Complaint Case No. CC/16/107 |
| | 1. Yash Sudhir Kane | Pitruchaya Near of Dr. Kelakar Hospital Ramdaspeth Akola | Akola | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Manager, I.D.B.I Bank Station Road, Akola | Station Road Akola | Akola | Maharashtra | 2. Manager, Axis Bank, Pune | Karve Road Branch Satilt Floor, CTS No. 1189/25, Plot No.3, Arihant Pune | Pune | Maharashtra | 3. Manager, I.C.I.C.I. Bank, Pune | Karve Road Branch Satilt Floor, CTS No. 1189/25, Plot No.3, Arihant Pune | Pune | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: आ दे श ::: ( पारीत दिनांक :21.03.2017 ) आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर न झाल्याने, त्यांचे विरुध्द सदर तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. उभय पक्षांनी दाखल केलेले दस्त, व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकून, काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला. - दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा ग्राहक असल्याचे दिसून येत असल्याने व यावर विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा आक्षेप नसल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्ता हा आय.एल.एस.कॉलेज पुणे येथे कायद्याचे शिक्षण शिकत आहे. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या शाखेमध्ये बचत खाते असून, त्याचा क्र. 05111000084464 हा आहे. या खात्यावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास एटीएम कार्ड वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तक्रारकर्त्यास पैशाची आवश्यकता असल्यामुळे दि. 24/4/2016 रोजी संध्याकाळी अंदाजे 6.00 ते 6.30 वाजताचे दरम्यान पैसे काढण्याकरिता म्हणून सर्वप्रथम विरुध्दपक्ष क्र.3 यांचे लोलगे कॉर्नर, कर्वे रोड, पुणे स्थित एटीएम मशिनमध्ये रक्कम काढण्याकरिता गेला होता. पैसे काढण्याकरिता कार्ड मशीनमध्ये टाकुन आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरही रक्कम न मिळाल्यामुळे, रकमेअभावी निघुन आला. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे एटीएम मशीनवर रु. 20,000/- काढण्याकरिता तक्रारकर्ता लगेच गेला. रक्कम मिळण्याकरिता करावी लागणारी संपुर्ण प्रक्रिया तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या एटीएम मशीनमध्ये पुर्ण केल्यानंतरही तेथे देखील रक्कम प्राप्त झाली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा सदरहु एटीएम मशिनच्या बाजुलाच लागून असलेल्या एच.डी.एफ.सी बँकेच्या एटीएम मशिन मधुन आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर तक्रारकर्त्यास रु. 10,000/- ची रक्कम प्राप्त झाली. त्यानंतर अधिकची रक्कम रु. 5,000/- काढण्याकरिता प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर त्या मशिनद्वारे असे सुचविण्यात आले की, तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध नाही. त्यानंतर लगेच तक्रारकर्त्यास अधिकृत भ्रमणध्वनी क्र. 8275525550 या क्रमांकावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेतर्फे संदेश प्राप्त झाला की, त्याने या पुर्वी वापर केलेल्या एटीएम मशीन मधुन पैसे काढून घेतले आहे व तशी नोंद विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या खात्यात झाली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने ताबडतोब संदेशामध्ये नमुद केलेला क्रमांक 1800221070 यावर संपर्क साधुन विरुध्दपक्ष क्र. 3 व 2 यांच्या एटीएम मशीनद्वारे एटीएम कार्डाचा उपयोग करुनही रक्कम प्राप्त झालेली नाही, ही बाब कळविली. वर नमुद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याच्या बचत खात्यामधुन दोन वेळा रु. 10,000/- रक्कम काढण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा दिला गेलेला संदेश हा पुर्णपणे चुकीचा आहे. तक्रारकर्त्याने दि. 13/6/2016 रोजी ईमेलद्वारे विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठवून, वजा करण्यात आलेली रु. 10,000/- ची रक्कम परत खात्यामध्ये वळती करावी, अशी सुचना दिली व त्यानंतर 20 जुन 2016 रोजी या बाबत विरुध्दपक्ष क्र. 1 यांना एटीएम मशीनचा उपयोग केल्याबाबतची देखील माहीती देवून, त्या बाबत चौकशी करावी अशी विनंती केली. परंतु विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याचे कुठलेही कारण न देता फक्त तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे, असे कळविले. फक्त एकदाच रु. 10,000/- तक्रारकर्त्यास प्राप्त होवूनही विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्याच्या बचत खात्यातून दोन वेळा तशी रक्कम काढल्या गेली आहे, असे दर्शवून चुकीची नोंद खाते उता-यात नोंदविली व त्यामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यातून रु. 10,000/- अधिकची रक्कम वजा करण्यात आलेली आहे, हे विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे कृत्य पुर्णपणे गैरकायदेशिर असून सेवेमध्ये अक्षम्य अशी त्रुटी दाखविली आहे. विरुध्दपक्ष यांच्या नियमानुसार व रिझर्व बँकेने आदेशीत केलेल्या नियमानुसार एटीएम मशीन बसविलेली संपुर्ण जागा ही सी.सी. कॅमे-या अंतर्गत तेथे येणा-या प्रत्येक व्यवहाराचे व कृत्याचे चित्रीकरण करण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे तक्रारकर्ता हा जेंव्हा सर्वप्रथम रक्कम काढण्याकरिता म्हणून विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्या एटीएम मशीनमध्ये गेला होता व नंतर विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या एटीएम मशीन मध्ये गेला होता, त्या बाबतचे दि. 24/4/2016 रोजीचे संपुर्ण चित्रण झालेले आहे, ते झालेले संपुर्ण चित्रण विरुध्दपक्ष यांनी सांभाळून ठेवावे म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 यांना स्पष्टपणे कळविले होते व सदरहु चित्रण केलेली चित्रफीत ही विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांच्या ताब्यात असल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांना देखील विरुध्दपक्ष संबोधण्यात येवून त्या सर्वांचे विरुध्द आदेश पारीत करावा, म्हणून ही तक्रार दाखल करण्यात येत आहे. सदरहु चित्रफित ही विरुध्दपक्ष यांनी वि. मंचासमक्ष सादर करावी म्हणून सदरहु चित्रफित हया तक्रारीचा निकाल लागेपर्यंत नष्ट करण्यात येवू नये असे नोटीसद्वारे विरुध्दपक्ष यांना कळविले आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास त्यांच्या एटीएम मशिनी मधुन तक्रारकर्त्यास न मिळालेली रक्कम रु. 10,000/- तक्रारकर्त्यास परत करावी व विरुध्दपक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी दाखविली असून गैर व्यापारी पध्दतीचा अवलंब केला आहे असे घोषीत करावे. तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व्याजासह मिळावी तसेच नोटीस खर्च रु.3000/- व तक्रार खर्च रु. 10,000/- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्यावे.
- यावर, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या जबाबात असे म्हटले आहे की, एटीएम मशीनद्वारे होणारे व्यवहार नेट सेटलमेंट प्रमाणे होतात व ज्या बँकेच्या एटीएम कार्डद्वारे दुस-या बँकेच्या एटीएम मशीनमधुन रक्कम काढल्या गेली तर ज्या बँकेत एटीएम कार्डधारकाचे खाते असेल ती बँक एटीएम मशीनचा वापर केलेल्या बँकेस प्रत्यक्ष रक्कम अदा करीत नाही, तर एटीएम मशीन असलेल्या सर्व बँकेच्या नेट सेटलमेंटनुसार सदर रक्कम अदा केली जाते. वर नमुद पध्दतीनुसार तक्रारकर्त्याने दि. 24/4/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी जारी केलेल्या एटीएम कार्डद्वारे प्रत्येकी रु. 10,000/- दोन वेळेस एटीएम मशीनमधुन काढण्याचा केलेला व्यवहार पुर्णत्वास गेला आहे व त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याचे खात्यात एकूण रु. 20,000/- नावे टाकली आहे. तक्रारकर्त्याने केलेल्या तक्रारीची रितसर शहानिशा केली असता, त्यांनी दि. 24/4/2016 रोजी फक्त रु. 10,000/- प्राप्त झाले ही बाब चुकीची आढळली. तक्रारकर्त्याचे तक्रारीनुसार विरुध्दपक्ष क्र. 1 याने तक्रारकर्त्यास रितसर कळविले आहे. येणे प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 नम्रपणे निवेदन करतात की, त्यांनी अर्जदारास द्यावयाच्या सेवेत कोणताही कसुर केलेला नाही व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे विरुध्द दाखल केलेला तक्रार अर्ज, खर्चासहीत फेटाळण्यात यावा.
- उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलेाकन केले. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 ह्यांचे विरुध्द अंतरिम आदेश पारीत करण्यात आला होता. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 बँकेनी त्यांच्या लोलगे कॉर्नर, कर्वे रोड, पुणे स्थित ए.टी.एम. मशीन केंद्रातील दि. 24/04/2016 रोजीचे सी.सी.टी.व्ही. कॅमे-यातील चित्रण, या तक्रारीचा अंतीम निकाल लागेपर्यंत जैसे थे ठेवून नष्ट न करण्याचा आदेश या मंचाने विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 ला दिला होता. परंतु नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 मंचासमोर हजर झाले नाही व त्यांनी सी.टी.टी.व्ही. चे नमुद तारखेचे चित्रण मंचासमोर दाखल केले नाही. सबब विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांच्या वरील बेजबाबदार वर्तणुकीचा मंचाने अंतीम आदेशाचे वेळी योग्य तो निष्कर्ष काढला आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या जबाबात तक्रारकर्त्याला प्राप्त न झालेले रु. 10,000/- विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यापैकी कोणत्या बँकेला अदा केले, याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही, परंतु युक्तीवादाच्या वेळी दाखल केलेल्या दस्तांवरुन विरुध्दपक्ष क्र. 2 बँकेच्या एटीएम मशीन मधुन तक्रारकर्त्याला रु. 10,000/- मिळाल्याचे नमुद केलेले दिसून येते. तसेच दि. 2/9/2016 रोजीच्या विरुध्दपक्ष क्र. 2 च्या एटीएम च्या ट्रान्झॅक्शन वरुन तक्रारकर्त्याला प्रथम एटीएम मधुन रक्कम प्राप्ती झाली नसल्याचे दिसून येते. परंतु लगेचच एका मिनीटांनी तक्रारकर्त्याला सदर रक्कम प्राप्त झाल्याचे नमुद केलेले दिसून येते. परंतु सदर बाब तक्रारकर्त्याने नाकारलेली असून मंचापुढे तक्रार दाखल करण्यापुर्वीच व अंतरिम अर्जाद्वारे दि. 24/10/2016 रोजीचे विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 च्या लोलगे कॉर्नर, कर्वे रोड पुणे स्थीत एटीएम मशीन केंद्रातील सी.सी.टी.व्ही. कॅमे-यातील चित्रण जैसे थे, ठेवून नष्ट न करण्याची मागणी केली होती. तक्रारकर्त्याचा अंतरिम अर्ज मंचाने मंजूरही केला होता. परंतु त्याची दखल विरुध्दपक्ष क्र. 2 ने घेतली नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 यांना ईमेलद्वारे मागणी केलेल्या कागदपत्रांची, 1) ATM Log, 2) ATM Cash Balancing Report, 3) ATM Balancing Report, 4) ATM Switch Report, 5) Pin Hole Images, 6) CCTV Footages, इत्यादिची पुर्तता विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी केल्याचे दिसून येत नाही. म्हणून विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांची बाजु मंचासमोर, हजर राहुन सिध्द केली नसल्याने व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यातील रु. 10,000/- विरुध्दपक्ष क्र. 2 यांना अदा केल्याचे सिध्द होत असल्याने, विरुध्दपक्ष क्र. 2 यांचेकडून तक्रारकर्ता, रु. 10,000/- दि. 24/4/2016 पासून प्रत्यक्ष देय तारखेपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के व्याजदराने, व्याजासह रक्कम व इतर नुकसान भरपाईसह प्रकरणाचा खर्च मिळण्यास पात्र असल्याचे मंच ग्राह्य धरत आहे. सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे...
-
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याला रु. 10,000/-( रुपये दहा हजार फक्त ) दि. 24/4/2016 पासून प्रत्यक्ष अदाई तारखे पर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याजासह द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/-(रुपये तिन हजार फक्त ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार फक्त ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.
| |