नि. 18
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 147/2011
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 03/06/2011
तक्रार दाखल तारीख : 06/06/2011
निकाल तारीख : 15/03/2013
-----------------------------------------------------------------
श्री नितीन महादेव काळे
वय वर्षे – 45, व्यवसाय – हॉटेल व्यवसाय
रा.8, मनोहर, लोकल बोर्ड कॉलनी,
टाटा पेट्रोल पंपाच्या मागे, गेस्ट हाऊस, सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
मॅनेजर, एच.डी.एफ.सी.बँक
जिल्हा परिषद समोर, सांगली
ता.मिरज जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड तेजस्वीनी सागांवकर
जाबदारतर्फे : अॅडए.आर.कोरे
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुत प्रकरणात जाबदार यांचेविरुध्द अशी तक्रार आहे की, जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.1,00,000/- मर्यादेचे क्रेडीट कार्ड अदा केले, त्याद्वारे तक्रारदार यांनी रु.82,455/- चे सोने खरेदी केले. सदर रकमेची परतफेड ठराविक हप्त्याने रु.70,000/- जमा करुनही जाबदारांनी रक्कम रु.1,04,212-13 येणे दर्शविली व त्याप्रमाणे ते मागणी करीत आहे व योग्य अकाऊंट स्टेटमेंट देत नाहीत. सदर रक्कम अवास्तव असल्याने तक्रारदार यांनी सदरची तक्रार या मंचासमोर दाखल केली आहे.
2. सदर प्रकरणात तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, तक्रारदार हे जाबदार बँकेचे ग्राहक असून जाबदार बँकेमध्ये तक्रारदारांच्या नावे सेव्हिंग्ज खाते नं.02222000009753 असा आहे. तक्रारदारांच्या बँक खात्यावरील बँक व्यवहार पाहून जाबदार बँकेने तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/- मर्यादेचे क्रेडीट कार्ड पोस्टाने पाठविले होते. तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डचा नंबर 4050285000211589 असा असून त्याची वैधता ऑगस्ट 2009 ते सप्टेंबर 2012 अशी होती. दि.4/5/2010 रोजी तक्रारदार यांनी मे.पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ व जव्हेरी दुकान सांगली यांचेकडून रक्कम रु.82,455/- चे सोने खरेदी केले. सदर बिल तक्रारदार यांनी क्रेडीट कार्डद्वारे बिल नं.जीजे/10280 ने अदा केलेले आहे. या अनुषंगाने दि.4/5/2010 रोजी नंतर जाबदार यांनी आपल्या क्रेडीट खात्यावर दरमहा ठराविक रक्कम रु.5,300/- भरले आहेत. तक्रार दाखल करेपर्यंत रोख तथा चेकने रु.70,000/- पेक्षा रक्कम बँकेत जमा केली आहे. मात्र दि. 11/5/2011 रोजी जाबदारांनी तक्रारदारांना पाठविलेल्या क्रेडीट कार्ड स्टेटमेंटमध्ये अद्यापी रक्कम रु.1,04,212-93 येणे असल्याचे कळविले. सदर स्टेटमेंटमध्ये बी.आर.कॅश कलेक्शन चार्जेस रु.5,370/-, लेट फी रु.500/-, सर्व्हिस टॅक्स रु.381-19 पैसे, सेस टॅक्स रु.11-43 पैसे, फायनान्स चार्जेस रिटेल रु.2731-16 पैसे, फायनान्स चार्जेस कॅश रा.480-82 अशी वेगवेगळया स्वरुपात आकारणी केली आहे, जी अयोग्य आहे. सदर रक्कम भरणेसाठी जाबदार बँकेकडून वारंवार फोन करुन मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच तक्रारदार यांनी बँकेत जाऊन आपल्या क्रेडीट खात्याचा उतारा मिळणेबाबत लेखी मागणी करुनही त्यांना खाते उतारा दिलला नाही. ही सदोष ग्राहक सेवा जाबदार तक्रारदारांना देत असलेने, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.7,000/- तक्रारखर्च रु.5,000/- योग्य तपशीलासह अकाऊंट स्टेटमेंट व मागणीची रक्कम अवाजवी असल्याबाबत आदेश होऊन मिळावा अशी तक्रारदाराने मंचाला विनंती केली आहे.
3. तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र, तक्रारदाराचे नावे असलेले क्रेडीट कार्डची झेरॉक्स, जाबदार बँकेने पाठविलेले क्रेडीट कार्ड स्टेटमेंट, सोने खरेदी पावती, पैसे जमा केलेच्या पावत्या, क्रेडीट कार्डचे अकाऊंट स्टेटमेंट मिळणेबाबतचे पत्र इ. कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल केलेली आहेत.
4. जाबदार यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारदाराच्या तक्रारीमधील कलम 1 मधील कथन सर्वसाधारण मान्य केले आहे यावरुन तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे. आपले म्हणणेच्या पुष्ठयर्थ जाबदार यांनी बँक स्टेटमेंट दाखल केले आहेत.
5. तक्रारदार यांची तक्रार, लेखी पुरावे, जाबदारचे म्हणणे, या संदर्भात अवलोकन करता तसेच दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन करता व तक्रारदार व जाबदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमंचापुढे निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय |
3 | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1, 2 व 3
i. तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे हे जाबदार यांनी नि.11 मध्ये आपल्या लेखी उत्तरात मान्य केले आहे. तक्रारदार हा जाबदार बँकेचा ग्राहक असून त्याचे सेव्हिंग्ज खाते क्र. 02222000009753 असे आहे. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवादार असे नाते प्रस्थापित होत आहे.
ii. तक्रारदार यांनी दि.4/5/2010 रोजी रक्कम रु.84,445/- चे सोने नि.4/3 वरील बिलानुसार मे.पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांचेकडून खरेदी केले. त्यानंतर सोन्याची रक्कम व त्यावर होणा-या व्याजाची रक्कम जमा केली नाही असे जाबदारचे म्हणणे निखालस खोटे वाटते कारण तक्रारदार यांनी नि.4/4 ते 4/9 वर जाबदारांकडे पैसे भरल्याच्या पावत्या पुराव्यादाखल सादर केलेल्या आहेत.
iii. क्रेडीट कार्ड स्वीकारताना तक्रारदारांकडून फॉर्म भरुन घेतल्याने व त्यावर तक्रारदारांची सही असलेने त्यांना क्रेडीट कार्ड व्यवहारासंबंधी अटी मान्य आहेत हे जाबदारचे कथन अयोग्य वाटते कारण तो विहीत नमुन्यातील फॉर्म पुराव्यासाठी मंचासमोर दाखल करणे गरजेचे होते तशी कोणतीही कागदपत्रे जाबदार यांनी दाखल केलेले नाहीत.
iv. ग्राहकाला अकाऊंट स्टेटमेंट मागण्याचा किंवा आकारण्यात आलेल्या चार्जेसचा योग्य तो खुलासा करुन देण्याचा अथवा माहिती देणेची वैधानिक आणि नैतिक जबाबदारी ही जाबदारांची होती मात्र ती त्यांनी टाळलेली असून ही सेवेतील त्रुटी आहे असे मंचास वाटते.
v. तक्रारीस कारण घडलेले नाही हे जाबदारांचे म्हणणे म्हणजे पर्यायाने आपली जबाबदारी न स्वीकारणे किंवा आपल्या चुकीचे परिमार्जन तक्रारदारांवर फोडणेसारखे आहे.
vi. तक्रारदाराने जाबदार यांचेकडून क्रेडीट कार्डवरती सोने खरेदीसाठी रु.84,445/- घेतले क्रेडीट कार्डची मर्यादा रक्कम रु.1,00,000/- होती व त्यांची परतफेड रु.69,220/- तक्रारदारने केलेली आहे. बँकेने घेतलेल्या चार्जेसचे अवलोकन केले असता मुद्दलापेक्षा अन्य चार्जेसची रक्कम रु.1,26,065-24 ही अवाजवी वाटते कारण तक्रारदाराने जी रक्कम अदा (परतफेड) केली आहे. त्यांचे तुलनात्मक प्रमाण (Ratio) आणि चार्जेसची रक्कम यात निश्चितपणे तफावत दिसून येते.
vii. या तक्रारीत जाबदार यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत आहे व तक्रारदार हे जाबदार क्र.1 यांच्याकडून तक्रारीत विनंती केल्याप्रमाणे क्रेडीट कार्ड कर्जाची रक्कम अवास्तव असल्याने त्याचे योग्य ते माफक चार्जेस आकारुन घेणेस तसेच मानसिक त्रास, खर्च आर्थिक नुकसान भरपाई मिळणेस हक्कदार आहेत.
वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराला क्रेडीट कार्ड अकाऊंट स्टेटमेंटमध्ये दर्शविलेल्या रकमेतील इतर फायनान्स चार्जेस कमी करुन, ते नव्याने कॅलक्युलेट करुन कर्जफेडीची रक्कम निश्चित करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
3. तक्रारदार यांना जाबदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार माञ) अदा करावेत.
4. तक्रारदार यांना जाबदार यांनी तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार माञ) अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 15/03/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.