::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 21.03.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. तक्रारदार यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 चा लेखी जबाब, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर व तक्रारकर्ते यांचा तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन करुन खालील प्रमाणे निर्णय पारीत केला. कारण विरुध्दपक्ष क्र. 2 ला मंचाची नोटीस प्राप्त होवूनही ते मंचासमोर हजर झाले नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालेल, असे आदेश मंचाने दि. 15/9/2016 रोजी पारीत केले होते. तसेच सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 यांना संधी देवूनही त्यांनी योग्य ते दस्त दाखल करुन, अंतीम युक्तीवाद केला नाही, त्यामुळे तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले सर्व दस्त व विरुध्दपक्ष क्र. 1 चा लेखी जबाब मंचाने काळजीपुर्वक तपासला.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांना हे कबुल आहे की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 / डिलर कडून विरुध्दपक्ष क्र. 2 निर्मित चारचाकी वाहन “ Mahindra KUV 100 K8 MFALCON D 75 65 RWT” हे दि. 28/3/2016 रोजी दाखल बिल रकमेनुसार खरेदी केले होते. म्हणून अशा परिस्थितीत तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. दाखल सदर वाहनाच्या बुकलेट मधील माहीती ही विरुध्दपक्ष क्र. 1 यांना कबुल आहे.
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, सदर बुकलेट मध्ये वादातील वाहनाची सर्व माहीती, म्हणजे वाहनाची किंमत, फोटो, मायलेज ई. संबंधी पुर्ण माहीती आहे व वाहन खरेदी करतांना, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी बुकलेट मधील माहीती खरी असून, त्यानुसार सदर वाहन हे एक लिटर डिझेल मध्ये 25.32 कि.मी. एव्हरेज मायलेज देईल, असे आश्वासन दिले होते, मात्र तक्रारकर्ते यांच्या असे निदर्शनास आले की, सदरहु वाहनाचे अॅव्हरेज मायलेज हे प्रतिलिटर डिझेल 11 ते 12 कि.मी. आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 शी संपर्क साधला असता, त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने त्याचे वाहन दि. 13/4/2016 रोजी व दि. 30/4/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या वर्कशॉप मध्ये नेले असता, तेथील इंजिनिअरने स्वतःहुन मायलेज काढले व ते दि. 13/4/2016 रोजी 11 कि.मी. निघाले व दि. 30/4/2016 रोजी 13.75 कि.मी. प्रती लिटर निघाले, तशी नोंद जॉबकार्डवर आहे. त्यानंतर गाडीचे ऑईल, सर्वीसिंग झाली, पण बुकलेट मधील माहीतीनुसार 25.32 कि.मी. प्रतिलिटर मायलेज देण्यास वाहन असमर्थ ठरले. ही फसवणूक व सेवा न्युनता आहे. म्हणून प्रार्थनेनुसार विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर वाहन बदलुन द्यावे किंवा वाहनाची पुर्ण किंमत सव्याज, नमुद इतर नुकसान भरपाई, प्रकरण खर्चासह द्यावी.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथनाला विरुध्दपक्ष क्र. 2 / वाहन निर्माता यांचेकडून नकारार्थी कोणतेही कथन रेकॉर्डवर उपलब्ध नाही व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी अंतीम युक्तीवाद, संधी देवूनही केला नाही. अशा परिस्थितीत मंचाने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या लेखी जबाबातील विधाने तपासली आहेत, त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे असे कथन आहे की, कोणत्याही वाहनाची भारतामध्ये मार्केटींग व विक्री करतांना सरकारने प्रमाणित केलेल्या टेस्टनुसारच वाहनाचे अॅव्हरेज काढल्या जाते व ही टेस्ट सरकारी प्रयोगशाळेत नियंत्रीत वातावरणात, वाहनाचे वातानुकूलीत यंत्र बंद करुन घेतली जाते. सदर वाहनाची इंधन क्षमता ही वातानुकूलीत यंत्र बंद करुन घेतली जाते व सदर वाहनाची क्षमता ही वातानुकुलीत यंत्राचा वापर, रहदारीची परिस्थितीती, गैरजरुरी वाहन थांबविणे व वाहन चालु स्थितीत एकाच जागी ब-याच वेळ उभे ठेवणे, वाहनाच्या सिस्टीम मध्ये नियमीतता नसणे व वाहन चालविण्याची पध्दत ई. यावर अवलंबुन असते, परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी ही बाब सिध्द करण्यासाठी कोणतेही दस्त दाखल केले नाही, शिवाय तक्रारकर्त्याच्या प्रकरणात वाहन हे दि. 28/3/2016 रोजी खरेदी केलेले आहे व त्यानंतर एका महिन्याच्या आंतच विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी वरील नमुद मायलेज काढले असता ते बुकलेटवर नमुद एव्हरेजपेक्षा कमी भरले, असे दाखल दस्तावरुन दिसून येते. त्यामुळे या अल्प कालावधीत विरुध्दपक्ष क्र. 1 चे वरील मुद्दे तक्रारकर्ते यांच्या बाबतीत लागु पडणार नाही, तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 च्या मते सदर वाहनाचा 25.32 कि.मी. प्रतीलिटर अॅव्हरेज, हा वाहनाच्या आयडीयल परिस्थितीत आहे. परंतु ही पण बाब तक्रारकर्त्याचे वाहन नवीन असल्यामुळे लागु पडत नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 चे असेही कथन आहे की, त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर वाहन हे विरुध्दपक्ष क्र. 1 कडे जनरल चेकअप करिता व तिस-या फ्री सर्व्हीसींगच्या वेळेस आणले होते, परंतु त्यावेळेस त्याने अॅव्हरेज बद्दल तक्रार नोंदविली नव्हती, मात्र ही पण बाब विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी कागदोपत्री, पुराव्याद्वारे सिध्द केली नाही. फक्त विरुध्दपक्ष क्र. 1 चे कथन, जसे की, त्यांनी लेखी जबाबात अशी हमी दिली की, ते तक्रारकर्त्याच्या वाहनाचा अॅव्हरेज मायलेज प्रतीलिटर 20-21 पेक्षा जास्त काढून देण्यास तयार आहेत. म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्ते यांचे वाहन तपासून, हमीनुसार अॅव्हरेज हे निःशुल्क काढून देवून तसा स्वयंस्पष्ट अहवाल तक्रारकर्ते यांना दिल्यास ते योग्य होईल. मात्र जर विरुध्दपक्ष क्र. 1 हे असमर्थ ठरले तर तक्रारकर्ते यांना पुनः नव्याने प्रकरण मंचात दाखल करण्याची मुभा राहील. कारण हया बाबीवरुन तक्रारकर्ते यांची प्रार्थना क्र. 1 मंचाला मंजुर करता येणार नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थीक नुकसान भरपाईपोटी, सदर प्रकरणाच्या न्यायीक खर्चासह रक्कम रु. 8000/- द्यावी, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे पारीत केला.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार प्रार्थना क्लॉज क्र. 2 नुसार विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्ते यांच्या वादातील वाहनाचा अॅव्हरेज मायलेज प्रतिलिटर 20-21 कि.मी. पेक्षा जास्त, निःशुल्क काढून द्यावा व तसा स्वयंस्पष्ट अहवाल तक्रारकर्त्यास पुरवावा.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे, तक्रारकर्ते यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 5000/- ( रुपये पांच हजार ), तसेच सदर प्रकरणाचा न्यायिक खर्च म्हणून रक्कम रु. 3000/-( रुपये तिन हजार फक्त ) द्यावी.
- सदर आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावी.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.