(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार मा. सदस्या)
(पारीत दिनांक– 08 नोव्हेंबर,2021)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे तो मोठा बाजार, भंडारा येथे भाडयाचे दुकानात श्रीराम जनरल स्टोअर्स या नावाने दुकान चालवितो. यातील विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा येथील विमा कंपनीचे शाखा कार्यालय आहे तर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी ही मुख्य शाखा आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंक असून, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके कडून सदर दुकानावर रुपये-1,00,000/- एवढया रकमेचे गहाण कर्ज काढले होते. कर्ज रकमेच्या सुरक्षिततेसाठी विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा येथील विमा कंपनीचे कार्यालया मधून विमा पॉलिसी क्रं-47459996 विमा रक्कम रुपये-2,00,000/- ची काढली होती आणि सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-25.03.2017 पासून ते दिनांक-24.03.2018 असा होता. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेनी सदर विमा पॉलिसीचे प्रिमीयम रकमेची कपात तक्रारकर्त्याचे खात्यामधून करुन प्रिमियमची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी मध्ये जमा केली होती. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विमा पॉलिसी जारी करण्या आधी तक्रारकर्त्याचे दुकानाची प्रत्यक्ष मोक्यावर भेट देऊन चौकशी केली होती, त्यावेळी तक्रारकर्त्याचे दुकान सुरळीत चालू होते. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके मधून घेतलेल्या कर्ज खात्याचा क्रं 122 असा असून तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेला प्रत्येक महिन्यात मालाचा तपशिल देत होता. दिनांक-02.07.2017 रोजीचे तपशिला नुसार त्याचे दुकाना मध्ये रुपये-2,95,000/- चा माल होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-12.06.2017 रोजी अनोळखी जे.सी.बी.च्या चालकाने त्याचे दुकानाचे छत पाडले व त्यामुळे त्याचे रुपये-2,95,000/- एवढया मालाचे नुकसान झाले, त्या बाबत त्याने तक्रार पोलीस स्टेशन भंडारा येथे दिली असून त्या संबधात अपराध क्रं-525/17 कलम-447, 448, 426 भा.दं.वि. नुसार पोलीसांनी नोंद केला. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडे नुकसान भरपाई दाखल विमा रकमेची मागणी केली असता, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे मुख्य कार्यालयाने दिनांक-10.01.2018 रोजीचे पत्रान्वये त्याचे कडून दस्तऐवजाची मागणी केली. त्या अनुसार तक्रारकर्त्याने रुपये-1,50,000/- क्लेम फार्म भरुन दिला आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे मागणी प्रमाणे दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी मध्ये सादर केले. सदर क्लेम फॉर्म व दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे मुख्य कार्यालयात सादर केले. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे मुख्य कार्यालयाने दिनांक-26.02.2018 रोजीचे पत्र तक्रारकर्त्याचे नावे देऊन त्याचा क्लेम कायदया मध्ये बसत नाही कारण तक्रारकर्त्याचे दुकानाचे बांधकाम सन-1970 चे असून ते पडक्या स्थितीत होते असे त्यात नमुद करुन विमा दावा नामंजूर केला.
या संदर्भात तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने त्याचे भाडयाचे दुकानाचे प्रत्यक्ष मोका निरिक्षण करुनच विमा पॉलिसी जारी केली होती. प्रत्यक्ष मोका निरिक्षणाचे वेळी दुकान ज्या स्थिती मध्ये होते त्याच स्थिती मध्ये घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक-12.06.2017 रोजी होते. या शिवाय विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेनी सुध्दा त्याला कर्ज मंजूर करताना त्याचे दुकानाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी दुकानाची मोक्का पाहणी करुन चुकीचा अहवाल दिला की, त्याचे दुकान हे एक वर्षा पासून बंद आहे. वस्तुतः विम्याचे वैध कालावधी मध्ये त्याचे दुकानाचे नुकसान झालेले असून विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-26.02.2018 रोजीचे पत्रान्वये चुकीचे कारण नमुद करुन त्याचा विमा दावा नामंजूर केलेला आहे. तो विमा कंपनीचा ग्राहक असून त्याचा विमा दावा नामंजूर केल्याने त्यास आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून त्याने वकीलांचे मार्फतीने दिनांक-19.05.2018 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून विरुध्दपक्षां कडून विमा दाव्याची रक्कम रुपये-1,50,000/- मिळावी अशी मागणी केली परंतु सदर नोटीस सर्व विरुध्दपक्षांना मिळूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही वा लेखी उत्तर दिले नाही. म्हणून शेवटी त्याने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्त्याचे दुकानाची विमा पॉलिसी क्रं-47459996 अनुसार विमा दाव्याची रक्कम रुपये-1,50,000/- आणि सदर विमा रकमेवर दिनांक-26.02.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज विरुध्दपक्षांनी त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- त्याला झालेल्या आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे. या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. परिच्छेद निहाय उत्तरे देताना परिच्छेद क्रं 1, 2, 5 तसेच क्रं 8 ते 10 हा अभिलेखाचा भाग असल्याने उत्तर देण्याची आवश्यकता नसल्याचे नमुद करुन परिच्छेद क्रं-3 व 4 मधील मजकूर नामंजूर केला. विशेष कथनात नमुद केले की, नुकसानीचे घटनेची माहिती मिळाल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मे.प्रोक्लेम इन्शुरन्स सर्व्हेअर अॅन्ड लॉस अॅसेसर इंडीया प्रा.लि.यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली. विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी वारंवार दस्तऐवजांची पुर्तता करण्या बाबत लेखी पत्र पाठवून सुध्दा तक्रारकर्त्याने सर्व्हेअर यांचे मागणी प्रमाणे दसतऐवजांची पुर्तता केली नाही. विमा कंपनीने सुध्दा तक्रारकर्त्याशी संपर्क साधून दस्तऐवजाची पुर्तता करण्यास सांगितले होते. शेवटी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-10.01.2018 रोजीचे पत्रान्वये तक्रारकर्त्यास कळविले होते की, दिनांक-25.01.2018 पर्यंत दस्तऐवजाची पुर्तता न केल्यास त्याचा विमा दावा नामंजूर केल्या जाईल परंतु तक्रारकर्त्याने विमा दाव्या संबधात कोणतीही रुची दाखविली नाही. उपलब्ध असलेल्या कागदपत्रां वरुन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी दिनांक-20.02.2018 रोजी अंतिम सर्व्हे अहवाल सादर करुन अभिप्राया मध्ये विमा दावा देय नसल्याचे नमुद करुन त्या बाबतची कारणे सुध्दा नमूद केलीत. सर्व्हेअर यांचे अहवाला वरुन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-20.02.2018 रोजीचे पत्र तक्रारकर्त्यास देऊन त्याचा विमा दावा नामंजूर केला. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा निर्णय योग्य असल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी असे नमुद केले.
04. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात तक्रारकर्त्याचे श्रीराम जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून सदर दुकानावर विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके कडून रुपये-1,00,000/- रकमेचे गहाण कर्ज घेतले होते आणि कर्जाचा खाते क्रमांक-122 असा आहे. कर्ज रकमेच्या सुरक्षिततेसाठी विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेच्या मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून रुपये-2,00,000/- रकमेची विमा पॉलिसी क्रं-47459996 काढली होती आणि सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-25 मार्च,2017 ते दिनांक-24 मार्च, 2018 पर्यंत वैध होता या सर्व बाबी मान्य केल्यात. तक्रारकर्ता हा प्रत्येक महिन्यात विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके मध्ये दुकानात असलेल्या मालाचा तपशिल देत होता आणि दिनांक-02.07.2017 रोजीचे तपशिला नुसार त्याचे दुकाना मध्ये रुपये-2,95,000/- रकमेचा माल होता. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेनी तक्रारकर्त्याला कर्ज दिले असल्यामुळे कर्ज रकमेच्या सुरक्षितते करीता विमा असणे आवश्यक होते, त्याप्रमाणे विरुदपक्ष क्रं 3 बॅंकेनी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून दुकानाची विमा पॉलिसी काढली होती आणि त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीची आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेचा कोणताही संबध येत नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेनी लेखी उत्तरा सोबत लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत एफ.आय.आर. रिपोर्ट, तक्रारकर्त्याचे दुकानात दिनांक-02.07.2017 रोजी असलेल्या मालाचा तपशिल, पोलीस स्टेशन यांनी त.क.ला दिलेली सुचना, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्यास दस्तऐवजाची मागणी बाबत दिलेले दिनांक-10.01.2018 रोजीचे पत्र, दिनांक-26.02.2018 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्यास दिलेले विमा दावा नामंजूरीचे पत्र, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीसची प्रत, रजिस्टर पोस्टाच्या पावत्या, पोस्ट ट्रॅकींग रिपोर्ट, विमा पॉलिसी प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तक्रारकर्त्याने शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तरा सोबत लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच उत्तरा सोबत तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे दिलेली तक्रार, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेला दिलेली सुचना, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी दिलेला अंतिम अहवाल, विमा कंपनीने तक्रारकर्त्यास दिलेले विमा दावा नामंजूरीचे पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
07. प्रकरणातील उभय पक्षां तर्फे दाखल उपलब्ध दस्तऐवज, तक्रारकर्त्याची तक्रार, साक्ष पुरावा, लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तर व लेखी युक्तीवाद, विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेचे लेखी उत्तर इत्यादीचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्रीमती पशीने आणि विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील कु. ए.व्ही.दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारकर्त्याचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
2 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
::निष्कर्ष::
मुद्दा क्रं 1 बाबत
08. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे दिनांक-12.06.2017 रोजी त्याचे दुकानाची छत अज्ञात जे.सी.बी.चालकाने पाडून त्याचे दुकानातील मालाचे रुपये-2,95,000/- एवढया रकमेचे नुकसान केले आणि त्या संबधात त्याने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली असता पोलीसांनी गुन्हा नोंदविला, त्या संबधीचे पोलीस दस्तऐवज त्याने तक्रारी सोबत दाखल केलेत. त्याने विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके मधून सदर दुकानावर रुपये-1,00,000/- चे कर्ज घेतले होते आणि कर्जाचे सुरक्षिते करीता विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेच्या मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची रुपये-2,00,000/- एवढया रकमेची विमा पॉलिसी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे शाखा कार्यालयातून काढली होती आणि त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे रुपये-1,50,000/- एवढया रकमेचा विमा दावा दाखल केला होता व त्याप्रमाणे त्याला विमा दाव्याची रक्कम व्याजासह मिळावी.
09. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तरा मध्ये त्यांनी दिनांक-10.01.2018 रोजीचे पत्रान्वये तक्रारकर्त्यास कळविले होते की, दिनांक-25.01.2018 पर्यंत दस्तऐवजाची पुर्तता न केल्यास त्याचा विमा दावा नामंजूर केल्या जाईल परंतु तक्रारकर्त्याने विमा दाव्या संबधात कोणतीही रुची न दाखविता दस्तऐवज दिले नाहीत. उपलब्ध असलेल्या कागदपत्रां वरुन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी दिनांक-20.02.2018 रोजी अंतिम सर्व्हे अहवाल सादर करुन त्याव्दारे विमा दावा देय नसल्याचे नमुद करुन त्या बाबतची कारणे सुध्दा नमूद केलीत. त्यानुसार विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-20.02.2018 रोजीचे पत्र तक्रारकर्त्यास देऊन त्याचा विमा दावा नामंजूर केला. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी युक्तीवादात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी मध्ये त्याचे दुकान अज्ञात जे.सी.बी. च्या उपकरणाने पाडलेल्या अवस्थेत दिसत आहे कारण रात्री खूप पाऊस आलेला नाही परंतु विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेला दिलेल्या सुचनेत तक्रारकर्त्याने नमुद केले की, दिनांक-12.07.2017 रोजी रात्री आलेल्या जोरदार पावसामुळे दुकानाचे स्लॅब कोसळलेले आहे अशाप्रकारे एकाच घटने बाबत विसंगती दर्शविल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खोटी आहे.
10. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेच्या लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्त्याचे श्रीराम जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके कडून रुपये-1,00,000/- रकमेचे गहाण कर्ज घेतले होते. कर्ज रकमेच्या सुरक्षिततेसाठी विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेच्या मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून रुपये-2,00,000/- रकमेची विमा पॉलिसी क्रं-47459996 काढली होती आणि सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-25 मार्च, 2017 ते दिनांक-24 मार्च, 2018 पर्यंत वैध होता. तक्रारकर्ता हा प्रत्येक महिन्यात विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके मध्ये दुकानात असलेल्या मालाचा तपशिल देत होता आणि दिनांक-02.07.2017 रोजीचे तपशिला नुसार त्याचे दुकाना मध्ये रुपये-2,95,000/- रकमेचा माल होता या बाबी मान्य केल्यात.
11. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी दिलेल्या अहवालाचे जिल्हा आयोगा व्दारे अवलोकन केले. सदर सर्व्हे अहवाला मध्ये तक्रारकर्त्याचे भाडयाचे दोन खोल्यांचे दुकान आहे, दुकान असलेली ईमारत 1970 सालातील बांधलेली आहे, सन-2013 मध्ये काही दुकाने नगर परिषदेने पाडलेली असून कारणे माहित नाही. विमाधारकाने दिनांक-11 जुलै, 2017 चे रात्री 22.00 वाजता दुकान बंद केले आणि दुसरे दिवशी सकाळी 09.30 वाजता दुकान उघडले असता ते क्षतीग्रस्त दिसून आले. घटनेच्या रात्री जोरदार पाऊस पडला नसल्याचे चौकशीत आढळून आले. आर.सी.सी.सिलींग आणि भिंती कोसळलेल्या दिसून आल्यात. तक्रारकर्त्याने नुकसान झालेला माल दाखविला नाही. लाकडी रॅकचे अंशतः नुकसान झाल्याचे दिसून आले. तक्रारकर्त्याचे दुकान हे मागील एक वर्षा पासून बंद असल्याचे चौकशीत समजले त्यामुळे विमा दावा देय नसल्याचे अहवालात नमुद केलेले आहे.
12. तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी मध्ये घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक-12.07.2017 चे रात्री अज्ञात जे.सी.बी.चालकाने दुकानचे छत पाडून दुकानाचे नुकसान केल्याचे नमुद केले तर विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेला दिलेल्या सुचनेत दिनांक-12.07.2017 चे रात्री जोरदार पावामुळे त्याचे दुकानाचे स्लॅब कोसळून त्याचे दुकानातील मालाचे रुपये-2,00,000/- चे नुकसान झाले. यावर विरुध्दपक्ष क्रमांक 1 व क्रं 2 विमा कंपनीने घेतलेली भूमीका की तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार खोटी आहे या मध्ये जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येत नाही. तक्रारकर्त्याने पोलीसां मध्ये दिलेली तक्रार अद्दापही प्रलंबित आहे व शोध कार्य चालू आहे, जो पर्यंत पोलीस तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत कशामुळे नुकसान झाले हे माहित होऊ शकत नाही परंतु काहीही झालेले असले तरी तक्रारकर्त्याचे दुकानातील मालाचे निश्चीतपणे नुकसान झालेले आहे. कोणीही सर्वसामान्य व्यक्ती नुकसान झाल्या शिवाय पोलीस मध्ये तक्रार करणार नाही. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, दुकान असलेली ईमारत 1970 ची बांधली असल्याचे सर्व्हे अहवालात नमुद केले असले तरी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे दुकानाची प्रत्यक्ष पाहणी करुन विमा पॉलिसी जारी केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-10 जानेवारी, 2018 रोजीचे पत्रान्वये दिनांक-01 जुलै, 2017 ते 26 जुलै, 2017 खरेदी विक्री रजिस्टर, मार्च-2017 ते जून-2017 कालावधीचे बॅंक स्टॉक स्टेटमेंट, बॅलन्स शिट मार्च-2015, मार्च-2016, मार्च-2017 अखेर अशा दस्तऐवजाची मागणी तक्रारकर्त्या कडून केलेली आहे व तक्रारकर्त्याने सदर दस्तऐवजाची पुर्तता केली नसल्याने विमा दावा खारीज केल्याचे नमुद केले.
13. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेच्या मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडून दुकानाची विमा पॉलिसी काढली होती. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेच्या लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्ता हा प्रत्येक महिन्यात विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके मध्ये दुकानात असलेल्या मालाचा तपशिल देत होता आणि दिनांक-02.07.2017 रोजीचे तपशिला नुसार त्याचे दुकाना मध्ये रुपये-2,95,000/- रकमेचा माल होता या बाबी मान्य केल्यात.
14. असे असले तरी तक्रारकर्त्याचे दुकानाचे छत पडून नुकसान झाल्याची बाब दाखल पोलीस तक्रारी वरुन अमान्य करता येणार नाही आणि तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असल्याचे पोलीसांचे म्हणणे नाही तसेच पोलीस तपास चालू असल्याचे पोलीस दस्तऐवजा वरुन दिसून येते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे मागणी प्रमाणे बॅंक स्टॉक स्टेटमेंट, बॅलन्स शिट ईत्यादी दस्तऐवजाची पुर्तता केली नाही ही बाब लक्षात घेतली तरी विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेचे लेखी उत्तरा प्रमाणे त्याचे दुकानात दिनांक-02.07.2017 रोजीचे तपशिला नुसार रुपये-2,95,000/- चा माल होता असे नमुद आहे. तक्रारकर्त्याने रुपये-1,50,000/- चा विमा दावा दाखल केलेला असला तरी सर्वसाधारण परिस्थितीत त्याचे रुपये-1,05,000/- एवढया रकमेचे नुकसान झाले असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक आयोगास काढण्यास कोणतीही अडचण नाही. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, सर्व्हेअर यांना प्रत्यक्ष पाहणीचे वेळी दुकानाची छत कोसळल्याचे दिसून आल्या नंतरही क्षतीग्रस्त माल दाखविला नाही तसेच दस्तऐवजाची पुर्तता केली नाही म्हणून कोणताही विमा दावा देय नाही अशी जी भूमीका घेतलेली आहे तीच मूळात चुकीची दिसून येते. वस्तुतः विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेचे मार्फतीने विमा पॉलिसी काढलेली असल्याने सर्व्हेअर स्टॉक संबधीचा तपशिल विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंके कडून मागू शकले असते परंतु त्यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही वा तसे त्यांचे म्हणणे सुध्दा नाही. तक्रारकर्त्याला त्याचे झालेल्या नुकसानी संबधात कोणतीही रक्कम मंजूर न झाल्यामुळे साहजिकच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे आणि तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे त्याला विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडून शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- अशी नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचित राहिल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रकरणात खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं -1 ईफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत व्यवस्थापक, मुंबई आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ईफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत व्यवस्थापक, भंडारा यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला विमाकृत दुकानाचे झालेल्या नुकसानी बाबत रुपये-1,05,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष पाच हजार फक्त) एवढी रक्कम अदा करावी आणि सदर रकमेवर विमा दावा नाकारल्याचा दिनांक-26.02.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत दयावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने न केल्यास सदर विमा रक्कम आणि त्यावर आदेशित व्याज आणि मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने दंडनीय व्याज यासह येणारी रक्कम तक्रारकर्त्याला देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.
3. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याला दयावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष क्रं 3 बॅंकेनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्याला दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त संच त्यांनी जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.