-ः निकालपत्र ः- द्वारा- मा.सदस्या सौ.ज्योती अभय मांधळे, . 1. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे- तक्रारकर्ती ही पनवेल येथील रहिवासी असून सामनेवाले ही विमा कंपनी आहे. तक्रारकर्तीकडे तिच्या स्वतःच्या मालकीची अँल्टो एल.एक्स.आय.ही कार असून तिची नोंदणी पेण आर.टी.ओ.मध्ये झाली आहे. नोंदणी झाल्यावर सदर अँल्टो गाडीला एम.एच/06/ए.एन-7099 हा नंबर मिळाला आहे. तक्रारकर्तीने सामनेवालेकडे तिच्या गाडीसाठी विमा उतरवला आहे. तक्रारकर्तीने तिच्या गाडीचा अपघात विमा दि.5-4-09 ते 31-4-10 या कालावधीसाठी उतरवला होता. तक्रारकर्ती तिच्या कुटुंबासह कर्नाटक येथे तिच्या गावी जाताना तिच्या गाडीला कर्नाटक राज्यात येलपूर, जि.कारवा या गावी अपघात झाला. सदर अपघातात गाडीचे खूप नुकसान झाले. अपघातानंतर तिने ती गाडी नेरुळ, मुंबई येथील रॉयल अँटो गॅरेज यांचेकडे दुरुस्तीसाठी आणली व सामनेवालेना सदर अपघाताची माहिती त्वरीत कळवली. सामनेवालेनी श्री.संदेश या सर्व्हेअरला दि.18-4-09 रोजी गाडीची पहाणी करण्यासाठी/सर्व्हे करणेसाठी पाठवले. सर्व्हेअरने त्याच दिवशी गाडीचा सर्व्हे केला व तक्रारदाराकडून गाडीचा क्लेम फॉर्म भरुन घेतला. त्यासाठी तिला रु.80,000/- खर्च आला. तक्रारदारानी सदरची सर्व बीले सामनेवालेकडे सादर केली. त्यानंतर तक्रारदारानी सामनेवालेकडे अनेकवेळा त्यांच्या गाडीचा क्लेम मिळण्यासाठी फे-या मारल्या व कंपनीच्या मॅनेजरलाही भेटत आहेत. प्रत्येक वेळी सामनेवालेनी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर दि.6-7-09 रोजी सामनेवालेनी तक्रारदाराला पत्र देऊन त्यांचा क्लेम नामंजूर केल्याचे कळवले. सदर पत्र पाहिल्यावर तक्रारदार पुन्हा सामनेवालेंकडील संबंधित अधिका-याना जाऊन भेटले व नुकसानभरपाईची मागणी केली, त्यावेळी संबंधित अधिका-यांनी त्यांना असे सांगितले की, त्यांनी नो क्लेम बोनस घेतल्यामुळे त्यांना नुकसानभरपाईची रक्कम देता येणार नाही. दि. 24-7-09 रोजी तक्रारदारानी सामनेवालेना तिच्या वकीलातर्फे नोटीस पाठवली परंतु सामनेवालेनी तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. सामनेवालेनी तिचा क्लेम नाकारल्यामुळे व प्रतिसाद न दिल्यामुळे शारिरीक व मानसिक त्रास सोसावा लागला. सदरची नुकसानी मिळण्यासाठी अनेकदा तिला कंपनीकडे भाडयाची गाडी न्यावी लागली. त्यामुळे तिला शारिरीक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सोसावे लागले. तक्रारकर्तीची विनंती अशी की, तिने दाखल केलेल्या दुरुस्ती बिलाची रक्कम व्याजासह मिळावी, तसेच शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- मिळावेत. न्यायिक खर्चापोटी तिने रु.5,000/-ची मागणी केली आहे. 2. तक्रारदारानी तक्रारीसोबत नि.4 अन्वये कागदपत्राची यादी दाखल केली असून त्यात कंपनीकडे उतरवलेली पॉलिसी, अपघाताबाबत सामनेवाले कंपनीकडे केलेला क्लेम फॉर्म, सामनेवालेनी तक्रारदारास दिलेले पत्र, दुरुस्ती बील, सामनेवालेना पाठवलेली नोटीस, एफ.आय.आर.इ.कागदपत्रांचा समावेश आहे. 3. नि.6 अन्वये तिने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.8 अन्वये मंचाने सामनेवालेना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करणेचे निर्देश दिले. नि.13 अन्वये सामनेवालेनी लेखी जबाब व सोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सामनेवाले आपल्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार खोटी असून ती चालवण्याचा मंचाला अधिकार नसल्यामुळे ती फेटाळण्यात यावी. तक्रारकर्तीने त्यांच्याकडे तिच्या गाडीसाठी विमा उतरवला होता. सदर विमा दि.5-4-09 ते 31-4-10 या कालावधीसाठी होता. तक्रारकर्तीने त्यांच्याकडून पॉलिसी घेतेवेळी जे अंडरटेकिंग कम डिक्लेरेशन दिले होते त्यात त्यांनी पूर्वीचे विमा कंपनीकडून क्लेम घेतला होता ही बाब लपवून ठेवली आहे. वास्तविकतः तक्रारकर्तीने पूर्वी काय घडले हे न लपवता त्याचा खुलासा करणे आवश्यक होते. तक्रारकर्तीने सदर बाब लपवून ठेवल्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाला कारण पॉलिसी देणे व घेणे हे दोन्ही विश्वासावर अवलंबून असते. परंतु तक्रारदारानी नो क्लेम बोनसबाबत सामनेवालेना अंधारात ठेवून पॉलिसी घेतली आहे. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत आपण पूर्वी नो क्लेम बोनसची रक्कम घेतली होती ती रक्कम आपण परत करणेस तयार असल्याचे म्हटले होते, परंतु प्रत्यक्षात तिने तसे सामनेवालेस सांगितले नाही. तसेच तक्रारदारानी तिच्या कार्यकक्षेत तक्रार दाखल केली असल्यामुळे ती फेटाळण्यात यावी असे सामनेवालेनी म्हटले आहे. 4. दि.3-5-11 रोजी सदरची तक्रार अंतिम सुनावणीसाठी आली असता उभय पक्षकार व त्यांचे वकील गैरहजर होते. तसेच दि.8-2-11 रोजी सुध्दा तक्रारदार गैरहजर होते. सदरची तक्रार चालविण्यात तक्रारकर्तीला स्वारस्य नसल्याचे दिसून येत असल्यामुळे ही तक्रार काढून टाकावी या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 5. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहेत- -ः आदेश ः- 1. तक्रार क्र.175/10 नामंजूर करण्यात येत आहे. 2. खर्चाचे वहन उभय पक्षकारानी स्वतः करावे. ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई. दि. 3-5-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |