श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार -
:- नि का ल प त्र :-
[दिनांक 12/मे/2011]
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार जाबदेणार बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत होते. तक्रारदारानी जाबदेणार बँकेस रक्कम रुपये 37,143/- चा धनादेश दिला तो दिनांक 7/4/2006 चेक पेमेंट रिसीव्ह समरी अकाऊंट एप्रिल 2006 मध्ये दाखविण्यात आला. त्यानंतर बँकेनी तक्रारदारास दिनांक 15/4/2006 रोजी फोन करुन तक्रारदाराचे दोन चेक रक्कम रुपये 37,143/- व 7,143/- परत आल्याचे व ताबडतोब रक्कम भरावी असे सांगण्यात आले. तक्रारदारानी दिनांक 16/4/2006 रोजी जाबदेणार यांच्या कार्यालयात जाऊन परत आलेले चेक दाखवावे अशी विनंती केली. तक्रारदारास चेक दाखविण्यात आले नाहीतच परंतू ताबडतोब रक्कम न भरल्यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट 138 कलमाखाली कारवाई केली जाईल असे तक्रारदारास कळविण्यात आले. त्यामुळे तक्रारदारानी यु.टी.आय बँकेतून रक्कम रुपये 38,000/- काढून बँकेत भरली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी रक्कम रुपये 7,143/- चा चेक जाबदेणार बँकेत कधीच भरला नव्हता. तरीही जाबदेणार बँकेनी तक्रारदारास ही रक्कम भरावयास लावली. जाबदेणार यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 37,143/- व रुपये 9930/- लास्ट बॅलेन्स म्हणून भरावयास सांगितली. त्याप्रमाणे तक्रारदारानी रक्कम भरली. त्यावेळी जाबदेणार यांनी रक्कम रुपये 9930/- ची पावती तक्रारदारास दिली, परंतू रक्कम रुपये 37,143/- ची पावती तक्रारदारास देण्यात आली नाही. ही रक्कम अॅडजेस्ट करण्यात आली असे तक्रारदारास सांगण्यात आले. तक्रारदारानी चौकशी केली असता बॅलेन्स नील असल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले. त्यानंतर सहा महिन्यांनी दिनांक 28/9/2006 रोजी समरी अकाऊंट मध्ये रक्कम रुपये 37,143/- चेक परत व रुपये 7,143/- रिफन्डेड असे दाखविण्यात आले. म्हणून तक्रारदारानी व्यवस्थापक हैद्राबाद व श्री. अनुराग अरोरा, मॅनेजर, सुमो हाऊस यांना खुलासेवार पत्र दिली. त्यांनी श्री. विशाल मांडवे व श्री. प्रशांत चव्हाण, मॅनेजर यांच्याकडे तक्रारदाराचे प्रकरण सोपविले. सुनावणीनंतर श्री. मांडवे यांनी रक्कम रुपये 20,000/- पाच हप्त्यात भरण्याची तयारी ठेवा, असे तक्रारदारास सांगितले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करुनही, संपर्क साधूनही जाबदेणार यांच्याकडून उत्तर आले नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून खोडसाळपणे नोंदी रक्कम रुपये 37,143/- व रुपये 7,143/-, मन:स्ताप व आर्थिक खर्चाची नुकसान भरपाई यापोटी रक्कम रुपये 50,000/- मागतात. तसेच धनादेश बरोबर असूनही तसा नसल्याचा आरोप, व रक्कम रुपये 7,143/- ना खरेदी ना चेक तक्रारदाराच्या नावावर नोंद केली यापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 49,500/- एकूण रक्कम रुपये 99,500/- 12 टक्के व्याजासह मिळावे अशी मागणी करतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांचेविरुध्द मंचानी दिनांक 7/4/2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी दाखल केलेल्या दिनांक 10/4/2006 च्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटची मंचानी पाहणी केली असता त्यात दिनांक 7/4/2006 रोजी रक्कम रुपये 37,143/- चा चेक जमा नोंद आहे. चेक मिळूनही तो चेक न मिळाल्याचे तक्रारदारास फोन व मोबाईलवर मेसेज देण्यात आले, रक्कम न भरल्यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम 138 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले. दिनांक 10 मे 2006 च्या तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डची पाहणी केली असता दिनांक 13/4/2006 रोजी रक्कम रुपये 7,143/- चा चेक रिटर्न व रिटर्न चेक पेमेंट फी रुपये 250/- वसूल केल्याचे दिसून येते. तर दिनांक 10/10/2006 च्या स्टेटमेंटवरुन दिनांक 28/9/2006 रोजी रक्कम रुपये 7,143/- चा चेक मिळाल्याचे व त्याचदिवशी रक्कम रुपये 37,143/- चेक पेमेंट रिर्व्हेसल ची नोंद दिसून येते. हे सर्व तक्रारदारानी जाबदेणार यांच्या निदर्शनास आणल्यावर जाबदेणार यांनी चौकशी करुन तक्रारदारास रक्कम रुपये 10,000/- भरावयास सांगून फायनल सेटलमेंट करावयास सांगितले. म्हणून तक्रारदारानी जाबदेणार यांच्याकडे रुपये 10,000/- पावती क्र.6535123 दिनांक 27/9/2008 रोजी भरले. तक्रारदारानी जाबदेणार यांनी सांगितलेल्या सर्व रक्कमा भरुनही तक्रारदारास अटक वॉरंट काढून रहाते घरास सिल करण्याचे आदेश व कोर्टात हजर करण्याचे समन्स असल्याच्या धमक्या दिल्या, म्हणून तक्रारदारानी पोलिसात तक्रार केली, त्याची प्रतही रेकॉर्डवर दाखल करण्यात आलेली आहे.
जाबदेणार बँकेनी तक्रारदाराच्या खात्याच्या नोंदी व्यवस्थित न ठेवल्याने चेक परत आल्याचे तक्रारदारास कळविल्यावर तक्रारदाराने मागणी करुनही परत आलेले चेक जाब देणा-यांनी दाखविलेले नाहीत. यावरुन जाबदेणा-यांनी व्यवहारात पादर्शकता न ठेवता, रक्कम देणेसाठी धमकी देण्याची भुमिका घेतल्याचे दिसून येते. या भुमिकेचा अवलंब म्हणजेच जाबदेणार यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी दिसून येते. यासर्वांमुळे तक्रारदारास निश्चीतच मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला असेलच असे मंचाचे मत आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेस पात्र आहेत.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/- या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून चार आठवडयात दयावी.
3. आदेशाची प्रत दोन्ही पक्षास विनामूल्य पाठविण्यात यावी.