले होते. तक्रारकर्त्याने 18.08.2010 ला गैरअर्जदाराचे कर्मचा-याने दिलेल्या पावतीप्रमाणे पूर्ण रक्कम भरुन खाते बंद केले व गैरअर्जदाराकडे जमा असलेले मुळ दस्तऐवज मागितले कारण दस्तऐवज मुंबई येथे आहे, 20-25 दिवसात परत मिळतील असे सांगितले. वेळोवेळी चौकशी केली, दस्तऐवज परत मिळाले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांना आपला फ्लॅट विकता आला नाही व कमी पैश्यात विकावा लागला. यासंबंधाने रु.1,00,000/- नुकसान त्यांना झाले. दरम्यान गैरअर्जदाराचे खात्यात तक्रारकर्त्याने अशी रक्कम भरल्यानंतर दोनदा ई.सी.एस.द्वारे दि.08.11.2010 व 07.12.2010 रोजी प्रत्येकी रु.3378/- प्रमाणे हफ्त्यांची कपात केली. नोटीस मिळाल्यानंतरसुध्दा अशी कपात करण्यात आली. नोटीसला मात्र उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल करुन, तीद्वारे त्याचे बँक खात्यातून काढून घेतलेली रक्कम रु.6756/- ही 24 टक्के व्याजासह परत मिळावी, फ्लॅटसंबंधी सर्व मूळ दस्तऐवज आणि कोरे धनादेश परत मिळावे, त्यांना झालेल्या सर्व प्रकारामुळे मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.50,000/- भरपाई गैरअर्जदाराने द्यावी, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारीसोबत तक्रारकर्त्याने एकूण 5 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आला असता गैरअर्जदारांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व तक्रारीतील विपरीत विधाने नाकबूल केली आणि असा उजर घेतला की, त्यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची कारवाई केली नाही. तक्रारकर्त्याने कर्जाची रक्कम भरल्यानंतर ई.सी.एस. सुविधा स्वतःच्या बँकेला सुचना देऊन बंद करावयास पाहिजे होती हा त्यांचा दोष आहे. तसेच तक्रार खारीज करण्याची मागणी केली.
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर, मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. यातील गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याची विधान नाकारले असले व फोरक्लोजर संबंधाने कोणताही स्पष्ट बचाव घेतला नसला तरीही युक्तीवादा दरम्यान खाते बंद झाले होते व कर्जाची रक्कम संपुष्टात आली होती याबाबी नाकारुन असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारकर्त्याचे कर्ज खाते कधीही बंद करण्यात आले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला या प्रकरणात मुळ पावती दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यांनी मुळ पावती दाखल केली. दोन्ही पावत्यांमध्ये फोजरक्लोजर चार्जेसच्या ठिकाणी “ ” अशी खुण करण्यात आलेली आहे आणि तक्रारकर्त्याजवळून रु.1,03,895/- रक्कम स्विकारण्यात आलेली आहे. गैरअर्जदाराने ही रक्कम नेमकी कशाकरीता स्विकारली याबाबत खुलासा केलेला नाही. तक्रारकर्त्याने नोटीस दिला त्याला गैरअर्जदाराने उत्तरही दिले नाही. उलट तक्रारकर्त्याच्या खात्यातून नोटीसपूर्वी व नोटीसनंतर ई.सी.एस.प्रणालीद्वारा दोन हफ्ते गृह कर्ज खात्यात वळते केले. याबाबी या प्रकरणात स्पष्ट झालेल्या आहे आणि गैरअर्जदारांची ही कृती अनुचित व्यापार प्रथा आहे आणि त्यांच्या सेवेत गंभीर त्रुटी आहे, कारण तक्राकर्त्याने जर खाते बंद केले होते, तर पुढे यासंबंधीची सुचना गेरअर्जदाराने आपल्याकडे नोंदवून घेऊन तक्रारकर्त्याचे पुढील हप्त्याची वसुली करण्याचे कोणतेही प्रयोजन नव्हते. मात्र गैरअर्जदाराचे वरील कृतीवरुन ते किती अयोग्यरीत्या आपले काम करतात हे स्पष्ट होते. यानंतर गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला 13.04.2011 रोजी रोजी नोटीस देऊन त्यांच्या हफ्ता भरला नाही असे कळविले आहे. तक्रारकर्त्याच्या खात्यातील बेकायदेशीरपणे ई.सी.एस.प्रणालीचा वापर करुन रक्कम गैरअर्जदाराने कपात केली आहे व त्यामुळे तक्रारकर्त्यास अन्य देय रकमेचा भरणा करता आला नाही असाही तक्रारकर्त्याचा आरोप आहे. वरील संपूर्ण परिस्थिती, गैरअर्जदाराची अनुचित व्यापारी प्रथा व अयोग्य सेवा दिल्याबद्दल स्वयंस्पष्ट आहे. यास्तव खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून अयोग्यरीत्या वसुल केलेली रक्कम रु.6,756/- ही वसुल केल्याची तारीख 07.12.2010 पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह अदाएगीपावेतो परत करावी.
3) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांना मुळ फ्लॅटचे दस्तऐवज व कोरे धनादेश परत करावे.
4) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासाबद्दल रु.25,000/- नुकसान भरपाई गैरअर्जदारांनी द्यावी. गैरअर्जदाराने सदर नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचा-यांपैकी योग्य चौकशी करुन दोषी कर्मचा-यांच्या वेतनातून वसुल करावी.
5) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत करावी.