::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे दिनांक ०५.०९.२०१३ रोजी ७ वर्षासाठी गुंतवणूक व मृत्यू विमा करार क्र. १८०३५७६४ व १८०३६११० प्रत्येकी रक्कम रु. २००००/- प्रमाणे एकूण रक्कम रू. ४०,०००/- सामनेवाले यांच्या योजनेमध्ये गुंतविले. सदर योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांस प्रतिमाह पेन्शन मिळेल असे सांगितले. परंतु त्याप्रमाणे सामनेवाले यांनी पूर्तता न केल्याने तक्रारदारांनी दिनांक १०.०४.२०१४ व दिनांक ०७.०५.२०१४ रोजी सामनेवाले यांच्या कार्यालयात जावून सदर रक्कम परत मागितली असता सामनेवाले यांनी प्रतिउत्तर न दिल्याने तक्रारदार यांनी दिनांक ०३.०९.२०१५ रोजी सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून करारातील अटींची पुर्तता करणेंस लेखी कळविले. त्यानंतरही सामनेवाले यांनी तक्रारदारांस गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत न दिल्याने तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार गुंतवणूक रक्कम व्याजासह अदा करावी, तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती केली आहे.
३. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, तक्रारदार यांनी विमा प्रतिनिधी यांना आवश्यक सामनेवाले असताना समाविष्ट न केल्याने, तक्रार अमान्य करण्यात यावी असे वादकथन केले. सामनेवाले यांनी IRDA यांच्या नियमाप्रमाणे सर्व अटी व शर्तीचे पालन करुन तक्रारदारासोबत विमा करार केलेला असून, तक्रारदारास विमा करार प्रत प्राप्त झाल्यानंतर विमा करार रद्द करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी होता. सदर कालावधीमध्ये तक्रारदार यांनी कोणताही आक्षेप न घेतल्याने त्यानंतर विमा करार रद्द करणे न्यायोचित नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
४. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्राबाबत पुरशीस, लेखी युक्तिवादाबाबत व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय? नाही
२. आदेश तक्रार अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १
५. सामनेवाले यांच्या विमा करार अटी व शर्तीप्रमाणे व IRDA यांच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे तक्रारदार यांस विमा करार प्रत प्राप्त झाल्यानंतर विमा करार रद्द करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी होता. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून घेतलेले विमा संरक्षण अटी व शर्तीच्या अधीन असून त्याबाबतची तक्रार विहित मुदतीत करणे तक्रारदार यांचेवर बंधनकारक आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा कराराची प्रत पाठविली असल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिद्ध होत नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारास दिलेल्या विमा कराराबाबत कोणताही आक्षेप असल्यास विहित मुदतीत लेखी स्वरुपात सादर करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी सदर कालमर्यादेचे पालन न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्वये “सेवा” या संज्ञेची व्याप्ती पाहता कालमर्यादेबाहेरील विमा करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येणार नाही, असे न्यायतत्व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, तक्रारदारांनी सदर तक्रार कालमर्यादेबाहेरील विमा करार सेवेबाबत दाखल केल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर न केल्याची बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. २
६. मुद्दा क्रं. १ च्या विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २११/२०१५ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाहीत.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.